रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 1630

‘ओबीसीं’च्या जनगणनेसाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरावा – विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले

मुंबई : राज्यात इतर मागासवर्गीयांची जनगणना होण्यासाठी राज्याने आग्रह धरला पाहिजे. राज्य शासनाने यासाठी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी किंवा आवश्यकता वाटल्यास तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात‘ओबीसीं’ची जनगणना करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य  शासनाला दिले. अध्यक्षांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हे अधिवेशन संपण्याच्या आसपास शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य श्री.विकास ठाकरे यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर झालेल्या चर्चेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदींनी सहभाग घेत ओबीसींच्या जनगणनेची भूमिका मांडली.

अध्यक्ष श्री.नाना पटोले म्हणाले की, सध्या 1931 मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेचाच आधार घ्यावा लागतो. ओबीसी समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाची जातनिहाय गणना व्हावी अशी भावना आहे. तामिळनाडु राज्याने स्वत: सर्वेक्षण करुन त्यांच्या आरक्षणामध्ये वाढ केली आहे. सगळ्यात जास्त आरक्षण तामिळनाडू राज्यात दिले जात आहे. महाराष्ट्रात ओबीसींच्या गणनेबाबतही याचा विचार व्हावा किंवा राज्यशासनाने यासाठी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी, अशा सूचना श्री.पटोले यांनी दिल्या.

त्यावर उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अध्यक्षांच्या सूचनेस संमती दर्शवत प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृह मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सभागृहाची भूमिका मांडली जाईल, असे सांगितले.

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करणार – अल्पसंख्याक विकास मंत्रीनवाब मलिक

मुंबई : उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत जे निर्देश दिले आहेत, त्या दृष्टीने राज्यात यावर्षीचे शैक्षणिक प्रवेश सुरु होण्यापूर्वी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करण्यात येणार असून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत दिली.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सदस्य शरद रणपिसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री.मलिक बोलत होते.

श्री.मलिक म्हणाले, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत. ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत कायदा करु. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामधील प्रवेशासाठी दिलेले पाच टक्के आरक्षण अबाधित ठेवले आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर घटनेला धरुनच निर्णय घेण्यात येणार आहे. मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे.

मुस्लिम समाजासाठी नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने दि. 14 नोव्हेंबर 2014 रोजी या प्रकरणी अंतरिम निर्णय दिला आहे. या अंतरिम आदेशाद्वारे शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात आलेले आहे. परंतु खासगी विनाअनुदानित संस्थामधील प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या अध्यादेशाचे दि. 23 डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने अध्यादेश व्यपगत झाला आहे. तथापि, दि. 09 जुलै 2014 ते दि. 23 डिसेंबर 2014 या काळातील शासकीय तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रवेश अबाधित ठेवण्यात आलेले आहेत. तसेच दि. 09 जुलै 2014 ते दि. 14 नोव्हेंबर 2014 या दरम्यानच्या काळातील शासकीय सेवेत झालेल्या नियुक्त्या अबाधित राहणार आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्यात 2019 मध्ये 17 ठिकाणी आंदोलने झाली. तथापि, गुन्हे दाखल झाले नसल्याचेही श्री.मलिक यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री भाई जगताप, भाई गिरकर, विनायक मेटे, ॲड.हुस्नबानू खलिफे आदींनी सहभाग घेतला.

000

प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केले.

राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याबाबतचा प्रश्न सदस्य रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री. ठाकरे बोलत होते.

श्री.ठाकरे म्हणाले, येत्या 1 मे महाराष्ट्र दिन हा आपण 60 वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. या दिवसापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगलयूज प्लास्टिक मुक्त बनविण्याचा प्रयत्न आहे. शासनाने प्लास्टिक बंदी केली असली तरी यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगल यूज प्लास्टिक मुक्त चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे.

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना 2018 नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई परिक्षेत्रातील 53 प्लास्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत संयुक्तपणे बाजारपेठा, हॉटेल्स, मॉल्स इ. ठिकाणी पाहणी करुन प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते. दि. 23 जून 2018 ते दि. 01 फेब्रुवारी 2020 पर्यंत भेटी दिल्या असून 84 हजार 210 किलो प्लास्टिक जप्त केले आहे व 4 कोटी 54 लाख इतका दंड वसुल करण्यात आला आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अधिसूचनेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे, भाई जगताप, विद्या चव्हाण, मनिषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.

०००

अनुदानास पात्र घोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन काम करीत असल्याबाबत प्रश्न सदस्य प्रा.अनिल सोले यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना प्रा.गायकवाड बोलत होत्या.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, दि. 19 सप्टेंबर 2016 व 09 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शाळेतील 20086 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट 20 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. उर्वरित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकड्यांना दि. 13 सप्टेंबर 2019 नुसार 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्ष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरु आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, 1977 मधील नियम 4 (3) नुसार विनाअनुदानित शिक्षकांना वेतन देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, कपिल पाटील आदींनी सहभाग घेतला.

000

माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यास काही अटींच्या अधीन राहून अतिरिक्त शिक्षक – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास असे वाढीव पद काही अटींच्या अधीन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षक संचालकांना कळविले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना प्रा.गायकवाड बोलत होत्या.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास असे वाढीव पद काही अटींच्या अधीन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षक संचालक यांना 13 नोव्हेंबर 2018 च्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

००००

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार – सामाजिक न्यायमंत्री

मुंबई, दि. 28: राज्यातील राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना देण्यात आलेल्या  निधीबाबतीत महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांचेकडून संयुक्तपणे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्यातील अर्थसहाय्य प्राप्त मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत श्री.मुंडे बोलत होते.

श्री. मुंडे म्हणाले,  मागासवर्गीयांची औद्योगिक प्रगती व्हावी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये 372 संस्थांना निधी मंजूर करण्यात आला होता. यातील बऱ्याच संस्था सुस्थितीत असून काही संस्थांचे  काम सुरू आहे. काही संस्था अद्याप काहीच करू शकलेल्या नाहीत. या सर्व बाबींची समितीकडून तपासणी करण्यात येईल. तपासणी एक महिन्यात करण्यात येणार आहे.

संस्थांना देण्यात आलेल्या नोटीसांबाबत विधी व न्याय विभागाचा सल्ला घेणार आहे.कमेटी स्थापन करण्यासाठी गरज भासल्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. सर्व प्रकारची कामे, निविदा प्रक्रिया, निधी वितरण हे संस्थांना न देता संबंधित यंत्रणेला वर्ग करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले

 बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार राजूबाबा आवळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, आयुक्त प्रविण दराडे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे शहाजी कांबळे, मोहन माने,प्रमोद कदम यांच्यासह संस्थांच्या सभासदांची उपस्थित होती .

जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई,दि.27 :राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (इतर मागासवर्गीय) जातनिहाय स्वतंत्र नोंदणी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईल,अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

ओबीसी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत,विकास योजनांसाठी पुरेसा निधी मिळावा यासाठी ओबीसींची निश्चित संख्या जाहीर होणे आवश्यक असल्याच्या सदस्यांच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या मताशी सहमत होत उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ओबीसी बांधवांची  राज्यात जातनिहाय जनगणना होण्यासाठी राज्याने आग्रह धरला पाहिजे  व त्यासाठी राज्य शासनातर्फे प्रमुखांनी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी,असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यशासनाला दिले.

विधानसभा सदस्य श्री. विकास ठाकरे यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर झालेल्या चर्चेत अन्न व नागरीपुरवठा मंत्री  छगन भुजबळ,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी सहभाग घेत ओबीसींच्या जनगणनेची भूमिका मांडली. आजही १९३१ मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेचाच आधार घ्यावा लागतो. ओबीसी समाज सामाजिक,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाची जातनिहाय गणना व्हावी,अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

मुंबई,दि.27 :-महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई महापालिका,शालेय शिक्षण विभाग,आदिवासी विकास विभागाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा,असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार,महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘महानंद’ही राज्य शासनाने स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेने दुधाचा दर्जा आणि व्यावसायिकता राखल्यास संस्थेस ऊर्जितावस्था येऊ शकते. शासकीय विभागांना आवश्यक दूधखरेदी  ‘महानंद’कडून करण्याबाबत धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात यावा,असेही बैठकीत ठरले.

‘शब्दसृष्टी’ द्विभाषिक मासिकाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि, 28 : लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पित ‘शब्दसृष्टी’ या हिंदी – मराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या विशेषांकात संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित इंग्रजी, मराठी आणि हिंदी यातील 100 हून अधिक लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हा विशेषांक साहित्यकार, संशोधक, समाजसेवक आणि शिक्षकांना बहुमूल्य असा आहे.

या प्रकाशन कार्यक्रमास संपादक प्रा.डॉ.मनोहर, टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, शब्दसृष्टीचे समन्वयक संपादक डॉ. सतिश पावडे, सहसंपादक प्राचार्य मुकुंद आंधळकर, प्रसिद्धी प्रमुख डॉ. अनिल गायकवाड, अतिथी संपादक डॉ. दिनकर येवलेकर, संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर आदी उपस्थित होते.

राज्यातील अपूर्णावस्थेत असलेली बांधकामे पूर्ण करण्यास प्राधान्य – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

मुंबई, दि २८ : राज्यात वनक्षेत्रांतर्गत पोलिसांच्या गृहसंस्थांसाठी ८५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धोकादायक असलेल्या इमारती निष्कासित करण्यात येणार असून, संबंधित कामासाठी कंत्राटदारांची निवड करताना अटी व नियमांचे कठोर पालन करण्यात येईल. रस्ते पूर्ण करण्यासाठी वने व रस्ते विभागाची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील अपूर्णावस्थेत असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज दिली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांसंदर्भात चर्चा पूर्ण झाल्यावर विधानसभा सदस्यांनी मागणी केलेल्या विषयावर मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही यावेळी मागण्या संमतीसाठी सादर केल्या.

श्री. चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली कामे सध्या बंद असून, ती पुन्हा सुरू करून पूर्ण करण्यासाठी शासन प्राधान्य देणार आहे. हायब्रीड ॲन्युटी मॉडेलअंतर्गत शासन आणि उद्योजक यांच्या सहभागाने संयुक्तरित्या 30 हजार किमीच्या रस्त्यांची जी कामे सुरू करण्यात आली होती, तीही बंद असून यासाठी निधी उपलब्ध करून ती पूर्ण करण्यात येणार आहेत. कोकणातील कोस्टल रोड प्रामुख्याने पूर्ण करण्यात येणार आहे. रेतीचे घाट असतील तेथील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. व्हीजिलन्स आणि क्वालिटी कंट्रोल यावर कटाक्षाने लक्ष देण्यात येणार असून, मर्यादित कालावधीत काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

वन आणि रस्ते विभागात समन्वय नसल्याने अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याने, राज्यस्तरावर समन्वय समिती नेमून ही कामे त्वरित पूर्ण करण्यात येणार आहेत. माहिम कॉजवे संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करून प्राधान्याने हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी संमतीसाठी सादर केली.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी संरक्षक भिंती, नगररचना यासंदर्भात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनांसंदर्भातील तर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मदत व पुनर्वसन यासंदर्भात सदस्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, नितेश राणे, आशिष शेलार, योगेश कदम, अभिमन्यू पवार, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, माधुरी पिसाळ, अबु आझमी, सुलभा खोडके, मंदा म्हात्रे, नमीता मुंदडा, राहुल कुल,यामिनी जाधव, भारती लव्हेकर, अनिल पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी मागण्या सभागृहात मांडल्या.

देशाला सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचा स्टेट ऑफ द इयरपुरस्काराने सन्मान

मुंबई,  दि. २८ : देशाला सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे सीएनबीसी टीव्ही18 इंडिया ने आयोजित केलेल्या इंडियन बिजनेस लीडर ॲवार्ड कार्यक्रमात श्री. ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याला‘स्टेट ऑफ द इयरपुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमास पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होतील परंतु हे स्वातंत्र्य तळागळातील लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. देशातील गरिबांच्या, सर्वसामान्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या तिनही मुलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही हे पाहणे आपली जबाबदारी आहे. देशाला सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर ठेवायचे असेल तर उद्योगपती, कष्टकरी, माध्यमे आणि इतर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. आज महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला आहे. तसा तो इतर राज्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी, जीवनगौरव पुरस्कार दीपक पारेख, क्रीडा क्षेत्रात पुल्लेला गोपिचंद, उत्कृष्ट व्यवसाय क्षेत्रात एचडीएफसी बँक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा : अकोला पोलीस अधीक्षकांची बदली तर दोन तपास अधिकारी निलंबित

मुंबई, दि. २८ :- अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कराडे यांना निलंबित करण्यात आल्याची तसेच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली. महिला व मुलींविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

अल्पवयीन मुलगी हरविल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणात तेथील तपास अधिकाऱ्यांनी गतीने तपास केला नाही. पालकांना अतिशय अवमानजनक वागणूक दिली. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करुन कडक शब्दात ताशेरे ओढले. आज मुलीच्या पालकांनी मंत्रालयात गृहमंत्र्यांना भेटून मुलीच्या तपास प्रकरणातील पोलिसांबाबत तक्रार केली. त्यावर गृहमंत्र्यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन आणि विभागाच्या अपर मुख्य सचिवांना बोलावून चर्चा केली.

गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि तसे सभागृहात जाहीर केले. महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा राज्यात खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वरळीत प्रभात फेरीचे आयोजन

मुंबई दि.27 : महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने कविवर्य कुसुमाग्रज जयंती म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वरळी सी फेस येथे प्रभात फेरीचे आयोजन केले.या प्रभात फेरीत वरळी सी फेस बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते. यानिमित्ताने बोलताना ते म्हणाले, “मराठी ही अत्यंत सुंदर व समर्थ भाषा आहे, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कोणत्याही भाषेच्या कुबड्यांची गरज नाही. आपल्या मातृभाषेबद्दल आपल्या सर्वांनाच प्रेम, आपुलकी आहेच, मात्र आजच्या मराठी भाषा गौरव दिनी ते व्यक्त करणं हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज येथे ही महापालिका शाळेतील मुले प्रभात फेरीच्या माध्यमातून ज्या उत्साहाने आपले मातृभाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करीत आहेत, ते पाहून मला आनंद वाटला.”

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. संजय कृष्णाजी पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका बागेश्री केरकर व नम्रता सावंत तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

मराठी भाषेची गोडी वाढावी व आपल्या रोजच्या जीवनात जास्तीत जास्त प्रमाणात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेने या प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

मराठी भाषा संवर्धनासाठीच्या वेगवेगळ्या घोषणा देत शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली. मराठी भाषा विभागाने या प्रभात फेरीसाठी मोलाची मदत केली तसेच नायर रुग्णालयाने वैद्यकीय मदत केली.

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...