बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 168

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत. यामधील  बाधितांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

विरार – डहाणू येथील बाधित कुटुंबासोबतच इतर विषयांसंबंधात मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. बैठकीला आमदार मनिषा चौधरी, ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रेल्वेसाठी जमीन अधिग्रहीत केली जात असताना त्याठिकाणाच्या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. जर त्यांची घरे तिथे असतील तर त्याचा सर्व्हे करुन त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. जवळपास त्यांचे पुनर्वसन करता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे. यासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने धोरण ठरविण्यात आले, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

गणेश मंदीर ट्रस्टबाबत चर्चेनंतर निर्णय

बोरीवली येथील टीपीएस ३ भूखंडाला श्री गणेश मंदीर ट्रस्टचे नाव लावून जागा नियमित करण्यात यावी, अशी मागणी आमदार मनिषा चौधरी यांनी केली. तसेच १९७४ च्या टॅक्स नियमावलीप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी देखील केली. याबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे दिसत असून नियमानुसार किती कर लागू होऊ शकतो याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

अधिवेशनापूर्वी एन.ए. टॅक्सबाबत दुरुस्ती

मुंबई परिसरात एन. ए. टॅक्स नाही, तो रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश निघालेला नाही. त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचीही मागणी श्रीमती चौधरी यांनी केली. यावेळी जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी कायद्यामध्ये दुरुस्ती करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांचा प्राधान्याने विचार

समुद्राच्या किनाऱ्यावर मच्छिमार समाजासाठी राखीव असलेली जागा गावठाणात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाबाबतही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मच्छिमारांची सध्याची जागा ही सीआरझेडमध्ये येत असून समुद्राच्या किनारी गावठाण करणे शक्य नाही. यासाठी जवळपास जागा पाहून त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याबाबतही विचार करू असे स्पष्ट केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी – पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई दि. 07 :- राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठविण्यात आला आहे.

राज्यात 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून 77 हजार 53 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे 2025 रोजी संपत आहे. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता 13 मे 2025 पासून पुढे पंधरा दिवसाची मुदतवाढ केंद्र सरकारने वाढवून द्यावी, अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सन 2024 -25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्था मार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. त्या खरेदी केंद्रात आत्तापर्यंत 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून 77 हजार 53 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे.

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 7550 रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे बाजार भाव कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी व्हावी त्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  दि. ७  : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना  या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हणाले, गुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे.” या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का, याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.

गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो, ट्रेन, बस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

  • आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.
  • आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि ‘Go’ आयकॉनवर क्लिक करा.
  • ट्रामच्या चिन्हावर टॅप करून ‘Public Transport’ मोड निवडा.
  • सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.
  • एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.

विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१५० दिवसांचा आगामी कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा 

निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित करणार

मुंबई,दि.७ :  प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, राज्यस्तरांवरील सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण, धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा व अधिका-यांचा गुणगौरव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार यासह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसांचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा होता. लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटी) या तीन आधारांवर प्रशासनात पुढे जाणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत 10 प्रमुख मुद्यांवर सादरीकरण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने काम करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील 12 हजार 500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे. याच उपक्रमांत राज्याच्या 48 विभागांनी एक स्पर्धात्मक सादरीकरण सादर केले. प्रत्येक विभागाने स्वतः प्रश्नपत्रिका तयार केली व स्वतःच उत्तरंही दिली. 100 दिवसांमध्ये काय साध्य करणार हे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दाखवून दिली.प्रशासनात संरचनात्मक सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, दि.६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ हा पुढील 150 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे.  शासकीय सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये विविध उपक्रम राबविल्यास ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा तयार करणे सुलभ होईल. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मध्ये 16 शासकीय विभागांचे एकत्रीकरण करून संबधित विभागांचे सचिव (उदा. कृषी,आरोग्य) यामध्ये अल्प  व दीर्घ कालावधीत उद्दीष्ट आणि त्याची पूर्तता विभागातील आव्हाने, बलस्थाने यावर काम  करतील. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी हे असून 16 क्षेत्र आहे. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, भूमी, पाणी, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, कल्याण, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान, मानव संसाधन या विभागांचा समावेश आहे.२०२९, २०३५ आणि २०४७  अशा तीन टप्प्यात हे व्हिजन तयार करावे. १५० दिवसाच्या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणामध्ये  Ease of Living मध्ये कार्यालयीन सेवा अधिक सुलभ करणे, Ease of Doing Busines प्रत्येक व्यावसायिक सेवा अधिक सुलभ करणे, G2G – Ease of Working राज्याअंतर्गत आणि केंद्रांच्या विविध विभागांशी समन्वय साधणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाक आहेत दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.नागरिकांना मंत्रालयात यावे लागू नये यासाठी स्थानिक पातळीवरच आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, ही शासनाची भूमिका आहे,जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. या उद्दिष्टपूर्तीमध्ये  अनेक विभागीय धोरणे, लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या विभागाच्या कार्याचा गौरव करण्यात आला असू प्रेरणादायक हे कार्य आहे. याआधी ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम राबविले गेले. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. शंभर दिवसांचा आराखडा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 150 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

शंभर दिवसात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या विभाग आणि अधिका-यांचा गौरव

यावेळी राज्यातील सर्व विभागांचा शंभर दिवसांच्या कामांचा आढावा तसेच या कामाचा उत्कृष्ट रित्या पाठपुरावा करून सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रथम क्रमांक विजेते अधिकारी  यांनी त्यांनी केलेल्या कामांचे  सादरीकरण केले.

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग म्हणून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सचिव अनुप कुमार यादव, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर,कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभाग मंत्री जयकुमार गोरे,प्रधान सचिव एकनाथ डवले, परिवहन व बंदरे विभाग मंत्री नितेश राणे, अपर मुख्य सचिव बंदरे विभाग संजय सेठी यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे-रोहन घुगे, नागपूर विनायक महामुनी, नाशिक आशिमा मित्तल, पुणे-गजानन पाटील, वाशिम वैभव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर – विनय गौडा जी. सी., कोल्हापूर- अमोल येडगे, जळगाव -आयुष प्रसाद, अकोला – अजित कुंभार, नांदेड राहुल कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक, पालघर – बाळासाहेब पाटील, गडचिरोली -निलोत्पल, नागपूर (ग्रामीण) – हर्ष पोतदार, जळगाव – महेश्वर रेड्डी, सोलापूर (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर- मनीषा आव्हाळे, पिंपरी-चिंचवड शेखर सिंह, पनवेल मंगेश चितळे (तिसरा क्रमांक विभागून नवी मुंबई आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर मधुकर पाण्डेय, ठाणे श्री.आशुतोष डुंबरे, मुंबई रेल्वे डॉ. रवींद्र शिसवे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उपमहानिरीक्षक म्हणून परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, कोकण श्री संजय दराडे, नांदेड- श्री शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त, कोकण डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिक डॉ. प्रवीण गेडाम, नागपूर- श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम आयुक्त, संचालक  म्हणून संचालक, तंत्र शिक्षण विनोद मोहितकर, आयुक्त, जमाबंदी डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, आदिवासी विकास श्रीमती- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण   जीवनोन्नती अभियान श्री निलेश सागर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण श्री राजीव निवतकर यांचा सत्कार करण्यात आला.

शंभर दिवसाच्या कार्यक्रमात  १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभाग

अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग – दिपक कपूर, अपर मुख्य सचिव खनिकर्म विभाग व  गृह विभाग- इक्बालसिंह चहल,अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग – विकास खारगे,अपर मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, बंदरे विभाग  – संजय सेठी, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग – एकनाथ डवले, अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग – वेणुगोपाल रेड्डी, प्रधान सचिव, कामगार विभाग -आय.ए. कुंदन, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग  – श्रीमती अंशु सिन्हा,सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग – एन. रामास्वामी, सचिव, रोजगार हमी योजना विभाग – गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये

९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग श्रीमती आभा शुक्ला,अपर मुख्य सचिव, महसूल विभाग राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग संजय सेठी,अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग – श्रीमती सोनिया सेठी, प्रधान सचिव, शालेय शिक्षण श्री. रणजित सिंह देओल,सचिव, उद्योग विभाग  – डॉ. पी. अन्बळगन सचिव, अन्न, औषध प्रशासन विभाग – धीरज कुमार यांचा सत्कार करण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार

सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयीन कामकाजासाठी  दिला जाणा-या सेवाकर्मी पुरस्कार प्रथम तीन क्रमांकाचे पुरस्कार वितरण पार पडले. यामध्ये ज्या विभागाच्या मंजूर पदसंख्या १० हजार पेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये मनिषा पाटणकर-म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनिषा वर्मा अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,श्रीमती शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त (राज्यकर) विभाग यांचा सत्कार करण्यात आला. मंजूर पदसंख्या ३००० ते १०००० पद असलेले विभाग डॉ. रिचा बागला प्रधान सचिव, वित्त विभाग (लेखा व कोषागारे),श्रीमती विनीता वैद सिंगल प्रधान सचिव,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव, गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क)मंजूर पदसंख्या ३००० पेक्षा कमी असलेल्या विभागाचे असीमकुमार गुप्ता ,अपर मुख्य सचिव, नगरविकास विभाग (नवि-१), श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचा सत्कार करण्यात आला.

100 दिवस बक्षीस वितरण प्रारंभीच भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले

ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

००००

 

संध्या गरवारे/विसंअ

 

इयत्ता अकरावीची जादा तुकड्या, अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

मुंबई, दि. 7 : इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत दरवर्षी साधारणतः 250 ते 300 प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांचा प्रवास शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व शासनस्तर असा होतो. प्रस्तावामध्ये त्रूटी आढळल्यास पुन्हा याच प्रकारे प्रस्ताव सादर करावा लागतो. यामध्ये वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो. या बाबींचा विचार करता सर्व संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करुन इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, शिक्षण संचालक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे व विद्यालयांचे 500 हून अधिक प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी केले.

एन.आय.सी.पुणे यांच्याद्वारे संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीमुळे संस्थेला कोणत्याही कार्यालयात न जाता इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेला संबंधित कागदपत्रे थेट प्रणालीवर अपलोड करता येतील व संबंधित अधिकारी ती ऑनलाईन तपासू शकतील. अर्जामधील माहिती व अपलोड कागदपत्रे स्वयंचलित प्रणालीद्वारे पूर्वनिश्चित निकषांनुसार तपासली जातील, ज्यामुळे मानवी चुका कमी होऊन वेळ वाचेल. संगणकीय प्रणालीतून मिळणाऱ्या आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल जे अधिक पारदर्शक व वस्तुनिष्ठ ठरेल. अर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

अर्ज वेळेत व परिपूर्ण सादर केल्यास शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज मंजूर करता येईल. इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी लागणारी मंजूर तुकडी व आधार वैध मुलांची संख्या स्टुडेंट पोर्टलवरून संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध होईल, त्यामुळे सदर माहिती भरण्याची गरज राहणार नाही. या अर्जाचे ट्रॅकिंग ऑनलाईन प्रणालीद्वारे संस्थेस अवगत होणार असून अर्ज कोणत्या स्तरावर मंजूर झाला, पुढे कोणत्या वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी गेला अथवा नामंजूर झाला असल्यास त्याची कारणे ऑनलाईन पद्धतीने अवगत होणार आहेत. संस्थेसाठी एक सुलभ, आकर्षक आणि उपयुक्त डॅशबोर्ड उपलब्ध होईल ज्यावरून सर्व अर्ज ट्रॅकिंग, दस्तऐवज व इतर माहिती एकत्र पाहता येईल.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन

Oplus_131072

मुंबई, दि. 7 – कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट असणार आहे. या लाटेत शासकीय कार्यप्रणालीत आमूलाग्र सुधारणा होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित, आणि सुलभ सेवा मिळवून देणे हा शासनाचे उद्देश असल्याचे प्रतिपादन  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी आयोजित “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” या उपक्रमांतर्गत श्री. कृष्णन यांचे ‘फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे’ याविषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी श्री. कृष्णन बोलत होते. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कपॅसिटी बिल्डिंग आयोगाच्या सदस्य अलका मित्तल, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह विविध मंत्री, सचिव यावेळी उपस्थित होते.

Oplus_131072

श्री. कृष्णन यांनी इंडिया डिजिटल मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये भाषिणी उपक्रम, एआय, ड्रोन, जीआयएसचा प्रभावी वापर आदींची माहिती दिली.

श्री. कृष्णन म्हणाले की, डिजिटीकरणाच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने कार्यप्रणाली सुधारण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. विशेषत: शासकीय प्रणालीतील प्रक्रियांमध्ये सुधारणा आणि नागरिकांच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन, ड्रोन, आणि जीआयएस सारख्या नव्या तंत्रज्ञानांच्या वापरावर भर देण्यात येत आहे. डिजिटल परिवर्तनाची लाट शासकीय कामांमध्ये अधिक कार्यक्षम, समावेशक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते, असे श्री. कृष्णन यांनी यावेळी सांगितले.

Oplus_131072

श्री. कृष्णन म्हणाले की, डिजिटाझेशनच्या या प्रक्रियेत अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्यात मॅन्युअल बॅकएंड प्रणाली आणि सायबर हल्ल्यांचे वाढते धोके यांचा समावेश आहे. सध्याच्या शासकीय प्रणालीमध्ये अनेक विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून त्यांचा समन्वय साधण्यात अडचणी येत आहेत. यावर सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सुरक्षा व डेटा सुरक्षेवरही भर देणे आवश्यक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शासन आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करू इच्छित आहे.कुटुंब नोंदणी प्रणाली (Golden Record), राज्य डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म, बॅकएंड ऑटोमेशन, तसेच नागरिकांना माहिती द्यायची आवश्यकता कमी करणे या महत्वाच्या सुधारणांवर काम सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय भाषिणी या प्रकल्पाद्वारे मोबाईल, व्हॉइस आणि स्थानिक भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि सहजतेने सेवा देण्याचे काम सुरू आहे.

एआय आणि ब्लॉकचेनचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शासनाच्या कार्यप्रणालींमध्ये सुधारणा केली जात आहे. शासनाच्या पोर्टल्सवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रमाणिकतेपासून, भूमी नोंदणी आणि मालमत्ता रेकॉर्ड्समध्ये केला जात आहे. यामुळे माहितीच्या सुरक्षिततेला मोठी गती मिळेल. यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.

शासनाने डिजिटल सेवांच्या सुलभतेसाठी विविध योजना तयार केली आहे. त्यामध्ये कुटुंब नोंदणी आणि राज्य डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्मचा विकास, तसेच विभागीय स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची योजना आहे. यासाठी इंडिया एआय मिशन आणि भाषिणी या सारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे काम केले जात असल्याचेही श्री. कृष्णन यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी प्रास्ताविक करून श्री. कृष्णन यांची ओळख करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या सचिव अश्विनी भिडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी टेकवारी निमित्त त्रिमूर्ती प्रांगणात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली. रोबोट, विविध प्रकारचे ड्रोन, व्हर्च्यूअल इंटरफेस यांची माहिती घेतली.

 

००००

 

नंदकुमार वाघमारे/विसंअ

निवडणूक आयोगामार्फत २,३०० पेक्षा अधिक क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

नवी दिल्ली, 7 – भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या स्थानिक तमिळ भाषेत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला. दिल्ली येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयआयडीईएम) येथे आयोजित या प्रशिक्षणात 264 बीएलओ पर्यवेक्षक, 14 ईआरओ, 2 डीईओ आणि इतर अधिकारी असे एकूण 293 अधिकारी सहभागी झाले होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, बीएलओ हे निवडणूक आयोगाचे मतदारांसोबतचे पहिले संपर्कबिंदू असून, मतदारयादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही आठवड्यांत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांमधून आतापर्यंत सुमारे 2,300 अधिकाऱ्यांना लाभ झाला आहे. दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम बीएलओ आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग असून, पुढील काही वर्षांत देशभरातील एक लाखांहून अधिक बीएलओंना प्रशिक्षण देण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.

बीएलओ पर्यवेक्षकांना फॉर्म 6, 7 व 8 भरताना अचूकता राखण्यासाठी इंटरॲक्टिव सेशन्स, भूमिका आणि आयटी सोल्युशन्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे बीएलओ पर्यवेक्षक विधानसभा स्तरावरील मास्टर ट्रेनर्स म्हणून इतर बीएलओंना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणात सहभागी अधिकाऱ्यांना अंतिम प्रकाशित मतदार यादीविरुद्ध प्रथम व द्वितीय अपील करण्याच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

6 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या स्पेशल समरी रिव्हिजन (एसएसआर) नंतर तमिळनाडू व पुद्दुचेरीमधून एकही अपील दाखल झाले नव्हते, ही विशेष बाब असल्याचे आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

00000

 

बी.सी.झंवर/विसंअ

महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली 7 : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने सुवर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

दुसरीकडे, नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसी, बिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्ट बैठकांचे आयोजन आवश्यक – झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी

मुंबई, दि.७ : कोणतेही काम थांबत नाही, हे कोरोना काळात सर्वांना समजले आहे. या काळात सर्व क्षेत्रातील बैठका झूम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून झाल्या. सर्व ठिकाणी विविध बैठकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट बैठकांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी यांनी केले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी ‘स्मार्ट बैठक आयोजित करणे’ या विषयावर श्री. रंगारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र शासनाच्या कपॅसिटी बिल्डिंग आयोगाच्या सदस्य अलका मित्तल उपस्थित होत्या.

वितरण व्यवस्थापक श्री. रंगारी म्हणाले, कोणतीही बैठक ही बैठकपूर्व, बैठकीदरम्यान आणि बैठकीनंतर या तीन टप्प्यांमध्ये विभागलेली असते. यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बैठकीला सामोरे गेले पाहिजे. याकरिता झूम अ‍ॅप्लिकेशनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. झूम ॲप्लीकेशनचा वापर करून बैठकीसाठी लिंक तयार करणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल वापरणे, पीपीटी शेअर करणे आदी बाबत त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

आज सर्व काही क्लाउड-बेस्ड झाले आहे. आजच्या काळात कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन काम करणे अनिवार्य नाही. सर्व क्षेत्रांमध्ये विविध बैठका क्लाउडवर घेतल्या जातात. यासाठी मोबाइल, लॅपटॉप किंवा ब्राउझरवरूनही विविध अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो आणि आजच्या घडीला ब्राउझर-बेस्ड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्लिकेशन्सही उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

गजानन पाटील/स.सं

 

नाशिक विभागाने मत्स्योत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई दि. ७ :- नाशिक विभागात मत्स्यव्यवसायास अधिक गती देऊन  विभागास दिलेले मत्स्योत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिल्या.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांनी मंत्रालयात नाशिक मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त (भूजल) अभय देशपांडे, नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त ना. वि. भादुले यांच्यासह नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, नाशिक विभागात मासेमारीसाठी ३३ हजार ७४७ तलाव असून  १ लाख २ हजार ७८७ हेक्टर जलक्षेत्र असल्याने मत्स्योत्पादनाची मोठी क्षमता आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जल क्षेत्रात मत्स्योत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे. पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून मासेमारी तलावातील गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीचा ठेका दिलेल्या तलावात अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले, विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासेमारी तलावास नियमित भेटी देऊन याबाबतचा आढावा घ्यावा. मासेमारी तलाव नियमित भेटीबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...