शनिवार, मे 17, 2025
Home Blog Page 1632

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची मुलाखत

जय महाराष्ट्र कार्यक्रमात शुक्रवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमात स्वच्छ व सुंदर नवी मुंबई महानगरपालिकाया विषयावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर दिलखुलासकार्यक्रमात गुरुवार दि. २७आणि शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नवी मुंबई महापालिकेने  स्वच्छतेमध्ये देशात मिळवलेले सातवे स्थान, महापालिकेला मिळालेला ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा, महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे संकलन व वर्गीकरणावर सुरू असलेले काम, स्वच्छता उपक्रमाला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद, प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी  सुरू असलेले प्रयत्न, स्वच्छ सर्वेक्षण या उपक्रमाचे सातत्य, महापालिकेने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली आहे.

विधानपरिषद लक्षवेधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनातदिशाकायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणारगृहमंत्री अनिल देशमुख

बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा

मुंबई,  दि. 26 : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या दिशाकायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामूहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.

विधानपरिषद सदस्य हेमंत टकले तर विधानसभेत सुनिल प्रभू यांनी वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याच्या अनुषंगाने महिला सुरक्षेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात‘दिशाकायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याच्या धर्तीवर आवश्यक त्या सुधारणा करून महाराष्ट्रातही कायदा अस्तित्वात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. देशमुख यांनी दोन्ही सभागृहात दिली.

या कायद्याचा अभ्यास व त्या अनुषंगाने राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. या अहवालानंतर या कायद्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी शासन गंभीर असून, हा नवीन कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या महिला सदस्य तसेच महिलांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

येत्या तीन महिन्यात राज्यभरातील1150 पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेंतर्गत  अर्थसहाय्य देण्यात येते. येत्या काळात ज्वलनशील पदार्थांमुळे बळी पडलेल्यांना मदत करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

महिला अत्याचार प्रतिबंध आणि समुपदेशनासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत‘भरोसा सेलस्थापन करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वितेनंतर राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तक्रारींच्या नोंदणीसाठी सीसीटीएनएस या प्रणालीद्वारे ऑनलाईन तक्रारींची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी या लक्षवेधीवरील एका उपप्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.

मुंबईत सध्या पाच  हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त माध्यम ठरणार आहेत. राज्यातील नवीन तसेच जुन्या इमारतीत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री  कपिल पाटील, गिरीश व्यास, नागो गाणार, प्रकाश गजभिये, हुस्नबानो खलिफे, निरंजन डावखरे, जोगेंद्र कवाडे, किशोर दराडे, रामदास आंबटकर, परिणय फुके, प्रसाद लाड, भाई गिरकर, अंबादास दानवे, श्रीमती ॲड. मनिषा कायंदे, विद्या चव्हाण यांनी तर विधानसभेत सदस्य सर्वश्री अबू आझमी, प्रणिती शिंदे, यामिनी जाधव, शुभ्रा घोडके यांनी सहभाग घेतला.

००००

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 26 : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गत सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली. सदस्य विलास पोतनीस यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापूर्ण आणि आजच्या काळाशी समर्पक असे शिक्षण मिळावे ही राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यातील सुमारे 83 शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. यात शैक्षणिक वर्ष 2018-19  मध्ये राज्यातील 13 जिल्हा परिषद शाळांना संलग्नता देण्यात आली तर शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मराठी माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा , स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा 70 शाळांची निवड करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नव्या अभ्यासक्रमाची निश्चित रुपरेखाही तयार करण्यात आली नव्हती. या सर्व त्रुटी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे हित अबाधित राखत संबधित शाळेतील अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच चालू ठेवून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत  सदस्य डॉ. रणजीत पाटील, डॉ. सुधीर तांबे, शरद रणपिसे, कपिल पाटील, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे, महादेव जानकर, भाई गिरकर यांनी सहभाग घेतला.

००००

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाची फिनलँड संसदीय शिष्टमंडळाकडून पाहणी

मुंबई, दि. 26 : फिनलँडच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषदेतील कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही देशातील संसदीय  कार्यपद्धतीसंदर्भात विधानभवनात पीठासीन अधिकाऱ्यांसोबत  बैठक झाली.

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, राज्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कृषी उत्पन्नावर संशोधन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावर चर्चा करुन फिनलँडने यासाठी सहकार्य करावे, असे प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवण्यात आले. तसेच फिनलँडमधील  मोफत शिक्षण याचा अभ्यास करण्यासाठी फिनलँड येथील विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील विद्यापीठाचा सामंजस्य करार करता येईल का यावर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासासाठी एक समिती गठित करावी, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

फिनलँड संसदीय शिष्टमंडळात वित्तीय समितीचे अध्यक्ष जोहान्स कोस्कीन, अँडर्स अँडलेरक्रूझ, सदस्य इवा जोहना एलोरांटा, सदस्य सँनी ग्रॅहॉन-लॅसेनन, सदस्य एस्को किविरंता, सदस्य जुक्का कोपरा, सदस्य मेर्जा कायल्लोनेन, सदस्य पिया लोहिकोस्की, सदस्य आरीस सुमेला, सदस्य जस्सी विहोनेन, सदस्य हेलवी इकावल्को, फिनलँडचे भारतीय राजदुत रिल्वा कोक्कु-रोंडे, फिनलँड देशाचे वाणिज्यदुत मिक्को पॉटसोनेन, जुक्का होलाप्पा, फिनलँडचे मुंबई, गुजरात, गोवा या राज्यासाठींचे वाणिज्यदूत श्रेयस दोषी उपस्थित होते.

००००

काशिबाई थोरात/वि.सं.अ./26/02/2020

विधान परिषद प्रश्नोत्तरे

औरंगाबादमधील सातारादेवळाई भागात विकासकामांवर भर देणार मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : सातारा-देवळाई नगर परिषद औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर येथील विकासकामांवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. शिंदे म्हणाले, सातारा- देवळाई  भागाकरिता महानगरपालिकेकडून रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग, भूमिगत गटारे, सरकारी नाल्यांवर पुलाचे बांधकाम करणे, आरोग्य केंद्र उभारणीसाठी इमारतींची  दुरुस्ती व नाल्यातील गाळ काढणे इत्यादी कामे करण्याचे नियोजित आहे. या भागात एकूण 43  विकासकामे करण्यात आली असून त्यासाठी  1.98 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.  याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दिडशे कोटीचा निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सतिश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कांदिवलीतील सार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे आरक्षण कायम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : पोईसर (कांदिवली) पूर्व येथील भूखंड हे विकास आराखड्यानुसार सन 2034 पर्यंत सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित असून प्राथमिक, माध्यमिक शाळा, क्रीडांगण व नियोजित रस्ता यासाठीचे आरक्षण हे कायम राहील, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.  शिंदे म्हणाले, मौजे पोईसर, कांदिवली पूर्व येथील विशिष्ट भूखंडाच्या जमीन मालकाने हा भूखंड महानगरपालिकेस बजावलेल्या खरेदी सूचना नगररचना अधिनियमातील तरतुदींशी विसंगत वाटल्याने महानगरपालिकेने त्या अस्वीकृत करून स्वाधिकारात भूसंपादनाचा प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत सुधार समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र हा भूखंड सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असल्याने यावरील आरक्षण व्यपगत होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार, प्रसाद लाड, गोपीकिशन बाजोरिया, किरण पावसकर, जोगेंद्र कवाडे, प्रविण दरेकर, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना दिनांक 1 जानेवारी 2006 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2010 या कालावधीतील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. निर्णय घेऊन 1 डिसेंबर 2010 पासून सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही थकबाकी देय नाही, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्ती वेतन, थकित महागाई भत्ता देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार,  अनिल सोले, भाई जगताप आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

रायगड जिल्ह्यातील साळावा-रेवदंडा खाडीवर नवीन पूल बांधणार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 26; रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले असून पुलाचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. दुरुस्तीची निविदा काढण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल असे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. भरणे म्हणाले, रायगडचे जिल्हाधिकारी यांनी अति अवजड वाहनांना या पुलावरून प्रवेशास बंदी घातली आहे. रेलिंगची दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच पुलावरील रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील, अनिकेत तटकरे, भाई जगताप, प्रविण दरेकर आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ विधान परिषद प्रश्नोत्तरे/26-2-20

‘महाज्योती’ संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरला

मुंबई, दि. 26 : महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.

महाज्योती संस्थेमार्फत शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या योजनांना विशेष गती देऊन या योजनांचा लाभ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या आर्थिक विकासासाठी व्हावा यासाठी नागपूर येथे हे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. विदर्भामध्ये या समाजाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यालय सामाजिक न्याय भवन नागपूर येथील नवीन इमारतीत कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री.वडेट्टवार यांनी दिली.

बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार महाज्योती संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या नागपूर येथील मुख्यालयासाठी आवश्यक असणारे अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या वेतन, भत्ते व अन्य कार्यालयीन सोयी सुविधांबाबत आवश्यक ते आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००

संगीता बिसांद्रे/26.2.2020

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु

68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 26 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. राज्यात 68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

श्री.पाटील म्हणाले, राज्यभरातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र व बँकांच्या शाखा या ठिकाणी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर योजनेंतर्गत लाभाची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव/वि.सं.अ./26/02/2020

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक विधानपरिषदेत एकमताने संमत

मुंबई, दि. 26 : मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खूप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,  असे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र  देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसं हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते हीच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही भाषेचा दुःस्वास करावा असे, शिकविले नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण जपल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे. मराठीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य  दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.

अस्वच्छ परिसरात व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 26 : अस्वच्छ परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या शिक्षण घेत असणाऱ्या मुलांना, त्यांची संख्या निश्चित नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांचे सर्वेक्षण करावे असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात  डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील काच, कागद, पत्रा, कष्टकरी पंचायत या संघटनेने शासनाला विविध समस्यांचे  निवेदन दिले होते. या व्यवसायात काम करणाऱ्या व सफाई कामगार यांच्या मुलांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती शासनाने 2013 मध्ये सुरू केली आहे. या योजनेमध्ये लाभार्थींची संख्या अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत त्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात,  केंद्र सरकारने 2018 पासून शिष्यवृत्ती 1580 वरून तीन हजार रुपये वाढवून दिली आहे, त्याची अंमलबजावणी करावी. ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने कोणताही भार राज्य शासनावर पडणार नसल्याने योजना तातडीने राबविण्यात यावी. त्यात कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ही माहिती जिल्हानिहाय ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनजंय मुंडे म्हणाले, आरोग्यास अपायकारक असलेल्या व्यवसातील व्यक्तींच्या मुलांकरीता मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. केंद्र शासनाच्या तरतुदीनुसार 100 टक्के केंद्र पुरस्कृत असलेली रक्कम 3000 रुपये देण्यात येतील. कागदपत्रे जमविणे, बँकेत खाते उघडणे, आधार क्रमांक जोडून देणे यामध्ये शाळांनी पालकांची मदत करावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले. शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थींची जिल्हानिहाय यादी प्रकाशित करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस प्रकल्प संचालक हंबीरराव कांबळे, कैलास कणसे, पौर्णिमा चिकरमाने, सुरेखा गाडे, ज्योती म्हापसेकर, निशा बांदेकर आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ/26.2.2020

माजी विधानसभा सदस्य नामदेवराव भोईटे यांना विधानसभेत आदरांजली

मुंबई, दि. 26 : माजी विधानसभा सदस्य नामदेवराव भोईटे यांना विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

000

अजय जाधव/वि.सं.अ./26/02/2020

‘मराठी भाषा गौरव दिन’ महाविद्यालये, विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत निवेदन

मुंबई, दि. 26 : मराठी भाषा गौरव दिनमहाविद्यालये, विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भातच्या परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना देण्यात आल्याचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिले.

श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/अशासकीय, अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था, कला संचालनालय व त्या अधिपत्याखालील कार्यालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व त्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये “मराठी भाषा गौरव दिन”  साजरा करण्याविषयी सर्व संबंधितांना दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक“मराठी भाषा गौरव दिन”सोहळा साजरा करण्याबाबत दि. २५ फेब्रुवारी, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये निर्देशित करण्यात आले आहेत.  या दिवशी “मराठी भाषा गौरव दिन”साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिन“मराठी भाषा गौरव दिन”म्हणून साजरा करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाच्या दि.२१ जानेवारी, २०१३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयीन प्रमुखांना मराठी भाषा विभागाच्या दि. ०४ फेब्रुवारी, २०२०च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

तसेच उपरोक्त सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययनवर्ग सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करण्याबाबत तसेच स्नेह संमेलने, वर्धापन दिन, समारोप समारंभ, सामूहिक उपक्रम, चर्चासत्र, शिबीर, विविध विषयांबाबतचे परिसंवाद, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने करण्याबाबतच्या सूचना दि. १५ फेब्रुवारी, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधित विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील उपरोक्त नमूद विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेतून लावण्याबाबत तसेच ज्या ठिकाणी नामफलक इंग्रजी भाषेमध्ये लावण्यात आले आहेत, तेथे सदर फलक इंग्रजी भाषेसह मराठी भाषेत लावण्याबाबतच्या सूचना दि. १५ फेब्रुवारी, २०२०च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...