रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1631

आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्ट‍िव्हीटीचा लाभ – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई दि. 31 : कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट झाल्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांना याचा लाभ मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच, मोबाईल नेटवर्किंगची समस्या सोडविण्यात आली असून आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्ट‍िव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना मोबाईल कनेक्ट‍िव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावकऱ्यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. परंतु, आंगणेवाडी परिसरात मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे, आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांना यंदा “नो-नेटवर्क” असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, आंगणेवाडी साठी येणाऱ्या भाविकांना यात्रेची छायाचित्रे, व्हीडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

 मुंबई, दि.  ३१ : कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून  अंगीकारण्यात येणार आहे.  या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्वीकारण्यात आले आहे. हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.

 महाराष्ट्राचे राज्यगीत असे आहे :-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

 

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

 

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

राज्यगीत गायन, वादना संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत :-

  • विचारार्थ राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
  • शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
  • १ मे, महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.
  • राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा /प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
  • राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.
  • राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती याना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
  • राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
  • वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.
  • राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
  • या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.

—–०—–

 अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय

आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे आदिवासी युवक – युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५० व्या बैठकीतील शिफारस क्र. ३४ नुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.

ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या २५ ते ५० टक्क्यांदरम्यान आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ अधिसूचित संवर्गातील सरळसेवेची ५० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येतील. त्याचबरोबर ज्या गावांची आदिवासींची लोकसंख्या २५ टक्के पेक्षा कमी आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ अधिसूचित संवर्गातील (कोतवाल व पोलीस पाटील वगळून) २५ टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येणार आहेत. तसेच अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार तसेच गुणवत्तेनुसार भरली जातील.

राज्यपालांच्या दि.२९.८.२०१९ च्या अधिसूचनेमध्ये नमूद १७ संवर्गातील पदांबाबत प्रत्येक शासकीय विभागाने प्रत्येक संवर्गातील पदाचे क्षेत्र (गावे) निश्चित करुन ते अधिसूचित करावे. अनुसूचित क्षेत्राच्या गावांमधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे व इतर लोकसंख्येचे प्रमाण निश्चित करावे. प्रत्येक पदाच्या निश्चित केलेल्या क्षेत्रानुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण निश्चित करुन अनुसूचित जमाती प्रवर्गातून १०० टक्के, ५० टक्के व २५ टक्के भरावयाची संवर्गनिहाय पदसंख्या निश्चित करावी.

भरती प्रक्रिया राबविताना स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणारी पदे संबंधित महसुली विभागातील अनुसूचित जमातीच्या स्थानिक भाषा अवगत असलेल्या अर्हता धारक उमेदवारामधून भरण्यात यावीत. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील पदांच्या कार्यक्षेत्रासाठी जिल्हा हा घटक धरण्यात यावा. तथापि, वन विभागाच्या अखत्यारितील वन निरिक्षक व वनरक्षक या पदांबाबत वनविभाग/तालुका हा घटक धरण्यात यावा.

अधिसूचित १७ संवर्ग असे- तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास  निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, सहायकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, वनरक्षक, कोतवाल, वन-अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी, पोलीस पाटील,

—–०—–

नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधनात्मक संस्थाचा उद्योग क्षेत्र म्हणून समावेश

नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगासाठी राखीव असलेल्या ८५ टक्के औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिरिक्त अनुज्ञेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्थांना उद्योग क्षेत्र म्हणून परवानगी देण्यात आली असून या उद्योगामुळे अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा उपलब्ध होतील. या प्रकल्पात  ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे.

नवी मुंबई येथे एकात्मिक औद्योगिक क्षेत्र सन २००६ मध्ये सिडकोच्या संयुक्तीक भागिदारीतून नवी मुंबई आर्थिक विकास क्षेत्राची (NMFMSZ) रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. परंतु बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे व केंद्र शासनाच्या बदललेल्या कर रचना यामुळे विशेष आर्थिक क्षेत्र हे कार्यान्वित होऊ शकले नाही. त्याकरिता शासनाने त्यास एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामध्ये रुपांतर करण्यास सन २०१८ मध्ये मान्यता दिली. या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे उद्योग स्थापन करण्यात येणार आहे, ते उद्योग क्षेत्र प्रदूषण विरहीत असणे आवश्यक आहे. नवी मुंबईची विशेष भौगोलिक रचना व पर्यावरण लक्षात घेता, सेवा उद्योगांवर भर देणे आवश्यक आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा या क्षेत्रामध्ये उभ्या करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे. (उदा. आय. ओ.टी., ब्लॉक चेन तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन कृत्रिम प्रज्ञा, रोबोटिक्स इत्यादी) या उद्योगांना पूरक होणाऱ्या शैक्षणिक संस्था / संशोधन संस्था उभ्या करणेही आवश्यक आहे. सबब सेवा उद्योगाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय नामांकित शैक्षणिक संस्था / संशोधनात्मक संस्था या उद्योग क्षेत्र म्हणून अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्योगांमुळे अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा उपलब्ध होतील. या प्रकल्पामध्ये साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे एक लाख (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) रोजगार निर्माण होतील.

—–०—–

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ

महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयामुळे बाल संगोपन योजनेचे 31 हजार 182 लाभार्थी तसेच कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले 23 हजार 535 लाभार्थी अशा एकूण 54 हजार 717 लाभार्थींना अनुदान वाढीचा लाभ मिळणार आहे.

बालसंगोपन योजनेअंतर्गत यापूर्वी देण्यात येणाऱ्या लाभार्थी अनुदानामध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी पालकास देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात 1 हजार 100 वरून 2 हजार 250 रुपये वाढ करण्यात येणार आहे. संस्थेस देण्यात येणाऱ्या प्रतिबालक दरमहा अनुदानात 125 वरून 250 रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे. अशा रितीने  बाल संगोपन योजनेअंतर्गत परिपोषण अनुदान म्हणून एकूण 2 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे.

—–०—–

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 921 कोटी रुपये

फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी राज्य शासन 921 कोटी रुपयांचा 50 टक्के वाटा उचलणार आहे.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होण्यास मदत होणार आहे.

राज्याच्या ग्रामीण विशेषत: अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पुर्ण व्हावे याकरीता अशा निवडक प्रकल्पांमध्ये 40 ते 50 टक्के  आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने  स्वीकारले आहे. या रेल्वेमार्ग प्रकल्पाकरिता महाराष्ट्र शासनाने एकूण प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के खर्च म्हणजेच 1842 कोटीं रुपयांपैकी 921 कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली. राज्य शासनाच्या हिश्श्यामध्ये जमिनीची किंमत (शासकीय जमीन अथवा इतर जमीन) अंतर्भूत असून  हा प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) व्दारे राबविण्यात येणार आहे.

—–०—–

विविध योजनांमधील दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ; गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये

राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयानुसार आता गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमत राहणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजना) ही योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली.

पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप अंतर्गत वाटप करावयाच्या प्रति दुधाळ देशी / संकरीत गायीची किंमत आता 40 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किंमत रु. 40 हजार रुपयांऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे. मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी / संकरीत गायीची किंमत 51 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किंमत 61 हजार ऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे. या किंमतीनुसार लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येतील.

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत 6 किंवा 4 किंवा 2 दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना केवळ  2 दुधाळ देशी किंवा संकरीत गायी किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करण्यात येईल.

या विविध योजनांतर्गत गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा, खाद्य साठवणूक, शेड बांधकाम या बाबींसाठी देय असलेले अनुदान रद्द करण्यात येऊन या उपलब्ध निधीचा वापर लाभार्थींना दुधाळ जनावरे  गट वाटप करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. लाभार्थ्यांना दोन्ही दुधाळ जनावरांचा गट एकाच वेळी वाटप करण्यात येईल. दुधाळ जनावरांच्या किंमतीस अनुसरून कमाल 10.20 टक्के मर्यादेपर्यंत (अधिक 18 टक्के सेवाकर) दराने 3 वर्षांकरीता विमा उतरविणे बंधनकारक असेल. यातील शासनाच्या हिश्यानुसारची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निवड झालेल्या लाभार्थींना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषयक एक दिवसीय प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी 500 रुपये देण्यात येतील.

बैठकीत संबंधित आर्थिक वर्षात दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजना राबविण्यासाठी वाटप करावयाच्या दुधाळ जनावरांच्या किंमतीच्या प्रमाणात प्रशासकीय खर्चासाठी 1 टक्का निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारित किंमतीनुसार योजनांची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्ष 2023-24 पासून करण्यात येणार आहे.

——०——

मैत्री कक्षाबाबतच्या विधेयकास मान्यता

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकाच्या मसुद्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या विधेयकामध्ये उद्योगांसाठीच्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान करणे, त्याबाबत यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याच्या तरतुदी आहेत.

महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी एक खिडकी योजनेंतर्गत महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा कक्ष (मैत्री कक्ष) स्थापन करण्यात आलेला आहे. या मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा देण्याचा उद्योग विभागाचा प्रस्ताव होता. त्यानुसार महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा (मैत्री) विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील स्पर्धा परिक्षेसाठी 1 हजार रुपये शुल्क

राज्यातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस., आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा तसेच राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)  नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा टि.सी. एस., आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेतली जाते. त्यासाठी या कंपन्यांना द्यावयाची रक्कम, कर व प्रशासकीय खर्च मिळून उमेदवाराकडून एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. परीक्षा शुल्कात राखीव प्रवर्गासाठी १० टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

—–०—–

तेंदूपान स्वामित्व शुल्क मजुरांना प्रोत्‍साहन मजुरी म्‍हणून वाटणार

तेंदूपान संकलनातून जमा होणारे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदू पान संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्‍साहनात्‍मक मजुरी म्‍हणून वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाची अंमलबजावणी गत 2022 च्या हंगामापासून करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

तेंदू पाने संकलन करिता लिलाव प्रक्रियेतून मिळणाऱ्या स्‍वामित्‍व शुल्‍कातून विविध खर्च  वजा करुन त्‍या हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्‍साहन मजुरी ठरवण्यात येत असे. पण आता सन 2022 च्या हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्‍याही प्रकारची वजावट न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्‍साहनात्‍मक मजुरी देण्यात येणार आहे. गत तीन वर्षात तेंदू पाने संकलनाकरिता दरवर्षी सरासरी ३३ कोटी रुपये इतका प्रशासकीय खर्च होत आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्‍याही प्रकारची प्रशासकीय खर्चाची वजावट न करता प्रोत्साहनात्‍मक मजुरी म्‍हणून वाटप करण्यात येणार आहे. ही प्रोत्‍साहनात्‍मक मजुरीची रक्कम वन विभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू मजुरांना देण्यात येणार आहे. यामुळे उपजिविकेची मर्यादित साधने असलेल्या तेंदू पाने मजुरांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

—–०—–

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू

खासगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील 21 अभिमत विद्यापीठातील विविध संवर्गातील 14 हजार 232 विद्यार्थ्यांना होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे लाभ राज्यातील अभिमत विद्यापीठातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यासाठी धोरण ठरविण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष न्या. (निवृत्त) एम.एन.गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल 27 डिसेंबर 2021 रोजी सादर केला.

या अहवालातील समितीच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रमनिहाय शुल्काची परिगणना करुन अंदाजित 118 कोटी रुपये शिष्यवृत्ती राज्यातील 21 अभिमत विद्यापीठांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे 14 हजार 232 विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

—–०—–

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेत लोकसंख्येनुसार आर्थिक निकषात बदल

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील सर्व आदिवासी वस्ती/वाडे/पाडे/प्रभाग यांचा एकसमान विकास साधण्याचा उद्देश सफल होण्यासाठी ही योजना केवळ जिल्हास्तरावरुन अथवा राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक  न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना (पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आदिवासी लोकसंख्येनुसार सुधारित निकष करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत कामांची यादी, योजनेची व्याप्ती व कामांचे लोकसंख्यानिहाय आर्थिक निकष सुधारित करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. या सुधारणा जिल्हास्तरावरुन राबवावयाच्या योजनेस देखील लागू राहणार आहेत.  सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार कामांचे आर्थिक निकष असे आहेत.

३ हजार पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या क्षेत्रासाठी एक कोटी, १५०० ते ३००० लोकसंख्येसाठी ७५ लाख, १००० ते १४९९ लोकसंख्येसाठी ५० लाख, ५०० ते ९९९ लोकसंख्येसाठी ४० लाख, १०१ ते ४९९ लोकसंख्येसाठी २० लाख आणि १ ते १०० लोकसंख्येसाठी ५ लाख रुपये असे सुधारित निकष करण्यात आले आहेत.

—–०—–

पुरंदर उपसा सिंचन योजनेस 460 कोटी 95 लाखांची सुधारीत प्रशासकीय मान्यता

पुरंदर  उपसा सिंचन योजनेच्या कामांसाठी 460 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यासाठी प्रथम सुधारीत प्रशासकीय म्हणून मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेमुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील 63 गावांतील 25 हजार 498 हेक्टर  क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड व हवेली (पुर्वभाग) हे तालुके कमी पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मिमी असते. लाभक्षेत्र उंचसखल डोंगराळ असल्याने इतर प्रवाही सिंचन योजनांचा या भागास लाभ होत नाही. या दुर्गम डोंगराळ भागातील दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुळा-मुठा नदीतून उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेसाठी मंजूर पाणी उपलब्धता  4.00 अघफु आहे.  शिवाय या योजनेत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी खुल्या कालव्याऐवजी बंद पाईप प्रणालीद्वारे वितरण व्यवस्थेचा पर्याय निवडण्यात आला आहे.

—–०—–

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाखांच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनास लाभ

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या  3 हजार 976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे पुण्यासह, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील ४३ हजार ५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील निरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सन 2008 पासुन धरणामध्ये पूर्ण क्षमतेने 337.39 दलघमी इतका पाणी साठा होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत “उर्वरीत महाराष्ट्र” या प्रदेशात आहे. या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 6 हजार 670 हेक्टर, सातारा जिल्हातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 11 हजार 860 हेक्टर व फलटण तालुक्यातील 13 हजार 550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 10 हजार 970 हेक्टर असे एकूण 43 हजार 50 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

—–०—–

आग प्रतिबंधक, जीवसंरक्षक उपाययोजनेच्या अधिनियमात सुधारणा

राज्यातील वाढते नागरिकरण व औद्योगिकरण लक्षात घेता, अग्निसुरक्षा विषयक बाबींसाठी असलेल्या महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खालील सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार पार्किंगची समस्या लक्षात घेता, स्वयंचलित पार्किंगची उंची 45 मीटर वरुन 100 मीटर पर्यंत त्याचबरोबर शैक्षणिक इमारतींची उंची 30 मीटर वरुन 45 मीटर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

आगीच्या संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन करुन, उपलब्ध अग्निप्रतिबंधक उपाययोजना यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येईल. गोदामे व शितगृहे यांची उंची 15 मीटर वरुन 24 मीटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. अग्निशमन अधिनियमातील अनुसूची-1 मध्ये विविध प्रकारच्या इमारतींसाठी किमान अग्निशमन उपाययोजना या राष्ट्रीय बांधकाम संहिता, 2016 प्रमाणे सुधारीत करण्याचा निर्णय यावेळी झाला. अग्निशमन शुल्कात बदल करुन ते बांधकामाच्या रेडी रेकनरवर आधारीत करुन, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) प्रमाणे लागू होणारे अग्निशमन पायाभूत शुल्क एकत्रित करुन अनुसूची-2 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

मुंबई, दि. ३१ : कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे १ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम – (क्र. ६०) चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी १ व २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मुलाखतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या सीडीएस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० जानेवारी २०२३ अशी होती. या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना त्यांनी फेसबुक/वेब पेजवर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्ल्यू) सर्च करून त्यातील सीडीएस- ६० कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक ०२५३- २४५०३२) येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 

सर्व तीनही वर्गवारीमध्ये महाराष्ट्राला तीन पारितोषिके; सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन !

मुंबई, दि. 31 : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्ली येथे झालेल्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राला चित्ररथाबद्दल दोन पारितोषिके तर सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल एक पारितोषिक अशी एकूण तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्ररथ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक, लोकप्रिय चित्ररथ श्रेणीमध्ये तिसरा क्रमांक आणि आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक, अशी महाराष्ट्राने पारितोषिके पटकावली आहेत. दिल्ली येथे आज संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या राज्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी ही पारितोषिके स्वीकारली.

यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त, महाराष्ट्राने “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या विषयावर चित्ररथ साकारला होता. अप्रतिम देखावे, सुंदर नृत्य आणि सर्वांग सुंदर गीत यामुळे या चित्ररथाने अनेकांची मने जिंकली होती.

संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीतील सदस्यांनी या चित्ररथास सर्वोत्कृष्ट चित्ररथ श्रेणीत दुसरा क्रमांक देऊन गौरव केला, तर लोकप्रिय चित्ररथ श्रेणीमध्येही महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला. आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राच्या पथकाने “धनगर नृत्य” यावर आधारित सादरीकरण केले होते. या सादरीकरणास देशात दुसरा क्रमांक मिळाला होता.

महाराष्ट्राला मिळालेल्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे. तीनही श्रेणीमध्ये तीन पुरस्कार मिळणे ही गोष्ट महाराष्ट्राला अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 31 : राज्यातील विविध भागात अनेक कलाकार आपली कला वेगवेगळ्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. या सर्व कलाकारांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ असावे म्हणून सांस्कृतिक कार्य विभाग कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चित्रकार मिलिंद लिंबेकर यांचे “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजन करण्यात आले आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणाऱ्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार मिलिंद लिंबेकर यांच्यासह आशा महाकाले, महेश सरमळकर, चित्रकार विजय बोधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भातील चित्रकाराच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. आगामी काळात मिलिंद लिंबेकर यांची कला फक्त विदर्भात, मुंबईत न पोहोचवता भारतभर पोहोचवेल, अशी खात्री आहे.

भारतामध्ये कला, संस्कृती यांची विविधता आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, संस्कृती यामध्ये विविधता आहेच. आज राज्यात प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे, आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. या डिजिटल व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराला आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. मिलिंद यांची आतापर्यंत पाच एकल चित्र प्रदर्शनी झाली आहेत. त्याचबरोबर देशभरातील अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनात त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या स्वरुपात मोठ्या खुबीने नाट्यमयता आणली आहे. या चित्रप्रदर्शनात बहुतांश चित्रे ही ऍक्रेलिक माध्यमातील आहेत.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता; माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

मुंबई, दि. 31 : नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे 24 हजार 520 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करणार आहे. त्यादृष्टिने जलसंपदा विभागाने विविध बाबींची पूर्तता तत्काळ करून घ्यावी. उरमोडी धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील उर्वरित त्रुटींची दुरुस्ती महिनाभरात पूर्ण करावी. शिवाय उरमोडी ते वाठार किरोली याठिकाणी बंदिस्त जलवाहिनीचे कामही हाती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. यामुळे माण, खटाव या दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टेंभू योजनेची पाणी वाटप प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून माण व खटावसाठी योजना राबवावी. शिवाय सांगोला उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार करावा. या योजनेचा प्रस्ताव 1 मार्चला देण्यात येऊन प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर एप्रिलपासून काम सुरू करावे. नीरा-देवधर प्रकल्पातील पाण्याचे फेरनियोजन करून पाणी उपलब्ध झाल्यास एक टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिल्या. यामुळे टँकरमुक्त सांगोला तालुका होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सिना-माढा उपसिंचन प्रकल्पात समावेश नसलेल्या माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव या गावांचा समावेश होण्याबाबत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा. खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेत मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, बुदुकवाडी, हटकरवाडी, जामगाव इत्यादी गावांना लाभ मिळण्याबाबत सुद्धा अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केल्या. वसना उपसा सिंचन योजनेत कोरेगाव, सर्कलवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, मोरबंद आदींचा समावेश करण्याबाबत सुद्धा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या निविदा येत्या 10 दिवसात काढून काम त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कुकडी लाभक्षेत्रातील अनेक गावे पाण्याविना आहेत, त्यांना उजनी जलाशयामधून अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून पाणी देण्यासाठी नियोजन करावे. ही प्रक्रिया जलसंपदा विभागाने त्वरित हाती घ्यावीत. सातारा जिल्ह्यातील काही गावांतून तब्बल 356 रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाने पोलिसांमध्ये तक्रारी द्याव्यात. पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करावी. फलटण-पंढरपूर रेल्वेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता घेऊन आवश्यक 50 टक्के निधीची तरतूद करावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मौजे रांजणी ते नीरा नरसिंगपूर येथील पुलाच्या बांधकामाबाबत सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

आतापर्यंत 287 रोहित्रे बसविण्यात आली असून 69 रोहित्रे 15 दिवसांत बसविले जातील. याशिवाय फलटण तालुक्यात तीन नवीन वीज उपकेंद्र निर्माणाधीन असून तीही लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती श्रीमती शुक्ला यांनी दिली. यावेळी खासदार श्री. निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यासाठी जादा रोहित्रांची मागणी केली. शिवाय सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी, मोडनिंब यासह चार ठिकाणी प्रस्तावित असलेले ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मागणी केली.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत जाँ मार्क सेरे शार्ले यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. 31 : भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मूल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी. उभयपक्षी माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत श्री. जाँ मार्क सेरे शार्ले यांनी उप सभापती डॉ. गोऱ्हे यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी जागतिक स्तरावर सुरु असलेले स्त्री समानता विषयक कार्यक्रम, उपक्रम, परिषदा याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. फ्रान्समधील स्त्री समानता विषयक उपक्रमातील सहभागी गटनेत्यांना यावेळी मुंबई भेटीचे आमंत्रण देण्यात आले.

फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशातील स्त्री समानता विषयक कार्यक्रमांचे अभ्यासगट फ्रान्स वकिलातीच्या माध्यमातून परस्परांशी संपर्क आणि समन्वय साधून आहेत. त्‍यांची एक परिषद मुंबई येथे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती यावेळी महावाणिज्यदूत श्री. शार्ले यांनी दिली. या परिषदेत आपणही सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. स्त्री आधार केंद्र त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या स्त्री समानता आणि महिला सबलीकरण उपक्रमांची माहिती उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. “समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिला. या सदिच्छाभेटीप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव राजेश तारवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने हे उपस्थित होते.

००००

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 31 : सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यातील बरीचशी गावे ही सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश नजीकच्या सिंचन योजनेत करणे अथवा या गावांना नवीन सिंचन प्रकल्पातून पाणी देण्यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सातारा, खटाव, कोरेगांव तालुक्यातील वंचित गावांना सिंचनाचे पाणी देण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीस कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार महेश शिंदे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता अ.प. निकम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोयना धरणामध्ये बुडीत बंधारे बांधण्यात येणार असून उन्हाळ्यात कोयना धरण परिसरातील गावांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रस्तावित सोळशी धरणाबाबत सर्वेक्षण करून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी वंचित भागाला पाणी देण्यात येईल. नेर तलावाखालील गावांना उजवा व डावा कालवा काढून पाणी देण्यात यावे.

सातारा तालुक्यातील वर्णे, निगडी, देगाव, देवकरवाडी, कारंडवाडी व राजेवाडी ही गावे कायमस्वरूपी सिंचनापासून वंचित आहेत. या गावांत पाणी देण्यासाठी उपसा सिंचन योजना करून ते पाणी वर्णे व निगडीच्या टेकडीवरती टाकून कालव्याद्वारे सिंचनास पाणी देणे शक्य आहे. या अनुषंगाने वर्णे व निगडी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

वेटणे रणसिंगवाडी गावांना आंधळी बोगद्यातून उपसाद्वारे पाणी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सातारा जिल्ह्याचे पाणी वापराचा फेर आढावा घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागाला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. शेल्टी, खिरखंडी आणि सिद्धार्थ नगर या गावांना जिये कठापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होता, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरले. तसेच पुरस्कारच्या रकमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रकमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्त्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले.

०००००

‘महाराष्ट्र मिलेट मिशन’साठी २०० कोटी रुपयांची तरतूद; शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘मिलेट मिशन’ महत्त्वाचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 31 : राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री भरत गोगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसोडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तृणधान्य पूजन आणि तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पीके घेतली जात होती, आजही ती घेण्यात येतात. या पिकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्ट‍िक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या पिकांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे हे मोठे वरदान ठरणार आहे. एकप्रकारे हा शेतकऱ्यांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल. शासनस्तरावरुन या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. ज्वारीसाठी 73 टक्के, बाजरी साठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88 टक्के इतकी ही वाढ असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय स्मार्ट या प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने “सेंटर ऑफ एक्सलन्स”ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. धानासाठी हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस, हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी चार सिट्रीस इस्टेटपैकी एक पैठण येथे स्थापन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० आपण राबवित असून इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, या वर्षात व्यापक अशी योजना यासाठी बनवली आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भरड धान्याला विविध पदार्थात वापर करून याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक कृषी सचिव श्री. डवले यांनी केले. यावेळी त्यांनी तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स याठिकाणी लावल्याचे सांगितले. आभार कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी मानले.

शेतकरी मासिक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि पोस्टरचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शेतकरी मासिक पौष्टिक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. शेतकरी मासिकात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 च्या अनुषंगाने राज्यात पिकविण्यात येणाऱ्या मुख्य व लघु पौष्ट‍िक तृणधान्य पिकाच्या लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया, आहारातील महत्त्व व त्यांचा लोकांच्या आहारात वापर वाढ करण्याच्या अनुषंगाने माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबवावयाच्या विविध योजनांची माहिती पोस्टरमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरापासून ते ग्रामपातळीपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार

यावेळी शेतीमध्ये पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सोनू बांगारा (माळ, जि. ठाणे), किसन मोढवे (मर्दी, जि. ठाणे), काकड्या लहांगे (उज्जेनी, जि. पालघर), आनंता धिंडा (सातरोंडे, जि. पालघर), जानू कामडी आणि पद्माकर वाख ((मुसई, जि. ठाणे), तानाजी यादव (गमेवाडी, जि. सातारा), होरुसिंग ठाकरे (बंधारा, जि. नंदुरबार), प्रकाश गायकवाड (पिसाळवाडी, जि. सातारा), बाजीराव चौरे (बाभूळणे, जि. नाशिक), निंगोजी कुंदेकर (शेवाळे, जि. कोल्हापूर), प्रमोद माळी (पिंपरखेड, जि.जळगाव), भामटा पाडवी ((खेडळे, जि.नंदुरबार), तात्यासाहेब फडतरे (समृद्धी ॲग्रो ग्रुप. राहाता, जि. अहमदनगर), महेश लोंढे (ॲग्रोझी ऑरगॅनिक भरडधान्य प्रक्रिया उद्योग, उरळीकांचन, जि. पुणे), शंतनू पाटील (मेलूप फू़डस, सोलापूर), श्रीमती नीलिमा जोरवार (संचालक, कळसूबाई शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक), महेंद्र छोरिया (यश इंटरप्रायजेस, नाशिक), प्रसाद औसरकर (शहापूर, जि. ठाणे) आणि बारवी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी  (पाटगाव, जि. ठाणे) यांचा समावेश आहे.

विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी

आजच्या या कार्यक्रमावेळी प्रांगणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासह विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी आणि मंत्रालयात विविध कामांसाठी आलेल्या  नागरिकांनी या पदार्थांची खरेदी केली.

समृद्धी ॲग्रो, पुणे, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक. एमटीडीसी आणि दादर केटरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले आदर्श प्रभाग संघ, नाचणगाव, वर्धा. आदर्श स्वयंसहायता महिला समूह, ताम्हाणे, रत्नागिरी. एव्हीपी फूडस स्टफ, शहापूर. सान्वी कुकीज, ऐरोली. बारवी ॲग्रो, मुरबाड. अग्रणी शेतकरी उत्पादक गट, कवठेमहांकाळ.

पवित्र अन्न प्रक्रिया गृहउद्योग, भिवंडी. जय भवानी महिला बचत गट, जव्हार. कृषी विभाग ठाणे अधिकारी- कर्मचारी महिला, कृषी विभाग भिवंडी, श्री गणेश महिला बचत गट, कर्जत. श्रीयाज फूडस पनवेल. हिरकणी प्रभाग संघ, आदर्श महिला प्रभाग संघ, पालघर. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र, शहापूर. सुसी फूडस् रायगड. स्वयंसिद्धा महिला स्वयंसहायता समूह पनवेल. प्रेरणा स्वयंसहायता महिला समूह, खालापूर. रत्नाई महिला समूह, खालापूर, श्री वैभव इंडस्ट्रीज, जळगाव, ओम नमोशिवाय महिला समूह, साक्री, धुळे, मिलूप फूडस, बार्शी. यशस्व‍िनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी, दक्षिण सोलापूर. शिवमुद्रा शेतकरी गट, मांडेदुर्ग, चंदगड, धनदाई महिला बचत गट, रोहा, रायगड आणि अरूणिका फूडस, धुळे यांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....