शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1690

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा-डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर, दि.4: हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी आज येथे केले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.

डॉ.सेनगुप्ता म्हणाले की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी लिपोप्रोटीन सारख्या नवीन जोखीम घटकांची लवकर ओळख आणि प्रतिबंध हे महत्त्वाचे आहेत. हार्टअटॅक ला जबाबदार पर्यावरणीय, वर्तणूकीय, रोगनियंत्रण (रक्तदाब-मधुमेह)  इ. घटक आहेत. यावर उपाय म्हणून दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीसाठी स्थिर बसल्यास थोड्या थोड्या वेळात चालावे. डिजिटल साधनाचा अतिवापर हा घातक आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.गुप्ता म्हणाले की,  मधुमेह 2021 मध्ये 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत होते. ही संख्या 2030 पर्यंत 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. रक्तातील ग्लुकोजचे लवकर निदान आणि नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांची शरीराची रचना बारीक असली तरी शरीरात फॅट्स चे प्रमाण भरपूर असते. मधुमेही व्यक्तीला आपण रोगी न म्हणता ‘पेशंट विथ डायबिटीज’ अस म्हणावं. रोगाचे निदान न होता तसेच इन्सुलिनचे प्रमाण माहिती नसल्यामुळे  मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास अनेक रुग्णांचे जीव वाचवता येतील,असे ते म्हणाले.सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.

पुरातत्व विभागाच्या ‘समृध्द भारतीय वारसा’ प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि.3 : भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने विद्यापिठाच्या आवारात ‘समृध्द भारतीय वारसा’ या विषयावर प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॅा.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.

कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र.कुलगुरु डॉ. संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. डॉ.सिंह यांनी त्याचे फित कापून उद्घाटन केले.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव, देशातील तसेच विशेषत: विदर्भातील पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणाऱ्या या प्रदर्शनाची राज्यमंत्री डॉ. सिंह यांनी पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या प्राचीन वस्तू संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.

तक्षशिला, हडपसर, ब्रम्हगिरी, कालीगंगा येथील उत्खननासह नागपूर जिल्ह्यातील अडम व मनसर तर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील उत्खनन व तेथे आढळून आलेल्या वस्तूंची चित्रे या प्रदर्शनात आहेत. मानवाची उत्पत्ती, प्राचीन काळातील अवजारे, सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या डोंगरांमधील कोरीव काम, नागपूर शहरातील वास्तूशास्त्रीय वारसा स्थळे, गोंडकालिन किल्ल्यांची चित्रे व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई, दि.३ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखांची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

0000

 

 

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी – चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहोचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ :- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

00000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवयित्री  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

0000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. 3 (जिमाका) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

“देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे होणार उद्घाटन

नागपूर, दि. 2 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून या संपूर्ण  उदघाटन सत्रामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन  सोहळा  सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवित आहे.  आरटीएमएनयूच्या  अमरावती मार्गावरील  परिसरामध्‍ये  हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

उद्घाटन सत्राला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि आरटीएमएनयू शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष,  नितीन गडकरी , यांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री, डॉ जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 विज्ञान काँग्रेसची संकल्पना ” महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” अशी आहे. या कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रे आणि प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी खुली आहेत.

108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तांत्रिक सत्रांची 14 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे आयोजित केली जातील.

या 14 विभागांव्यतिरिक्त, महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषद देखील भरविण्यात येणार आहे.

या सर्व सत्रांमध्ये नोबेल पारितोषिक विजेते; आघाडीचे भारतीय आणि परदेशी संशोधक; अवकाश, संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन यासह विविध क्षेत्रातील तज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होतील. तांत्रिक सत्रांमध्ये कृषी आणि वनीकरण विज्ञान, प्राणीशास्त्र, पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान, मानववंशशास्त्र आणि वर्तन विज्ञान, रसायनशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, पर्यावरणशास्त्र, माहिती आणि संप्रेषण विज्ञान आणि तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणिती शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, नवीन जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यामधील पथदर्शक आणि उपयोजित संशोधन प्रदर्शित केले जाईल.

महाप्रर्दशन “प्राईड ऑफ इंडिया” म्हणजेच ‘शान भारताची’  हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी आणि प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या जातील. यासह वैज्ञानिक जगाच्या पटलावर भारतातील शेकडो नवीन कल्पना, नवोपक्रम आणि उत्पादने एकत्र आणून प्रदर्शित केल्या जातील.

प्राईड ऑफ इंडिया हे सरकार, देशभरातील कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संस्था, नवोन्मेषक आणि नवउद्योजक यांची ताकद आणि उपलब्धी प्रदर्शित करते.

000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर व दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट

नागपूर, दि. 2 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली.  यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य  संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर कार्यालयास भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील दैनिक भास्कर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते दैनिक भास्कर समूहाच्या निर्णायक मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समूह संपादक प्रकाश दुबे, संचालक सुमीत अग्रवाल, माजी न्या.विकास शिरपूरकर, संपादक मणिकांत सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...