शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1684

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सूत्रसंचालन करणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.

००००

इरशाद बागवान/विसंअ

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, दि. २०  : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.  पद भरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती

  • सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
  • वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
  • गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
  • महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
  • गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
  • वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
  • वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
  • मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

000000

राजू धोत्रे/विसंअ

आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०० आपदा मित्र प्रशिक्षित होणार

सातारा दि. २०: जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंट रोड) पाचगणी ता. महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५०० आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ५ आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आल्या.  शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  सांगितले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या देखरेखीखाली सातारा जिल्ह्यातील एकूण ५०० स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित केले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांमध्ये / पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला अत्यंत मोलाचे सहकार्य लाभणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आपत्ती अथवा दुर्घटनेत प्रथम प्रतिसाद कमी वेळेत मिळाल्यास जिवीत हानीचे प्रमाण कमी होण्यास हे प्रशिक्षण प्रभावी ठरणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान, आपत्ती पश्चात नियोजन, आपत्ती व्यवस्थापन बाबत जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन विषयक आपदा मित्राची भूमिका, आपदा प्रशिक्षणाचा मूख्य हेतू, तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिके शोध व बचाव, प्रथमोपचार, गाठींचे प्रकार, दोरखंड गाठी, बॅन्डेज, स्ट्रेचर उचल पद्धती, अपघातग्रस्तांना वाहून नेण्याच्या पद्धती, अग्निशमन, १०८ ॲम्ब्युलन्सचे कामकाज, मॉक ड्रिल सराव तसेच पूर परिस्थिती दरम्यान बोट, बोटीबाबत माहिती, बोट चालविणे, इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण सरावासह दिले जात आहे. हे प्रशिक्षण यशदा, पुणे येथील तज्ज्ञ मास्टर ट्रेनर्स आणि जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनानुसार सुरु आहे.

000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण मतदारसंघातील विकास कामांचा आढावा

सातारा, दि.२० :  पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभगृहात घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते खूप महत्त्वाचे आहेत. जे पाणंद रस्ते मंजूर आहेत त्यांची कामे येत्या जून २०२३ पर्यंत पूर्ण करावीत. पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांना निधी आला आहे ती कामे लवकरात लवकर सुरु करावीत. ही कामे करीत असताना कामांचा दर्जा चांगला ठेवावा.

अर्थसंकल्पीय कामे, जिल्हा नियोजन फंडातील कामे, कोयना भूकंप पुनर्वसन निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ठोक निधी, डोंगरी विकास, जल जीवन मिशन व इतर फंडातून प्राप्त विकास कामेही सुरु करावीत. तसेच मौजे मळे, कोळणे, पाथरपुंज, पुनवली, किसरुळे या गावातील व्याघ्र प्रकल्पातील खातेदार यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. जिल्हा परिषद परिसरातील सातारा जिल्हा लोकल बोर्डाची इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करुन जतन करण्यात येणार आहे, याचाही आराखडा तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

000

महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, अभयारण्यांतर्गत गावे, सीआर झेड २ अंतर्गत एसआरए प्रकल्प याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक  झाली. यावेळी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाशी संबंधीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कालबद्ध पद्धतीने त्यावर मार्ग काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पश्चिम घाट, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र याबाबत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबाबत श्री. रेड्डी यांनी सादरीकरण केले. राज्य शासन विभाग आणि केंद्रीय वन विभागाच्या तज्ज्ञ समिती सोबत बैठक घेऊन प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य अंतर्गत असलेली गावे पुनर्वसित करताना देण्यात येणारी मदत वाढविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी, पिकांची हानी यासंदर्भात केंद्र शासनाकडून मदत देण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण येथे ११०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुलुंड येथे वैद्यकीय महाविद्यालय, तर ठाणे येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय कामगार मंत्री श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील रुग्णालयाचे बळकटीकरण करतानाच तेथे कार्डधारक आणि विना कार्डधारक रुग्णांना सेवा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केली त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीआरझेड २ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि मोडकळीस आलेल्या आणि उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी करताना विशेष सवलत देण्याबाबत यावी चर्चा करण्यात आली. कांदळवनाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात कांदवळवन कक्ष आणि फाऊंडेशन असून कांदळवनाच्या वाढीसाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्राचे कौतुक यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले. माथाडी मंडळ अंतर्गत माथाडी कामगारांच्या कामगार भविष्य निर्वाह निधी भरण्यासंदर्भात येणाऱ्या समस्येबाबत चर्चा यावेळी झाली. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे

मुंबई, दि. २० : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागर चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे.

यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागरयांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्यापरीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.  यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी  दिली  आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत शुभ एड चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संचालक बिभीषण चवरे व सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येत आहे.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १९ :  दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन  मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना कॅस चे लाभ देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पुढाकार घेऊन नोव्हेंबर २०२२ मध्ये सकारात्मक भूमिका घेत विभागाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश एम.फील. पदवीधारक अध्यापकांना लाभ देण्यात आले, मात्र काही मागण्या विचाराधीन होत्या. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, महाराष्ट्र राज्य एम.फील. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. नीलेंद्र लोखंडे, डॉ. सचिन गोसावी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सविता तायडे, डॉ. लता चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर बोराडे, डॉ. अभिजित पवार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १९ : सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा ‘हॅपिनेस इंडेक्स ‘ तयार करण्यात आला आहे. नाटक बघून मानव आपले दुःख विसरतो व त्याला आनंदाची अनुभूती मिळते, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीवर्षा निमित्त त्यांच्या संगीत नाटकांवर आधारित ‘शूरा मी वंदिले’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आज दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशेष उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, तेव्हा ते बोलत होते. प्रारंभी नाट्याचार्य कृ. प्र खाडिलकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,  या कार्यक्रमामुळे नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर यांचा जीवनपट समोर आला. सांस्कृतिक कार्य विभाग ऊर्जा असलेला विभाग आहे. सांस्कृतिक कार्य विभागाला अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिभावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहनही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी  केले.

या कार्यक्रमाच्या वेळी शिवाजी नाट्य मंदिरात अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, अभिनेता शैलेश दातार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, स्वरकुल संस्थेच्या वीणा खाडिलकर आणि त्यागराज खाडिलकर आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्री. पांडे यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्य सैनिक, लेखक, पत्रकार, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे समग्र लेखन आणि जीवनावर आधारीत “शूरा मी वंदिले” हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यागराज खाडिलकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००

निलेश तायडे/ससं/

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. १९ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास  वेगवान करणाऱ्या  मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  आमदार आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.

दरम्यान  मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या  छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आराखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशनवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला.

सुलभ वाहतुकीसाठी दोन स्मार्ट उपक्रम “मुंबई १” मोबाईल ॲप आणि एनसीएमसी

मुंबई १” मोबाईल अॅप :  या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे.तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.

एनसीएमसी कार्ड

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे.नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतूकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे.डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.

मुंबई मेट्रो २ अ आणि ७ ची वैशिष्टयै

वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकरांना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे

मेट्रो २ अ   दहिसर पूर्व ते डीएन. नगर. ६४१० कोटी रूपयांचे १८.६ किमी मार्गिका असून १७ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.

मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व) रूपये ६२०८ कोटी खर्चासह १६.५ कि.मी मार्गिका असून १३ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत जवळपास १२ हजार ६१८ कोटी आहे.

मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या टप्पा २ मधील स्थानके

मेट्रो लाईन-२अ- टप्पा-२

वळनई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (पश्चिम).

मेट्रो मार्ग ७- टप्पा- २

गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), मोगरा, गुंदवली.

वरील  दोन्ही मेट्रो मार्गांसाठी दहिसर पूर्व हे संयुक्त स्थानक आहे.

मेट्रो मार्ग २अ- टप्पा- १

दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर- I.C. कॉलनी, एकसर, बोरिवली (पश्चिम), पहाडीएकसर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी.

मेट्रो मार्ग ७- टप्पा- १

दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे या स्थानकांचा समावेश आहे.

एकात्मिक मेट्रो मार्गिका

पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे

यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे

रोलिंग स्टॉक

मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन  7  अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (युटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी. असून क्रियात्मक वेग ताशी ८० कि.मी. आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.

सुरक्षा यंत्रणा

सर्व स्थानकावर बॅगेज स्कॅनिंग मशीन, हॅण्डहेल्‍ड मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.

रूफ टॉप सोलार सिस्टिम

मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट – पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.

दिव्यांगासाठी सुविधा

दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर व्हीलचेअर, ब्रेलसह लिफ्ट बटणे आणि प्लॅटफॉर्मवर टॅक्टाइल टाइल्स आहेत जे दृष्टिहीन लोकांसाठी दिशादर्शक म्हणून  काम करतील.

सार्वजनिक माहिती प्रणाली

प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा आणि माहिती प्रदर्शित करणारी यंत्रणा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नलींग, एस्कलेटर्स या सुविधाही करण्यात आल्या आहेत.

मेट्रो मार्ग ७ वरच्या स्थानकांना आयजीबीसीच ‘प्लॅटिनम ‘ मानांकन

पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला महत्व देण्यात आले आहे.मेट्रो मार्ग ७ वरच्या १० मेट्रो स्थानकांना ‘आयजीबीसी’ तर्फे ‘प्लॅटिनम ‘ दर्जाचे मानांकन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवारीपाडा अशी या स्थानकाची नाव आहेत. आयजीबीसीच्या ‘ग्रीन मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम रेटिंग प्रोग्राम’ नुसार स्थानकाच मूल्यांकन करण्यात आले आहे. आयजीबीसीच्या मानांकन अहवालामध्ये मेट्रो मार्ग ७ साठीची पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी)ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आयएसओ १४००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले आहे.

प्रवाशांची सुविधा व सुरक्षा

प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्स (पीएसडी) ही मोटरव्दारे उघड बंद होणाऱ्या सरकत्या दरवाजांची अत्याधुनिक प्रणाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्म्सचं संरक्षण करण्यासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांच्या होणा-या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्तींनाही मेट्रोत सहज येता यावे म्हणून असे सरकते दरवाजे फार उपुयक्त आहेत.

000

काशीबाई थोरात/संध्या गरवारे/विसंअ/

महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाने दहा वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. १६ मे २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

राज्यशासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक २४ जानेवारी, २०२३ रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक २४ जानेवारी, २०२३ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक २५ जानेवारी, २०२३ रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक २५ जानेवारी, २०२३ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी  २५ जानेवारी, २०२३ पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ जानेवारी, २०३३ रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. २५ जुलै व २५जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या १९ जानेवारी, २०२३ रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली.

०००

ताज्या बातम्या

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...