मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 1622

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

मुंबई, दि. ७ : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी हे निर्णय घेतले आहेत.

आज दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूलीविभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी या सर्व सूचना तात्काळ स्वीकारल्या.

आजच्या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना “सर्वांसाठी घरे” या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्नही करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशद केली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटससाठी आदिवासी विभाग वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवाना ड गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या चारही सूचना महत्त्वपूर्ण आणि योग्य आहेत त्यामुळे त्या सर्व स्वीकारण्यात येत आहेत असे बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितले. या चार महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची २१४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

मुंबई, दि.७ – नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे सुरु आहेत, यापूर्वीच दोन टप्प्यांना शासनाने मान्यता दिली असून या आराखड्यातील २१४ कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तिसरा टप्पा १४०.७६ कोटी रुपये तर चौथा टप्पा ७४.१७ कोटी असा एकूण २१४.९४ कोटी रुपयांचा असून या आराखड्याला आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्यात वाहनतळ, प्रवेशद्वारे, प्रशासकीय इमारत, तिकीट काऊंटर, फाऊन्टेन, देवीच्या ९ शक्तीपीठांची आणि ९ रुपांची प्रतिकृती, म्युझियम, सभागृह, उद्यान आदी बाबींचा समावेश आहे. या दोन्ही टप्प्यांमधील कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान हे पौराणिक मंदिर असून नगरविकास विभागाच्या वतीने टप्पानिहाय विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वीच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २२० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून कामे देखील पूर्णत्वास जात आहेत. या दोन टप्प्यातील कामे वेळेत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागांचे कौतुक केले आहे.
आज मंजूरी मिळालेल्या श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यासाठी दरवर्षी प्रत्येकी ५० कोटी रुपये निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार असून ही कामे दर्जेदार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने यावेळी कोराडी येथील पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यातून आराखड्यातील प्रस्तावित कामांची माहिती उपस्थितांना दिली.
०००

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

मुंबईदि. 7 : महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थांमधून राबविण्यात येणाऱ्या नावीण्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावीआणि त्यांची  प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावीम्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत  www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या वेबपोर्टलचे उद्घाटन सिंहगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे करण्यात आले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा आणि  केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार पसंती देतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावीयासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी उमेदवारांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश  नोंदणीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी  उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवनतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह सबंधित अधिकारी  उपस्थित होते.

वेब पोर्टल हे प्रामुख्याने एनआरआयएफएनएसओसीआय/पीआयओ व सीआयड्बल्यूजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या लिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईदि. ७ : राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्यात यावीअसे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग  विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून या विद्यापीठाच्या कामाला गती यावी. त्यासाठी समिती गठित करण्यात येईल, अशीही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील दिली.

यावेळी आमदार बच्चू कडूउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउपसचिव अजित बाविस्करउच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

खुल्या बाजारातून उभारलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ६ मार्चला परतफेड

मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.62 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची 6 मार्च 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

या कर्जाची अदत्त शिल्लक रकमेची दिनांक 5 मार्च 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दिनांक 6 मार्च 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 6 मार्च 2023 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.62 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

पवन राठोड/ससं/

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा

मुंबई, दि. ७ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील’, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी रा. पाटील यांनी दिली आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या. मात्र, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२३ असा आहे.

२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित नियमाची अंमलबजावणी सन २०२२ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे. या योजनेची सन २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारित नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत, असेही सचिव श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.

०००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादा १० लाखांवरून वाढवून १५ लाख रुपये – अध्यक्ष नरेंद्र पाटील 

बीड,  दि. ७:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाखावर वाढविण्यात येत आहे. तसेच कर्जासाठी महामंडळामार्फत बँकांना प्रस्ताव दिल्यानंतर संबंधितांचे व्यावसायिक प्रशिक्षण झालेले असल्यास कर्ज मिळणे सोयीस्कर होणार असल्याने विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण देणारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील बीड जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे झाली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अमित मालेगावकर, तसेच रमेश पोकळे, रवी शिंदे यासह जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,  विविध बँकांचे जिल्हा समन्वयक  पदाधिकारी, मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले मराठा समाजातील व्यक्तींना महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मागील दोन-तीन वर्षात दुर्लक्ष झाल्याने कार्यवाही व्यवस्थित होऊ शकलेली नाही हे बाब ध्यानात घेऊन महामंडळाचे काम केले जाईल असे ते म्हणाले

श्री.पाटील यांनी पुढे सांगितले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्याकडे लक्ष दिले जात आहे छोट्या व्यावसायिक कर्जाची देखील योजना आणली जात आहे. यामध्ये दोन लाख रुपये कर्ज दिले जाईल जास्तीत जास्त मराठा उद्योजक वाढविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यास कटिबद्ध आहे. बँकांमार्फत कर्ज वितरित व्हावे. यासाठी त्यातील त्रुटी दूर करणे व लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले

यावेळी त्यांनी विविध शासकीय, सहकारी व खाजगी बँकांचे जिल्हा समन्वयक व बँक व्यवस्थापक यांच्याकडून महामंडळाच्या योजनांबाबत आढावा घेतला तसेच महामंडळाने मंजूर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्तावावर तातडीने बँकांनी कार्यवाही करण्यातील अडचणींबाबत माहिती सादर करण्याची सूचना दिली.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यावेळी म्हणाले, जिल्हास्तरीय बँक समन्वयक यांच्या बैठकीमध्ये नियमितपणे शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांवर कार्यवाही बाबत माहिती घेतली जाते. बँकांकडे कर्ज मिळण्यात दीर्घकाळ लागत असल्याने त्यामध्ये गती देण्यासाठी सर्व लाभार्थ्यांची प्रकरणे व त्याची माहिती ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध केली जावी यामुळे अडचणी दूर करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांकडून बँकनिहाय मंजूर प्रकरणे, वितरित कर्ज स्थिती, नाकारलेल्या प्रकरणातील अडचणी आदीबाबींच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच बँक व्यवस्थापकांच्या अडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी महामंडळाच्या मार्फत प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थ्यांच्या वतीने अडचणी देखील मांडण्यात आल्या. त्याबाबत बँकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यामध्ये दीपक गिराम, बापूसो सोळंके यांच्यासह विविध लाभार्थ्यांनी बँकांमार्फत येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

                                                                      ०००००

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी; मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईदि. ७ : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जाधाडसकल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणेनावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मितीनियोजनकार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभवअसे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षानिबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

आयआयटीमुंबई व आयआयएमनागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (ॲकॅडेमिक पार्टनर) आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटीमुंबई व आयआयएमनागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

000

पोंभूर्णा (चंद्रपूर) येथील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेऊन अतिवृष्टी संदर्भात शासनाकडे नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात 2022 मध्ये जुलैऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री शोभाताई फडणवीसचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह चंद्रपूरचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीचंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना का नुकसान भरपाई दिली नाही, याबाबत चौकशी करुन याबाबतच्या चुका दुरुस्त करुन घ्याव्यात. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे तलाठीग्रामसेवक आणि कृषी सहायक अशा त्रिस्तरीय समितीकडून करण्यात आले होते ते तपासून घ्यावेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी हे नदीच्या काठावरील असलेल्या गावात राहत असून त्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देताना केलेले पंचनामे तपासून घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

आमदार निलेश लंके यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली03 : पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाद्वारे देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री.लंके यांना यावेळी “लोकराज्य” अंक भेट म्हणून देण्यात आला.

श्री. लंके यांनी कार्यालयाची पाहणी केली.  ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके तसेच दुर्मिळ हस्तलिखीत दिवाळी अंकांची पाहणी केली. या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास मराठी भाषिकांना दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  त्यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक महेंद्र पठारे, सतीश भालेकर, पोटघन मेजर यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

0
मुंबई, दि.५ : न्यायमूर्ती वि. मू. कानडे, लोक आयुक्त व संजय भाटिया, उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी, महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक...

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

0
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रातील गिग (Gig) कामगारांना शासनाच्या विविध योजना, कल्याणकारी योजना, सेवा सुविधा आणि सामाजिक सुरक्षासंहितेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच अन्य संघटित...

एसटी महामंडळ ‘यात्री ॲप’ आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ०५ : चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत ‘यात्री ॲप’ लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ...

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या तयारीचा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी घेतला आढावा

0
मुंबई, दि. ५ : स्वातंत्र्य दिन हा अतिशय महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक आहे. हा सोहळा साजरा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन...

मंत्रिमंडळ निर्णय

0
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज...