रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1623

राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट 

मुंबई, दि.4 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.

यावेळी राज्यपालांनी राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.

जेजे स्कुल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून दुसरे अधिव्याख्याता शार्दूल कदम यांचेसह ते देखील कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.        

000

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का):- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज घेतले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंतर्गत रस्ते देखील महत्त्वाचे आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर एमआयडीसी, सीडको व एमएसआरडीसी यांना सोबत घेऊन कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाला त्याचा खूप फायदा होईल. हे प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, श्री देवी भराडी आईच्या दर्शनाला आलेल्या लाखो भाविकांचे, भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा पण देतो. राज्यातील जनतेला, बळीराजाला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृध्दी, भरभराटी त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण व समाधान आले पाहिजे, अशी मी प्रार्थना करतो.

त्याचबरोबर राज्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करुया, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. रस्त्यांचे रुंदीकरण आपण करतोय, जेणेकरुन कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सगळे सागर किनारे हे अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई महामार्गाच्या धर्तीवर आपण ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतोय. जेणेकरुन खऱ्या अर्थाने कनेक्टीव्हिटी मिळेल. तसेच प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील. कोकणामध्ये पर्यटन व मस्त्य व्यवसायालाही मोठा वाव आहे.  कोकणामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा खूप  पाऊस पडत असतो. परंतु, बरेचसे पाणी हा वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शॉर्टटर्म व लाँगटर्म प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू व आंबा मार्केटिंग व ब्रॅडिंग यांनादेखील चालना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. शासनाने या यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे.

यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

०००००

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.4 – “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ.फ्लोरियन स्टॅगमन, लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रप, स्टूटगार्ड चे महापौर थॉमस फुहरमन, जर्मनीचे महा वाणिज्य दूत अचिम फॅबिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबईचे जर्मनीतील विविध शहरांशी घनिष्ठ संबंध असून महाराष्ट्र जर्मनीशी हृदयाने जोडला गेलेला आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने विविध व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी करार केलेले आहेत. शाळांमधून व्यवसाय आणि कौशल्य आधारित प्राथमिक शिक्षण दिले जाते. जर्मनीमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असून जर्मनीची आवश्यकता विचारात घेता व्यवस्थित नियोजन करून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याबाबत परस्पर सामंजस्य करार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पर्यावरण, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्यास वाव असून विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जर्मनीतील पर्यटकांनी कोकणात यावे, असे आवाहन श्री.केसरकर यांनी यावेळी केले.

जर्मनीतील राज्यमंत्री डॉ. स्टॅगमन यांनी यावेळी बोलताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात आम्ही सहकार्य करू इच्छित आहोत, तर जर्मनीला सुमारे चार लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ती पूर्ण करू शकतो. या माध्यमातून परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

00000

कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात ७४५ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

मुंबई, दि. 4 : कौशल्य विकास विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गोरेगाव येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण १ हजार ४१८ नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यातील ७४५ उमेदवारांची विविध नोकऱ्यांकरिता प्राथमिक निवड झाली असून १४४ उमेदवारांची विविध कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी अंतिम निवड केली. आज सकाळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

मेळाव्यात विविध 41 उद्योग, आस्थापना तथा कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 जागांसाठी आज मुलाखती घेतल्या. गोरेगावातील शहीद स्मृती क्रीडांगण येथे झालेल्या या मेळाव्यास आमदार विद्या ठाकूर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. वा. खंडारे यांच्यासह नगरसेवक, विविध उद्योग, आस्थापनांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवार उपस्थित होते.

राज्यात 300 पेक्षा अधिक रोजगार मेळावे – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना विविध कंपन्या, आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात ठीकठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 300 पेक्षा जास्त मिळावे घेण्याचे नियोजन आहे. आज गोरेगाव येथे होत असलेल्या मेळाव्याला नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशाच पद्धतीने राज्याच्या सर्व भागात मेळाव्यांचे आयोजन करून प्रत्येक नोकरीइच्छुक उमेदवाराला रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आजच्या मेळाव्यात विविध उद्योग, आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागांसाठी मुलाखती घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने सब्र रिक्रुटमेंट, डुआर्ज सर्विसेस. टेलीएक्सेस बीपीओ, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, वन स्टेप अवे एलएलपी, डायरेक्शन्स एचआर, श्री कन्सल्टन्सी, एसीइ टेक्नॉलॉजी, फन अँड जॉय अॅट वर्क, क्यूएचएसई इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, अंबिशस रिक्रुटमेंट, करिअर एन्ट्री, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, पीपल ट्री, एनएसइ एम्पिरियल अकॅडमी, टाटा स्ट्राइव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड, मनी क्रिएशन, युनि डिझाईन ज्वेलरी, थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स, पावर एंटरप्राइजेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस लिमिटेड, बझवर्क्स बिझनेस सर्विसेस, जीएस जॉब सोल्युशन, स्पॉटलाईट आणि आयुष्य हेल्थकेअर सर्व्हिसेस या कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 इतक्या जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचबरोबर राज्य शासनाची विविध आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी झाली होती. त्यांनी उमेदवारांना त्यांच्याकडील स्वयंरोजगारविषयक विविध कर्ज योजनांची माहिती दिली.

००००

न्यूनगंड सोडून बोलींचा वापर व्हावा ‘विदर्भातील बोली-भाषा’ विषयावरिल परिसंवादाचा सूर

नागपूर, दि.४ (जिमाका) : वऱ्हाडी, झाडी व नागपुरी आदि विदर्भातील बोलींनी मराठी भाषेच्या सौदर्यांत भर घातली व भाषा विज्ञानात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, न्यूनगंडापोटी या बोलींचा वापर कमी झाला आहे. विदर्भातील कोरकू बोली तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे निरिक्षण शुक्रवारी साहित्यिकांनी मांडले. तर प्रमाण भाषेचा आग्रह सोडून स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता प्रभावी वापर व्हावा. बोली अकादमी स्थापन व्हावी, आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे, असा आश्वासक सूर ‘विदर्भातील बोली-भाषा’ विषयावरिल परिसंवादात निघाला.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी भूषविले. डॉ. मनोहर नरांजे, डॉ.श्याम मोहकर, डॉ. पुरुषोत्तम माळोदे आणि प्रकाश एदलाबादकर या भाषा अभ्यासकांनी परिसंवादात सहभाग घेतला.

डॉ. तराळ यांनी परिसंवादातील सहभागी वक्त्यांच्या विचारांचा सार काढून विचार मांडले. विदर्भातील वऱ्हाडी, झाडी या प्रमुख बोली असून नागपुरी, गोंडी, कोरकु, माडिया आदि बोलीही या भागात बोलल्या जातात. प्रमाण भाषेच्या अवाजवी आग्रहामुळे आणि न्यूनगंडामुळे या बोलींसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. विदर्भातील कोरकू बोली सद्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता या बोलींचा प्रभावी वापर व्हावा तसेच, बोलींच्या विकासासाठी व त्यांच्या साहित्यिक समृद्धतेसाठी बोली अकादमी स्थापन व्हावी आणि आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

डॉ.तराळ म्हणाले, जॉर्ज गियर्सन यांच्या ‘लिंग्वेस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोली आहेत, असे म्हटले होते. पण २००१ मध्ये झालेल्या भाषिक पाहणीत २२२ भाषा आणि २३४ बोली आहेत असे म्हटले होते. म्हणजे दरम्यानच्या काळात ५७ भाषा आणि ३१० बोली लुप्त झाल्या. संपूर्ण जगातच भाषा लुप्त होत आहेत. मात्र, भाषा लुप्त होण्याचा वेग भारतात जास्त आहे. जागतिकीकरणाचा भाषेवर खूप जास्त परिणाम होत असतो. जागतिकीकरणाची भाषा हीच जगाची भाषा होते. सद्या इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या रंगनाथ पाठारे समितीच्या अहवालात मराठीला २३०० वर्षाचा जुना इतिहास असल्याचे आणि या भाषेत ५२ बोली असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात भाषा अभ्यासक मराठीच्या १५० बोली असल्याचे मानतात याचाच अर्थ मराठीतील १०० बोली लुप्त झाल्याचेही डॉ.तराळ यांनी सांगितले.

डॉ. मनोहर नरांजे यांनी आपल्या संबोधनात वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांनी व्यापलेला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील भूभाग आणि येथील मानव समुहांनी समृद्ध केलेल्या बोलीभाषांच्या भाषिक व्यवहारावर प्रकाश टाकला. विदर्भातील बोली या मराठी भाषेचा निर्झर झरा आहेत. वऱ्हाडी आणि झाडी बोलींनी विदर्भातील भाषिक व्यवहारात दिलेले योगदान महत्वाचे आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ आणि मराठीतील आद्य काव्यसंग्रह ‘विवेक सिंधू’ मध्ये वऱ्हाडी आणि झाडे बोले दिसून येतात असे निरीक्षण त्यांनी मांडले. चंद्रपूरचा राजा रामसिंह याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता, असे हे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भातील बोरी, नागपुरी या बोलीभाषेतील स्वनिम, रुपिम या तांत्रिक भाषा परिमानांचा अन्य भाषांशी तुलनात्मक संबंध उलगडून दाखवला. या बोलिंमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतील वर्णांच्या उच्चाराशी आढळणारी भिन्नता त्यांनी ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ या वर्णांची उदाहरणे देवून पटवून दिली.

डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी विदर्भातील बोली भाषांनी या भागाला सांस्कृतिक पुढारले पण मिळवून दिल्याचे सांगितले. डॉ. ना. गो. कालेलकर लिखित ‘बोली आणि भाषा’ या ग्रंथातील दाखले देत त्यांनी बोली विषयीचे गैरसमज आणि वास्तव याबाबत भाष्य केले. भूप्रदेश व जाती नुसार विदर्भात बोलिंची निर्मिती झाल्याचे सांगत त्यांनी कोष्टी, हळबी, गोंडी, माडिया या बोलिंवर प्रकाश टाकला.

प्रकाश एदलाबादकर यांनी बोली हीच भाषेची आई असल्याचे निरीक्षण मांडले. त्यांनी नागपुरी बोलीचे विविधांगी रूप उलगडून सांगितले. नागपूर मध्ये बोलली जाणारी ही भाषा समाजातील उच्च व निम्न अशा सर्वच वर्गात बोलली जाते. ग. त्र्यं. माडखोलकर, दोडके यांनी नागपुरी भाषेत केलेल्या संशोधन कार्याचाही  आढावा त्यांनी घेतला.

०००००

नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 4 (जि.मा.का.) :   मिरज शहरातील विविध विकास कामांचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.

मिरज शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका बबिता मेंढे, नगरसेवक करण जामदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ए. बी. शेख, मकरंद देशपांडे, राज कबाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

मिरज शहरातील प्रभाग क्र.5 मधील बोलवाड रोड मुख्य रस्ता करण्यासाठी 10 लाख रूपये, बोलवाड रोड हनुमाननगरजवळ मुख्य रस्ता करण्यासाठी 10 लाख रूपये, बोलवाड रोड येथील शिवगंगा पार्क येथील त्रिविक्रम मटाकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 20 लाख रूपये, किल्ला भागातील माने बोळ काँक्रीटीकरण करण्यासाठी 5 लाख रूपये, लोणार गल्ली अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी 5 लाख रूपये, गाडवे पेट्रोलपंप ते बोलवाड रस्ता करण्यासाठी 50 लाख रूपये, प्रभाग क्रमांक 6 येथील शास्त्री चौक म्हैसाळ रोड लगत गटार करण्यासाठी 10 लाख रूपये, म्हैसाळ रोड येथील चौगुले मळा येथे पकाली घर ते रामोजी घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख रूपये असा एकूण 1 कोटी 20 लाख रूपये इतका निधी या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

00000

जामनेर येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 4 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सर्व सुविधायुक्त आणि अद्ययावत  नवीन तालुका क्रीडा संकुलास मान्यता देण्यात आली असून लवकरच शासन निर्णय निघणार आहे. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलास अतिरिक्त निधी देण्यात येणार असून यामध्ये आधुनिकीकरणासह सिंथेटिक मॅट बांधण्यात येणार असल्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, उप सचिव सुनील हांजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पारोळा, एरंडोल या तालुका क्रीडा संकुलास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जामनेर येथे बांधण्यात येणारे क्रीडा संकुल हे स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी आणि क्रीडा स्पर्धांकरीता सर्व क्रीडा साहित्यासह अद्ययावत बांधण्यात येणार आहे. मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी याठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे सुलभ होण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमधील पदकामध्ये वाढ होण्यासाठी ठराविक खेळावर लक्ष केंद्रित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील विविध खेळ आणि खेळाडू यांचा अभ्यास करुन ज्या भागात संबंधित क्रीडा प्रकाराच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे त्या भागात त्या खेळाच्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्यात. क्रीडा क्षेत्राचा नवीन आराखडा बनवण्यात येणार आहे, असेही श्री. महाजन म्हणाले तसेच मंत्री श्री. महाजन यांनी राज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा यावेळी आढावा घेतला.

एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या काराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता 1.30 कोटी निधी मंजूर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जर्मनीच्या एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप  फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या कराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता राज्य शासनाकडून 1.30 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यावेळी केले.

00000000

जिल्हा परिषदांनी महिला बचतगटाच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

पुणे, दि. 4 : “राज्याचा ग्रामविकास साधायचा असेल तर महिलांना केंद्र स्थानी ठेवावे लागेल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद यंत्रणांनी बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनासाठी सरकारी मालकीचे गाळे किंवा इमारती विक्री केंद्र म्हणून उपलब्ध करून द्याव्यात.” असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक यांच्यासाठी निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत बोलताना मंत्री श्री.महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्याच्या ग्रामीण महिलांनी खूप चांगले संघटन आणि बळकट संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सोबत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या इतर सर्व योजनासुद्धा ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे राबवाव्यात, ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजनेतून ग्रामीण तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण मिळायला हवे, ग्राम स्वराज्य अभियानातून राज्यातील प्रत्येक ग्रापंचायतीला सर्वार्थाने बळकट करण्यासाठी प्रभावी कार्यशैली अवलंबिली पाहिजे, अशा सूचनाही मंत्री श्री.महाजन यांनी केल्या.

ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उद्घाटन कार्यक्रमात सर्व योजनांची स्थिती आणि भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. सामान्य माणसाला उपयुक्त धोरणे या विभागाकडून राबविली जावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाचे संचालक राजाराम दिघे, ग्रामस्वराज अभियानाचे संचालक आनंद भंडारी, अवर सचिव धनवंत माळी इत्यादी उपस्थित होते.

000

आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला – सांस्कृतिक कार्य संचालनालयाची माहिती

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता.

पुरस्कार प्राप्त सन्माननीय बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज हे प्रकृती अस्वस्थपणामुळे व बाबा महाराज सातारकर यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा विचार करून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी कळवले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून या अपरिहार्य कारणामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

000

मुंबईत रविवारपासून राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

मुंबई, दि. 4 :  राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परळ येथे आमदार अजय चौधरी, कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे, सोफिटेल रिसॉर्ट अँड हॉटेलचे संचालक सलील देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे व कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान दररोज संध्याकाळी कुस्त्यांचे सामने खेळवले जातील. सामने मॅटवर खेळवले जाणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी कामगार केसरी आणि कामगार पाल्यांसाठी कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासह विविध पाच वजनी गटातील सामने यावेळी खेळवले जाणार आहेत. कामगार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. 75 हजार, द्वितीय रु. 50 हजार, तृतीय रु. 35 हजार व उत्तेजनार्थ रु. 20 हजार आहे. तर कुमार केसरी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 50 हजार, द्वितीय रु. 35 हजार, तृतीय रु. 20 हजार व उत्तेजनार्थ रु. 10 हजार आहे. तसेच वजनी गटात रु. 10 हजार ते 25 हजारांची पारितोषिके दिली जातील.

बजाज ऑटो वाळूंज, कुंभी कासारी सह. साखर कारखाना कोल्हापूर, वडगांव यंत्रमाग वस्त्रोद्योग, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर, विमा साखर डिस्टिलरीज सोलापूर, क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल आदी कंपन्यांच्या 106  हून अधिक नामांकित पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

000

ताज्या बातम्या

दिल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0
नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद...

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...