शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1692

मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन

मुंबई, दि. १ : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया येथे दि. ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, ४७० परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तसेच, राजघराण्यातील मान्यवर, परकीय वकीलातीतील राजदूत इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. केसरकर यांनी आज दिली.

उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे हा देखील हेतू असल्यामुळे, परेदशातील निमंत्रित उद्योजकांसमवेत संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ०६ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा देखील या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरीक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरीक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे.

संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी जनांची अभिरुची लक्षात घेऊन संमेलनाच्या दि. ४, ५ व ६ जानेवारी २०२३ या दिवशी संध्याकाळी ६ नंतर अनुक्रमे चला हसू या, सांस्कृतिक संचालनालयाचा महासंस्कृती लोकोत्सव आणि मराठी बाणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक संचालनालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध सांस्कृतिक पैलू सादर केले जातील. यातील ‘महाताल’ वाद्यमहोत्सवात १५ वेगवेगळ्या दुर्मिळ वाद्यांचे सादरीकरण ५० कलाकारांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण व सर्व वाद्यांच्या तालावर महाराष्ट्र गीताचे सादरीकरण होईल ‘वाद्य जुगलबंदी’मध्ये ढोलकीची जुगलबंदी, संबळ व हलगी या वाद्यांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. ‘महासंस्कृती लोकोत्सव’मध्ये महाराष्ट्रातील भक्ती संस्कृती, जागर, आदिवासी संस्कृती, बंजारा नृत्य तसेच शिवकालीन लोककला, कोळीगीते, बोहाडा व सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायं. ६ ते १० या वेळेतील कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

000

उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.१: राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले की, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६  खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार असून या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा ज्योत तयार करण्यात आली आहे. मुख्य क्रीडा ज्योत ही रायगड येथून प्रज्वलित केली जाईल. राज्याच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणापासून क्रीडा ज्योत पुणे येथे आणली जाणार आहे. या सर्व ज्योतींचे एकत्रिकरण करून ही क्रीडा ज्योत मिरवणुकीने पुणे शहरातून शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणली जाईल व स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी मुख्य कार्यक्रमस्थळी असलेली ज्योत प्रज्वलित केली जाईल. याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली असून सर्व स्पर्धास्थळे स्पर्धा आयोजनाकरीता सज्ज झालेली आहेत. शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३९ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा संघटना अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता झटत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगणे, खेळाडूंची स्पर्धेकरीता वाहतूक, स्वयंसेवक, पदके आदी बाबी सर्वोत्कृष्ट स्वरूपाच्या होतील याकरीता प्रत्येक बाबीकडे जातीने लक्ष पुरविले जाते आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण,  रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करणाऱ्या जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धा आयोजनास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून १९ कोटी रुपये इतकी तरतूद देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धेकरीता कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही शासनाने दिलेली असून राज्यातील खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविण्याकरीता आवाहन केले आहे.

या स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल व भविष्यात या खेळाडूंच्या कामगिरीचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, असेही श्री. राव यांनी सांगितले.

श्री.दिवसे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.

श्री.शिरगावकर म्हणाले की, ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवी पहाट ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात क्रीडा विकासाला पोषक वातावरणाची निर्मिती होईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक देशातील सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.

0000

महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा: क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध

पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते १२ जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर शासनाच्या पुढाकाराने या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. ३९ क्रीडा प्रकारात राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी होणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशातील महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे. १९९४ मध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ‘कदम कदम पे नक्श है, विजय हमारा लक्ष है..’ हे स्वर जणू राज्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे होते. त्याच क्रीडा नगरीने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ती परंपरा पुढे नेण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची आहे.

खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे. मात्र शासनाने क्रीडा सुविधांचा विकास आणि प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिल्याने इतर खेळातही आपले खेळाडू आंतररराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करताना दिसत आहेत. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी तसेच खेळ व खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी २००१ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण आखण्यात आले. असे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

राज्याच्या क्रीडा लौकीकात भर घालण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘ऑलिम्पिक व्हिजन’ तयार करण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. त्यासोबतच शालेय आणि स्थानिक स्पर्धांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील शासनाने १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नुकतेच बालेवाडी येथे खेलो इंडिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा असेल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासोबत क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्याची क्षमता असलेले गुणवंत खेळाडू अशा स्पर्धांमधून पुढे येतात. त्यांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यासोबत नव्या दमाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्पर्धांना महत्त्व आहे.

बालेवाडी-म्हाळुंगे येथील १५३ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी हे देशाचे क्रीडावैभव आहे. सर्व प्रकारचे ऑलिम्पिक खेळ असणारे हे देशातील पहिले क्रीडासंकुल आहे. इथल्या अत्याधुनिक सुविधा लक्षात घेता या क्रीडानगरीत येऊन खेळ दाखविण्याचे स्वप्न राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. राज्यभरातील ३ हजार ८५७ पुरुष व ३ हजार ५८७ महिला खेळाडू असे एकूण ७ हजार ४४४  खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. स्पर्धेत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण १० हजार ४५६ जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात असा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिक असोसिएशनदेखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यातील आठ विभागीय मुख्यालयातून क्रीडा ज्योत स्पर्धास्थळी आणली जाणार असल्याने राज्यभरात क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रायगडावर प्रज्वलित करण्यात येऊन ५ जानेवारीला मिरवणूकीने ती क्रीडानगरीत येणार आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे, प्रतिष्ठा आहे हा संदेश यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे.

मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खेळाडूंना उत्तम संधी आणि योग्य मैदान मिळाले तर त्यांच्यातील प्रतिभा उंचावते, अशी संधी देणारी ही स्पर्धा आहे. यातून पुढे येणारे खेळाडू देशाचे नेतृत्व करतील आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येदेखील यश मिळवतील अशी अपेक्षा करीत त्यांना शुभेच्छा देऊया!

स्पर्धांची ठिकाणे

१. पुणे-ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग, स्क्वॅश, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटींग, गोल्फ, सॉफ्ट टेनिस

२. नागपूर- बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा

३. जळगांव – खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल

४. नाशिक- रोईंग, योगासन

५. मुंबई- याटींग, बास्केटबॉल

६. बारामती- कबड्डी

७. अमरावती- आर्चरी,

८. औरंगाबाद- तलवारबाजी

९. सांगली- कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत.  स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

000

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १ :- “स्वातंत्र्य संग्राम ते स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्षशील आणि ठाम भूमिका मांडणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘मन्याडचा वाघ’ म्हणून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा दरारा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ  आणि आणिबाणी विरुद्धचा लढा यात ते हिरिरीने सहभागी झाले. विधानसभेत कंधार भागाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केशवराव धोंडगे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि अगदी गुराखी यांच्यासारख्यांच्या प्रश्नावर  शेवटपर्यंत आपली आग्रही भूमिका मांडली. रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळातील त्याची समर्पक मांडणी यामुळे त्यांची भाषणं आजही मार्गदर्शक आहेत.  त्यांच्या निधनामुळे राजकारण, समाजकारणातील प्रेरणादायी, मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. अनेक सामाजिक चळवळींचा आधारवड नाहीसा झाला आहे असे सांगून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबाद, दि. 1: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.

या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

  • 600 पेक्षा जास्त स्टॉल्स
  • 99 विविध प्रात्यक्षिके
  • आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
  • शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण
  • यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
  • 32 विविध चर्चासत्रे
  • आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे राज्यस्तरीय उद्घाटन

 विशेष सहभाग

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ, मुंबई

000

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. १: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून भेट देत पाहणी केली. त्यानंतर  त्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार,  बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

यावेळी  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

000

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३१: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे २०२३ हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.३१ : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवार दि. ३१ रोजी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे, कार्बन डाय ऑक्साईडची पातळी आदी विषयक अचूक माहिती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता येणार आहे.  या हवामान केंद्रामुळे मुंबई हवामानाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर येणार असून ‘वेदर अंडरग्राउंड’ या जागतिक हवामान विषयक संस्थेच्या संकेतस्थळाशी जोडली जाणार आहे.

जागतिक हवामान बदल हे गंभीर आव्हान असून विद्यापीठे, शिक्षक व संशोधक यांनी या विषयावर निकडीने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

हवामान केंद्र स्थापना सोहळ्याला सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. पारोमिता सेन, प्रा. निल फिलिप, प्रा. ब्रायन वॉन हल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु कारभारी काळे तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

भारतात अशा प्रकारची ६ हवामान केंद्रे ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यात यापूर्वीच स्थापन करण्यात आली असून लवकरच एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू परिसर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील हवामान केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे प्रा. सेन यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले असून केंद्राच्या माध्यमातून मिळालेली हवामानासंबंधी माहिती राजभवनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.

ooo

Governor Koshyari unveils Weather Station at Raj Bhavan

Solar Powered Weather Station to provide accurate data of air quality, humidity, UV rays in Mumbai

A Solar Powered Weather Station for Climate Change Monitoring was installed in presence of State Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Sat (31 Dec).

The weather installation project is a collaboration with the City University of New York (CUNY) and IIT Bombay through their National Science Foundation collaborative grant project to monitor air pollution and weather on a micro-scale in Mumbai.

Prof Paramita Sen, Adjunct Lecturer. Department. Chemistry, Earth Sciences, and Environmental Sciences, City University of New York, Prof Neal Philip, Prof Brian Van Hull of City University of New York, Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor SNDT Women’s University, Prof Karbhari Kale, Officiating Vice Chancellor, Savitribai Phule Pune University and students from the Science, Technology and Public Policy Department of the City University of New York were present.

Addressing the invitees, the Governor said Climate Change is a serious challenge to the world. He called upon the University students to make it a mission to understand and address the various challenges arising from global climatic change.

According to Prof Paramita Sen, the Weather Station at Raj Bhavan will help measure accurately and access from anywhere the temperature, pollution levels, air quality, humidity, solar radiation, Ultraviolet Rays, Carbon Dioxide levels in Mumbai.

According to her, the weather data will be linked to the ‘Weather Underground’ network and will bring Mumbai on the world map of climate monitoring. She said that a similar Weather Stations will be installed at the Juhu Campus of SNDT WOmen’s University and the Savitribai Phule Pune University in the near future.

She informed the Governor that the US National Science Foundation International Science Experiences for Students had made a grant of $300,000 for the project, under which solar powered weather stations have already been set up in Telangana, Odisha, Andhra Pradesh and other places. The information available from the Weather Station will soon be made accessible from the website of Raj Bhavan, she said.

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दिनांक 30- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठीचे निर्णय घेतले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ देऊन प्रगतीच्या महामार्गावर आपल्या राज्याला नेऊया, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केले.

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तपशीलवार उत्तर दिले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात गेल्या सहा महिन्यात राज्यातील विविध घटकांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. विदर्भ विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, युवक, महिला, शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

नागपुरात झालेल्या या अधिवेशनात विदर्भासह राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका आम्ही मांडली. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत ही राज्य शासनाची भूमिका आहे. याच भूमिकेतून या भागातील प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहोत.  राज्य शासनाच्या कामाचा वेग जनतेने पाहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी कालावधीत नागरिकांच्या हिताचे सर्वाधिक निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना चौकटीबाहेर जाऊन बाहेर मदत केली. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना 755 कोटी रुपयांची मदत केली. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत आपण केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत देण्यात आली. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रती हेक्टरी बोनस जाहीर केला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 75 हजार जणांना नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याशिवाय दोन हजार अधिसंख्य पदे भरण्यात येणार आहेत. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून लाखो युवकांना संधी मिळणार आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी  सुरजागड प्रकल्पात खनिजाच्या उत्खननाबरोबरच खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प करीत आहोत, यामुळे गडचिरोलीची ओळख बदलणार आहे. हजारो  हातांना काम मिळणार आहे. राज्य शासनाने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले, त्यातील 44 हजार कोटींचे प्रकल्प एकट्या विदर्भातीलच आहेत, त्यामध्ये 45 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण विविध निर्णय घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचे उघडकीचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांनी स्थानिक गुन्ह्यांमध्ये पुढाकार घेऊन कारवाई केल्याने ही वाढ झाली आहे. राज्यात आता 18 हजार पोलीस भरती देखील सुरु केली आहे. दोषसिद्धीचे प्रमाण 60 टक्के इतके झाले आहे. गतवर्षीशी तुलना केली असता दोषसिद्धीचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले. ऑपरेशन मुस्कान मध्ये राज्यात 2015-22 कालावधीत मिसींग रेकॅार्डवरील 37 हजार 511 लहान मुले, मुली यांना पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महापुरुषांच्या अवमानासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करता येईल का किंवा सध्याच्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती अथवा सुधारणा करता येतील का यासाठी विधिमंडळातील सन्माननीय सदस्यांची समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

  • भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनविण्याच्या दृष्टीने लवकरच कार्यवाही. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
  • शिवसृष्टीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
  • पंढरपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास स्थानिकांना विश्वासात घेऊन करणार
  • राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाच्या घेतलेल्या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटी नागरिकांनी घेतला.
  • दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.
  • जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय सुरु करण्यात येत आहेत.
  • दिवाळीमध्ये नागरिकांना100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचे काम. याशिवाय दिवाळी सह इतर सर्व सण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले.
  • राज्यात सातशे ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’सुरू करण्याचा निर्णय. मुंबई मध्ये 50 दवाखाने सुरू केले.  त्याठिकाणी 147 प्रकारच्या विविध तपासण्या मोफत.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून हजारो गरजू रुग्णांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत. त्याची ऑनलाईन प्रक्रियादेखील सुरु.
  • गेल्या सहा महिन्यात राज्य शासनाने 18 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा निश्चय केला आहे.
  • जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू.
  • शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, जलसंपदा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक.
  • इंदु मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारत आहे. हे काम गतीने व्हावं यासाठी आपण स्वतः अनेकदा भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या महापुरुषांच्या स्मारकाच्या कामांना शासन गती देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला मी आवर्जून भेट दिली, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
  • श्री गुरु गोविंद सिंहजी आणि महाराष्ट्राचे नाते लक्षात घेता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून पाळण्याचा राज्य शासनाचा निर्णय.
  • निर्भया सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईसाठी तीन वर्षांकरिता 252 कोटी रुपये मंजूर.  निर्भया पथकासाठी 200 बोलेरो, 35 एर्टिगा, 200 अॅक्टिव्हा, 313 पल्सर बाईक खरेदी करण्यात येत आहेत.
  • सायबर गुन्ह्यांमध्ये नोव्हेंबर 2022 अखेर 454 आरोपींना अटक. ऑनलाईन जुगार नियंत्रणासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याचा विचार.
  • प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडस तयार करण्याचा निर्णय

000

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत

नागपूर, दि. 30 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा  उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...