मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1677

धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली

ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिवंगत दिघे यांना आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन दिवंगत दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शक्तिस्थळावर जाऊन समाधीवर पुष्प अर्पण केले.

000

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सातारा दि. 27 : महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे.  तरी साखर कारखानदारांनी  इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा. यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उंडवडी कडेपठार-बारामती फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण,  शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट  रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे  भूमिपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक समीर शेख,  राष्ट्रीय महामार्गाचे  संतोष शेलार आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती तर आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले,  आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.

मुंबई- बंगळुर महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना मोठ‌्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार  यामुळे या भागातील स्थालांतर कमी होईल. केंद्र शासनाचा देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहिला आहे.

महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. संत वाङमय हे डिजिटल पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे  सांगून श्री. गडकरी म्हणाले, फलटण शहरांतर्गत 9 कि.मी. चा रस्ता पूर्ण केला जाईल.फलटण -दहिवडी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करुन सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.  तसेच लोकप्रतिनिधींनी विविध विकास कामांना निधीची मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे काम  जिल्ह्यात चांगल्या प्रकारे  सुरु असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री नाईक निंबाळकर म्हणाले, पालखी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

पालखी मार्गासाठी  जमिन संपादन केलेल्या लोकांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.. माढा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी गडकरी साहेबांनी नेहमीच सहकार्य केले आहे.फलटण शहरातील विकास कामांनाही निधी मिळवा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर व शहाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक  उपस्थित होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पुणे, दि. २७: येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.

बालभारतीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे,  शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित  मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

बालभारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा  विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.

देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना  नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षात  भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल. दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव  न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री  दीपक केसरकर  यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील छायाचित्र प्रदर्शनास पर्यटनमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्राईल कॉन्सुलेटतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, इस्त्राईलचे वाणिज्यदूत कोबी शेनॉन तसेच वाणिज्यदूत कार्यालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की,  १९३३ ते १९४५ या कालावधीत इस्त्राईलमध्ये घडलेल्या घटनांचे तसेच विदारक वास्तवाचे दर्शन या छायाचित्रांमधून दिसते. आजचा दिवस दुसऱ्या जागतिक महायुद्धात बळी पडलेल्या निष्पाप लोकांप्रती शोक व्यक्त करण्याचा असल्याचेही ते म्हणाले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जल जीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन

पुणे दि.२७: जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतील उणिवा येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटी रुपयांची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली असून नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.

देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने  सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी  उशिर करू नये, असे त्यांनी सांगितले.

सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केंद्राकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी ८५ टक्के रक्कम थेट मिळते आहे. त्याचा विनियोग करताना गावाच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन विकासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

प्रास्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबवून १ हजार ३५४ गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात येत असून उर्वरीत गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत २९९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे. सरपंचांनी योजनेसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि स्थानिक वाद मिटवून प्रत्येक घरात नळ जोडणी करून द्यावी. योजनेसाठी वेळेवर वीज जोडणी करून घ्यावी आणि १० टक्के लोकवर्गणी जमा करून घ्यावी. कामाची गुणवत्ता चांगली राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे. या सरपंचांना गावाचा विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी जल जीवन मिशनचे कामही  चांगल्यारितीने करावे. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे, असेही श्री.प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यात घन कचरा व्यवस्थापनाचे सर्वाधिक काम झाले, गतवर्षी करवसुलीत २५ टक्के वाढ होऊन ३४० कोटीची कर वसुली झाली आहे. जिल्ह्यातील ९ लाख २७ हजार घरापैकी ८९ टक्के घरांवर महिलांचे नाव लागले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी‘घर घर जल’ घोषित गावातील सरपंचांचा, योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, जल जीवन मिशनच्या कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गुणवत्ता, पाणी गुणवत्ता, कामांची तपासणी, गुणनियंत्रण, योजनेच्या उपांगांचे व्यवस्थापन व संनियंत्रण आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

000

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२७: ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले.

ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थी आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. प्रधानमंत्र्यांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थांना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परीक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.

‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत

प्रधानमंत्र्यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत

शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

०००

मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २७: आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

यशदा येथे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शाळेतील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी शासन सहकार्य करेल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे आदी पायाभूत  सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणाऱ्या खर्चात अधिक वाढ करण्यात येणार आहे. मुलींच्या खेळ व शिक्षणावर शासनाने विशेष लक्ष दिले आहे.  त्यांना अधिकच्या सुविधा मिळण्यासाठी  मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करावा.

श्री. पाटील पुढे म्हणाले,  छोट्या शाळेत प्रयोगशाळेसारखे खगोलशास्त्राचा अभ्यासाकरीता आभासी तारांगण उभारण्याच्या प्रयत्न करण्यात येणार आहे. मोठ्या शाळेत मिळणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन आग्रही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्या इयत्तेआधी ३ वर्ष बालकांवर उत्तम संस्कार होण्याच्यादृष्टीने देशाची, भूगोलाची, राष्ट्रपुरुषांची माहिती होण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करुन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. लहानपणी घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम भविष्यात होत असतो. आगामी काळ गुणवत्तेचा असून विद्यार्थ्यांनी  गुणवत्ता संपादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

प्रस्ताविकात श्री. प्रसाद म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी करुन विद्यार्थी निवड संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासकीय, अनुदानित, खासगी शाळेत दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘निपूण भारत’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात दोन ते तीन वेळेस विद्यार्थीनिहाय सुक्ष्म अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येतो. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

आचार्य विनोबा भावे ॲप तयार करण्यात आले आहे. शाळा सुधार कार्यक्रम जिल्ह्यात ३९७ शाळेत राबविण्यात येत असून या शाळा आदर्श शाळा करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून देशासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री प्रसाद म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथामिक व पूर्व माध्यमिक परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले १०५ विद्यार्थी, इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत देशात व राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले १० विद्यार्थी, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेल्या ६ शाळा आणि जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

0000

भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. 27/01/2023 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

याबाबत प्रशासन सतर्क असून नागरीकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक 0257- 2223180 0257- 2217193 या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा.

भूकंपा दरम्यान काय कराल ?

जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?

घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा. 

जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?

पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका. उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

भूकंपादरम्यान काय करावे ? 

जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे ?

रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.

00000

शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.२७ – महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले, महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे, शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, अडथळ्यांचा शर्यतीत भाग घेणे आणि त्यासाठी सराव करणे हे मोठे धाडस आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणे आनंददायी आहे. शरीर, मन आणि बुद्धीसाठी असे खेळ आवश्यक आहेत. खेळ आता कौशल्य, व्यायाम किंवा स्पर्धेपुरता मर्यादित राहिलेला नसून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचीदेखील संधी आहे.

महाराष्ट्र शासनाने खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट सामावून घेतले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लहेराओ झंडा’ हे सादरीकरण केले. इंडियन स्कुल ऑफ योगच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडथळ्यांचा शर्यतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

आंतरशालेय स्पर्धेत जिल्ह्यातील १०० शाळा सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न

मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, प्रधान सचिव विकास खारगे,  अनुपकुमार यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

सन 2013 पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यावेळी मौलाना आझाद फायनान्शिअल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन, मुंबई यांच्या वतीने सर जे.जे. महानगर रक्तपेढीसाठी एक ॲम्बुलन्स भेट देण्यात आली. या ॲम्बुलन्सची चावी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात  कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत,  डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी असे नामवंत शायर सहभागी होवून  त्यांनी शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण केले. मुशायरा ऐकण्यासाठी रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतहर शकील यांनी सूत्रसंचालन केले.

000

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...