गुरूवार, जून 26, 2025
Home Blog Page 1616

महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज अत्याधुनिक करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापतींची सुयोग पत्रकार निवासस्थानी भेट

नागपूर, दि. 19 : महाराष्ट्र विधिमंडळाचा गुणात्मक दर्जा हा देशात सर्वात उत्तम असून त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. आगामी वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विधिमंडळाचे कामकाज हे डिजिटलायझेशन पध्दतीने करण्यात येईल, असे विधानसभचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.

हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी त्यांनी सुयोग पत्रकार निवासस्थानी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

विधिमंडळ कामकाजात भविष्यात मोठे बदल करण्यात येतील, असे सांगून अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, विधिमंडळाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन पेपरलेस व प्रभावशाली कामकाज करण्यात येईल. तसेच 1937 पासूनच्या विधिमंडळातील चर्चा, भाषणे, लायब्ररी डाटा एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. अधिवेशन किती कालावधीचे आहे, यापेक्षा कामकाज किती झाले, हे जास्त महत्त्वाचे आहे. अधिवेशन जास्त कालावधीचे असले आणि वेळ वाया जात असेल, तर त्याला अर्थ नाही. उलट लोकहिताच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करून विधेयके पारित करणे. कामकाजाचा वेळ वाया न जाऊ देणे, या बाबीला जास्त महत्त्व असते. अलिकडच्या काळात पाहिजे तेवढ्या प्रमाणात सभागृहात चर्चा होत नाही.

वार्तांकनासाठी विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये पत्रकारांसाठी योग्य व्यवस्था करण्यात येईल. एवढेच नाही तर पत्रकारांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या सोडविण्यासाठी संबंधिताना सुचना देण्यात येतील. गत अधिवेशनात रोज 14 ते 15 लक्षवेधी असायच्या. यावेळी सुध्दा असेच कामकाज करण्यावर भर आहे. सकाळी 9 ते 10.45 या वेळेत विधिमंडळात विशेष व्यवस्थेंतर्गत चर्चा करून सभागृह नियमाप्रमाणे चालायला पाहिजे, असाच कटाक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

विधेयके, चर्चा हा अधिवेशनाचा आत्मा : उपसभापती नीलम गोऱ्हे

गत 20 वर्षांपासून आपण विधिमंडळाचे कामकाज बघत आहोत. नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करणे, लोकहिताचे विधेयके पारित करणे हा अधिवेशनाचा खरा आत्मा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

विधिमंडळ कामकाजासाठी मुंबई येथून आलेल्या पत्रकारांशी सुयोग पत्रकार निवास येथे संवाद साधतांना त्या बोलत होत्या. या अधिवेशनात चांगले कामकाज करण्याबाबत विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, विदर्भातील तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चांगली चर्चा अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या चौकटीत चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश पाळण्याचे बंधन त्यांच्यावर असून त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर दिलेल्या सुचनांचे 99 टक्के पालन झाल्याचेही त्यांनी सांगितले.

विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार, मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदी यावेळी उपस्थित होते.

000

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन

नागपूर, दि. 19 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज १९ डिसेंबर रोजी नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने राजभवन येथे आगमन झाले.

आगमनप्रसंगी राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत राऊळकर, शाखा अभियंता सचिन भोंगारे व कनिष्ठ अभियंता अमोल नासरे यांची उपस्थिती होती.

000

संसदीय अभ्यासवर्गाची  सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल

नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षीराज्यशास्त्र लोकप्रशासनया विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीसंसदीय कार्यप्रणाली प्रथाया विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा 49 वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्याना जवळून ओळख करुन दिली जाते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना सन 1911 मध्ये ‘एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन’ या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. सुरुवातीला या मंडळाचे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यू फाऊंडलंड, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका व युनायटेड किंग्डम हे देश सदस्य होते, या मंडळाने 1948 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ’ असे नाव बदलून त्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती केली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय लंडन – युनायटेड किंग्डम येथे आहे. संसदीय मंडळ आज राष्ट्रीय, राज्य, प्रांतिक, प्रादेशिक स्वरुपात राष्ट्रकुलातील एकूण 54 देशांतील 180 शाखांमध्ये कार्यरत असून या मंडळाचे जवळ – जवळ 17,000 पेक्षा जास्त संसद, विधानमंडळ सदस्य सभासद आहेत. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या सोमवारी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय व संसद इत्यादी ठिकाणी विविध उपक्रम / चर्चासत्र माध्यमातून राष्ट्रकुल दिन (Commonwealth Day) साजरा करण्यात येतो.

अभ्यासवर्गाची पार्श्वभूमी

या मंडळामध्ये विकसित तसेच अविकसित राष्ट्रे, विविध धर्म, भाषा, विभिन्न संस्कृती असलेली राष्ट्रे सभासद आहेत. ही संस्था म्हणजे शांतता य समृध्दी, प्रतिष्ठा, समता, व्यक्तीस्वातंत्र्य, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रत्येक राष्ट्राच्या समाजजीवनात आवश्यक असलेल्या निष्ठा इत्यादी बाबतीत सर्व राष्ट्रांना एकत्रित बांधून ठेवणारा महत्त्वाचा दुवा आहे. ‘संयुक्त राष्ट्र संघ’ (UNO) व ‘अलिप्त राष्ट्र संघ’ (NAM) या खालोखाल ‘राष्ट्रकुल संसदीय संघटना’ (CPA) ही एक मोठी सर्वात जुनी जागतिक राष्ट्र संघटना म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे सभासदत्व स्वीकारलेल्या राष्ट्रांनी केवळ शासकीय स्तरावरच नव्हे तर अशासकीय स्तरावरील सदस्य राष्ट्रांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जिव्हाळ्याच्या समस्यांवर विचारविनिमय करून परस्पर सहकार्य करण्याचे धोरण अंगिकारले आहे. संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदीय शासन अधिक समृद्ध व बळकट करुन सर्वसामान्य जनतेमध्ये संसदीय शासन पद्धतीबाबत जागृती, प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी  विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करणे, परस्परांतील विविध संसदीय प्रथांचा, पध्दतीचा अभ्यास करून प्रत्येक राष्ट्राला आपापली संसदीय शासन प्रणाली अधिकाधिक समृद्ध करण्यास प्रवृत्त करणे, संसद सदस्यांची कर्तव्ये त्यांचे अधिकार व जबाबदारी ह्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात विविध विषयांवर विचारांची देवाण – घेवाण हे कार्य देखील या मंडळामार्फत केले जाते. सभासद राष्ट्रांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या परिषदा, परिसंवाद, चर्चा, भेटी इत्यादी विविध उपक्रमांद्वारे सदस्य राष्ट्रांच्या संसदीय प्रथा, प्रणाली याबाबत विचारविनिमय करुन यामध्ये सुधारणा करण्यासाठी चालना दिली जाते. त्यामुळे संसदीय लोकशाही अधिक प्रबळ व समृध्द करण्यास मदत होत असते.

महाराष्ट्राचा पुढाकार

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची राज्य पातळीवर शाखा स्थापन करुन त्याद्वारे उपयुक्त उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, श्री. मोरारजी  देसाई यांनी दिनांक 15 जुलै, 1952 रोजी महाराष्ट्र शाखेच्या स्थापनेचा ठराव सभागृहात मांडला व सभागृहाने तो दिनांक 18 जुलै, 1952 रोजी संमत केला. तेंव्हापासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाची, महाराष्ट्र शाखा आपल्या राज्यात कार्यरत आहे.

नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षी राज्यातील विद्यापीठांतील ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्याना जवळून ओळख करुन दिली जाते. त्यासाठी संसदीय शासन प्रणालीशी ज्यांचा निकट संबंध आला आहे व ती बळकट करण्यासाठी ज्या नामवंतांचा हातभार लागत आहे. अशा नामवंत संसदपटू व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करुन त्यांचा लाभ अभ्यासवर्गामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना करून दिला जातो. याच बरोबर  वृत्तपत्र क्षेत्रातील दिग्गज तसेच रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वतः नव्याने निर्माण केलेल्या मार्गाने समाजासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. अशा मान्यवरांचीसुद्धा व्याख्याने आयोजित करून त्यांच्या समृद्ध अनुभवाचा लाभ व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविला जातो.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पध्दतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना मिळत असते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ व संसदीय अभ्यासवर्गामध्ये देशातील संसदीय लोकशाही प्रणालीचा अभ्यास असणाऱ्या मान्यवर तज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे विधानसभा व विधानपरिषदेतील सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन व परदेश अभ्यासदौरे याचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला जातो. उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन विधिमंडळ सदस्यांना गौरविण्यात येते.

सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल

यंदाच्या 49 व्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर   विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, दै.सकाळ नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे इ. तज्ञ मान्यवरांचे अभ्यासवर्गाला मार्गदर्शन होणार आहे. राज्यातील 12 विद्यापीठांतील सुमारे 100 विद्यार्थी व अधिव्याख्याते सहभागी होणार आहेत.

तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमाद्वारे या व्याख्यानांच्या प्रसारणाचा लाभ जगभरातील प्रेक्षकांना घेता येणार आहे.

मा. सभापती, विधानपरिषद (रिक्त) व अॅड. राहुल नार्वेकर, मा. अध्यक्ष, विधानसभा हे या संस्थेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष असून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे मा. प्रधान सचिव, राजेन्द्र भागवत हे राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव आहेत. राष्ट्रकुल संसदीय संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि संसदीय लोकशाही प्रणाली अधिक प्रभावशाली करण्यासाठी महाराष्ट्र शाखा यापुढेही विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करीत राहिल.

संकलन

नागपूर शिबिर कार्यालय,

माहिती जनसंपर्क महासंचालनालय.

 

000

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विधानभवन परिसरातील लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

नागपूर, दि. 19 : शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल हिवाळी अधिवेशननिमित्ताने नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विधानभवन परिसरात लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिक हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याचा जडणघडणीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरलेले आहे.

स्टॉलवर 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’ स्टॉल लावण्यात आला आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि.19 : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

0000

विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध

मुंबई, दि. १९ : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

***

विसअ/अर्चना शंभरकर/ विधानपरिषद/ इतर कामकाज

विधानसभेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. १९ : विधानसभेचे माजी सदस्य आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने संमती दिली. या सर्व माजी सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृह अतिव दुःख व्यक्त करित आहे, अशा भावना अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडतांना व्यक्त केल्या.

यावेळी माणिकराव होडल्या गावीत (नवापूर, नंदुरबार), किसनराव नानासाहेब देशमुख  (अहमदपूर),  तुकाराम गंगाधर गडाख (शेवगाव, अहमदनगर), विनायक महादेव निम्हण (शिवाजीनगर, पुणे), दिगंबर बाळोबा भेगडे (मावळ, पुणे), सोपानराव तुकाराम फुगे (हवेली, पुणे), श्रीनिवासराव ऊर्फ बापूसाहेब बाळाजीराव देशमुख गोरठेकर (भोकर, नांदेड), विठ्ठलराव सोनाजी पाटील (बुलढाणा) व श्रीमती ॲनी सितम्बलम शेखर (कुलाबा) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

००००

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १९ :  सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली.

केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातात, ही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थ‍ितीत अशा प्रकारची घटना होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

***

४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

नागपूर, दि. 19 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे उद्घाटन होणार आहे.

या उद्घाटन समारंभास विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, राज्यातील 12 विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित राहणार आहेत.

49 वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बुधवार दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धवासाठी युवक चळवळीचे योगदान’ या विषयावर विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्र, जि.चंद्रपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली आहे.

रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन’ या विषयावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी 10.35 वा. पीठासीन अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थी, प्राध्यापकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण व अभ्यासवर्गाचा समारोप होणार आहे.

या अभ्यासवर्गाचे प्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटरhttps://twitter.com/MahaDGIPR

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/19.12.22

हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.

विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.

०००००

ताज्या बातम्या

विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा….!

0
यशकथा महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर...

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

0
अमरावती, दि. 25 (जिमाका): श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज सत्कार सोहळा आयोजित...

जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0
रायगड जिमाका, दि. 26 - राज्य व केंद्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहॆ. या सर्व योजनांचा तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत

0
मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रम'...

देवळाली येथील आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क गैरव्यवहाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करा –...

0
मुंबई, दि. २६ : नाशिक महानगरपालिकेंतर्गत मौजे देवळाली येथील सर्व्हे क्रमांक २९५ या आरक्षित क्षेत्राच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क संदर्भात आयुक्त, नाशिक...