रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1682

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीची अधिसूचना आज राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २३ : यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त श्री. देशपांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रालय पत्रकार कक्ष येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव मनोहर पारकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, श्री. साखरे उपस्थित होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. ही लोकशाही दिंडी राष्ट्रीय मतदार दिनी सकाळी ९ वा. एनसीपीए येथून पाटकर सभागृहापर्यंत निघणार आहे. तसेच भारतीय निवडणूकांच्या इतिहासावर आधारित चित्रमय प्रदर्शन, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाची निर्मिती असलेल्या ‘मै भारत हूँ’  या निवडणुकांवर आधारित गाण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन व लेखन सुभाष घई यांनी केले असल्याची माहितीही श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय रांगोळी आणि भित्तिपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असेही श्री. देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

००००

निलेश तायडे/स.सं.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम

मुंबई, दि.२३ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत “चालता बोलता” या प्रश्नसरितेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. २३ ते २५ जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २४ रोजी परिषद सभागृह, मंत्रालय येथे दुपारी २ वा. मंत्रालयातील आणि विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ रोजी सायं. ४ ते ५:१५ वाजेपर्यंत “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर, सायं. ५:३० ते ६ या कालावधीत अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

०००

अर्चना शंभरकर/विसंअ

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी – एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या मदतीने रोजगार निर्माण करावेत. सकल देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी उद्योजक होऊन योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नॅशनल एससी – एसटी हब संमेलनात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते.

मंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, देशात रोजगार निर्माण करताना उद्योजकही तयार करायचे आहेत. उद्योजक बनविण्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे योगदान आहे. सध्या देशात ६ कोटी ४० लाख उद्योजक असून ११ कोटी कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. भारताचा जीडीपी ३.५ टक्के असून तो पाचवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या भारत पाचव्या क्रमांकावर असून २०३० मध्ये अमेरिका, चीननंतर तिसऱ्या स्थानी नेण्याचे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवउद्योजकांनी उद्योग उभे करून योगदान द्यावे.  नवउद्योजकांना केंद्र सरकारच्या योजनांतर्गत कर्ज उपलब्ध होते. यावर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून २५ ते ३५ टक्के सबसीडी देण्यात येत आहे. नोकरी आणि उद्योगामध्ये फरक असून उद्योगांमध्ये फार मोठ्या संधी आहेत. यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून कष्ट घेण्याची तयारी नवउद्योजकांनी ठेवावी. समाजहित, देश आणि कुटुंबासाठी औद्योगिक प्रगती महत्वाची आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक व्हा. समाजाचे दु:ख पुसण्यासाठी स्वत: आर्थिक सक्षम व्हा, असे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

यावेळी मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शून्यातून उद्योजक बनलेल्या नितीन बनसोड, दिनेश खराडिया, सुनील चव्हाण आणि अप्पा वाघ या चार उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे एससी-एसटी समाज घटकातील उद्योजकांना मदत करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात श्रीमती इपाओ यांनी सांगून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बी.बी.स्वेन, योगेश भांबरे, प्रांजळ साळवे, सुनील शिंदे, इशिता गांगुली-त्रिपाठी, मनोजकुमार सिंग, राजेंद्र निंबाळकर, प्रशांत नारनवरे, सुनील झोडे, रवीकुमार यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय सचिव बी.बी. स्वेन, सहसचिव श्रीमती मर्सी इपाओ, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅफरमेटिव्ह अॅक्शनचे चेअरमन सुनील झोडे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुनील शिंदे, डॉ. विजय कलंत्री, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, उद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त इशिता गांगुली-त्रिपाठी, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्र

महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयातील उपस्थित अधिकारी, रसिक प्रकाशनाच्या श्रध्दा नांदुरकर, संस्कृती प्रकाशनचे सुनील मांडवे आणि पॉप्युलर प्रकाशनचे सचिन गुंजाळ यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३ : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि  महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, २३ व २४ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंबई येथे आयोजित “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अतिरिक्त सचिव डीएआरपीजी अमर नाथ, सचिव व्ही. श्रीनिवास, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते.

यावेळी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेला शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले की, जनतेला सुलभतेने उत्तम सेवा- सुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने देशभरातील जनतेला पारदर्शक आणि गतिमान सुविधा उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभारली जात असून ई – गर्व्हनन्स संकल्पनेच्या आधारे देशातील जनतेला विनासायास सर्व मूलभूत सोयी सुविधा तत्परतेने मिळणार आहेत.  ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना, यंत्रणांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे सांगून या परिषदेच्या माध्यमातून राज्यांतर्गत उत्तम कल्पनांची देवाण-घेवाण होईल, असे प्रधानमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे  म्हणाले की, देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ई – गव्हर्नन्स   व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून या कार्यप्रणालीचे अद्ययावतीकरण, नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात येत असलेली दोन दिवसीय परिषद हा स्वागतार्ह उपक्रम आहे.  देशभरात ई – गव्हर्नन्स अंतर्गत होत असलेल्या उपक्रमांची माहिती या परिषदेच्या माध्यमातून  मिळणार आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने उत्कृष्ट प्रशासक राजाचा वारसा लाभलेला असून जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून शिवाजी महाराजांनी आपले राज्य वाढवले.  लोकप्रिय राजा म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. त्याच पद्धतीने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या शासनामार्फत जनतेला  व्यापक आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याच्या दृष्टीने  विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अधिक पारदर्शक काम करण्यास शासनाचे प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची २५०० कोटी रुपये एका दिवसात व एका क्लिकवर  शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात  आली. तसेच विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती थेट त्यांच्या खात्यात जमा करणे,  विविध पदांच्या ७५ हजार नोकर भरतीसाठी पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  ड्रोन कॅमेराद्वारे कृषी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  लोकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड करण्यात येणार आहे.

राज्यातील नागरिकांना त्यांच्या निवेदनाची माहिती आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही  दोन चाके असून त्यांच्या सहकार्य आणि समन्वयातून राज्य यशस्वी वाटचाल करेल. सुशासनाचा मुख्य उद्देश जनसामान्यांना अधिक तत्परतेने, पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देणे असून या दृष्टीने ई- गव्हर्नन्स उपयुक्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ई-गव्हर्नन्सची व्यापक अमंलबजावणी करण्यात येत असून ‘अधिकतम शासन ,न्यूनतम सरकार’ हा मंत्र प्रधानमंत्री यांनी दिला आहे.  प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात जागतिक स्तरावर देशाला लक्षणीय सहभाग मिळत आहे. दावोस परिषदेतही महाराष्ट्राची उपस्थिती उल्लेखनीय राहिली आहे. त्या ठिकाणी एक लाख ५५ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र तंत्रज्ञान अमंलबजावणीत देशात अग्रेसर असल्याचे सचिव श्री. श्रीनिवास यांनी सांगितले तसेच ई- गर्व्हनन्स संकल्पनेच्या उपयुक्ततेबद्दल माहिती दिली. अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका अद्ययावत करण्यात येत असून यामुळे  शासकीय कामकाज हाताळताना ते कशा पद्धतीने हाताळावे, टपाल,नस्त्या आवक पत्रे, जावक पत्रे,  क्रमांक निर्देशांक, अभिलेख वर्गीकरण आदी बाबींबाबत एकत्रित स्वरुपाचे निर्देश एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई – ऑफिस, सुशासन, ई-गव्हर्नन्स आदी विषयात करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती  दिली.

000

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २३ : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार समाधान अवताडे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, ज्येष्ठ साहित्यिक उषा तांबे उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेतील योगदानाबद्दल मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तर, रामकृष्ण प्रकाशनाच्या ‘ग्राहक दृष्टी- राष्ट्र पुरुष जागा होतोय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे सहयोगी संपादक – संचालक अविनाश पात्रीकर आहेत.

मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, “मराठी भाषा विश्वकोष तयार करणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जन्मगावी वाईला मराठी भाषेचा गौरवपूर्ण इतिहास जतन करणारे ‘संग्रहालय’ उभे राहणार आहे. मरीन लाईन्स, मुंबई येथे मराठी भाषा भवन ची इमारत उभी राहते आहे. या भवनात मराठी भाषा अभ्यासकांसाठी अभ्यासिका आणि मुंबई बाहेरील साहित्यिकांना निवासाची व्यवस्था असणार आहे. नुकत्याच झालेल्या मराठी विश्व संमेलनाचा संदर्भ देऊन श्री. केसरकर यांनी दरवर्षी असे संमेलन घेणार असल्याचा मानस बोलून दाखविला.

मराठी साहित्य संमेलन घेणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा अनुदान निधी वाढविला असून सीमाभागात मराठी भाषा संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. ज्ञान भाषा म्हणून मराठीचा वापर वाढावा यासाठी शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यात येणार आहेत. यामुळे मराठी शाळा संवर्धनाला मदत होईल असेही मंत्री श्री. केसरकर म्हणाले.

मराठी भाषेच्या योगदानासाठी माहिती संचालक हेमराज बागुल सन्मानित

मराठी भाषेसाठी विविध प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील पाच अधिकारी व कर्मचारी यांचा मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, मुख्यमंत्री सचिवालय येथील अवर सचिव सुधीर पंडितराव शास्त्री, जलसंपदा विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी श्रीमती सारिका चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उच्च श्रेणी लघुलेखक जगदीश कुळकर्णी, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती खदीजा नाईकवाडे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ जानेवारी ते दि. २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. यादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

०००

अर्चना शंभरकर/विसंअ

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. २३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

           मुंबई, दि. २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले..

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल, उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग,दि.२३ (जिमाका): गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या खारघर, नवी मुंबई येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.

 

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, मेडिकव्हर समूहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, भारती विद्यापीठचे कुलपती प्रो. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, नृपाल पाटील, आनंदराव पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाच्या संचालक स्वप्नाली कदम, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. विलासराव कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना संकटानंतर हेल्थकेअर क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता लक्षात आली त्यानुसार आपली वाटचाल सुरू झाली आहे.  हेल्थकेअर क्षेत्रात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला आरोग्य उपचारांसाठी निश्चित होणार आहे. इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कमी खर्चात उपचार होवू शकतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हेल्थ इन्स्टिट्यूटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आरोग्य क्षेत्रामुळे अर्थ व्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतचे हेल्थ इन्शुरन्स गरिबांना मिळत आहे. सामान्य नागरिकांकरिता हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्र्यांनी प्रो. डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. विश्वजीत कदम यांचे विशेष अभिनंदन करत मेडिकव्हर हॉस्पिटलची मालिका विदर्भातही यावी, यासाठी आवाहन केले.

 

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भारती विद्यापीठ व मेडिकव्हर समूह यांनी एकत्रित केलेल्या कामांची माहिती देणारी ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली. भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. विलासराव कदम यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...