शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1683

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

या कार्यक्रमात महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय रांगोळी आणि भित्तीपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.

२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०२१ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

000

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि.२२: उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे ‘भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन’ या विषयावरआयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमाला, एमआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, एआययुच्या सचिव श्रीमती पंकज मित्तल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कुलपती प्रदीप खोसला, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले की,जगातील मानवजातीला एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातील विद्यापीठांना होईल. आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचे ज्ञान आहे. त्यामुळे शैक्षणिक देवाण-घेवाण सर्वांना उपयुक्त ठरेल. चांगले नागरिक घडविण्यासाठी मूल्यशिक्षणही महत्त्वाचे आहे.

कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत विचार करताना उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचा विचार करण्यासोबत जागतिक शिक्षण क्षेत्रात अनुकूल बदलाचा विचार करण्यासाठी एक मंच तयार करावा. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारताने जगाला दिलेला विचार आहे. शांतताप्रिय जागतिक समाज घडविण्यासाठी एकत्रितपणे विचार करावा लागेल. त्यासाठी शिक्षणात मूल्यांचा समावेश करणे उपयुक्त ठरेल.

राष्ट्रीय, राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास मुंबईत प्रारंभ

मुंबई, दि. २२ : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. दि. २४ जानेवारी पर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे तो सुरु राहणार आहे. महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २१ रोजी रोजी सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या उपस्थितीत झाले.

या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये फनरल, झिपऱ्या, एक हजाराची नोट, कासव, श्वास, धग, इन्व्हेस्टमेंट, गोष्ट एका पैठणीची हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी प्रकल्प संचालक संतोष रोकडे व श्रीमती स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

000

‘ई-गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन

मुंबई दि. २२ : केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि  महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, दि. २३ व  २४ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे ‘ई-गव्हर्नन्स’ या विषयावर दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे. उद्या सोमवार, दि. २३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, या या परिषदेचे उद्घाटन होईल.  देशभरातील ५०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेस प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने उपस्थित राहतील.

परिषदेत २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५०० प्रतिनिधींचा सहभाग

परिषदेत २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवराच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. तसेच ई-सेवा, डिजिटल मंच आणि ई-प्रशासन मॉडेल्स सुधारण्याच्या मार्गांवर प्रतिनिधी करणार चर्चा करणार आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रादेशिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करणार

राज्य सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव, (सामान्य प्रशासन विभाग) सुजाता सौनिक आणि डीएआरपीजीचे  सचिव व्ही. श्रीनिवास  हे देखील उद्घाटन सत्रात संबोधित करतील. समारोप सत्रात केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेला संबोधित करतील. अतिरिक्त सचिव अमर नाथ आणि सचिव व्ही. श्रीनिवास  देखील या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपट

महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपटही यावेळी  दाखविला जाईल. तसेच परिषदेच्या समारोप सत्रात, विशेष मोहीम २.० (विशेष आवृत्ती) वरील एमजीएमजी (Minimum Government, Maximum Governance) आणि जीजीडब्ल्यू २०२२ पुस्तिकेचे तसेच ई-जर्नलचे प्रकाशनही होईल.

उद्घाटन सत्रादरम्यान, खालील गोष्टी प्रदर्शित केल्या जातील

(i) महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयीन प्रक्रियेच्या नियमावलीचे संक्षिप्त सादरीकरण (Manual of Office Procedure)

(ii) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) च्या वर्ष अखेर आढाव्यावर आधारित चित्रपट

(iii) ई प्रशासन उपक्रमांवर आधारित ई – जर्नल एम जी एम जी प्रकाशित केले जाईल.

सुशासन परिसंवाद स्टार्टअपचे पहिले सत्र

‘सुशासन परिसंवाद स्टार्टअप’ या विषयावर आधारित पहिल्या सत्राचे अध्यक्षपद, कर्नाटक सरकारच्या, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव, डॉ. श्रीवत्स कृष्णा भूषवतील. पहिल्या सत्रात चार स्टार्ट अप कंपन्या सादरीकरण करतील. महाराष्ट्र शासनाचे सर्व सनदी अधिकारी या सत्रात उपस्थित राहतील. भारतीय लोक प्रशासन संस्था, आयआयपीएचे महासंचालक डॉ. एस.एन. त्रिपाठी  ‘ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम’ या विषयावरील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष असतील. दुपारच्या सत्रांमध्ये (सत्र – तीन) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव, अमर नाथ, यांच्या अध्यक्षतेखाली  ‘ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम’ या विषयावर सादरीकरण होईल. पुणे येथील यशदाचे  महासंचालक एस चोकलिंगम, हे ‘महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्तम पद्धती’ या विषयावरील चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी असतील.

डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये विषयावर सादरीकरण

दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पाचव्या सत्रात महाराष्ट्राचे भारतीय लोक प्रशासन संस्थेचे निवृत्त आय.ए.एस. अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये’ या विषयावर सादरीकरण होईल. सहाव्या सत्रात ACT चे संदीप सिंघल आणि पपिलफर्स्टचे सह-संस्थापक संजय विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली  ‘ई-गव्हर्नन्समधील स्टार्ट-अप्स’ या विषयावर सादरीकरण केले जाईल.

राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन ‘NeSDA 2021 – पुढील मार्ग’ आठवे सत्र

सहाव्या सत्रात राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिषेक सिंग, यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यांमधील  ई-सेवा वितरण’ या विषयावर सादरीकरण होईल. राष्ट्रीय स्मार्ट सरकार संस्था, ‘राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन NeSDA 2021 – पुढील मार्ग’ या विषयावरील एन आय एस जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.आर.के. राव आठव्या सत्राचे अध्यक्ष असतील. ‘डेटा प्राणित तक्रारी’ या विषयावरील नवव्या सत्राचे अध्यक्षपद पुणे येथील यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग भूषवतील.

ही परिषद म्हणजे प्रशासकीय प्रशिक्षणातील सर्वोत्तम पद्धतींच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये अंतर्भूत असलेल्या नागरिक केंद्रित प्रशासन सुलभ करण्यासाठी क्षमता वृद्धी, ई-गव्हर्नन्सद्वारे सुधारित सार्वजनिक सेवा वितरण, पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक- स्नेही प्रभावी प्रशासन यासंदर्भातले अनुभव सामायिक करण्यासाठी एक समान मंच तयार करण्याचा प्रयत्न असेल.

000

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

चंद्रपूर, दि. २१ : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२ विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे ५२ विद्यार्थी खराळपेठ येथे सहलीला गेले होते. जेवण करून सायंकाळी घरी आल्यानंतर १२ मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे भरती करण्यात आले. भरती असलेल्या सर्वांची तब्येत बरी आहे. अन्य मुले आपापल्या घरी व्यवस्थित असली तरी त्यांची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

000

शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन

शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

सांगली दि. २१ (जि.मा.का.) : सियाचीन येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) खानापूर येथे सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तर चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने सुभेदार मेजर समीर नालबंद यांनी शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगत मळा येथे शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकी व पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी साश्रू नयनांनी शहीद जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, नगराध्यक्ष डॉ.उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  विजया पांगारकर, विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेश शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील तसेच खानापूर परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सियाचीन ग्लेशियर येथील फॉरवर्ड पोस्टवर युद्धजन्य परिस्थितीत तैनात असताना अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना १५ जानेवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून कमांड हॉस्पिटल चंदीगड येथे विशेष हेलिकॉप्टरने आणण्यात आले होते. परंतु त्यांची  २० जानेवारी रोजी प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले व पुढे ॲम्बुलन्सने त्यांच्या गावी खानापूर येथे आज २१ जानेवारी रोजी आणण्यात आले. खानापूर येथे शहिद जयसिंग भगत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे…. अमर रहे ….. शहिद जयसिंग भगत अमर रहे … या घोषणांनी खानापूर शहर दुमदुमून गेले. अंत्यसंस्कारासाठी मराठा इन्फट्री सेंटर बेळगाव येथून सुभेदार मेजर समीर नालबंद व १५ सैनिक आले होते. शहिद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी रूपाली, तीन मुली, एक मुलगा, वडील असे कुटुंबीय आहे.

शहिद जयसिंग भगत यांच्या कुटुंबाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांत्वन

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शहिद जवान जयसिंग भगत यांच्या कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा

मुंबई, दि. २१ : विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २७ जानेवारी  रोजी सकाळी ११ वा. विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयावर थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक शाळेत थेट प्रसारण करावयाचे असून शिक्षण विभागाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.

मंत्री श्री. केसरकर यांनी आज सकाळी बालभवन, मुंबई येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते, शिक्षण आयुक्त सुरजकुमार मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले, की ‘परीक्षा पे चर्चा’ च्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ जानेवारी  रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेचेही नियोजन शिक्षण विभागाने करून अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. या चित्रकला स्पर्धेसाठी विविध दहा विषय असतील. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांसह दहा उत्तेजनार्थ व २५ इतर विशेष बक्षिसे देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांनाही निमंत्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधान सचिव श्री. देओल यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चित्रकला स्पर्धेचे परिपूर्ण नियोजन करावे. या स्पर्धेसाठी अडीच तासांचा वेळ असेल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून त्यांची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण आयुक्त श्री. मांढरे, संचालक श्री. दिवेगावकर यांनी सहभाग घेतला.

०००

पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि.२१: पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुल येथे आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पवना प्रॉपर्टी असोसिएशनचे अध्यक्ष पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी देशाच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी जीवनात यश प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत करावी आणि त्यासोबतच आई-वडिलांची सेवा करावी. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे.

मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना कृषि विषयाचे अद्यावत व तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी परिसरात कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषि महाविद्यालयासाठी लागणारी जागा जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली असल्याने याबाबत राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मावळ परिसर डोंगरखोऱ्यात, निसर्गानी नटलेला परिसर असल्याचे यावेळी आमदार शेळके म्हणाले. परिसरात कृषि महाविद्यालयाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

पद्मभूषण श्रॉफ म्हणाले की, पवना धरणग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत  असून परिसरात ५० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. पवना विद्या मंदिर संकुलात विद्यार्थ्यांसाठी ५० स्वच्छतागृहे बांधण्याचे काम सुरु आहेत,असेही ते म्हणाले.

संस्थेचे सचिव श्री. खांडगे  पवना शिक्षण संकुलाबाबत माहिती दिली. यावेळी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी श्री. मुनगंटीवार यांनी पवना प्रॉपर्टी असोसिएशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर ते म्हणाले, पवना प्रॉपर्टी असोसिएशनने पवना परिसरात ५० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने येथील पर्यावरणाचा विकास होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात आल्यास शुद्ध हवा मिळते, मन शुद्ध होते, शेवटी त्याचे शुद्ध कृतीत रूपांतर होते. या वृक्ष लागवड मोहिमेस वन विभागाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

000

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री

पुणे दि. २१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे आणि टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून  ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ७ लाख २० हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे.

कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे गरजेचे

कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक  लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे. संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल.

साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान

ऊस, शेती आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,  व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बेणे निर्माण केली. त्याचा मराठवाडा आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे.

कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते आणि संशोधन करते. आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय ८००५ आणि १२१२१ या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन

चालू गळीत हंगामात ५०८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४७ लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी १३७.२० लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. १२.६ लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणत इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ऊसासोबत फळबागांचेही क्षेत्र वाढवावे

ऊसाचे वाढते उत्पादन, गाळपाशिवाय रहाणारा ऊस अशी आव्हाने साखर कारखान्यांसमोर आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन असल्याने साखर निर्यात व साखरेचे कमी उत्पादन होणाऱ्या अन्य राज्यात साखर विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर कारखान्यांनी भर द्यावा. ऊस उत्पादनासोबत खरीपातील कापूस-सोयाबीनचाही पेरा शेतकऱ्यांनी वाढवावा. फळबाग क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस पीकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. त्यामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल. यादृष्टीने व्हीएसआयचे काम महत्वपूर्ण आहे, असे श्री.शिंदे म्हणाले.

केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे नमूद करून साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

दावोसमध्ये उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातल्या विविध भागात उद्याग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे-शरद पवार

भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो.

भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉप्रेस्ड बायोगॅस आणि हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा स्त्रोतदेशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील.

शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक आणि गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि.धावरवाडी ता.कराड जि.सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता.पलूस जि.सांगली, कै.कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना,  कै.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता.दौंड, जि.पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता.कागल जि.कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या  तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल अशा विविध अहवालांचे प्रकाशन करण्यात आले.

000

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

मुंबई दि. २० : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन –  हॉप ऑफ बसची सुविधा आज सुरु केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  करण्यात आले.

पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी पर्यटनमंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाच्या चित्रफित, छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे प्रकाशन, अजिंठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॉलेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ  करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

 

या उद्घाटन कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एच. आर. कॉलेजचे पर्यटन विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, मुंबई हे देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी कालावधीत ११ हॉप ऑन – हॉप ऑफ बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत. आज एका बसचे लोकार्पण मंत्री श्री.लोढा यांनी केले.. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या हॉप ऑन – हॉप ऑफ बसचे आरक्षण दर कमी असतील, अशी माहिती  मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली. यादरम्यान हो हो बसने श्री.लोढा यांनी मंत्रालय ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, हॉप ऑन –  हॉप ऑफ बस मुंबईमध्ये प्रायोगिक‍ तत्वावर सुरू  केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल. या बसचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येणे शक्य होणार आहे.आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ११ होहो बसेस पर्यटनस्थळी देण्यात येतील, अशी माहितीही पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

युवा पर्यटन संघाची स्थापना

मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमात  पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी आज सहभागी झाले होते. पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळांची या पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आगामी कालावधीत जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ उपक्रम राबवत आहे. वसुंधरेला हानी न पोहोचता पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट ५०० पर्यटक रिसॉर्टचे फोटो लॉन्च करण्यात आले ही छायाचित्रे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. पर्यटन पॅकेजेसमध्ये या छायाचित्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटनविषयक व्हिडीओ देखील यावेळी लॉन्च करण्यात आले. अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत अजिंठा केव्ह व्हयू पॉईंट या प्रकल्पाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.

 

००००

 

पवन राठोड/स. सं

ताज्या बातम्या

मनपाच्या ‘पीएम श्री’ शाळेला मिळणार १० कोटी रुपये – तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री डॉ. अशोक उईकेंनी...

0
बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत आयोजन चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पीएम श्री सावित्रीबाई...

गणेशोत्सव विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी ७ कोटींची तरतूद; लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्तीसह तात्काळ भूमिगत करा –...

0
शांतता समितीची बैठक संपन्न नंदुरबार, दिनांक 16 : आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीची रूपरेषा आखली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...

शासनाच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीयांपर्यंत; पालकमंत्र्यांनी केले स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन

0
नंदुरबार, दिनांक 16 (जिमाका) : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...