रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1644

देशात उष्माघातामुळे जाणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय – कुणाल सत्यार्थी

मुंबई, दि. १४ : जगात उष्माघाताचे सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे. यावरील उपाययोजनांबाबत दोन दिवसीय कार्यशाळेत सखोल चर्चा झाली. यंदा भारतात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्यासाठी शासन, संस्था, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक घटक सर्वांनी मिळून काम करू, असे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी यांनी केले.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आयआयटी पवई येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या चर्चासत्रात श्री. सत्यार्थी बोलत होते.

देशातील विविध राज्यांतील व महाराष्ट्रातील विविध शासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी उष्णतेच्या लाटांविषयी संशोधन, अभ्यास आणि उपाययोजनांबाबत कार्यशाळेत आपले मत मांडले.

उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे.  उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून बचाव कसा करता येऊ शकेल, यावर चर्चा करण्यात आली.

उष्ण लहरी शमविण्यासाठी राज्य शासनाच्या कृती आराखड्याची पुनर्रचना आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण भागात उष्ण लहरींमुळे प्रभावित होणाऱ्या पिकांसाठी उपाययोजना सांगाव्यात, शेती, जनावरे आणि कामगार वर्गामध्ये जातील जास्त माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, शहरांमध्ये ‘उष्ण लहरींबाबत सर्व माहिती संकलन आणि नियंत्रणासाठी ‘हिट अधिकारी’ यांची नेमणूक करावी, आंतर – संस्था समन्वय साधण्याचे प्रयत्न व्हावेत, उष्ण लहरींचे निरीक्षण करण्यासाठी संशोधन आणि माहिती संकलित करावी, उष्णतेच्या आरोग्यावरील होणाऱ्या परिणामांसंदर्भात संशोधनाला चालना दिली जावी, असे मत प्राधिकरणाच्या डॉ. कृष्णा वत्सा यांनी मांडले.

उष्ण लहरींबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत प्रसिद्धी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र आराखडा असावा, तेथील लोकांच्या गरजेनुसार आणि त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रसिद्धी करावी, असे पत्रसूचना कार्यालयाचे अमनदीप यादव यांनी सांगितले.

देशातील प्रत्येक भागात वेगवेगळे तापमान असते. तसेच दोन्हीकडे एकसारख्या तापमानातही लोकांची जीवनपद्धती वेगळी असू शकते, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना आखणे गरजेचे आहे. झोपडपट्टी भागात दाटीवाटीत राहणाऱ्या वस्तीत जास्त तापमान असते, आग लागण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत कमी खर्चात योग्य उपाययोजना कशा कराव्यात यासाठी संशोधन होणे गरजेचे असून, उष्माघाताने होणारे बळी हे नैसर्गिक आपत्तीत गणले जावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

आज झालेल्या समारोपीय चर्चासत्रात ‘उष्ण लहरींवर उपाय’ यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, सहसचिव कुणाल सव्यार्थी, डॉ. कृष्ण वात्सा, सचिव अलोक, महिला हाऊसिंग ट्रस्टचे संचालक बिजल ब्रह्यभट्ट, सीडस् चे संचालक मनु गुप्ता, NRDC चे डॉ. अभियंत तिवारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, प्रो. रवी सिन्हा यांसह शैक्षणिक संस्थातील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/श्रद्धा मेश्राम/ससं/

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादर येथे टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय परिषदे ते बोलत होते. यावेळी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत  उपस्थित होते.

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. १५ टक्के जीडीपी महाराष्ट्र तयार करतो. २० टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्रातून होते. सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. ३८ टक्के थेट विदेशी गुंतवणूक (‘एफडीआय’) महाराष्ट्रात येते. ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा देश बनविण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला वन ट्रिलियनची करावी लागेल. महाराष्ट्राची लवकरात लवकर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू आहे. तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात येत आहेत. यातून वेगवान विकास घडत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर

पायाभूत सुविधांचा विकास हा विकासाचा मूलमंत्र आहे हे जाणून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. याद्वारे १४ जिल्हे थेट ‘जेएनपीटी’ बंदराशी जोडले जात आहेत.  हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल हायवे तयार करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्यात येत आहे. २५ हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक तेथे येत असून भविष्यातील स्टील हब म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण होईल. नागपूर-गोवा हायवेमुळे मराठवाड्यातील पाच जिल्हे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील यामुळे शेती व उद्योगालाही चालना मिळेल. विरार-अलिबाग कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी ऑरिक सिटी आकारास येत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना सुविधा मिळत आहे.

नवी मुंबईचे विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंकची उभारणी याद्वारे तिसरी मुंबई आकाराला येत आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

इनोव्हेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे स्टार्टअप आणि ‘इनोवेशन’चे कॅपिटल आहे. देशातील ८० हजार स्टार्टअप्स पैकी पंधरा हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील शंभर युनिकॉर्न पैकी २५ युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. इनोव्हेशनच्या माध्यमातून इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत आहे.  डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्राची क्षमता देशात ६० टक्के झाली आहे.

जलयुक्त शिवार- च्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अधिक चालना

जलयुक्त शिवार – १ द्वारे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली. जलयुक्त शिवार- २ च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करत कृषी क्षेत्राला अधिक चालना देण्यात येत आहे.  समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून, ‘टनेल टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील भागात आणत आहोत. याद्वारे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम करण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे पश्चिम विदर्भातील दुष्काळी जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामविकासाला अधिक बळकट करण्यात येत आहे. आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल या दृष्टीने अधिक विचार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने ॲग्री बिजनेसद्वारे गावातील प्राथमिक कृषी सोसायटी बहुउद्देशीय बनविण्यात येत आहेत. त्यांना ॲग्री बिझनेस सोसायटी करण्यात येत आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात मूल्यसंवर्धन होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र बदल

शालेय आणि उच्च शिक्षणातही दर्जा वाढ करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रातील सुविधांमध्येही आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येत आहे. समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व त्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००

केशव करंदीकर/विसंअ/

मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान

शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरूवात करण्यात आली. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील जवळपास दोन कोटी ९२ लाख मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ९ हजार तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबविली जात आहे. अगदी अभिनव आणि काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी नियोजित केलेले अभियान म्हणजे “जागरूक पालक, सुदृढ बालक” होय. या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या बालकांची तपासणी करून आपण जागरुक पालक असल्याचे दाखवून द्यावे.

अभियानाची रूपरेषा आणि उद्दिष्ट

राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवर्यीन मुला-मुलींच्या  सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

उद्दिष्ट :

  • ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
  • आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
  • गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार,शस्त्रक्रिया इ.)
  • प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे.
  • सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.

राज्यातील शाळा/अगंणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, बालगृहे, अनाथालये, अंध, दिव्यांग शाळामधील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य विद्यार्थ्यांची तपासणी या मोहिमेअंतर्गत होणार आहे.

अशी असतील तपासणी पथके

  1. ग्रामीण भागात- उपकेंद्राच्या संख्येनुसार (प्रती उपकेंद्र एक पथक).
  2. शहरी व महानगरपालिका विभाग- शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येनुसार (प्रती प्राथमिक आरोग्य केंद्रात एक)

तपासणीची ठिकाणे

1) शासकीय निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये.

2) खाजगी शाळा,

3) आश्रमशाळा

4) अंध शाळा, दिव्यांग शाळा

5) अंगणवाडया,

6) खाजगी  नर्सरी, बालवाड्या

7) बालगृहे, बालसुधार गृहे

8) अनाथ आश्रम,

९) समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली),

१०) शाळा बाह्य (यांचे उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) मुले-मुली.

या अभियानांतर्गत बालकांच्या  तपासणीसाठी स्थानिक पातळीवर  बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणी पथक –

प्राथमिक स्तरावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (आरबीएसके) आरोग्य पथक असेल यामध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष/महिला, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. दुसरे भरारी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/ सेविका यांचा समावेश असणार आहे. तिसरे पथक हे बाल आरोग्य तपासणी पथक असणार आहे. या सर्वपथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका काम पाहणार आहेत.

या पथकामार्फत प्रतिदिन १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाडी यांच्या तपासणीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही पथके कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व अंगणवाडीला दररोज (सार्वजनिक सुट्टी दिवस वगळून) भेटी देणार असून तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालकांना  प्रथम, द्वितीय, तृतीय स्तरावर उपचाराकरिता संदर्भित करणार आहेत.

प्रथम स्तर तपासणी

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र/प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपग्रामीण रुग्णालये, सीएचसी, महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहांमध्ये ही प्रथमस्तर तपासणी होणार आहे. याअंतर्गत प्रा. आ. केंद्रामध्ये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालये/सामुदायिक आरोग्य केंद्रे/महापालिका रुग्णालये/प्रसुतीगृहे येथे आठवड्यातून दोन वेळा (दर मंगळवारी व शुक्रवारी) तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहे.

द्वितीय स्तर तपासणी/संदर्भ सेवा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये/दंत रुग्णालये/महिला रुग्णालये आदीमध्ये द्वितीय स्तर तपासणी होणार आहे. यामध्ये शल्य चिकित्सक, बालरोगतज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, त्वचारोग तज्ञ, दंतरोगतज्ञ, मानसिक रोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय येथील सर्व विशेषतज्ञ सहभागी असणार आहेत. यामध्ये आठड्यातून  एकदा (दर शनिवारी) तपासणी होणार आहे. सर्व स्तर व तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आश्यकता  असलेल्या बालकांना येथे संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच अशा बालकांना पुढील उपचारासाठी करारबद्ध करण्यात आलेली खाजगी रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्ययोजना/प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. 

अभियानाची पूर्व तयारी

अभियानाचे नियोजन, अंमलबाजावणी व  आढावा घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल  व महानगरपालिका स्तरावर आयुक्त (महानगरपालिका) यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

असे असेल अभियानाचे नियोजन

  • हे अभियान कालबध्द पध्दतीने ८ आठड्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
  • त्यादृष्टीने सर्व ग्रामीण,शहरी व मनपा भागातील संस्थांचा / अधिकाऱ्यांचा आढावा घेवून वेळेत तपासणी पूर्ण होईल याकरिता सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • यासाठी मनपा,नगरपालिका, जिल्हा, तालुका, आरोग्य संस्थास्तरावर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तपासणीचा सूक्ष्म कृती आराखडा

  • विविध स्तरावर प्रथम/द्वितीय स्तर पथके व“बाल आरोग्य तपासणी पथक” स्थापन करणे.
  • पथकनिहाय त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार तपासणी करिता सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे.
  • प्रत्येक तपासणी पथकाने पूर्ण दिवसामध्ये किमान १५० विद्यार्थी तपासणीचे नियोजन करणे.
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य केंद्राच्या पथकांमार्फत त्यांच्या नियोजनातील तपासणी करण्यात येणाऱ्या शाळा व अंगणवाडी वगळून कार्यक्षेत्रातील इतर सर्व उर्वरित शाळा अंगणवाडीच्या तपासणीचे गठित“बालआरोग्य तपासणी पथक”   नियोजन करत आहे.
  • जिल्ह्यातील अंध-दिव्यांग शाळा,बालगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली) यातील विद्यार्थ्यांची तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकामार्फत करण्यात येणार आहेत.  

रुपरेषा

तपासणी :

  • डोक्यापासून ते पायापर्यंतसविस्तर तपासणी
  • वजन व उंची घेवून सॅम/मॅम/बीएमआय(६ वर्षावरील बालकांमध्ये) काढणे
  • पद्धतशीर वैद्यकिय तपासणी करणे.
  • आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणे व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार वा संदर्भित करणे.
  • नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे.
  • रक्तक्षय,डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग,
  • कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी ई. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून  त्वरित संदर्भित  करणे.
  • ऑटीझम, विकासात्मक विलंब, शिकण्याची अक्षमता (Learning Disability) इ. च्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित डीईआयसी येथे संदर्भित करणे.
  • किशोरवयीन मुला-मुलींमधील शारिरिक/मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार संदर्भित करावे. 

ब. उपाययोजना व औषधोपचार :

  • प्रत्येक आजारी बालकांवर औषधोपचार.
  • तपासण्या – नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध सर्व रक्त-लघवी-थुंकी, एक्सरे/यूएसजी आदी तपासण्या आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत.
  • डीईआयसी अंतर्गत आवश्यकतेनुसार बालकांना थेरपी,शस्त्रक्रिया.
  • न्युमोनिया,जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टिदोष, दंतविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, इ. व्याधींने आजारी असलेल्या बालकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार होणार आहेत.
  • समुपदेशन (नवजात बालकासोबत आलेल्या मातेस स्तनपान,पोषण, बीएमआय (६ ते १८ वयोगटाककरिता) (१८.५ ते २५ च्या दरम्यान ठेवण्याबाबत), मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे.)

संदर्भ सेवा :

अंगणवाडी व शाळा स्तरावरील बालके/विद्यार्थ्यांच्या तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील योग्य ते उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय/जिल्हा रुग्णालय/डीईआयसी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने अगदी अभिनव आणि काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक जागरूक पालकाने आपल्या पाल्याची तपासणी करून तो सुदृढ कसा राहिल यासंदर्भात सजग रहावे. बालके सुदृढ राहिले तरच आपला राज्य, देश सुदृढ राहिल… 

00000000

नंदकुमार ब. वाघमारे

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

‘मिशन जयकिसान’ अंतर्गत जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा कायापालट करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. १३ : चंद्रपूर जिल्ह्यात शेतीसाठी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक साधनसंपत्ती या सर्व बाबी मुबलक प्रमाणात आहेत. मात्र त्याचा योग्य वापर किंवा सुक्ष्म नियोजन नसल्याने आपल्याकडील कृषी प्रगती जेमतेम आहे. यावर मात करण्यासाठी आता जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्यात येणार असून या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा कायापालट करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विनोद नागदेवते, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रात आपला जिल्हा एक मॉडेल बनावा, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, बळीराजाच्या कल्याणासाठी व कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वत: जीव तोडून काम करणार आहे. यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी – कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांचे योगदान आवश्यक आहे. चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये करावा, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा.

पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनात यशस्वी होण्याची इच्छा निर्माण होत असेल तर त्याला शासन, प्रशासनाचे सहकार्य मिळालेच पाहिजे. शेतकऱ्यांचा आता आधुनिक, तांत्रिक आणि उत्पादनक्षम होण्याकडे कल आहे. त्यामुळे पुढील काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून योग्य नियोजन करावे. इतर राज्यातील शेतकऱ्यांनी चंद्रपूरचे अनुकरण करण्यासाठी कृषी विभाग, प्रगतशील शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा. आपल्याकडे जमीन, पाणी मुबलक आहे. मात्र कृषी क्षेत्र माघारले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमी पाणी आणि जेमतेम जमीन असूनसुध्दा आधुनिकतेच्या भरवशावर त्यांची शेती बारमाही हिरवीगार दिसते. याचा अभ्यास करून योग्य नियोजन करावे.

कृषी विभागाने आवडीच्या क्षेत्रानुसार कृषी अधिका-यांच्या स्थायी समित्या तयार कराव्यात. जिल्ह्यातील एखादं गाव फुलांचे, एखादं गाव भाजीपाल्याचे तर एखादं गाव फळबागेचे असावे. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत चार-पाच गावांनी मिळून प्रक्रिया उद्योग करावा. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी गाव तेथे एक कृषिदूत किंवा कृषीमित्र असावा. आदर्श शेतकऱ्यांचे इतर ठिकाणी पाहणी दौरे आयोजित करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी सीएसआर फंडातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविता येईल. प्रगतशील शेतकऱ्यांच्या आकाशवाणीवर मुलाखती, जिंगल्स, त्यांचे मनोगत प्रसारीत करावे. जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांनासुध्दा होईल.

मोबाईलच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान डीजीटल स्वरुपात शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. प्रत्येक पाण्याचा थेंब त्याच गावात उपयोगात आणण्यासाठी नियोजन करा. बंधारे, पाण्याच्या व्यवस्था, जलसंधारणाच्या व्यवस्था, मामा तलाव आदी आदर्श करा. फलोत्पादनात आपण आणखी बरेच काही करू शकतो. केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीकरीता १० हजार कोटींचे नियोजन केले आहे. सेंद्रीय शेतीकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रवृत्त करा. शेत तेथे मत्स्यतळे योजनेसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. अत्याधुनिक नर्सरी करण्यासाठी प्रयत्न करा. कृषी महाविद्यालयासाठी पहिल्या टप्प्याकरीता ३९ कोटी उपलब्ध झाले आहे. एप्रिलमध्ये ३५ कोटी उपलब्ध होणार आहे. कृषी महाविद्यालय आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक बाबींनी परिपूर्ण असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुढे पालकमंत्री म्हणाले, कृषी माल विकण्यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये पाण्याची व्यवस्था, शेडची व्यवस्था असावी. यांत्रिकी शेतीबाबात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. गोडावून निर्मितीकरीता मानव विकास, नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यात कोल्डस्टोरेज करीता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तांदूळ प्रक्रिया उद्योगासाठी दोन वर्षात १० हजार कोटींचे अनुदान देण्याची मागणी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. गाई आणि म्हशी खरेदीकरीता आपण अनुदान वाढवून घेतले असून त्याचा फायदा शेतक-यांना होईल. आदिवासी शेतकऱ्यांनासुध्दा ९० टक्के अनुदानावर गाई-म्हशी देऊ शकतो, असेही ते म्हणाले.

वनशेती संदर्भात एम.आय.डी.सी. च्या धर्तीवर आता चंद्रपूर आणि नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) सुरू करणार आहे. या माध्यमातून वनौषधी आणि आयुर्वेदिक शेती उत्पादन होऊ शकेल. कृषी पर्यटनाबाबत योग्य नियोजन करा. १०० टक्के लोकांना माती परिक्षण कार्ड उपलब्ध करून द्या. सुक्ष्मसिंचन, जलसाक्षरता महत्त्वाचे विषय असून वीज कनेक्शन देण्यासाठी मिशन मोडवर कार्यक्रम हाती घ्यावा. ड्रोनच्या माध्यमातून जमीन मोजणी करण्यासंदर्भात नियोजन करा. कृषी सभागृहासाठी पाच एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी.

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती द्या. गाजर गवताचे उच्चाटन मिशन मोडवर करा. जुनोना, घोडपेठ येथील तलाव साफ करण्यासाठी साडेआठ लक्ष रुपयांची मंजुरी त्वरीत देण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर शेतकरी आरोग्य मिशन सुरू करावे. तसेच एका वर्षाच्या आत कृषी संबंधित प्रकरणांचा निकाल लावण्यासंदर्भात कॅबिनेट पुढे विषय प्राधान्याने मांडला जाईल. केंद्र व राज्य सरकारचे कायदे याचा व्यावहारीकदृष्ट्या अभ्यास करा. कृषी ॲप विकसीत करून सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल, याचे नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बऱ्हाटे यांनी सादरीकरण केले. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी प्रक्रिया उद्योग समुहाचे प्रतिनिधी व गावकरी उपस्थित होते.

०००

राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 13 : सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसटाटा सन्सचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन उपस्थित होते

ही बैठक महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणालेमहाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी ही बैठक क्रांतीकारक ठरेल. राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे राज्य असून महाराष्ट्राच्या सहभागाने पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण आहे.

आर्थिक विकासाबरोबरच शेतीशेतकरी त्यातील प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. सामान्य माणूस हाच विकासाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणार आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढतंत्रज्ञानाचा वापरवित्तपुरवठा याबाबत परिषद अभ्यास करून सूचनाशिफारशी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

विकासाचा रोडमॅप तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विकासासाठीचे व्हिजन या संदर्भात सादरीकरण केले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणालेया बैठकीत कृषी क्षेत्रकौशल्य विकासआर्थिक समावेशन आणि विभागीय असमतोल दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या परिषदेत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले सदस्य आहेत. त्यांनी आपली मतं मांडली तर परिषदेचे अध्यक्ष यांनी परिषद सदस्यांच्या सूचना असलेले सादरीकरण केले. या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्यातील संधींना गतीमानता प्रदान करण्यासाठी परिषदेतील सदस्य आपले योगदान देण्यास उत्सुक  असून आर्थिक विकासाच्या विविध कल्पना या परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी दिली. ते पुढे म्हणालेमहाराष्ट्र हे देशासाठी महत्त्वपूर्ण राज्य आहे. राज्याचे (जीडीपी) सकल देशांतर्गत उत्पादन सर्वात जास्त आहे. इथे पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. राज्याच्या आर्थिक विकासासह प्रत्येकाचे जीवनमान उंचावण्यासाठीदरडोई उत्पन्न वाढावे यासाठीचर्चा करण्यात आली. यासोबतच कृषीकृत्रिम बुद्धीमत्ताहरित मार्गया सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या परिषदेच्या माध्यमातून सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे एन.चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.

००००

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती, दि. १३ : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. मतदानाविषयीची उदासीनता दूर करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचा बक्षीसवितरण कार्यक्रम बचतभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अनेकांकडून बजावला जात नाही. जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाविषयी उदासीन राहून चालणार नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन डॉ. पांढरपट्‌टे यांनी केले.

मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी. तसेच प्रत्येक निवड़णूकीत स्वत: मतदान करून आपल्या कुटुंबियांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

अमरावती जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतलेली स्पर्धा राज्यात अभिनव ठरली, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. करण पारिख यांनी सूत्रसंचालन केले. श्री. देशमुख यांनी आभार मानले.

भित्तीचित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ४ हजार रू. चे पारितोषिक सुनीत निसगुडे, विशाल वानखडे, निखिल लिंगाटे, प्रशिक  तायडे यांना, तसेच ३ हजार रु. चे दुसरे बक्षीस आकांक्षा मोटघरे, रोहिणी नेवारे, प्रगती चौरे, समीक्षा मालसाने, ऐश्वर्या विभूते यांना आणि २ हजार रू. चे तिसरे बक्षीस परीक्षित भेले, दर्शन खेसे व अमर कदम यांना मिळाले. गणेश सावंत, अस्मिता सावंत, सार्थक धवल, पूर्वा खुशादे, सानिका बुधाले यांना १ हजार रू. चे व संकेत ताभणे, दीपक खंडागळे, ओम इंगळे, प्रणाली दातिर, पायल गणोरकर व सौरभ इंगोले यांना साडेसातशे रू. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेत रवींद्र वानखडे यांना प्रथम क्रमांकांचे ३ हजार रू. चे, तर रूचा काटकर व नेहा सराफ यांना २ हजार रु. चे दुसरे बक्षीस मिळाले. निशिगंधा कांबळे, दिप्ती टेंभुर्णे, अश्विनी खडसे यांना १ हजार रु. चे तिसरे, तसेच प्रियंका भटेजा व अतुल चव्हाण यांना साडेसातशे रु. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. सर्वाधिक व्ह्युज मिळवल्याबद्दल सार्थक मुंडवाईक यांना २ हजार रू. चे विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेला आय- क्लीन संस्थेचे सहकार्य मिळाले.

०००

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई, दि. 13 : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टँकर असोसिएशन यांना केले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक घेऊन मुंबईतील पाणी टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करु, पण तत्पूर्वी टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.

बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशीही यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा करुन लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील टँकर्सनी अचानक लोकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. या टँकरधारकांशी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यास शासन कधीही तयार आहे. त्यामुळे टँकरधारकांनी लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत केले. टँकरधारकांच्या प्रश्नासंदर्भात उद्या सकाळी पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे या चर्चेत निश्चित करण्यात आले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर – उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 13 :- जीएसटी करप्रणाली ही संघराज्यांतील परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. ‘जीएसटी’चा कणा असलेली ‘आयटी’ प्रणालीही आता स्थिरावत असून तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाने विविध सूचनांना मान्यता दिली.

‘जीएसटी’ प्रणाली सुधारणा मंत्री गटाची तिसरी बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. यावेळी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तामिळनाडूचे वित्तमंत्री डॉ. पलानीवेल थैगा राजन, ‘जीएसटीएन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सिन्हा, केंद्रीय सचिव ऋत्विक पांडे, ‘सीबीआयसी’ पॉलिसी विंगचे प्रधान आयुक्त संजय मंगल, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राज्य कर आयुक्त राजीव कुमार मित्तल, सचिव शैला ए आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे वित्त मंत्री बुगना राजेंद्र नाथ, दिल्लीचे वित्तमंत्री मनिष सिसोदिया, ओरीसाचे वित्तमंत्री निरंजन पुजारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जीएसटी करप्रणालीमध्ये कर अनुपालन सुलभ, कार्यक्षम व प्रभावी असावे, यासाठी प्रशासनाची वाटचाल चालू आहे. मंत्रीगटाने बोगस जीएसटी क्रेडिट व B2C व्यवहारांमुळे होणाऱ्या करचुकवेगिरीबाबत चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्याची गरजही मंत्रीगटाने यावेळी अधोरेखीत केली.

महसूल हानी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

अस्तित्वात नसलेल्या (बनावट / बोगस) आस्थापनांचा शोध आणि त्यांचा मागोवा घेणे, बनावट/बोगस क्रेडिटचा वापर होऊ नये याकरिता जीएसटी क्रेडिटचे सुयोग्य नियमन करणे, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन B2C व्यवहाराद्वारे होणारी महसूल हानी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, सेवांच्या आयातीशी संबंधित डेटाच्या प्रभावी वापरासाठी पद्धतींचा विकास करणे याबाबत मंत्री गटाने योग्य त्या शिफारशीसहित आपला अहवाल औपचारिकपणे जीएसटी परिषदेसमोर विचारार्थ ठेवण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. जीएसटी करप्रणाली अधिक बळकट करण्यासंदर्भात मंत्रीगटाने सविस्तर चर्चा केली.

—-000—–

केशव करंदीकर/विसंअ/

खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि. 13 (जिमाका) –  खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या (बीबीएनजी) वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित परिवर्तन 2023 या उद्योग परिषदेत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, विवेक देशपांडे, मधुरा कुंभेजकर, अरविंद नांदापूरकर, अरविंद कोऱ्हाळकर, शिल्पा इनामदार, महेश देशपांडे, महेश जोशी, अभिनेते प्रशांत दामले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ब्राह्मण समाजातील उद्योजकांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला एकेकाळी नोकरी हाच पर्याय होता. अलिकडच्या काळात मात्र आता सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाज अग्रेसर दिसून येतो आहे. उद्योग क्षेत्रात ब्राह्मण समाजातील तरुणांची गरुड झेप पहावयास मिळत आहे. ब्राह्मण समाजात यशस्वी उद्योजक पहायला मिळतात. जगातील प्रमुख 7 कंपन्यांपैकी 4 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण आहेत. सिलिकॉन व्हॅलीत समाजाचे तरुण काम करत आहेत. या माध्यमातून मोठे काम होत आहे. आज विविध समाजातील संघटना या समाजाच्या पाठिशी उभे राहून उद्योजकता, शिक्षण, व्यवसायिकता या विविध क्षेत्रात काम करत आहेत. कुठलेही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करत आहेत. ब्राह्मण समाजातील संघटना देखील  नि:स्वार्थ वृत्तीने काम करताना दिसतात. बीबीएनजी सारख्या संस्था समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करतात, याचे समाधान वाटते. समाजाला ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक होते ते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी केले आहे.

ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. सन 2030 सालापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आजच्या जगात व्यावसायिकता, उद्योगशिलता, नव्या उद्योगाला समजून घेणे व त्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. दूरसंचार क्रांतीमुळे तरुण पिढीला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या काळात अशी संधी उपलब्ध आहे की, छोट्या गावातील तरुण स्टार्टअप सुरू करून मोठा उद्योग उभारु शकतो. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेला युवक देखील एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे परिवर्तन घडत आहे. हे बदलते मूल्य समजून घेण्यात तरुणाई काम करत आहे. जगात उद्योग आणि विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध हे सांगणारे व या संधी कशा प्राप्त कराव्यात याबद्दल मार्गदर्शनाचे काम बीबीएनजी सारख्या संस्था करत आहेत. अनेक लोकांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं विश्व तयार केले आहे. ज्या वेगाने देश पुढे चालला आहे. त्या वेगात ब्राह्मण समाजाने यापूर्वी देखील योगदान दिले आहे, यापुढेही ते करतील व देशाला पुढे नेण्याचे काम समाजातील तरुण करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

समाजासाठी संस्थेच्या कार्यामध्ये काहीही मदत लागली, तर मी आपल्या पाठिशी उभा आहे. विशेषतः तरुणांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करु. मागील काळात  खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे 605 कोर्सेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्धे शुल्क भरण्याचा निर्णय घेतली. हुशार विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने जगातील उत्तम विद्यापीठामध्ये शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

000000000

उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा

मुंबई, दि. 13 : वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आज येथील उष्णतेच्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेवरील चर्चासत्रात विचार व्यक्त करण्यात आले.

राज्यातील समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेशही उष्ण असल्याचे आढळून येत आहेत. राज्य शासनासोबत नगरपालिका, महानगरपालिका या स्वायत्त संस्था उष्ण लहरींचे मानवी जीवनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी कृती आराखडा राबवित असल्याची माहिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन सल्लागार (युएनडीपी) श्रीदत्त कामत यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात हवामान केंद्रे कार्यरत असून, उष्ण लहरींची माहिती जनमानसात पोहोचावी यासाठी जनजागृती केली जाते. तापमान वाढल्याने होणारे आजार, त्याची लक्षणे याची प्रसिद्धी विविध माध्यमातून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयआरएडीएचे उपसंचालक रोहित मंगोत्रा, एनआयडीएमचे डॉ.अनिल गुप्ता, यांच्यासह छत्तीसगड व बिहारच्या शासकीय अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...