रविवार, ऑगस्ट 10, 2025
Home Blog Page 1637

नवतंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा, दि.5 (जिमाका) : विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती जागरुक करुन नवतंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करत नवनवे प्रयोग करावे. समाजासाठी हितकारक होईल, असे कार्य विद्यार्थ्यांनी सतत करत राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च संस्थेच्या वतीने जिज्ञासा लॅब व अनुकृती लॅबच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती दत्ता मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन, सागर मेघे, कुलगुरु ललीत वाघमारे, अधिष्ठाता अभय गायधने, श्वेता पिसुळकर, राजु बकाने यांची उपस्थिती होती.

श्री. गडकरी म्हणाले, आयटी, मॅकेनिकल इंजिनिअर व मेडिकल या तिन्ही क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपआपल्या ज्ञानाचा उपयोग संशोधनामध्ये केल्यास एक मोठी वेल्थ निर्माण होऊन देश समृद्ध होण्यास मदत मिळेल. प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी भविष्याची आव्हाने ओळखून अपडेट होणे ही काळाची गरज आहे. दत्ता मेघे इन्स्टिट्यूटने नॉलेज टू वेल्थ निर्माणाची भावना विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याचे प्रयत्न केल्यास  अमेरिकेसारखे महत्त्वाचे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित होण्यास मदत होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासुन गोरगरीब रुग्णाला सेवा देण्याचे कार्य केले जात आहे. यासोबतच रुग्णसेवा, शिक्षणासह पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. गडकरी हे कायदाभिमुख विकास पुरुष आहे. रस्ता आणि शिक्षण क्षेत्रात विकासाचे कार्य करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करुन वैद्यकीय महाविद्यालया सोबतच मोठे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तन मन धनाने काम करावे व आपले जीवन समृध्द करावे, असे दत्ता मेघे म्हणाले.

तत्पुवी नितीन गडकरी यांनी जिज्ञासा व सॅम्युलेशन लॅबचे फित कापून उद्घाटन केले व विविध विभागाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ललीत वाघमारे यांनी  केले तर आभार सागर मेघे यांनी केले.

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी वंचित समाजाचा सहभाग महत्त्वाचा –साहित्य संमेलन परिसंवादातील वक्त्यांचा सूर

वर्धा, दि.5 (जिमाका) : लोकशाही ही समाजातील विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने समृद् होत असते. परंतु अजूनही वंचित समाजातील काही घटकांचा सहभाग पूर्णपणे झाला असल्याचे दिसत नाही. यासाठी या घटकातील व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवून त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आचार्य विनोबा भावे सभामंडपातवंचिताचे साहित्य आणि लोकशाहीया विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीन प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात संवादक म्हणुन डॉ. दीपक पवार यांच्यासह बाळकृष्ण रेणके, दिशा पिंकी शेख, हर्षद जाधव, रझिया सुलताना, मुफीद मुजावर वक्ते म्हणून सहभागी झाले होते. व्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

सुरुवातीस डॉ.देशपांडे यांनी मतदार होणे लोकशाहीची पहिली पायरी असल्याचे सांगितले. बेघर, भटके विमुक्त, देहव्यवसायातील महिला, पारलिंगी या वंचित समाजातील घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लोकशाहीची संकल्पना अधिक मजबूत आणि दृढ करण्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ अत्य उपयुक्त असल्याचे सांगितले. वंचित समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पारलिंगी कवयित्री असलेल्या दिशा पिंकी शेख यांनी सांगितले की, परंपरेने पारलिंगी समाजाची विशिष्ट प्रतिमा निर्माण केली आहे. ती प्रतिमा बदनामी करणारी आहे. अजूनही पारलिंगी व्यक्तीशेजारी कुणी बसायला तयार होत नाही. ही भावना अतिशय क्रूर आहे. 2014 पर्यंत साधे नागरिकत्वही आम्हाला मिळाले नव्हते. मी माझ्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. मलाही काहीतरी व्हावं वाटत, त्यासाठीच लिहायला लागले. लेखणी आधुनिक काळातील मोठ शस्त्र आहे. हे शस्त्र समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते. पारलिंगी साहित्याची चांगली चळवळ भविष्यात उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी मुसलमान साहित्यातील अभ्यासक असलेल्या मुफिद मुजावर म्हणाले, राज्यातील मुसलमानांमध्ये सुफी आणि भक्ती परंपरेचा समावेश दिसतो. वारकरी, नाथ, दत्त परंपरेचा प्रभाव देखील दिसतो. पारंपरिक साहित्यात मुसलमानांची एकसाची प्रतिमा निर्माण झाली आहे. सय्यद अमिन यांनी अनेक चरित्र लेखन केले. शिवाजी महाराजांच्या चरित्रात त्यांनी महान उदारमतवादी शिवाजी राजनेता अशी मांडणी केली आहे. मुस्लीम साहित्यिकात अलिकडे सामुहीक स्वरुप आले आहे, असे मुजावर यांनी सांगितले.

हर्षद जाधव म्हणाले, पूर्वी अपंगांना गुप्त मतदान करता येत नव्हते. सहाय्यकाच्या मदतीने मतदान करावे लागत होते. सहाय्यकाला मात्र कुणाला मतदान केले ते कळत असत. ईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशीन मधील सुविधेमुळे आम्हाला गुप्त मतदानाचा अनुभव घेता येत आहे. अपंगांचे जीवन, जाणिवा, त्यांचा संघर्ष काही साहित्यिकांनी मांडला आहे. परंतु अजुन आणि अधिक स्पष्टपणे हा संघर्ष मांडण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक अपंग व्यक्ती आपल्या कार्यातून अपंगत्व भरुन काढण्याचा प्रयत्न करत असते. अपंगांच्या समाजात चांगल्या प्रतिमा निर्माण केल्या जाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आपल्या संबोधनात रझिया सुलताना म्हणाल्या की, समाजाचे सगळे प्रश्न कायद्याने सुटत नाही. यासाठी संवेदनशीलता देखील असावी लागते. मुसलमान तरुणांमध्ये अलीकडे चिंतनशिल आणि प्रश्न विचारणारी पिढी निर्माण झाली आहे. वाईट प्रथा, परंपरा बदलवायला सांगणारी ही पिढी आहे. प्रथम भारतीय नंतर मुसलमान ही भावना 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी रुजविली. पुढे अनेकांनी ही प्रथा पुढे चालविली. मुसलमान महिलांना वेगवेगळ्या प्रवाहाला बळी पडावे लागत आहे. परंतु सामाजिक अभिसरण देखील चांगल्या पध्दतीने होत असल्याचा आनंद आहे. सर्व अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम साहित्य करत आहे. अधिक संवेदनशील लिखानाने लोकशाही उच्च पातळीवर जात आहे.

भटक्या विमुक्त समाजासाठी दीर्घ काळापासून काम करीत असलेले बाळकृष्ण रेणके म्हणाले, चौकटी, चाकोरी बाहेर जावून वंचित घटकात आवश्यक लोकशाही रुजविण्यासाठी प्रचार प्रसाराचे काम निवडणुक आयोग करीत आहे. वंचित घटकात लोकशाही रुजवून देश बलवान करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. साहित्य म्हणजे समाजाचे वास्तव दाखविणारा आरसा आहे. ब्रिटीश काळात भटक्यांना बदनाम करणारे नकारार्थी साहित्य तयार केले गेले. दलित लेखकांची आत्मकथने त्यांच्या अस्मितेची तर भटक्या समाजातील व्यक्तींची आत्मकथने हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. आत्मकथने त्या त्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असते. वंचित समाजाच्या समस्या कशा सुटतील याचा संवेदनशिलपणे विचार केल्यास लोकशाही समृध्द होईल. भटक्या हा विकास प्रक्रियेतला अदृष्य समाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना विकासाची गोड फळे चाखण्याची संधी मिळावी, असे बाळकृष्ण रेणके यांनी पुढे सांगितले.

परिसंवादाचे संवादक डॉ.दीपक पवार यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. श्रोते, वक्ते आयोजकांमध्ये संवादकांची उत्कृष्ट भूमिका त्यांनी पार पाडली. यावेळी श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेवटी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी आभार मानले. परिसंवादाला साहित्य रसिक, शिक्षक, विद्यार्थी, वंचित समाजातील अभ्यासक, वक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगाच्या व्यासपीठावर भारतातील नागरी संस्थांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवूया : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

नागपूर दि.5 : विविध सामाजिक समस्या, नागरी समस्या, पर्यावरण ते वन्यजीव संवर्धनासंदर्भात अनेक नागरिक संस्था देशात, विदर्भात मोठ्या समर्पणाने काम करत आहे. जगाच्या व्यासपीठावर भारतातील या नागरी संस्थांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याची संधी जी-20 आयोजनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीचे सोने करूया, असे आवाहन भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

जी-20 समितीच्या बैठक आयोजन तयारी संबंधात या समितीच्या उपसमितीचे अर्थात सी-20 चे आयोजक तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी.,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदिप कुळकर्णी,  रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त राजलक्ष्मी शाह, सी-20 वर्कींग ग्रुप मेम्बर अजय धवले, स्थानिक नागरी संस्थाचे प्रतिनिधी शैलेश जोगळेकर, जयंत पाठक , विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शिवराज पडोळे, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकी जी-20 संदर्भात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

नागपूर शहरामध्ये 21 व 22 मार्च रोजी जी-20 समूहातील देशातील सिव्हिल सोसायटीचे सदस्य येणार आहेत. जी 20 मध्ये सहभागी असणारे देश व तेथील विविध शिष्टमंडळ वेगवेगळ्या बारा मुद्द्यांवर भारतातील विविध शहरांमध्ये बैठका घेत आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये या बैठकी होत आहेत. जी-20 चे यजमानपद भारताला आल्यानंतर या बैठकीची सुरुवात झाली. नागपूर येथे होणारी जी-20 ही सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात जागतिक स्तरावरील ध्येय धोरण ठरवणार आहे. त्यामुळे जी-20 बैठकीला  सी-20 असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे यापूर्वी झालेली बैठक ही व्यापारांची बैठक होती. तर पुणे येथे नुकतीच झालेली बैठक ही अर्बन 20 या संदर्भातील होती. प्रमुख शहरांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील याबैठका होत आहेत. अंतिम बैठक ही 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या अंतिम बैठकीला जी -२० समूहातील प्रत्येक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

नागरी संस्थांच्या संदर्भात नागपूर येथे होणारी बैठक यशस्वीपणे पार पाडण्याचे यावेळी आवाहन सहस्त्रबुद्धे यांनी केले. त्यांनी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासनामार्फत आतापर्यंत झालेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. काही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

एक मार्चपासून यासंदर्भातील नियोजित कामे पूर्ण करण्याचे व त्यानंतर पाहुण्यांचे आगमन होईपर्यंत शहर सजविण्याच्या आवाहनही त्यांनी केले. या आयोजनाच्या संदर्भात उद्या जिल्हा प्रशासनामार्फतही आढावा बैठक घेतली जाणार आहे. नागपूरचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.

शैक्षणिक विकासातून ‘आत्‍मनिर्भर भारत’ निर्माण होईल – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद, दि. 05 (जिमाका) : आश्रम शाळेतील विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक विकासासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री आणि सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याबरोबरच जागतिक दर्जाचा भविष्‍यवेध विविध उपक्रमातून घेतला जात आहे. यामुळे  शैक्षणिक  विकासातून ‘आत्‍मनिर्भर भारत ‘ निर्माण करण्‍याचे  स्‍वप्‍न पूर्ण होईल असे प्रतिपादन राज्‍याचे इतर मागास बहुजन कल्‍याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र, निपुण भारत, अधिगम सर्वेक्षण व स्‍पोकन इंग्लिश व प्रौढ साक्षरता या विषयावरील औरंगाबाद विभागस्‍तरावरील कार्यशाळेचे आयोजन वंदे मातरम  सभागृहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेस,आमदार हरिभाऊ बागडे, इतर मागास व बहुजन कल्‍याण विभागाचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव श्री. नंदकुमार , तसेच सर्व सहसंचालक यामध्‍ये औरंगाबादचे जलील शेख, लातूर विभागाचे दिलीप राठोड, कैलास साळुंखे, सिध्‍दार्थ झाल्‍टे, कुशल गायकवाड समन्‍वयक प्रियंका पाटील, निलेश घुगे यांच्‍यासह लातूर, औरंगाबाद, बीड, पुणे विभागातील विविध आश्रम शाळेतील विद्यार्थी, मुख्‍याध्‍यापक, शिक्षक यांची प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती होती.

आश्रमशाळेतील   विद्यार्थी सर्वगुणसंपन्‍न, तसेच जागतिक स्‍पर्धेत आपले अस्तित्‍व  निर्माण करणारा व्‍हावा यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्‍यांना टॅब, निवास व  भोजन तसेच विविध सुविधा उपलब्‍ध करुन देण्यात येत आहेत. तसेच परदेशात शिक्षण घेण्‍यासाठी ‘ महाज्‍योतीच्‍या ‘ माध्‍यमातून शिष्‍यवृत्‍ती, प्रशिक्षण आणि परदेशात शिकण्‍याची संधी उपलब्‍ध करुन दिली जात आहे. यामध्‍ये 50 वरून वाढ करुन ती 100 विध्यार्थ्यांना संधी देण्‍यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्‍याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

डिजीटल क्‍लासरुम लवकरच सुरु करुन तंत्रज्ञानाच्‍या  साहायाने सर्व आश्रमशाळेत अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवली जाणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्‍याच्‍या गुणांचे  कौतुक केले. बीड जिल्‍ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील वारोळा येथील आश्रमशाळेला भेट  देण्‍याची ग्‍वाही विद्यार्थीनींना मंत्री सावे यांनी दिली.

आमदार हरीभाऊ बागडे यांनी या कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून विविध शिक्षक, विद्यार्थी यांना एकत्र आणून विविध विषयाचे अध्‍ययन व अध्‍यापणाबाबत जी चर्चा घडवुन आणली. ती   अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्‍यानी अभ्‍यासाचे नियोजन, प्रयत्‍नातील सातत्‍य आणि स्‍वत: समजून घेण्‍याची क्षमता वाढवली तर शिक्षण सुलभ होते. काळानुसार कौशल्‍य आधारीत शिक्षण घेतले तर प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी मागण्‍यापेक्षा आपण नोकरी देणारे ठरु यासाठी प्रयत्‍न करावा असे विद्यार्थ्‍यांना  व शिक्षकांना मार्गदर्शनात सांगितले.

लक्षवेधी शिक्षण पध्‍दती ‘वेध’ या उपक्रमामुळे विविध शाळा, विद्यार्थी  यांच्‍यात सकारात्‍मक बदल घडून आनंददायी शिक्षण निर्माण केले आहे.  अशा प्रतिक्रिया  मुख्‍याध्‍यापक श्रीमती राधा, सुबोध काळे, विठ्ठल कचरे, शेखर मांडे यांनी व्‍यक्‍त केल्या. सहभागी विद्यार्थ्‍यांशी संवाद कार्यक्रमातून प्रियंका पाटील यांनी ‘विषयमित्र’ च्‍या माध्‍यमातून वर्गात शिकवलेला अभ्‍यासक्रम समजून घेण्‍यात त्‍यांची भूमिका विद्यार्थ्‍यांना स्वयं अध्‍ययनातून शिक्षण आनंददायी करते असे सांगित‍ले.

स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे धुळ्यात २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा धुळ्यात 21 ते 25 फेब्रुवारी, 2023 दरम्यान गरुड मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबणीस, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले, अनुप अग्रवाल, उमेश चौधरी, सुनील चौधरी, कमलाकर अहिरराव, राष्ट्रीय खेळाडू महेश बोरसे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला कुस्तीची परंपरा लाभली असून ती अजतागायत सुरु आहे. धुळ्यातील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या तातडीने गठीत करुन कामांचे वाटप करण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात.

स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा 21 ते 25 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत गरुड मैदान, धुळे येथे संपन्न होणार आहेत. ही स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व मुलींचा संघ अशा प्रत्येकी दहा वजनगटात तीस संघ सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात 7 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 9 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 360 वरिष्ठ कुस्तीगीर, 100 पंच व पदाधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 650 जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धा तीन पोडियममध्ये मॅटवर लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 31 लाख 20 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी गरुड मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिली.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे शहर महानगरपालिका, धुळे जिल्हा तालीम संघ तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ५ (जिमाका) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे साहेबांनी या मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरु ठेवू. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आपल्या शुभेच्छांमुळे कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध होते, सगळे बंद होते. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

काळा घोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

मुंबई, दि.5 : मुंबईतील कला प्रेमींसाठी संगीत नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला शनिवार दि. 4 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या महोत्सवाला शालेय शिक्षण तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी काळा घोडा आर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

या महोत्सवात नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स थिएटर, साहित्य, खाद्य, बालसाहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वॉक, स्टँड अप कॉमेडी, स्ट्रीट आर्ट, शहरी डिझाईन आणि आर्किटेक्चर, व्हिज्युअल आर्टस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काळा घोडा आर्ट असोसिएशनतर्फे आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड , म्युझियम गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी पुन्हा एकदा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध होत आहे. हा महोत्सव 12 फेब्रुवारीपर्यंत कला रसिकांसाठी खुला राहणार आहे.

सन 1999 मध्ये स्थापित झालेल्या या वार्षिक कलामहोत्सवाने देशातील तसेच जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात सुरु असलेल्या या कलामहोत्सवात ललित कला, नृत्य, नाटक – सिनेमा, वास्तुकला, छायाचित्रण, सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला अशा अनेक कलांचे सादरीकरण होणार आहे.

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या महोत्सवाची पाहणी करुन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना करुन  कलाकारांचे अभिनंदन केले. तसेच कलाप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुंबई, दि. 5 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत  3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.

जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट – 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर – 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर – 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर – 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

पं.सूर्यकांतजी गायकवाड यांच्या निधनाने भक्ती संगीतातील तपस्वी गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 5 : पं. सूर्यकांतजी गायकवाड गुरूजी यांच्या निधनाने शास्त्रीय भक्ती संगीतातील एक दिग्गज तपस्वी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पं.सूर्यकांतजी गायकवाड गुरूजी म्हणजे पारंपरिक शास्त्रीय संगीत आणि वारकरी परंपरेतील भक्ती संगीत यांचा मेळ साधणारा अवलिया होता. वारकरी संप्रदायातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून पं.सूर्यकांत गायकवाड गुरूजी ओळखले जायचे. अर्वाचीन भक्तिसंगीताला त्यांच्या कार्याने एक वेगळी उंची लाभली. गुरुजींच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांचे परिवारजन आणि शिष्यमंडळींना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

नवभारताच्या निर्माणात योगदान द्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकोला,दि. (जिमाका)- आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. कृषी पदवीधारकांना देशाची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आपल्या क्षेत्रात अथक परिश्रम करुन आपण नवभारताच्या निर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षान्त समारंभ आज संपन्न झाला. या सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत राज्यपालांनी नव स्नातकांशी संवाद साधला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यास भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी उपमहासंचालक, श्री करण नरेंद्र कृषी विद्यापीठ जोबनेर, कुलगुरु महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ तथा संचालक गितांजली तंत्रज्ञान व विज्ञान संस्था उदयपूर डॉ. नरेंद्र सिंह राठोर, कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण  डॉ. धनराज उंदिरवाडे, आ. विप्लव बाजोरिया तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे, डॉ.जी.एम. भराडे, डॉ.विलास भाले, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, कृषी सेवा आणि शिक्षण हे असे क्षेत्र आहेत जे नेहमीच फलदायी ठरले आहे. कृषी क्षेत्रात अमाप संधी आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी क्षेत्र आहे. अशाप्रकारे कृषी क्षेत्राला संशोधक, विद्यार्थी, कुशल मनुष्यबळ पुरविणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जेथे स्थित आहे त्या अकोला जिल्ह्याचे यामुळेच देशासाठी मोठे योगदान आहे.  आपल्या संस्कृतीत कृषी हे क्षेत्र नेहमीच सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे.  कोरोना काळातही सर्व क्षेत्र बंद पडले असतांनाही केवळ कृषी हेच क्षेत्र अव्याहतपणे सुरु होते, असे त्यांनी सांगितले. नव्या पदवीधरांना संदेश देतांना राज्यपाल म्हणाले की, कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर आपणास प्राप्त विद्येचा योग्य वापर करावा. यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष असून तृणधान्य पिकांच्या संशोधनात, त्यांच्यावरील प्रक्रिया पद्धतीत आपण आपले योगदान देऊ शकता. कृषी विद्या क्षेत्रात महिलांनी चांगली प्रगती केली आहे. त्यांचा या क्षेत्रातील योगदानाचा नक्कीच देशाला फायदा होईल, अशा शब्दात त्यांनी महिलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधारकांनी, संशोधकांनी, विद्यापीठांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आपली कृषी विज्ञान केंद्र सशक्त करावे,असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी विस्तार कार्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आवश्यकडॉ. नरेंद्र सिंह राठोर

कृषी शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. असे होत असतांना हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे विस्तार कार्य केले जाते; त्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र सिंह राठोर यांनी केले. ते म्हणाले की, शिक्षण, संशोधन, पूरक संशोधन  आणि विस्तार असे कृषी शिक्षणाचे टप्पे आहेत. त्याद्वारेच आपण कृषी उत्पादनात वाढ करु शकतो. त्यासाठी आता उद्योगांना पूरक असे मनुष्यबळ निर्माण व्हावे, अशीही अपेक्षा आहे.  त्यादृष्टीने विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करावे. संशोधन हे सुद्धा उद्यमशीलतेला चालना देणारे असावे, शेतकऱ्यांमध्येही उद्योगाभिमुखता रुजविण्यासाठी प्रयत्न व्हावे,असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नकुलगुरु डॉ. गडाख

प्रास्ताविकात कुलगुरु डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या वाटचाली विषयी माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यापीठाने आजपर्यंत १७६ वाण विकसित केले असून त्यातील १९ वाण हे राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.  तसेच ४६ अवजारेही विकसित केली आहेत.  विद्यापीठाने आपल्या संशोधनाचे ३७ बौद्धिक संपदा हक्क   मान्यतेसाठी पाठविले आहेत. विविध संशोधन प्रकल्पांमध्ये विद्यापीठाचा पुढाकार असून त्यासाठी निधीही प्राप्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त  ज्वारी पिकाच्या २६००० वाणांची लागवड करुन त्यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. ‘एक दिवस बळीराजासाठी’ सारख्या उपक्रमातून विद्यापीठाचे प्राध्यापक, संशोधक हे ९८ गावांमधून ३६९६ शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचले आहेत.  तसेच विविध माध्यमांचा वापर करुन विद्यापीठ आपले संशोधन, तंत्रज्ञान हे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित असते.

असा झाला सोहळा

वाद्यवृंदाद्वारे मान्यवरांचे दीक्षान्त मिरवणुकीद्वारे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्यानंतर कुलपतींनी दीक्षान्त समारंभ सुरु करीत असल्याचे घोषित केले. त्यानंतर विद्यापीठ गीत, सरस्वती वंदना,  झाली. प्रास्ताविकानंतर मुख्य दीक्षान्त सोहळ्यास सुरुवात होऊन पदवीदानास प्रारंभ झाला. विविध गुणवत्ता व पारितोषिक धारकांना त्यांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात कृषी विद्याशाखा, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम व आचार्य अशा एकूण ४३२७ पदव्यांचे पदवीदान करण्यात आले. ३० आचार्य पदवीधारक, २३ स्नातकोत्तर तर १९२२ पदवीपूर्व पदवीधारक यांनी समारंभात उपस्थित राहून  पदवी प्राप्त केली.  त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व नव पदवीधारकांना कुलपतींनी दीक्षान्त उपदेश दिला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पसायदानानंतर कुलपतींनी दीक्षान्त समारंभ संपन्न झाल्याचे घोषित केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.10 - कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘दिशा अभियान’ची यशस्वी अंमलबजावणी

0
मुंबई, दि. १० : बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे ‘दिशा अभियान’ महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून...

नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि.10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील...

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर !

0
मंत्री, खासदार, आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व...

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल

0
नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक...