शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1691

सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात  काढले. त्यांच्या हस्ते अकोला येथील एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सेवासदन संस्थेच्या डॉ. वसंतराव वांकर स्मृती  रंगमंचावरआयोजित या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, लेखक यशवंत कानेटकर, अनिरुद्ध देशपांडे,सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.

राज्यपाल पुढे म्हणाले, सेवा हाच परमधर्म मानून १९२७ पासून  सेवासदन संस्थेचे कार्य नागपूर शहरात  सुरु आहे. या संस्थेने  संस्थापक रमाबाई रानडे यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संस्कारक्षम  शिक्षणाचा नवा वस्तुपाठच या संस्थेने घालून दिला आहे. या  कार्याचा विस्तार होत असताना अन्य शैक्षणिक संस्थांनाही  हे कार्य मार्गदर्शक ठरणार आहे. पर्यायाने  शिक्षण  क्षेत्रात सेवासदनचे  मोठे योगदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन’ला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार

अकोला येथील ‘एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन’ला  राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमात रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष प्रांजली  जयस्वाल आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.

रमाबाई  रानडे  यांच्या स्मृती  प्रित्यर्थ  दरवर्षी २ जानेवारीला  सेवासदन संस्थेच्यावतीने  नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना हा मानाचा पुरस्कार  प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे ८वे वर्ष आहे. ५१ हजारांचा धनादेश व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार प्राप्त एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशनने  अकोला जिल्ह्यातील अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले. जिल्ह्यातील आठ वस्तींमध्ये  संस्थेतर्फे संस्कार व अभ्यासवर्ग चालविण्यात येतात. व्यसनमुक्ती  पुनर्वसन आणि समुपदेशनाचे कार्यही केले जाते. चाइल्ड हेल्प लाईनच्या माध्यमातून संस्थेने १६४ बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत  सुखरूप पोहचवले आहे.

कांचन गडकरी यांनी  प्रास्ताविक केले.यशवंत कानेटकर व अनिरुद्ध देशपांडे यांनी  मार्गदर्शन केले.                                         ०००००

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा-विभागीय आयुक्त

अकोला, दि.2 (जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आढावा बैठकीत दिले

जिल्हाधिकारी यांच्या दालनात अमरावती विभाग पदविधर मतदारसंघ निवडणुक संदर्भात आढावा घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे, सहा.पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदि उपस्थित होते.

पदविधर निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र, वाहन व्यवस्था, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उपलब्धतेबाबत पूर्व तयारी ठेवावी. मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदारांची संख्या वाढवावी.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आवश्यक ते उपाययोजना राबवावी. घोषित निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहितेप्रमाणेच  करावयाची असुन त्यात काटेकोर दक्षता पाळावयाची आहे, अस‍े निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले.

निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असून मतदार नोंदणी अंतिम टप्यात चालू असल्याचे माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा

पुणे, दि. 2: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपवसंरक्षक राहुल पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याचा आढावा, एकलव्य कॉलेज ते मुंबई- पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्ता याबाबत आढावा घेतला. जनतेच्या सोयीसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांना गती द्यावी. कोठे भूसंपादनाचे अडथळे असतील तर सहमतीने मार्ग काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याअंतर्गत विकास योजनेच्या मान्य विकास आराखड्यानुसार आंबेडकर चौक ते गोपीनाथ नगर कोथरुड पर्यंत 30 मी. डी. पी. रस्त्यांची लांबी सुमारे 1 हजार 800 मी. इतकी आहे. या रस्त्याच्या सद्यस्थितीमध्ये डोंगर उतार व मोठ्या प्रमाणात पातळी कमी जास्त आहे. त्यामुळे नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोथरुड व कर्वेनगर भागातील प्रवासाचे अंतर कमी होवून कर्वेरस्ता (एन.डी.ए. रस्ता) रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सेवा रस्ता 15 मी रुंदीचा आहे. या रस्त्याची लांबी शांतिबन चौक ते एकलव्य कॉलेज 250 मी व एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सर्विस रस्त्यापर्यंत 360 मी असा एकूण 610 मी लांबीचा आहे. या लांबीपैकी एकूण विकसित झालेल्या रस्त्याची लांबी सुमारे 540 एवढी आहे. विकसन न झालेल्या रस्त्याची बाधित मिळकत भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा रस्ता विकसित झाल्याने चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास तसेच या रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना प्रमथेश सोसायटीतील खाजगी रस्ता न वापरता सदर रस्त्याच्या वापर करून पुणे मुंबई सेवा रस्त्यास जाणे सोयीचे होणार आहे.

बालभारती ते पौड फाटा या 30 मी रुंद विकास आराखड्यातील रस्त्या रस्त्याची एकूण लांबी सुमारे 2.10 कि.मी. आहे. हा रस्ता विकसित झाल्याने लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणेस मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्त्याच्या अनुषंगानेही यावेळी आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेला राष्ट्रीय स्मारक करणे, पी.एम.सी. व स्वच्छ संस्थेचे मॉडेल व घनकचरा व्यवस्थापन, सिंहगड कॉलेज परिसर व आंबेगाव बु. येथील समस्यांबाबत बैठक, कोथरूड येथील गदिमा स्मारकाचे काम आदींबाबतही आढावा घेण्यात आला.

****

विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २ : जिल्ह्यातील लोकहिताची विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या योजना यशस्वीपणे विहित मुदतीत कार्यरत व्हाव्यात यासाठी संबंधित विभागांनी व यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी व मुंबई शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ चा आढावा घेण्यात येऊन लोकहिताच्या विविध कामांना निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने पोलीस वसाहतीसाठी शासनाने मान्यता दिलेल्या ३१.५० कोटींच्या निधीतून वाडी बंदर पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६.१९ कोटी रुपये, शिवडी पोलीस वसाहतीसाठी ४.९९ कोटी, ताडदेव पोलीस वसाहतीसाठी २.४६ कोटी, बॉडीगार्ड पोलीस वसाहतीसाठी २.५० कोटी, भायखळा पोलीस वसाहतीसाठी २.६० कोटी, काळाचौकी पोलीस वसाहतीसाठी ५.१० कोटी तर डोंगरी पोलीस वसाहतीसाठी १.९२ कोटी असे एकूण २५.७६ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून या निधी अंतर्गत तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शासकीय रुग्णालयांना यंत्र सामग्री व इतर सुविधा

या योजनेअंतर्गत जे. जे. हॉस्पिटलला कॅथलॅबसाठी ५.७८ कोटी रूपये, गोकुळदास तेजपाल रूग्णालयाला एमआरआय, एक्स-रे मशीन व सिटीस्कॅन मशीनसाठी १३.५७ कोटी, कामा व अल्ब्लेस रूग्णालय येथे आयव्हीएफ केंद्रासाठी ४.६३ कोटी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला डेंटल व्हॅन व यंत्रसामग्री साठी २.०४ कोटी तर सेंट जॉर्ज रुग्णालयाला यंत्रसामग्री व औषधीसाठी ४.१५ कोटी असा एकूण ३५.९५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. म.आ. पोद्दार रुग्णालय येथील केंद्रीयकृत रोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करणे तसेच रक्त तपासणी प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी एक कोटी व बांधकामासाठी २.८२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमधील बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅशियम हॉल व व्यायाम शाळा, आर्ट गॅलरी, लायब्ररी, ओपन बाल्कनी, स्टोअर रूम, स्विमिंग पूल, चेंजिंग रूम या बाबी अद्ययावत तयार करण्यासाठी ३.८५ कोटी रुपयांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला.

नागरी दलितेतर पायाभूत सुविधांसाठी ९६.११ कोटी, अंगणवाडी येथील सोयी सुविधा अंतर्गत २० अंगणवाड्या स्मार्ट करणे व ८० अंगणवाड्यांना जादुई किलबिल खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी २.४८ कोटी, महिला व बाल सशक्तीकरण योजनेअंतर्गत उमरखाडी येथील बालसुधारगृहात नुतनीकरणासाठी ४.७० कोटी तसेच डेव्हिड ससून येथील बालसुधारगृहास ३.३१ कोटी रूपये मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी २.५० कोटींच्या निधीस मंजुरी देऊन १.५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर राज्य ग्रंथालय एशियाटिक लायब्ररीच्या नुतनीकरणासाठी ४० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मत्स्य विकास कार्यक्रमअंतर्गत सागरी मच्छीमारांना शीतपेटीसाठी ३४ लक्ष तसेच माहीम नाखवा मच्छीमार सहकारी संस्था, माहीम कोळीवाडा येथे जेट्टीचा प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी २.३१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

शासकीय महाविद्यालयांचा विकास या योजनेअंतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालयासाठी २.६३ कोटी, शासकीय विज्ञान संस्थेसाठी २.७८ कोटी, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेसाठी ४४ लक्ष, सिडनहॅम व्यावसायिक उद्योग शिक्षण व संशोधन संस्थेसाठी ४७ लक्ष, सिडेनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयासाठी २० लक्ष, राज्य प्रशासकीय संस्थेसाठी २९ लक्ष तर शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी ३५ लक्ष असा एकूण ७.१४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंत्रसामग्री पुरवणे व आधुनिकीकरण करणे यासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप इमारतीसाठी ७८ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

000

मराठी भाषेच्या वैश्विक स्तरावर प्रचार व प्रसारासाठी मुंबईत “मराठी तितुका मेळवावा” विश्व मराठी संमेलन

मुंबई, दि. २ : मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व मराठी संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया (NSCI) येथे दि. ४ ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत हे विश्व मराठी संमेलन होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात मंत्री दीपक केसरकर यांनी “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारांशी आज संवाद साधला.

मंत्री श्री.  केसरकर म्हणाले की, हे संमेलन म्हणजे मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा यांचा वैश्विक पातळीवर होणारा भव्य दिव्य उत्सव असणार आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि एकूणच मराठीवर प्रेम करणाऱ्या, महाराष्ट्राबाहेर  असणाऱ्या सर्व मराठी भाषिकांनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही  मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील अन्य विभागाचे मंत्री तसेच केंद्रीय मंत्री हे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहित  मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

जगभरातील विविध देशांमध्ये तसेच विविध राज्यांमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या मराठी भाषिकांनी एकमेकांमध्ये संवाद साधावा, विचारांचे व कल्पनांचे आदान – प्रदान व्हावे. सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून वैश्विक मराठी व्यासपीठ मिळेल. लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा सुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरिक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरिक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्व मराठी संमेलनात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची विस्तृत माहिती मराठी तितुका मेळवावा https://www.marathititukamelvava.com या संकेतस्थळावर  पाहता येईल आणि संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी  या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९१ ९३०९४६२६२७ आणि ९१ ९६७३९९८६०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल.

संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा

संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 4 जानेवारी रोजी लेझीम पथक, ढोलताशा पथक, मर्दानी खेळ यांच्या साथीने संमेलनाचे उदघाटन होणार आहे. उपस्थित मंत्री महोदय, मान्यवर मंडळी आणि निमंत्रितांचं स्वागत मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सत्रात नचिकेत देसाई, केतकी भावे – जोशी, माधुरी करमरकर, मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे हे गायक कलाकार काही अजरामर मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग कलेचे हा वंदना गुप्ते, नीना कुळकर्णी, शिवाजी साटम, अशोक पत्की अशा सिने-नाट्य सृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहेत.तसेच लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल आज उद्या हा परिसंवाद होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे या परिसंवाद सत्राच्या अध्यक्ष असून याप्रसंगी त्या साहित्याविषयी आपल मनोगत व्यक्त करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे.

दुपारच्या सत्रात १० विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे. यात लेखिका, पटकथाकार मनीषा कोरडे, भाषा तज्ञ अमृता जोशी, झी स्टुडियोच्या क्रिएटिव्ह हेड वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीम गोकर्ण, अॅड. दिव्या चव्हाण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत, पहिली कॅमेरा वूमन अपर्णा धर्माधिकारी या मान्यवर महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन अभिनेत्री समिधा गुरु करणार आहे. संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम होईल ज्यात नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, उर्मिला धनगर, वैशाली भैसने माडे हे कलाकार असतील व त्यानंतर चला हसुया या विनोदी कार्यक्रमाचं सादारीकरण होईल. या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या फेम सर्व कलाकारांचा सहभाग असणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात स्वर अमृताचा ही मराठी भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यसंगीताची मैफल सादर होणार आहे. यात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडिलकर आणि उत्तरा केळकर हे दिग्गज सहभागी असणार आहेत. त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढे हे परिसंवाद सत्र होईल. या सत्रात चितळे डेरीचे गिरीश चितळे आणि हावरे इंजिनिअर्स आणि बिल्डर्सच्या उज्ज्वला हावरे हे भारतातील २ नामवंत उद्योजक आणि “जर्मनीतील ओंकार कलवडे, सॅनफ्रान्सिस्कोतील प्रकाश भालेराव हे भारताबाहेरील २ उद्योजक सहभागी होतील. तसेच विविध क्षेत्रात आकाशझेप घेतलेल्या आणि मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हे दाखवून देणाऱ्या काही मराठी मान्यवरांच्या मुलाखती होणार आहेत. या कार्यक्रमात BMM अध्यक्ष संदीप दिक्षित, पूर्णब्रम्हच्या जयंती कठाळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अॅड गुरु भरत दाभोलकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहेत.

दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर विविध लोकवाद्यांची मैफल, वाद्यमहोत्सव महाताल सादर होईल. तसंच रसिकांना आपल्या चिंता विसरून हास्याच्या विश्वात नेणारे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार काही विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन दिप्ती भागवत करणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात कृष्णा मुसळे आणि निलेश परब यांची अनोखी वाद्य जुगलबंदी सादर होणार आहे. तसंच २०० ते २५० कलाकारांच्या साथीने महासंस्कृती लोकोत्सव हा भव्य कार्यक्रम सादर होणार आहे.

संमेलनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात पारंपरिक वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवणाऱ्या वारकरी दिंडीने होईल. त्यांनतर मराठी खाद्यसंस्कृती लोकांसमोर यावी आपले विविध पारंपरिक पदार्थ उपस्थितांना पाहता यावे या दृष्टीने एक पाककला स्पर्धा पार पडणार आहे. यानंतर इन्व्हेस्टर मीट हे अगदी महत्त्वपूर्ण सत्र पार पडणार आहे. भारतातील आणि भारताबाहेरील उद्योजक यावेळी एकत्र येणार आहेत आणि उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या सत्रात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री अशा अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आलेल्या सर्व उद्योजकांशी आणि गुंतवणूकदारांशी विशेष संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात आनंदयात्री हा कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमातून प्रसिद्ध कलाकार ऐश्वर्या नारकर, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे मराठी साहित्यातील काही अजरामर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करतील तर सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी गाजलेली मराठी गाणी सादर करतील. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक करणार आहेत.

यानंतर गप्पाष्टक हा मुलाखतीचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात नेमबाज अंजली भागवत, सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने, चित्रकार सुहास बहुळकर, लेखक आणि आयटी तज्ञ अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. तसंच सोनाली कुलकर्णी आणि संस्कृती बालगुडे या सुप्रसिद्ध अभिनेत्रींचा लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केलं आहे. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे करणार आहे.

000

जयस्तंभ अभिवादन सोहळा : उत्तम नियोजन आणि समन्वय

पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्तम नियोजन,अनुयायांची शिस्त, त्यांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोहळ्यासाठी सहकार्य करणारे अनुयायी, विविध संस्था-संघटना आणि ग्रामस्थांना त्यासाठी विशेष धन्यवाद दिले.

सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्याने यावर्षी अधिक प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोहळ्यासाठी अधिकच्या सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि कार्यक्रमस्थळी विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या. पूर्वतयारी करताना विविध संघटनांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले.

पोलीस दलाची चांगली कामगिरी

सोहळ्यासाठी ८ हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, ७४६ होमगार्ड्स आणि राज्य राखील दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे शहरचे साडेपाच हजार तर पुणे ग्रामीणचे २ हजार ७०६ पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात होते.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे १८५ सीसीटीव्ही आणि ३५० वॉकीटॉकी, ६ व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. एवढा मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण करताना पोलीस काही ठिकाणी अनुयायाना सहकार्य करतांनाही दिसत होते.

पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, १० ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, १० दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सलग ३० तास बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनतळाची तत्परतेने व्यवस्था

सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरितीने केले. रस्त्याची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण अशी कामे अत्यंत कमी वेळात त्यांनी पूर्ण केली. चार ठिकाणी हायमास्ट, पीए सिस्टीम, २७ ठिकाणी स्वतंत्र जनित्राची व्यवस्था करण्यात आली. पूर्व विभागातर्फे सुमारे २ लाख चौरस मीटरचे ८ वाहनतळ तयार करण्यात आले होते. विविध विभागांसाठी आश्यक सुविधाही निर्माण करण्यात आल्या. दक्षिण विभागातर्फे ६० एकर परिसरात १४ वाहनतळ तयार करण्यात आले.

स्वच्छ आणि आरोग्यदायी सोहळा

जिल्हा परिषदेची आयोजनातली भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ठ्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीतून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून ३ टन ओला आणि ८ टन कोरडा कचरा संकलीत करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचाकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास प्रयत्न करत होते.

विशेषत: जयस्तंभ व वाहनतळ परिसरातील १ हजार ५०० शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चांगल्यारितीने केले. ५ झेटींग यंत्र व मैला बाहेर काढण्यासाठी १५ सक्शन यंत्राचाही उपयोग करण्यात आला. शौचालयाचे ठिकाण नागरिकांना कळावे यासाठी आकाशात बलून सोडण्यात आले होते. हात धुण्यासाठी १५ हॅण्डवॉश स्टेशन बसविण्यात आले.

महिलांसाठी विशेष व्यवस्था

स्तंभ परिसर आणि वहानतळाच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचा १६८ महिलांनी लाभ घेतला. कक्षात माता व बालकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. कक्षासाठी ३१ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

बीएसएनएलतर्फे माध्यम कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यावर्षी कॉलड्रॉपच्या तक्रारी आल्या नाहीत. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सकाळी ६ ते १२ या वेळेत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समाज माध्यमाद्वारेदेखील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्याने येथे येऊ न शकलेल्यांना घरबसल्या सोहळा पाहता आला.


सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरितीने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. विविध संघटनांशी समन्वय साधल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ सारख्या संस्थांचेही आपत्तीव्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने अखंडीत वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.

अनुयायांसाठी बसेसची सोय

पीएमपीएलतर्फे ३१ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ( शिक्रापूर ते कोरेगाव) ३५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढु या मार्गावर ५ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका ४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. १ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ते कोरेगाव ११५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्कींग ते वढु २५ बसेस द्वारे रात्री ११ पर्यंत सेवा देण्यात आली. दुपारी गर्दी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोणीकंद ते पेरणे टोलनाका मार्गावर १४० बसेस विविध वाहनतळावरून उलपब्ध करून देण्यात आल्या. पुणे ते लोणीकंद करीता सुमारे ९० बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, पिंपरी, अप्पर इंदिरानगर आदी ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आल्या. पीएमपीएमएलचे सुमारे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व २५ डेपो मॅनेजर, इंजिनिअर अधिकारी नेमण्यात आले होते. बसेच्या सुमारे १० हजार फेऱ्याद्वारे ५ लाख अनुयायांनी लाभ घेतला.

वाहनतळावरील नियोजनही उत्तम होते. सर्व वाहनांची शिस्तीत ये-जा सुरू असल्याने वाहतूकीसाठी कोणतीही अडचण आली नाही. वाहतूक शाखेनेदेखील या मार्गावरील वाहतूक वळवून योग्य नियोजन केले.

आरोग्य सुविधा आणि तत्पर उपचार

आलेल्या अनुयायांना आरोग्यसुविधेचाही चांगला लाभ झाला. ४८ रुग्णवाहिका, ७ कार्डीयाक रुग्णवाहिका, १० आरोग्यदूत आणि २१ पथकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिली. सुमारे २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित (सर्वांची प्रकृती स्थिर) रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.

यावर्षी पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती. त्यापैकी साधारण ६० ते ७० टक्के पाणी वापरले गेले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली होती.

 

समूह भावनेमुळे सोहळा यशस्वी

प्रशासनातील विविध यंत्रणा, विविध संस्था आणि अनुयायांनी संवेदनशीलतेने आपले कर्तव्य पार पाडताना समूहभावनेचा उत्तम परिचय दिल्याने हा सोहळा यशस्वी झाला असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद देताना हा सोहळा समन्वयाचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनुयायांसाठी स्वयंस्फुर्तीने भोजन, पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा आदी व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिकांनी आपल्या अंतिथ्यशिलतेचा परिचय देत अनुयायांचे स्वागत केले. एस्कॉनसारख्या संस्थेने पोलीसांच्या भोजनाची व्यवस्था केली. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.

000

सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलिसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई ,दि.२ : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना दुप्पट सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. पोलीसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आपल्या कृतीतून राज्य पोलिसांनी गीतेतील ‘परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृताम’ हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केल्या जातो, असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

दिनांक १ जानेवारी १८२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असताना बॉम्बे डिस्ट्रिक्ट पोलीस दलाची स्थापना केली होती. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य पोलीस दलाच्या अंतर्गत १२ पोलीस आयुक्तालय व ३७ जिल्हा पोलीस दल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांतर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले  व वरिष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व  शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कार्यक्रमाला बृहनमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

000

Maharashtra Governor attends State Police Day Raising function

Mumbai 2-  Governor Bhagat Singh Koshyari attended the Maharashtra Police Raising Day function organised by Maharashtra Police at the State Reserve Police Force Ground at Goregaon Mumbai on Monday (2 Jan).

Director General of Police Rajnish Seth, Commissioner of Police of Brihanmumbai Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, police jawans and their family members were present.

Speaking on the occasion, the Governor said he felt proud to be the Governor of a State that boasts of the best police force in the country.  The Governor called upon the State Police to harness Artificial Intelligence and other modern technological tools to tackle emerging challenges like Cyber Security, Drug menace, Naxalism and those coming from the coastal border. The Governor praised the State police for being the front line Covid warriors alongside doctors and nurses during the COVID 19 pandemic.

Earlier the Governor inspected the Ceremonial Parade and accepted salute presented by the marching columns of State Police. This year the police band presented a musical ensemble while a team of 46 commandos presented the Silent Arm Drill. The Dog Squad presented an impressive Dog Show on the occasion.

The Maharashtra Police Foundation Day is celebrated on 2 January to commemorate the presentation of the State Police Flag by then Prime Minister Pt Jawaharlal Nehru to Maharashtra Police on 2 January 1961.

000

सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक गमावला : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

मुंबई, दि.१: ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक आपण गमावल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मामी फिल्म फेस्टिव्हलची मूळ संकल्पनाच सुधीर नांदगावकर यांची. चित्रपट हा विशेष जिव्हाळ्याचा विषय.चित्रपट संस्कृतीच्या प्रचाराचा ध्यास घेतलेल्या श्री.नांदगावकरांनी अनेक चित्रपट महोत्सवांच्या आयोजनात सक्रिय योगदान दिले आहे. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली चळवळ म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा मानबिंदूच ठरली. फिल्म फोरम, प्रभात चित्र मंडळ, थर्ड आय चित्रपट महोत्सव या माध्यमातून नांदगावकरांनी जे कार्य केले ते तर  या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. चित्रपटांचे केंद्र दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे वळवण्यात त्यांच्या प्रयत्नांचा वाटा मोठा होता. दिग्दर्शक भारतत्न सत्यजित राय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ही त्यांची दैवते होती.  नांदगावकरांनी त्यांच्या समीक्षणातून सुसंस्कृतता व अभ्यासू वृत्ती कायम जपली . त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एक व्यासंगी विद्वान आपण गमावला आहे. नांदगावकर कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी मी आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

000

 

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले : मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १ :केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, केशवरावांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे. आपल्या विचारसरणीशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर ते आक्रमक राहिले. त्यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आप्तांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो आणि केशवरावांना सद्गती देवो अशी प्रार्थना त्यांनी करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

000

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला

मुंबई, दि. १ : केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत त्यांची भाषण त्या काळात प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला.

000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...