मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1675

उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार -उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर, दि.२८ (जिमाका) : राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातीलऔद्योगिक वसाहतींचे विविध प्रश्न उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी बैठकीदरम्यान मार्गी लावले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ व उद्योग विभागाची कोल्हापूर जिल्हा आढावा बैठक तसेच उद्योग क्षेत्राच्या समस्यांबाबत कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सयाजी हॉटेल येथे बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, सत्यजित चंद्रकांत जाधव तसेच औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योजकांना सुरक्षितता देण्याच्या दुष्टीने राज्यातील सर्व एमआयडीसी परिसरात पोलीस चौक्या उभारण्याचा विचार आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात एमआयडीसीने लवकरात लवकर पोलीस चौकी बांधून द्यावी. तसेच पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी २ गाड्या जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी कोल्हापूर व साताऱ्याचे पालकमंत्री अनुक्रमे दीपक केसरकर व शंभुराज देसाई यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, कोल्हापूर येथील विकासवाडी येथे प्रस्तावित असलेल्या नविन एमआयडीसीसाठी 70 हेक्टर जागा संपादित करण्याची कार्यवाही सुरु करावी. यातील 20 हेक्टर जागेचा वापर लघु उद्योगांसाठी करण्यात येईल. अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील उद्योगांना अल्प दराने वीज, जमीन व इतर प्रोत्साहनपर सुविधांसह अन्य चांगल्या सुविधा राज्य शासनाच्या वतीने देण्यात येतील, असे सांगून औद्योगिक क्षेत्रातील कचरा उठाव आणि त्याच्यावर प्रक्रिया करुन व्यवस्था लावा. ग्रामपंचायत क्षेत्रातील औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची सुविधा द्यावी, अशा त्यांनी सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विजेची दरवाढ न करता पुढील तीन वर्षासाठी दर निश्चित ठेवावेत, अशी मागणी संघटनांनी केल्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच शासकीय विभागांची सबसिडी वेळेवर मिळवून देण्यासाठी सध्याच्या धोरणात बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

नविन एमआयडीसीमध्ये स्थानिक आणि लघु उद्योगांना प्राधान्य द्यावे, राज्यभरात ग्रामपंचायतीना एकसमान आणि कमीत कमी दर असावा, उद्योजकांसाठी महाराष्ट्रातील पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह या सामायिक प्रोत्साहन योजना 13 प्रमाणे सुधारित कराव्यात, या मागण्यांबाबत मंत्री श्री उदय सामंत यांनी औद्योगिक संघटनांसोबत चर्चा केली. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील वसाहतीत प्रवेश करणाऱ्या मुख्य चौपदरी रस्त्याचे डांबरीकरण करणे, उद्योग वाढीसाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना जागा उपलब्ध करून देणे, या वसाहतीमध्ये फायर स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा झाली. पाणी, वीज बिलाबाबत सध्या लागू पर्यावरण संरक्षण सेवाशुल्क आणि फायर चार्जेस हा वस्त्रोद्योग नसलेल्या उद्योगांसाठी निम्मा करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. कागल- हातकणंगले औद्योगिक वसाहतीतील पोलीस चौकी नवीन जागेत उभारणे, उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन सुविधेत आणखी सुधारणा करणे, ट्रक टर्मिनल्स उभारणे, विना वापर पडून असणाऱ्या औद्योगिक जागांचा वापर करणे तसेच औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या हद्दीतील साफसफाई आणि अघातक कचरा वेळेत उचलून स्वच्छता ठेवण्याबाबत चर्चा झाली. सातारा जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा निगम हॉस्पीटल उभारण्यासाठी 5 एकर जागा देण्यात येईल, अशी ग्वाही देवुन सातारा येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व साफसफाई आदी सोयी-सुविधा देण्यात येतील असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे व कार्यकारी अभियंता अतुल ढोरे यांनी जिल्ह्यातील उद्योग विभागाची सद्यस्थिती व औद्योगिक संघटनांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एमआयडीसी समोरील अडीअडचणींची माहिती दिली.

000

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

▶️ निर्यात व्यवस्थेत कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर बनावा

▶️जिल्ह्यातील नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे

▶️कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी मार्ग दर्जेदार  करुन प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी प्रयत्नशील

▶️जिल्ह्यात रोप वे, वातानुकूलित बस सह विकास प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य

▶️जल, वायू, ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करून जिल्ह्याचा विकास साधावा

कोल्हापूर, दि. २८ (जिमाका) : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी ह्या महामार्गाची निर्मिती अत्यंत चांगली व दर्जेदार करुन दळणवळणाच्या सुविधा अत्यंत गतिमान करण्यासाठी शासन कटिबंध असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग आंबा ते पैजारवाडी पॅकेज -2) (2191 कोटींचा प्रकल्प- 45.200 किमी) तसेच रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग पैजारवाडी ते चोकाक पॅकेज 3) (2131 कोटींचा प्रकल्प-32.960 किमी) यांचे भूमिपूजन आणि पंचगंगा नदीवरील कोल्हापूर प्रवेशासाठी उड्डाणपूल (बास्केट ब्रिज) (180 कोटींचा प्रकल्प- 1.2 किमी) ची पायाभरणी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 कोल्हापूर (शिरोली) ते सांगली (अंकली) या विभागाचे चौपदरीकरण (840 कोटींचा प्रकल्प- 33.825 किमी) कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

या  कार्यक्रमाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजय पाटील, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंधारकर, व्यवस्थापक गोविंदप्रसाद बैरवा, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या काम करण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर येत्या काळात भारत शक्तीशाली देश होईल. तर विकासाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर होईल, असा विश्वास व्यक्त करुन निर्यात व्यवस्थेत देखील कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर बनण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

देशाच्या विकासासाठी देशांतर्गत दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. कोल्हापूर – सांगली रस्ता हा पुढील कित्येक वर्षे टिकून राहील असा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येईल, त्याचप्रमाणे कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरील रस्ते रुंद आणि दर्जेदार होणार असून यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच शेतमालाची निर्यातवाढ होईल, शेतकरी, तरुण, नागरिक, उद्योजकांची सोय होवून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असे श्री. गडकरी म्हणाले.

दिल्ली आणि अन्य शहरांच्या तुलनेत निसर्ग सौंदर्याने समृध्द असणाऱ्या कोल्हापूरची हवा शुद्ध आहे. जल, वायू, ध्वनी प्रदूषण रोखून जिल्ह्याचा विकास साधा. प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर द्या. तंत्रज्ञानाचा वापर करुन कोल्हापूर,  सांगली जिल्ह्यात ऑटोमोबाईल हब बनण्यासाठी प्रयत्न करा. शहरातील रस्ते रुंद व स्वच्छ, सुंदर बनवा, मासिक पास मध्ये वातानुकूलित बसेस सुरु करा, असे सांगून वातानुकूलित बसेस, रोप – वे, केबल कार, रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आदी विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत, त्यांना मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही ही श्री. गडकरी यांनी दिली. तसेच येथील निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा व ड्राय पोर्ट ची सुविधा लॉजीस्टिक विविध वस्तूंच्या पार्क मध्ये देण्यासाठीही निश्चित प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांची चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभेच्छा संदेश देताना म्हणाले, दर्जेदार रस्ते आणि वेगवान विकास या विचारांनी नितीन गडकरी कार्यरत आहेत.  समृद्धी महामार्गाप्रमाणेच देशात अनेक महत्त्वपूर्ण मार्ग त्यांच्या प्रयत्नातून होत आहेत. यामुळे राज्याचा विकास साधला जाईल. बास्केट ब्रिज आणि कोल्हापुर- रत्नागिरी महामार्गामुळे वेळेची बचत होवून नागरिकांची सोय होईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरसह राज्यातील अन्य भागांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भविष्यात देखील नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्याचा विकास साधला जाईल.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आजवर आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. पन्हाळा व अन्य आवश्यक ठिकाणी रोप वे व्हावा, असे सांगून यापुढेही केंद्र सरकारच्या वतीने नितीन गडकरी यांनी यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर विमानतळाचा विकास होत असून येत्या काळात याठीकाणाहून वाढणारी वर्दळ विचारात घेवून विमानतळ मार्गाचे देखील चौपदरीकरण व्हावे. जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्पांना गती मिळावी, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे मालवाहतुकीच्या तसेच प्रवासी वाहतुकीच्या वेळेत बचत होऊन जिल्ह्याच्या विकासालाही मदत मिळेल असे त्यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, ज्या देशांमध्ये रस्त्यांचा विकास झाला आहे त्या देशांचा झपाट्याने विकास झाल्याचे दिसून येते. कोल्हापूरची ओळख आता विकासाचा जिल्हा म्हणून होत आहे. बास्केट ब्रीजच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागेल. पूर परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा श्री. महाडिक यांनी व्यक्त केली. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात अनेक सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. शहराच्या प्रवेश द्वारावर दर्जेदार भव्य कमान, विमानतळ तसेच शहरातील महत्वाच्या मार्गांचे चौपदरीकरण व्हावे, इलेक्ट्रिक बसेस द्याव्यात, पन्हाळा, गगनबावडा, जोतिबा याठिकाणी रोप वे ची सुविधा व्हावी, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गांसाठी भरघोस निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्नशील असून जिल्ह्यातील सहापदरी महामार्ग दर्जेदार पद्धतीने व्हावेत, असे सांगितले. तर कोल्हापूरच्या विकासात बास्केट ब्रीज महत्वपूर्ण ठरेल, असे सांगून लॉजेस्टिक पार्क हातकणंगले तालुक्यात व्हावा, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी मनोगतातून सांगली जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देवून सहकार्याची अपेक्षा केली.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जुहू येथे रोजगार मेळाव्यात ५७२ नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

मुंबई, दि. २८ : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५७२ नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

मेळाव्यात ४३ कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील ९ हजार १६१ रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण ३०४ उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.

५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२२-२३ च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या  बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले. देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२१ ते  नोव्हेंबर २०२२ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २८ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू ,पुद्दूचेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १८ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.

000

पायाभूत सुविधांची निर्मिती आणि उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दिनांक २८: पायाभूत सुविधांचा विकास झाला तर राज्य प्रगतीकडे जाते. त्यामुळे या सुविधा निर्माण करणे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे आणि लोकहिताचा कारभार करणे याला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

न्यूज १८ लोकमतच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्योग रत्न पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, न्यूज १८ लोकमतचे सीईओ अविनाश कौल, संपादक आशुतोष पाटील यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यात आमच्या सरकारने राज्याच्या हिताचे शेतकरी, कामगार, महिला, आणि उद्योजक अशा सर्वांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. तीच भावना आणि भूमिका यापुढील काळात कायम राहील. उद्योगांसाठी सबसिडी देणे, त्याला व्यवसायासाठी सुलभ वातावरण निर्मिती,  नवउद्योजकाना पाठबळ अशा प्रकारे राज्य शासन काम करत असल्याचे ते म्हणाले.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरातील पाचशे किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात लोकांना दिलासा मिळेल आणि पुढील अडीच वर्षात खड्डेमुक्त मुंबई पाहायला मिळेल. शहराचे सुशोभीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

दावोस येथे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योगांनी रुची दाखवली आहे. त्यातील अनेकांनी सामंजस्य करार केले. येत्या काळात राज्यात अनेक मोठे उद्योग आलेले दिसतील, असे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विकासाच्या दिशेने नेणारा आहे. नागपूर – मुंबई हे अंतर कमी झाल्याने अनेक शेतकरी, उद्योजक यांना त्याचा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

सिंचन प्रकल्पांना गती, शेतकऱ्यांना भरीव मदत, ज्येष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास.

दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय असे अनेक लोकहिताचे निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नवीन प्रकल्प सुरू होत आहेत. हाताला काम मिळाल्याने आणि पायाभूत सुविधा वाढल्याने रोजगार निर्मिती होईल आणि तेथील नक्षलवाद संपेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्र – राज्य संबंध चांगले असतील तर राज्याच्या विकासाला त्याचा लाभ होतो. गेल्या काही महिन्यात हे चित्र आपल्याला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रवी नरहिरे (कळंब, उस्मानाबाद), डॉ. सुजित जे. पी.सिंह, आयुष माहेश्वरी, राहुल राजभर, रवींद्र कुटे आणि केदार संघवी, शिखा गुप्ता आणि आलोक जयस्वाल, डॉ.बिपिन सुळे, लक्ष्मीकांत त्रिवेदी, विकी गावंडे आणि गोल्डी साहू, विनीत चौधरी आणि मयुरेश चौधरी, विनय तिवारी, रोहित अग्रवाल, राकेश राठी, जितेंद्र सिंह राठोड, डॉ. प्रमोद दुबे, सुखदेव शिंदे, दिनकर रत्नाकर, डॉ. प्रवीण बढे यांचा उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 000

जीवन कसे जगावे हे पुस्तके शिकवतात – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. २८, (जि. मा. का.) : जीवन कसे जगावे हे पुस्तके शिकवतात. पुस्तकाची, वाचनाची आवड जोपासल्यास निश्चित यश मिळते. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. हे प्रदर्शन उद्या दि. २९ पर्यंत असेल.

यावेळी ज्येष्ठ साहित्यक प्रा. वैजनाथ महाजन, शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ. मु. गलांडे, प्रशांत खाडे, जिल्हा  माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, एकनाथ जाधव, पांडूरंग सुर्यवंशी, विष्णू तुळपुळे, संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, आजच्या काळात वाचनाचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी असे ग्रंथोत्सव उपयुक्त ठरतील. ग्रंथोत्सवात अनेक लेखक, विचारवंतांचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. वाचेल तो वाचेल असे म्हटले जाते. संकटे, चिंता प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. आशावेळी अनेकजन हतबल होतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वामी विवेकानंद यांना समोर ठेवावे, दु:खला सामोरे जाण्याची क्षमता आपल्या येईल. असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी लोकप्रतिनिधी होऊ शकलो ते जन्माला आले नसते तर आज मी येथे नसतो. घटनेनं दिलेल्या अधिकारामुळेच सामान्यातला सामान्य, गरिबातील गरीब माणूस सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकतो. ही ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आहे.

ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य असून पुस्तक हा आपला साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही. वृध्दपकाळही सुखाचा होईल. वाचन आणि संगीताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल. जीवन कसे असावे हे पुस्तके शिकवतात. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी कामगार कल्याण विभागाच्या वतीने मिरज येथे घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रंथोत्सवासाठी शांतिनिकेतन या संस्थेने केलेल्या सहकार्याचेही कौतुक केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. कन्या विद्यालयाच्या मुलींची स्वागत गीत सादर केले.

रविवार दि. २९ रोजी सकाळी १०:३० वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात ग्रंथालय सेवा व ई-ग्रंथालय याविषयावर जेष्ठ  ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. सौ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. डॉ. अमित सत्तीकर व विजय बक्षी आदी सहभागी होतील. दुपारी २.३० वा. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथोत्सव कार्यक्रमागील उद्देश याविषयावर महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात आय.आर.एस. अजिंक्य काटकर, पोलिस उपधिक्षक अजित टिके, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल व परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे आदी सहभागी होतील.

दरम्यान ग्रंथोत्सवात सकाळी ९ ते सायं. ७ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

000

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री

पुणे दि.२८: ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश

जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना प्रधानमंत्र्यांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक

उपमुख्यमंत्री म्हणाले की, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आताची भू-राजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.

अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे.  यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त – डॉ. एस. जयशंकर

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, जागतिकीकरण आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारत मार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्त्वाची सूत्रे

स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे

चांगल्या परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.

चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारित धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.आफळे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत ६३० पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

000

 

 

सांघिक भावना वाढीसाठी कला, क्रीडा स्पर्धा उपयुक्त – अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह

अमरावती, दि. २८ : केवळ हार-जीत हा खेळाचा उद्देश नसतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध गुण विकसित होण्यासाठी व सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी कला व क्रीडा स्पर्धा उपयुक्त असते, असे प्रतिपादन राज्याचे  अप्पर मुख्य सचिव (लेखा व कोषागारे) आशिषकुमार सिंह यांनी आज येथे केले.

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, आंतरराष्ट्रीय नौकानयन खेळाडू दत्तू भोकनळ, संचालक (लेखा व कोषागारे) वैभव राजेघाटगे, संचालक (स्थानिक निधी लेखा परीक्षा) माधव नागरगोजे, सहसंचालक शिल्पा पवार आदी यावेळी उपस्थित होते.

अमरातीसारख्या क्रीडा व सांस्कृतिक महात्म्य लाभलेल्या नगरीत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल श्री. सिंह यांनी समितीचे व स्थानिक कार्यालयातील सहकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील क्षमता विकसनासाठी कला व क्रीडा स्पर्धेचा उपक्रम महत्त्वाचा आहे. विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्‌टे म्हणाले की, स्पर्धा ही ‘एन्जॉय’ करण्याची गोष्ट आहे.

जिंकण्यापेक्षा मनापासून खेळणे महत्त्वाचे असते. कोषागारात हिशेब तपासणीचे काम चालते. त्याअर्थाने येथील सर्व सहकारी आकड्यांशी खेळत असतात; पण क्षेत्र कुठलेही असो, खिलाडू वृत्ती जिवंत ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. यावेळी त्यांनी आपल्या गझलेतील काही ओळीही सादर केल्या.

धावपळीच्या या युगात प्रत्येकालाच ताणतणाव अनुभवावा लागतो. वेगवेगळे छंद जोपासणे, नियमित व्यायाम आदींसाठी स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे. दिवसातील किमान ३० मिनिटे तरी स्वत:ला दिली पाहिजेत, असे श्री. भोकनळ यांनी सांगितले. सहसंचालक श्रीमती पवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे आयोजन व विभागाच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.

विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी झाला. प्रारंभी दिव्यांग विद्यार्थी कलावंतांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. रवींद्र जोगी व प्रीती वाकोडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देशमुख यांनी आभार मानले.

०००

दिगंबर नेमाडे यांचा अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्या हस्ते गौरव

अमरावती, दि. २८ : समन्वयित कृषी विकास प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा सहायक संचालक दिगंबर नेमाडे यांचा विशेष पुरस्काराने गौरव राज्याचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्या हस्ते आज झाला.

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत श्री. नेमाडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, आंतरराष्ट्रीय नौकानयन खेळाडू दत्तू भोकनळ, संचालक वैभव राजेघाटगे, संचालक माधव नागरगोजे, सहसंचालक शिल्पा पवार आदी यावेळी उपस्थित होते.

समन्वयित कृषी विकास प्रकल्पाद्वारे शेतकरी बांधवांसाठी शेततळे, नदी-नाले खोलीकरण, नेट शेड वाटप, गॅबियन बंधारे, मत्स्य बीज वाटप, बांबू लागवड, सौर कुंपण निर्मिती आदी विविध कामे राबवली गेली. या काळात त्याचे लेखाविषयक काम, आवश्यक तपासण्या, त्रुटी दूर करणे आदी कामांसाठी श्री. नेमाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.  त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

०००

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून स्त्री रूग्णालयाची पाहणी

उस्मानाबाद,दि.२८ (जिमाका): राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी दि. २७ रोजी जिल्हा स्त्री रूग्णालयास सायंकाळी भेट देवून विविध विभागाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत मिटकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी, डॉ. सुधीर सोनटक्के आदी उपस्थित होते. प्रधान सचिव श्री. खंदारे यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या.जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचार व प्रसुतीसाठी येणार्‍या महिला रूग्णांची संख्या लक्षात घेवून आंतररूग्ण विभाग अद्ययावत करण्याबाबत खंदारे यांनी सूचना केल्या. तसेच आवश्यक त्या बाबींसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.

यावेळी जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी यांनी सांगितले की, एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ४५०० गर्भवती महिला प्रसूत झाल्या. यात २८०० महिलांची नैसर्गिकरित्या तर १७०० महिलांची सिझेरियन प्रसूती झाली आहे. याच कालावधीत कावीळ, प्रसूती काळ पूर्ण होण्याअगोदरच जन्मलेल्या ९०० बालकांची उत्तमरित्या काळजी घेण्यात आली आहे. स्त्री रूग्णालयात सुमन, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना यांची माहिती देण्यात आली. सध्या दररोज सरासरी आंतररूग्ण विभागात २०० महिला रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

रूग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, अतिजोखम ‘आयसीयू’ व ‘एनआयसीयू’ या विभागात माता व बालकांना उपचार देण्यात आले. स्त्री रूग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य या अभियानात प्रमाणित असल्याने खंदारे यांनी समाधान व्यक्त करून जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालयात उपचार घेणाऱ्या व प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला रूग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी १०० खाटांची सुविधा असलेले माता व बाल रूग्णालय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. नायकल, डॉ. मिनियार, डॉ. मिटकरी, डॉ. आयेशा, अधिपरिचारिका मराठे, परिचारिका भंडारी, संजय मुंडे, मस्के, गुळवे, आदी उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...