मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
Home Blog Page 1638

राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन – कामगारमंत्री डॉ. सुरेश  खाडे

मुंबई, दि. ८ :- सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.

बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी केले.

या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश  खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृतीविषयी विपुल लेखन केले असून मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित लेखन, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘चला उद्योजक होऊया’ विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स ग्रुप लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास ग्रुप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा’, ‘मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना’, ‘आम्ही का लिहितो ?’, ‘व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालयदेखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

००००

वंदना थोरात/ससं/

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापारवृद्धीला विपुल संधी

मुंबई, दि. 08 : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध दृढ असून दुग्ध उत्पादने, आयुर्वेदिक औषधे, पर्यटन विस्तार, मसाल्याचे पदार्थ, वायनरीसारखे कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापार कक्षा आणखी वृध्दिंगत व्हावी अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

आज विधानभवनात ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल, वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल, उप वाणिज्यदूत श्री.मायकल ब्राऊन यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली.  महिला सक्षमीकरणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देताना त्या बोलत होत्या.

उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील शासकीय आणि अशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात भरीव कार्य केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात 10 लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणारा व्यापार आणखी वाढविता येईल. योग विद्या आणि आयुर्वेदिक औषधे यांना जगभराप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक प्रगतीशील शेतकरी केवळ औषधी गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांची लागवड करतात. या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहान मिळावे, या मुद्यावर उभयपक्षी विस्ताराने चर्चा झाली. विधानसभा सदस्य श्री.आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना सागरी किनारा सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविला होता, तो यापुढेही सुरू ठेवण्यात यावा असे मत यावेळी वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल  यांनी नोंदविले.

येणाऱ्या जागतिक महिलादिनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत महिलांच्या प्रश्नांसदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. “समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिली.

या भेटीप्रसंगी मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी, प्रदीप ठाकरे, डॉ.अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

कौशल्य, स्टार्टअप्सच्या विकासासाठी महाराष्ट्र-भूतानमध्ये होणार आदान-प्रदान

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच या विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. भूतान देशासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास आणि स्टार्टअपविषयक नाविन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन भूतान नॅशनल असेंब्ल‍ीचे अध्यक्ष महामहीम श्री. वांगचुक नामग्याल यांनी केले.

वांगचुक नामग्याल यांच्या नेतृत्वाखालील भूतान देशातील 13 सदस्यीय संसदीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. शिष्टमंडळात भूतानचे संसद सदस्य श्रीमती त्सेवांग ल्हामो, कर्मा गयेल्त्सशेन, जिम दोरजी, कर्मा वांगचुक, ग्येन वांगडी, श्री. उग्येन त्शेरिंग, श्रीमती लहाकी डोल्मा, श्रीमती कर्मा लहामो, भूतान नॅशनल असेंब्लीचे भाषा तज्ज्ञ लोट्ये गयेल्त्सशेन, मुख्य माहिती व माध्यम अधिकारी थिनले वांगचूक यांचा समावेश होता. याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्राची नाविन्यता परिसंस्था आणि स्टार्टअप धोरण तसेच शासनाची यासंबंधी भूमिका या विषयांवर संवाद झाला. या भेटीदरम्यान भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील कौशल्य विकास व स्टार्टअप संदर्भातील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने मुंबई आयआयटीस्थित बेटीक (BETIC) या आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी काम करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील स्टार्टअप्सशी संवाद साधला.

भूतानसह विविध कल्पना, उपक्रम यांचे आदानप्रदान – प्रधान सचिव मनीषा वर्मा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्राला भूतानच्या शाश्वतता क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींमधून बरेच काही शिकता येईल. तसेच कौशल्य आणि नावीन्यता क्षेत्रामध्ये भूतानला महाराष्ट्राच्या सर्वोत्तम पद्धतींचा लाभ होऊ शकतो. भूतानसह विविध कल्पना, उपक्रमांचे आदान-प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले.

देशात तसेच राज्यात स्टार्टअपसाठी निधीचे स्त्रोत काय आहेत, स्टार्टअपसाठी कोणकोणत्या योजना आहेत, उद्योजकता आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो अशा विविध अनुषंगाने शिष्टमंडळातील सदस्यांनी प्रश्न विचारून यासंदर्भात महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेले धोरण, उपक्रमांची माहिती घेतली. प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. स्टार्टअपविषयक धोरणे, राज्यात स्टार्टअप्सना कशा पद्धतीने चालना देण्यात येते यासह महिला उद्योजकता कक्ष, महिला स्टार्टअप्स, ग्रामीण भागातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, योजनांची माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.

श्री. वांगचूक नामग्याल यांनी राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले की, भूतानसाठी भारताच्या कौशल्य आणि नाविन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे. यासाठी भविष्यात महाराष्ट्र राज्य आणि भूतान देशामध्ये परस्पर सहकार्य करता येईल, असे ते म्हणाले.

00000

इरशाद बागवान/विसंअ

अकृषिक कर माफीसंदर्भात विचार करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्यात येत असतो. निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमिनींवरील अकृषिक कर घेण्यात येतो. मात्र, शहरी भागातील जमीनधारकांसाठी अकृषिक कर माफ करण्यासंदर्भातील मागणीचा विचार करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांना लागू केलेली अकृषिक आकारणी रद्द करण्यासंदर्भातील आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, डॉ. भारती लव्हेकर, गीता जैन, यामिनी जाधव, गणपत गायकवाड, अमित साटम, अतुल भातखळकर, आशिष शेलार, संजय केळकर, मिहीर कोटेचा, पराग अळवणी, कॅ.आर.सेल्वन, योगेश सागर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहसचिव रमेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागाने भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनीच्या पुनर्विकासास तसेच पुनर्बांधकामास परवानगी देण्याबाबत धोरण केले आहे. त्यामुळे शासन जमिनीवरील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे, राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि मूळ सदनिका गाळे धारकांच्यातील करारनाम्यानुसार मुद्रांक शुल्काची आकारणी करणे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्याने नेहमीच नाविन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले  दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ९, १० आणि ११ फेब्रुवारीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 9, शुक्रवार दि. 10 आणि शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

महाराष्ट्राने नेहमीच नाविन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती, प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत ५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.

कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.

हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.

दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

पवन राठोड/स.सं/

राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू तयार होण्यासाठी प्रोत्साहन – क्रीडामंत्री गिरीष महाजन

मुंबई दि. 8 : जर्मनीतील एफ. सी. बायर्न  म्युनिक क्लब यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसार आजपासून राज्यात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धा सुरु झाली. जगात सर्वाधिक प्रमाणात खेळला जाणारा खेळ फुटबॉल असून राज्यात फुटबॉल खेळण्याचे प्रमाण वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू तयार होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

कुपरेज येथील मैदानात मुंबई शहर अंतर्गत एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धेचे उद्घाटन मंत्री श्री. महाजन यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मॅक्सिमिलन हशके उपस्थित होते.

क्रीडा मंत्री श्री महाजन म्हणाले, एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल आजपासून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होत असून राज्यातील एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून २० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. या खेळाडूंना एफ. सी. बायर्न क्लब च्या माध्यमातून जर्मनीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पारंपरिक पद्धतीने खेळाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.एफ. सी. बायर्न फुटबॉल क्लब म्युनिच जगातील नामांकित संस्था असून प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचारी यांच्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करून  राज्यातील फुटबॉलच्या वाढीस मदत होणार आहे.

राज्यातील २० प्रतिभावंत खेळाडू निवडीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपण चांगला खेळ खेळावा आणि या वीस जणांच्या यादीमध्ये आपलं नाव असावे. खेळाडूंकडून त्यांनी स्पर्धेचे घोषवाक्य ‘चलो खेलो फुटबॉल’ असे आहे, असेही त्यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई शहर तालिम मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, राज्यात राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा राज्याने जोपासला आहे. कुस्ती क्षेत्रातही नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान आले आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर होत आहे. हा बदल कुस्तीपटूंनी स्वीकारावा. खेळ म्हटला, की यश- अपयश येत राहते. मात्र, खेळाडूंनी अपयशाने खचून न जाता यशासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी.  कामगार कल्याण विभागाचे आयुक्त श्री. इळवे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेची माहिती  दिली. माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

अरू खांडेकर, कालिचरण सोलनकर विजेते

या राज्यस्तरीय कुमार केसरी स्पर्धेत अरू हिंदुराव खांडेकर, तर राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धेत कालिचरण झुंजार सोलनकर यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना अनुक्रमे चांदीची गदा, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अभिनंदन बोडके याने द्वितीय, ओंकार शिवाजी मगदूम याने तृतीय, तर विवेक कृष्णाजी धावडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दुसऱ्या गटात  भारत संजय पवार याने द्वितीय, प्रथमेश बाबा गुरव तृतीय, तर तानाजी सोपानराव विटकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

00000

राजू धोत्रे/विसंअ/

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ‘संकल्प महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.

श्री.फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे.  यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले. अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर – गोवा, विरार-अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.

आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयीसुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे.  वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा – वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.

आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेतीमालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.

0000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार  ठाणे,दि.१२...

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

0
मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या...

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन...

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी- मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२: विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत...