मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1676

लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हे; ‘हिंद केसरी’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २८ : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हते तर खऱ्या अर्थाने ‘हिंद केसरी’ होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या ‘लाल बाल पाल’ त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे, असे राज्यपालांनी सांगितले .

लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने २५ देश-विदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ. सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

000

जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.  पुरुष विभागात जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले तर बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात बाजी मारली. पश्चिम रेल्वे महिला विभागात अजिंक्य ठरले.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक  विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघाना कामगार कल्याण चषक आणि रोख ५० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास चषक आणि रोख ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे. एस. डब्ल्यू. ने क्रांती अग्रणीचा ३७-३६ असा निसटता पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला २९-२७ असे हरवले तर शहरी विभागात पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३७-२४ असा पराभव केला.

000

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. २८ : संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या  निधनाबद्दल राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. डॉ. मालखेडे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात आणि विशेषतः गुणवत्ता वाढविण्याच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

000

उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पेठ-सांगली रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू होणार

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पेठ नाका ते सांगली या 41.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. आष्टा शहर येथे झालेल्या या कार्यक्रमास कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मनसिंग नाईक, आमदार  विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले,  इंधन म्हणून इथेनॉलची मागणी वाढत आहे, यासाठी उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्याबरोबरच शेतकरी सभासदांना होणार आहे. केंद्र सरकारने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता  हार्वेस्टिंग सारखी योजना आणली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेमुळे कमी वेळेत ऊस कारखान्यास जातील आणि उसाचा उतारा चांगला मिळेल असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले. इथेनॉल बरोबरच हायड्रोजन हे देखील भविष्यातील इंधन असून या इंधनाच्या निर्मितीसाठीही शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. हायड्रोजन इंधन निर्मितीतून शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवले पाहिजे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र हायड्रोजन निर्मितीचेचे हब होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. गडकरी म्हणाले, पेठ सांगली या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरु होणार आहे  बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार असल्याने हा रस्ता अधिक दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होईल व  या भागातील विकास झपाट्याने होईल. या रस्त्यावरून होणारा प्रवास आनंददायी होण्यासाठी या भागातील शैक्षणिक संस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पालकमंत्री डॉ.खाडे म्हणाले,पेठ – सांगली या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि  ह्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होत असल्याने जिल्हावासियांची  बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन  या भागातील विकासाला गती दिली त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.  मार्च नंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होवून चांगला व दर्जेदार रस्ता  होईल याची मला खात्री आहे असेही पालकमंत्री डॉ. खाडे  म्हणाले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले या रस्त्याची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे, याचे सारे श्रेय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानाच द्यावे लागेल. हा रस्ता शिराळा मार्गे कोकणाला जोडल्यास त्याचा लाभ कोकणातील व या भागाच्या विकासाला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने या परिसराचा विकास झपाट्याने होईल.

पेठ-सांगली हा  रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या भागात विकासाचे दालन खुले झाले आहे असे खासदार संजय पाटील यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक करून या रस्त्याच्या कामाची माहिती दिली.

पेठ-सांगली रस्त्याबाबत माहिती…

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 एच पेठ नाका ते सांगली हा 41.25 किलोमीटरचा रस्ता ईपीसी तत्त्वावर काँक्रीट चौपदरीकरण करून पुनर्बांधणी व दर्जान्नतीकरण करण्याच्या कामासाठी 860 कोटी 45 लाख रूपये रक्कम मंजूर.
  • या  रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण होणार असून चार पदरी काँक्रीट रस्ता, मध्यभागी 0.6 मीटरचा दुभाजक, दुभाजक पासून दोन्ही बाजूस 7.5 मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता व 1.5  मीटर रुंदीची बाजू पट्टी असा हा रस्ता करण्यात येणार आहे.
  • या रस्त्यावर छोटे फुल 10, बॉक्स सेल मोरी 15, पाईप मोरी 60, ट्रक थांबे 2, बस शेड  10, मोठे जंक्शन 6, लहान जंक्शन 34, टोल नाका एक (तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान), काँक्रीट गटार १४.२०४ कि.मी. दोन्ही बाजूस, खुली गटार 27.046 कि.मी. दोन्ही बाजूस करण्यात येणार आहे.
  • या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक, स्थानिक लोक तसेच वाहतूक, रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे. अपघाताच्या प्रमाणात घट होणार असून प्रवास सुखकर, सुरक्षित व आरामदायी होणार आहे.
  • हा रस्ता राज्य मार्ग 48 पासून इस्लामपूर आष्टा सांगली या शहरांमधून पुढे सोलापूर व कर्नाटक मध्ये जाणाऱ्या रस्त्यास जोडला आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.
  • सांगली हे निर्यातक्षम शहर हळद व बेदाणे उत्पादनात अग्रेसर असून सांगली बाजारपेठ ही या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे पुणे मुंबई बेंगलोर एन एच 48 या राष्ट्रीय महामार्गास जोडली जाणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण होणार असल्याने वाहतूक जलद होऊन वाहनांच्या इंधन  खर्चात बचत होणार आहे.
  • हा राष्ट्रीय महामार्ग शेतीवर आधारित व्यवसाय तसेच सांगली कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहती मधील व्यावसायिका करिता लाभदायक ठरणार आहे.
  • या राष्ट्रीय महामार्ग सभोवतालच्या परिसर व शहराच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस सहाय्य होणार आहे.

00000

मराठी भाषेला म‍िळालेली समृद्ध संपदा वाढवूया – राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे         

नवी दिल्ली,27 : मराठी भाषेला मिळालेली समृद्ध संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत निर्माण करूया, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य तसेच ज्येष्ठ साहित्य‍िक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ या वर्षारंभ विशेषांकाच्या प्रकाशन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. याप्रसंगी  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास सपकाळ, परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अध‍िकारी अंजु निमसरकर, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हा विशेषांक परिचय केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

श्री. मुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा आणि  मराठी भाषेचा समृद्ध असा इतिहास आहे. मराठी भाषा ही भावनांसह लोककला, साह‍ित्य, लोकगीते, लोकनाट्य या सर्वांची संवाहक अशी ही भाषा आहे. मराठी भाषेत गेल्या 1500 वर्षात अनेक महाग्रंथ, दीर्घ  कविता, खंडकाव्य निर्माण झालेले आहेत. तर अलीकडच्या काळात कांदबरी, कथा, लोककथा, निबंध  अशा प्रकारचे विपुल साहित्य मराठीत  निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसह महाराष्ट्राबाहेरील मूळ मराठी मातीशी जुळलेली 2 कोटी जनताही मराठीत बोलते ही अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. जसे आपण जैववैविध्य जपतो तसेच आपल्याला भाषा वैविध्यही जपता आले पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे इतर भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपली साह‍ित्याची समृद्ध  पंरपरा जर टिकवायची असेल तर या साहित्य संपदेला पुढे नेऊया, यात अधिकाध‍िक दर्जेदार साहित्य निर्माण करू या, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ सारख्या उपक्रमात जास्तीत जास्त मराठी लोकांनी भाग घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. डॉ. मुळे यांनी आर्याबाग या अंकात त्यांनी  लिहिलेल्या कवितेचे वाचन याप्रसंगी केले.

विश्वास सपकाळ म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, मात्र आपली समृद्ध संस्कृती, साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचविता येईल याचा देखील प्रयत्न व्हायला हवा. फिजी आणि नौरू येथे राजदूत असताना हाय कमीशनच्या माध्यमातून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून येथील लोकांना महाराष्ट्रातील संस्कृतीचा परिचय करून दिल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे  काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये सुविचार लिहिले जात आहे. येथील नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासह मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, अशा कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे  काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली – काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात किमी अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.

राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेला मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्री वे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई व  मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होईल व त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे प्रकल्प

ऐरोली काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत चा रस्ता हा ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. सदर भागाची लांबी  ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित  रस्ता व उन्नत मार्ग आहे. सदर प्रकल्पात असलेला बोगदा हा चार  ४+४ मार्गिकेचा आहे.( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.)

सदर बोगद्यांचे भुयारीकरणाचे काम हे  New Austrian Tunneling Method (NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. सदर प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्री. श्रीनिवास म्हणाले की, “पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे  काम देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल.

०००

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

????????????????????????????????????

 

ठाणे, दि. २७ (जिमाका) : ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, निमंत्रक आशुतोष म्हस्के, श्री. मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केली. गणांक श्रमसाधना गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

000

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २७ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  दि. ३१ जानेवारी २०२३ नंतरही एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मुदत दि. २ मार्च, २०२३ असेल.

विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३) येणाऱ्या प्रवेशिका व पुस्तके स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

अर्चना शंभरकर/विसंअ/

मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. २७ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे १५ अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

चित्रपट परीक्षणाकरीता ३३ टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/01/जीआर.pdf”]

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि.27 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नियोजनबध्दरित्या अचूकपणे कामे पार पाडावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपटट्टे यांनी आज येथे दिले.

पदवीधर मतदार संघाच्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नियोजनभवन येथे मतमोजणीचे सादरीकरणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, विजय भाकरे, अजय लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, रविंद्र महाले यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 340 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

मतमोजणीची प्रक्रिया

बडनेरा येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबल राहणार असून त्यावर 28 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

मतमोजणी पूर्व तपासणी, मतमोजणीसाठी अनुषंगीक माहिती नमूद करण्याचे विवरणपत्रे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, मतपत्रिका वैध व अवैध ठरविणे, अवैध मतपत्रिकांची वर्गवारी, टेबलवरील मतपत्रिका मोजणी आदीबाबत  मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत म्हस्के  यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गणना पर्यवेक्षक व गणना सहायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत म्हस्के यांनी प्रशिक्षण दिले.  मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. बावने यांनी सांगितले.

00000

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...