रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1645

खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि. 13 (जिमाका) –  खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या (बीबीएनजी) वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित परिवर्तन 2023 या उद्योग परिषदेत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, विवेक देशपांडे, मधुरा कुंभेजकर, अरविंद नांदापूरकर, अरविंद कोऱ्हाळकर, शिल्पा इनामदार, महेश देशपांडे, महेश जोशी, अभिनेते प्रशांत दामले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ब्राह्मण समाजातील उद्योजकांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला एकेकाळी नोकरी हाच पर्याय होता. अलिकडच्या काळात मात्र आता सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाज अग्रेसर दिसून येतो आहे. उद्योग क्षेत्रात ब्राह्मण समाजातील तरुणांची गरुड झेप पहावयास मिळत आहे. ब्राह्मण समाजात यशस्वी उद्योजक पहायला मिळतात. जगातील प्रमुख 7 कंपन्यांपैकी 4 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण आहेत. सिलिकॉन व्हॅलीत समाजाचे तरुण काम करत आहेत. या माध्यमातून मोठे काम होत आहे. आज विविध समाजातील संघटना या समाजाच्या पाठिशी उभे राहून उद्योजकता, शिक्षण, व्यवसायिकता या विविध क्षेत्रात काम करत आहेत. कुठलेही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करत आहेत. ब्राह्मण समाजातील संघटना देखील  नि:स्वार्थ वृत्तीने काम करताना दिसतात. बीबीएनजी सारख्या संस्था समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करतात, याचे समाधान वाटते. समाजाला ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक होते ते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी केले आहे.

ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. सन 2030 सालापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आजच्या जगात व्यावसायिकता, उद्योगशिलता, नव्या उद्योगाला समजून घेणे व त्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. दूरसंचार क्रांतीमुळे तरुण पिढीला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या काळात अशी संधी उपलब्ध आहे की, छोट्या गावातील तरुण स्टार्टअप सुरू करून मोठा उद्योग उभारु शकतो. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेला युवक देखील एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे परिवर्तन घडत आहे. हे बदलते मूल्य समजून घेण्यात तरुणाई काम करत आहे. जगात उद्योग आणि विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध हे सांगणारे व या संधी कशा प्राप्त कराव्यात याबद्दल मार्गदर्शनाचे काम बीबीएनजी सारख्या संस्था करत आहेत. अनेक लोकांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं विश्व तयार केले आहे. ज्या वेगाने देश पुढे चालला आहे. त्या वेगात ब्राह्मण समाजाने यापूर्वी देखील योगदान दिले आहे, यापुढेही ते करतील व देशाला पुढे नेण्याचे काम समाजातील तरुण करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

समाजासाठी संस्थेच्या कार्यामध्ये काहीही मदत लागली, तर मी आपल्या पाठिशी उभा आहे. विशेषतः तरुणांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करु. मागील काळात  खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे 605 कोर्सेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्धे शुल्क भरण्याचा निर्णय घेतली. हुशार विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने जगातील उत्तम विद्यापीठामध्ये शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

000000000

उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा

मुंबई, दि. 13 : वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आज येथील उष्णतेच्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेवरील चर्चासत्रात विचार व्यक्त करण्यात आले.

राज्यातील समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेशही उष्ण असल्याचे आढळून येत आहेत. राज्य शासनासोबत नगरपालिका, महानगरपालिका या स्वायत्त संस्था उष्ण लहरींचे मानवी जीवनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी कृती आराखडा राबवित असल्याची माहिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन सल्लागार (युएनडीपी) श्रीदत्त कामत यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात हवामान केंद्रे कार्यरत असून, उष्ण लहरींची माहिती जनमानसात पोहोचावी यासाठी जनजागृती केली जाते. तापमान वाढल्याने होणारे आजार, त्याची लक्षणे याची प्रसिद्धी विविध माध्यमातून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयआरएडीएचे उपसंचालक रोहित मंगोत्रा, एनआयडीएमचे डॉ.अनिल गुप्ता, यांच्यासह छत्तीसगड व बिहारच्या शासकीय अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या परिणामांची शास्त्रशुद्ध माहिती गोळा करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत

मुंबई, दि. 13 :- जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून जीविताला होणारा धोका वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शास्त्रशुद्ध माहितीचे संकलन, प्रभावी उपाययोजना शासनस्तरावरुन राबविणे शक्य होईल, असे मत उष्ण लहरींबाबत आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत मांडण्यात आले.

जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजनांसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन आयआयटी, पवई येथे करण्यात आले असून पहिल्या सत्रात, हवामान बदलाचा प्रभाव आणि उष्णतेच्या लहरींच्या अनुकूलतेची आव्हाने तसेच उष्णतेच्या लहरींचा आरोग्यावर परिणाम आणि उपाय या विषयांवर चर्चासत्र झालीत. विविध तज्ज्ञांसमवेत, विविध राज्यांतील शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उष्ण मोसमात अचानक वाढणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरुन उष्णतेचा घातक परिणाम शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होताना दिसत आहे. मृत्यूच्या कारणांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून उष्माघातावरील उपाययोजना आखण्यास मदत होणार असल्याचे, आयआयटीचे प्रा.डॉ. महावीर गुलेचा यांनी सांगितले.

उष्णतेच्या लहरी अथवा उष्माघाताने होणारे मृत्यू हे पूर्वापार सुरू असून, अलिकडेच त्याची अधिक गांभिर्याने दखल घेण्यात येत आहे. जागतिक हवामान बदलामुळे उष्माघात वाढत असून मनुष्य व वन्यजीवांवर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी मांडले.

उष्माघातामुळे आरोग्य, अर्थव्यवस्था, शिक्षण अशा विविध घटकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असून, उष्माघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनासह लोकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात मृत्यूची संख्या वाढू शकते असे सांगून यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

शासनाने विविध स्तरावर प्रबोधन आणि जागृती करणे गरजेचे आहे. हवामान केंद्राची संख्या वाढविणे, आजाराची कारणे शोधून उष्माघाताचा मनुष्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचे निदान करून, त्यासंदर्भात डेटा तयार करून, तो सर्वांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहआयुक्त प्रशांत कांबळे यांनी मनुष्याला उष्माघाताचा जसा त्रास होतो तसाच प्राण्यांनाही होत आहे. यासाठी योग्य पाणीपुरवठा, शेड, औषध, आरोग्याची काळजी आणि उष्ण वातावरणात कामे करून घेऊ नयेत अशा विविध उपाययोजनांची माहिती दिली.

‘हीट ॲक्शन प्लान’ ची अंमलबजावणी करणे, पूर्वसूचना देणारी यंत्रणा अधिक अत्याधुनिक करणे, घरासाठी योग्य तापमान तयार होईल असे रंग वापरणे, इमारतींना काचा वापरणे टाळणे, फूल रुफ टेक्नॉलॉजीचा वापर करणे, कर्नाटकप्रमाणे वेदर स्टेशनचा इतर राज्यांनी वापर करावा, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण करण्यात यावे, स्थानिक संस्थेच्या सहकार्याने शासनाने विविध उपाययोजनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या सत्रात एनडीएमए चे सहसचिव कुणाल सत्यर्थी, आयएमडीचे महासंचालक डॉ. अजित त्यागी, एनडीएमएचे सदस्य डॉ. कृष्णा वात्सा, सदस्य सचिव कमल किशोर, आयआयटीचे प्रो. कपिल गुप्ता, प्रो. महावीर गुलेचा, पब्लिक हेल्थेचे सुरेश राठी यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. : 13 (जिमाका वृत्तसेवा) : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालय या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार

आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेस तत्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची  कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहोचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येऊन त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजनेसोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने देखील 500 कोटी रुपयांच्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मनमाडच्या  विकासात  भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व मार्गस्थ -२ गावे पाणी पुरवठा (करंजवण धरण उद्भव) योजना, शिवसृष्टी व ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेल्या वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटप यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000

मराठा समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी संवाद मेळावा महत्त्वपूर्ण – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद, दिनांक १३ (जिमाका) : मराठा समाजातील होतकरु तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तरुणांना उद्योजक होण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने चिखलठाणा येथे आयोजित केलेला लाभार्थी आणि बँक यांचा संवाद मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

या संवाद मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार हरिभाऊ बागडे,  महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे किशोर शितोळे, लोकविकास नागरी सहकारी बँकेचे  नामदेव पवार, इन्डसलँड बँकेचे व्यवस्थापक मनोज सदाफले, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील, रोजगार व स्वंय रोजगारचे सहायक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रंल बॅक, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, देना बँक यांच्यासह विविध बँकाचे स्टॉल धारक, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.

मेळाव्यातून सर्व बँकेचे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी तयार करुन युवकांना उपलब्ध करुन द्यावी.  लाभार्थींनी वेळेत कागदपत्रे जमा करावी जेणेकरुन लवकर कर्ज उपल्ब्ध होईल. ही प्रक्रिया सुलभ केल्याने गरजूंना विविध विकास महामंडाळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी सूचना सहकार मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित बँक अधिकारी व प्रतिनिधीना केली. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाची १५ लाखावरुन २५लाखापर्यंत कर्जाची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, या संवाद मेळाव्यातून महामंडळ प्रत्यक्ष अर्जदार, लाभार्थी बँकाचे प्रतिनिधी आणि अधिकारी, यांच्या समन्वयातून एकत्र ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व यात येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सहकारी बँकप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणत करावा. यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. महामंडळाअंतर्गत महिलांना देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यासाठी महिला समन्वयकाच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करुन उद्योजक तयार करण्यासाठी  अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. निर्यातक्षम उत्पादन वाढविण्याबरोबरच कर्जाची मर्यादेत वाढीसाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, उद्योजक होण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीसह निवड केलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती तरुणांनी करुन घ्यावी. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करुन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा. बँकाचा विश्वास संपादन करण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करावी.

किशोर शितोळे यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी तरुणांना उद्योजक घडविणे आवश्यक आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडाळाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जिल्ह्यात ४७५ लाभार्थींना ३५ कोटींचे कर्ज, देवगिरी नागरी सहाकारी बँकने उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचा व्याजाचा परतावा लाभार्थींनी पूर्णपणे केला आहे.     कार्यक्रमात लाभार्थी उद्योजक यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सचिन पेरे, सोमनाथ खांडेभराड, राहुल पोटफाडे, दिपाली पाटेकर, विशाल सोळंखे, रामेश्वर पाटोळे, दादासाहेब निकम यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

***

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले

मुंबई, दि. 13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले यांनी मांडले

पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023 मध्ये उष्णतेच्या लाटांबाबत पूर्वसूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे या चर्चासत्रात प्रा. परमेश्वर उडमाले बोलत होते. यावेळी ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील प्रतिनिधींनी आपले या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

प्रा.परमेश्वर उडमाले म्हणाले की, विविधांगी स्वरूपात उष्ण लाटांचे प्रदेश आहेत, त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यामध्ये अशा प्रदेशांची माहिती जमा करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक अशा स्वरूपाच्या सगळ्या जगण्यावरती याचा परिणाम होत असतो. संवेदनशील भागात नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपल्या राज्यात उष्णतेच्या लाटांसाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कशाप्रकारे आगामी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जनजागृतीसाठी माहिती–शिक्षण-संवाद यातून लोकांना उष्णतेच्या कालावधीत होणारी हानी कशाप्रकारे कमी करता येईल, याची माहिती यावेळी दिली.

हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत

जागतिक हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्म लहरींचा परिणाम कृषी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत. पीक विमा घ्यावा, कमी पाण्यातील विविध पीक लागवड करावी, अशा उपाययोजना यावेळी सूचविण्यात आल्या.

अन्न सुरक्षा ही महत्त्वाची बाब असून, बदलत्या हवामानानुसार राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे पिकांची लागवड करताना पालन करावे असे सांगून डॉ. विनय सेहगल यांनी शेतीचे वाढत्या उष्म लहरींमुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या.

वाढत्या उष्णलहरींमुळे पाणी व ऊर्जाचे नियोजन कसे करावे याबाबत सीडीआरआय चे महासंचालक अमित प्रोथी यांनी माहिती दिली.

००००

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईतून कनेक्टिव्हीटी उत्तम असल्याने आंतरराष्ट्रीय नागरिक, उद्योजक मोठ्या संख्येने येत आहेत, यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दादर येथे टीव्ही ९ च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. गेल्या सात महिन्यात जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोना काळात बंद पडलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण केले. हा महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू झाला असून येत्या वर्षाअखेर मुंबईपर्यतचा महामार्ग पूर्ण होईल. यामुळे नागपूर ते मुंबई अंतर 6 ते 7 तासांवर येणार आहे. शेवटचा टप्पा येत्या वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या समृद्धी महामार्गावर 18 ठिकाणी नवीन नोड तयार करण्यात आले असून विविध ठिकाणी उद्योग, लॉजिस्टीक पार्क, फूड पार्क तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यवर्धन होईल. पर्यटनाला चालना मिळणार असल्याने लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. महामार्गांवर 33 लाख वृक्ष लागवड करणार असून यामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. सुमारे २५० ते ५०० मेगावॅट सोलर वीज तयार करण्याचे उद्दिष्ट असून हा ग्रीन महामार्ग आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखून करण्यात येत आहेत.

ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ १५ मिनिटांत रायगड

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या सुशोभीकरणावर, कोळीवाड्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून शिवडी न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून रायगडला केवळ 15 मिनिटांत पोहोचणार आहोत. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविणार आहे. याठिकाणचे फ्लेमिंगो इथेच राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई आठ लेनचा जगातील सर्वात रूंद बोगदा करणार

मुंबईहून पुण्याला घाटातून जाताना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी जगातील सर्वात रूंद आठ लेनचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, प्रदूषण कमी होईल, इंधन आणि वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाला गडचिरोली, भंडारा, गोंदिया जोडणार

समृद्धी महामार्गाची व्याप्ती वाढविणार असून आता नागपूर-मुंबईसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना असा महामार्ग जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग हा मार्गही हाती घेण्यात येणार आहे. शिवाय नागपूर-गोवा शक्तीपीठ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांचा माल त्वरित मोठ्या बाजारपेठामध्ये पोहोचणार असून माल खराब होण्याची शक्यता कमी होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वर्सोवा-विरार सी-लिंक

मुंबईतल्या व्यक्तीला विरारला पोहोचायला दोन तास लागतात. मात्र वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतली व्यक्ती केवळ ४५ मिनिटात विरारला पोहोचणार आहे. हा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय मेट्रो २ अ, ७ अ सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. मेट्रो ३ सुरू झाल्यास वेळ, इंधनाची बचत होईल. ३३७ किमी मेट्रोचे जाळे तयार झाल्याने ६० ते ७० लाख कारचा वापर कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून १४७ प्रकारच्या तपासण्या

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असून मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १०० ठिकाणी सुरू केला आहे. शिवाय २५० आणखी दवाखाने सुरु करणार असून ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरू केला आहे. यामाध्यमातून १४७ विविध प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत. ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ योजनेंतर्गत राज्यातील चार कोटी 39 लाख मातांची तपासणी करून रोगनिदान केले. दुसऱ्या टप्प्यात 0 ते 18 वयोगटातील 3 कोटी मुलांची तपासणी सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन सुरू केले असून प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

१८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता

कृषी, पाणी टंचाई यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. १८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे अडीच ते पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करून प्रभावीपणे राबवित आहोत. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. उद्योगस्नेही धोरण ठेवल्याने अनेक नवीन उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्रात कौशल्य असलेले मनुष्यबळ, कनेक्टिव्हीटी असल्याने मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. सर्व सवलती देण्यात येत असून एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या परवानग्या देत आहोत. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी, सहकार, चित्रपट उद्योग यासाठी सवलती देऊन राज्य शासन सहकार्य करीत आहे. मुंबईतील रखडलेले प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत आहे. जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सडेतोड उत्तरे दिली.

000

धोंडिराम अर्जुन/ससं/

उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर

मुंबई, दि. 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज, देशातील विविध राज्यातील व  महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ कार्यशाळेत सहभागी आहेत.

श्री. कमल किशोर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून जगभरात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येऊन उष्णतेच्या लाटांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन यातून एक चांगले विचारमंथन घडून येईल, असेही कमल किशोर म्हणाले.

आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना दिलासा मिळणे गरजेचे – प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता

मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले की, राज्यात विविध आपत्तींमध्ये होणारी मनुष्यहानी टाळण्याकरता राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते. उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था आणि या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. कोणत्याही आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण, उपयुक्त कल्पनांच्या देवाण-घेवाणीसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे, असेही प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशिस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी प्रास्ताविक केले.

००००

संध्या गरवारे/श्रद्धा मेश्राम/13.2.2023

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. १२: महाराष्ट्र विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित ‘बोरिवली खेल महोत्सव २०२३’ या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी, कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी  शासकीय सेवेत  नियुक्ती  दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक  सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कुस्तीमध्येचं मिळवून दिले होते. आताही आपले कुस्तीपटू वेगवेगळ्या ठिकाणी पदके मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारांत  उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वाधिक पदके महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद  बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली.  या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटू  हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्तीपटूस पराभूत करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या.

000

राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना देणार स्वमालकीच्या शासकीय इमारती

नंदुरबार, दि. १२ (जिमाका वृत्त):  येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे व त्यात काम करणारे शिक्षक कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच पुढील वर्षापासून पहिली ते दुसरीच्या वर्गांत मराठी, हिंदी, इंग्रजी या अनिवार्य भाषांसोबतच स्थानिक आदिवासी बोली भाषेतून शिक्षण देण्याची योजना असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज अक्कलकुवा तालुक्यातील डाब, भगदरी, मोलगी आणि सरी येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/ आश्रमशाळांचे लोकार्पण व जलजीवन मिशनच्या कामांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्यांच्या भुमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि. प. सदस्य किरसिंग वसावे, सि. के. पाडवी, निलेश वळवी, पं.स. सदस्य बिरबल वसावे, सरपंच सर्वश्री पिरसिंग पाडवी (भगदरी), आकाश वसावे (डाब), अशोक राऊत (पिंपळखुटा), रोशन पाडवी (बिजरीगव्हाण), दिनेश वसावे (साकलीउमर), दिलीप वसावे (सरी), श्रीमती ज्योती तडवी (मोलगी), सागर पाडवी (काठी) सहायक जिल्हाधिकारी तथा तळोदा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता मनिष वाघ विवध व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व आश्रमशाळा/वसतीगृहांचे डिजिटलायजेशन केले जाणार असून व्हर्चुअल क्लासरूमची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. मातृभाषेतून शिक्षणासोबतच आदिवासी बहुल भागातील विद्यर्थ्यांची आकलन क्षमता वाढीस लागावी यासाठी आदिवासी बोली भाषांमधून पहिली, दुसरीच्या वर्गात दृकश्राव्य पद्धतीने विविध संकल्पना शिकवून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजीत काय संबोधले जाते याचेही समांतर शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व करत असताना कुठेही शिस्त आणि नियमांशी तडजोड केली जाणार नाही. जे शिक्षक व कर्मचारी वेळेत येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्या विषयांत मुलांचा निकाल समाधानकारक लागणार नाही त्या विषय शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाईल. शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी करताना शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांच्या अडचणी ऐकून त्या शंभर टक्के जागेवरच सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून शासनाच्या प्रत्येक विभागामार्फत आदिवासी विकासासाठी योजना कार्यक्रम आहेत. भविष्यात जनतेच्या मागणीनुसार या योजना व कार्यक्रम राबवले जातील, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

आधुनिक पद्धतीने दिले जाणार शिक्षण – डॉ. हिना गावित

आज ज्या वसतीगृह व आश्रमशाळांच्या इमारतींचे लोकार्पण झाले आहे, तेथे शिक्षणातील सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. व्यायामशाळा, ग्रंथालय या सारख्या उपक्रमांमधून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार असून केवळ पाठ्यपुस्तकेच नाही तर संशोधनपर संदर्भग्रंथही या आश्रमशाळा/ वसतीगृहांमधील ग्रंथालयात उपलब्ध आहेत, असे यावेळी सांगून खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल से नल’ योजनेची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

या इमारतींचा झाले लोकार्पण

 डाब येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 भगदरी येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 मोलगी येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 सरी येथील शासकीय आश्रमशाळा, मुलींचे वसतीगृह व सामाजिक सभागृह

यांचे झाले भुमिपूजन

 भगदरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध रस्ते

 मोलगी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

 सरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

 साकली उमर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

000

ताज्या बातम्या

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

0
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

0
मुंबई, दि. १७: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र...

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...