बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 1621

जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती वाढवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

नागपूर, दि. 8 : जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यात यावी तसेच अधिक जनजागृती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे,  अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी विभागीय समितीच्या आढावा बैठकीत आयुक्त बिदरी बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.वटी, पोलिस निरीक्षक सी.एस. कापसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त बिदरी यांनी याप्रसंगी जादूटोणा विषयक गैरसमजुतीतून नागपूर विभागात कोणाचे शोषण  किंवा छळ झाले आहे का याबाबत विचारणा करून माहिती घेतली.  तसेच जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लकवर पाठविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला समाज कल्याण, पोलिस, आदिवासी कल्याण, शालेय शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणात आर्थिक मदतीची प्रकरणे त्वरीत निकाली काढा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 8 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांतील आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या प्रकरणी संबंधीतांना तात्काळ आर्थिक सहाय्य करून प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा घेतांना आयुक्त बिदरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे,  अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.वटी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, नागरी हक्क संरक्षणचे पोलिस निरीक्षक गजानन विखे, सहाय्यक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे, गृह शाखेचे पोलिस उपायुक्त संजय पुरंदरे, सहाय्यक पोलिस आयुक्त रोशन पंडित तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रामुख्याने उपस्थित होते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाबाबत नागरिक जागरूक राहून गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येत आहेत, ही चांगली बाब आहे. दाखल गुन्ह्यात पोलिस विभागाने लवकरात लवकर तपास पुर्ण करावा तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा पाठपुरावा करून प्रकरणे शिघ्रतेने निकाली काढावे, अशा सूचना विभागीयआयुक्त यांनी याप्रसंगी दिल्या.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 लागू झाल्यापासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत नागपूर शहरात 669, नागपूर ग्रामीण 1405, वर्धा 1103, भंडारा 1075, गोंदिया 1172, चंद्रपूर 1616, गडचिरोली 656 असे एकूण 7696 गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त डॉ. गायकवाड यांनी सादर केली.  यात पोलिस तपासावर 95, ॲस्ट्रॉसिटी कलम कमी करण्यात आलेले 171 तर न्यायालयात 1626 प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच आर्थिक सहाय्याची एकूण 6448 प्रलंबित प्रकरणांपैकी 6433 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यासाठी आतापर्यंत 47 कोटी 53 लाख 73 हजार रकम आर्थिक सहाय्य म्हणून मंजूर करण्यात आली आहे. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

०००

शेतीस लवकरच शाश्वत पाणीपुरवठा करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

सातारा दि. ८ – सातारा व खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये  लवकरच शेतीसाठीही पाण्याची सोय केली जाईल असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सातारा तालुक्यातील देगांव आणि खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री.  पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी देगांव सरपंच वैशाली साळुंखे, उपसरपंच मनोज लोणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेगाव येथील कार्यक्रमावेळी एम.जी.पी. च्या अधिकाऱ्यांसह  पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जल जीवन मिशनच्या माध्यमातून सोडवण्यात आला आहे.  लवकरच  शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल. शेतीसाठीही शाश्वत पाणी पुरवठा करण्याची योजना राबवली जाणार आहे. देगाव व पुसेगाव भागात शेतीसाठी धरणांमधील पाणी पोहोचवण्यात येईल. पुसेगाव येथे १७ कोटी ३९  लक्ष रुपयांची योजना उभारण्यात येत आहे. तर देगांव येथे १३ कोटी ७० लाख रुपयांची योजना उभारण्यात येत आहे.

०००

मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 8 : मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्त्यांचे काम सुरू आहे. सर्वत्र सुशोभीकरण सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे, तर कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. आगामी काळात मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे आयोजित ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याबरोबरच देशाचीही आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गती देण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. कोळी बांधवांच्या सुविधेसाठी कोस्टल रोडच्या नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेसह पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होत आहे.

आमचे सरकार राज्याच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच जागतिक दर्जाचा समृद्धी महामार्ग आकारास आला आहे. त्याची भूसंपादन प्रक्रियाही विक्रमी वेळेत पूर्ण केली. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या महामार्गामुळे या परिसरात उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक सवलती राज्य सरकारतर्फे दिल्या जातील. त्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ३३ लाख रोपांची लागवड करण्यात येईल. तसेच सौर ऊर्जा निर्मितीही प्रस्तावित आहे.

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनारे रस्त्यांशी जोडले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता तयार करण्यात येणार असून त्यावर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार वाढण्यास मदत होईल, असे ते यावेळी म्हणाले.

कोकणात लहान- मोठे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडविण्यावर भर देण्यात आला आहे. पौष्टिक धान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून आणण्याचे नियेाजन सुरू आहे. त्यासाठी ही योजना पुनर्जीवित करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 :- ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली. कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करण्यावर भर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

यावेळी भारतातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण आर्थिक संबंध वाढविण्याबाबत तसेच अत्याधुनिक नवकल्पना निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यवसाय आणि भारतातील संभाव्य गुंतवणूक वाढवणे, अशा विविध विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भातही यावेळी चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्यातील कौशल्य विकास विद्यापीठाबरोबर ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल. या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उभारण्यास नक्कीच उपयोग होईल. तसेच पेन्शन फंडस् संदर्भात व सिंचन क्षेत्रातील कामांसाठीही ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल म्हणाले,  भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विविध क्षेत्रात सहकार्याची परंपरा आहेच. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठीही विविध पावले उचलली जात आहेत. वस्त्रोद्योग तसेच ज्वेलरी उद्योग यामध्ये भारत जागतिक स्तरावर पुढे येत आहे. तंत्रज्ञान, नावीन्यता, कल्पकता या सर्व स्तरावर सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्या आगामी भारत आणि विशेषतः मुंबई दौऱ्यासंदर्भातही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना माहिती दिली.

उद्योजकांना आवश्यक सहकार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरणही प्राधान्याने राबविण्यात येत आहे. गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन, पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क, समृद्धी महामार्गालगत औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी आहेत. राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग, ॲक्सेस कंट्रोल हायवे, जे एन पी ए बंदराचा विकास, लॉजिस्टिक सहकार्यासाठी  फ्रेट रेल्वे यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.  उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आज अनेक कंपन्या महाराष्ट्रात आपले उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अधिक पुढाकार घ्यावा. गुंतवणुकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्योग करण्यामध्ये (डुइंग बिझनेस मूल्यांकन) महाराष्ट्र अव्वल आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

—–000——-

केशव करंदीकर/विसंअ/

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 8 : कोकण विभागातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांसमवेत (VTPs/TPs/TCs) आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत नोंदणीकृत असलेल्या या प्रशिक्षण संस्था आणि विभागामध्ये समन्वय साधणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी यापुढील काळात दर २ महिन्यांनी या संस्थांचा जनता दरबार घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. तसेच संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी थेट मंत्री कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही यावेळी जाहीर करण्यात आला. राज्यातील गरजू तरुणांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी केले.

एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, एनएसडीसीच्या अधिकारी श्रीमती शताब्दी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी, कोकण विभागातील विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध कार्यक्रमांना गती देणे, अडीअडचणी सोडविणे याअनुषंगाने मंत्री श्री. लोढा हे राज्यभरातील प्रशिक्षण संस्थांबरोबर संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने आज कोकण विभागातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी मंत्री श्री. लोढा यांनी ऐकून घेऊन त्या दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी काही संस्थाचालकांनी आपली मते मांडली. दर दोन महिन्यांनी याबाबतची बैठक संबंधितांसोबत घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

मुंबई विभागातील १७० प्रशिक्षण संस्था चालक या बैठकीकरिता उपस्थित होते. बैठकीमध्ये कोकण विभागातील उत्तम काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान १ प्रशिक्षण संस्थांची निवड करून त्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयडीईएमआय (मुंबई शहर), टीसी – के. जी. सोमय्या पॉलिटेक्निक, (मुंबई उपनगर), शगुन समाज विकास संस्था (जि. ठाणे), ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन (जि. पालघर), ब्युटीफुल टुमॉरो (जि. रायगड), सेंटर फॉर क्रिएटीव्हीटी डेव्हलपमेंट सेवा सामाजिक विकास संस्था, (जि. रत्नागिरी), श्री साई इन्फोटेक कॉम्प्युटर (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या संस्थांना सन्मानित करण्यात आले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन जाऊन भरावेत. नियम व अटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती/नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी कळविले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

मुंबई शहरात नागरिकांसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

मुंबई, दि. 8 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

सर्वसामान्य जनतेला यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करण्यासाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सचिवालयाचा कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २१ डिसेंबर २०२२ पासून सुरु केलेला आहे. त्यामुळे मुंबईतील ज्या नागरिकांना मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या प्रलंबित कामांबाबत, अडीअडचणी व तक्रारींबाबत अर्ज/निवेदने द्यावयाची असतील त्यांनी ती ‘जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई शहर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ/

राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन – कामगारमंत्री डॉ. सुरेश  खाडे

मुंबई, दि. ८ :- सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.

बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी केले.

या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश  खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृतीविषयी विपुल लेखन केले असून मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित लेखन, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘चला उद्योजक होऊया’ विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स ग्रुप लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास ग्रुप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा’, ‘मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना’, ‘आम्ही का लिहितो ?’, ‘व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालयदेखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

००००

वंदना थोरात/ससं/

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापारवृद्धीला विपुल संधी

मुंबई, दि. 08 : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध दृढ असून दुग्ध उत्पादने, आयुर्वेदिक औषधे, पर्यटन विस्तार, मसाल्याचे पदार्थ, वायनरीसारखे कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापार कक्षा आणखी वृध्दिंगत व्हावी अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

आज विधानभवनात ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल, वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल, उप वाणिज्यदूत श्री.मायकल ब्राऊन यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली.  महिला सक्षमीकरणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देताना त्या बोलत होत्या.

उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील शासकीय आणि अशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात भरीव कार्य केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात 10 लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणारा व्यापार आणखी वाढविता येईल. योग विद्या आणि आयुर्वेदिक औषधे यांना जगभराप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक प्रगतीशील शेतकरी केवळ औषधी गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांची लागवड करतात. या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहान मिळावे, या मुद्यावर उभयपक्षी विस्ताराने चर्चा झाली. विधानसभा सदस्य श्री.आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना सागरी किनारा सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविला होता, तो यापुढेही सुरू ठेवण्यात यावा असे मत यावेळी वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल  यांनी नोंदविले.

येणाऱ्या जागतिक महिलादिनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत महिलांच्या प्रश्नांसदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. “समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिली.

या भेटीप्रसंगी मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी, प्रदीप ठाकरे, डॉ.अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

0
मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक, दि. 5: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार...

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...