मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1593

डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 9 : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यम विश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विश्वास मेहेंदळे केवळ एक लेखक नव्हते. ‘पाच सरसंघचालक’ ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके असली तरी पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक संस्था होते. संयतपणे आणि विचारांवर ठाम राहत निःपक्षपाती पत्रकारिता कशी करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने शिकवण दिली. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ९ :- माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची शैलीही अनेकांना भावणारी अशी होती. त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाच्या काळात स्वतः प्रयोगशील राहून नव्या पिढीला तंत्रज्ञान, सादरीकरण यातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी वाटाड्या सारखेच होते. ज्येष्ठ माध्यमातज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

0000

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा न करता तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गावर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाऊंडेशनतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री.फडणवीस यांना अटल सम्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, तमीळ सेलवन, माजी आमदार राज पुरोहित, संजय पांडे, आयोजक अमरजीत मिश्र आदी उपस्थित होते.

अटल महाकुंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जीवनात ज्यांचे आकर्षण होते, त्यांच्या नावाने पुरस्कार असल्याने तो जड अंतःकरणाने स्वीकारत आहे. हा सन्मान नसून जबाबदारी आहे. यापुढे राजकीय, सामाजिक जीवनात चूक करून चालणार नाही. केवळ समाज आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे. यामुळे हा पुरस्कार प्रेरणा देतो.

अटलजींनी कोणत्याही देशाची पर्वा न करता देशाला अणू संपन्न केले. प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ता हे स्वप्न सत्यात उतरवले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. कवी मनाच्या व्यक्तीच्या विचारावर देश सर्वोच्च शिखरावर पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नवभारत निर्मितीचे स्वप्न पाहून देशाला उंचीवर नेवून ठेवले आहे. जगात भारताची ओळख निर्माण केली. भारतासोबत संबंध वाढविण्यासाठी अनेक देश येत आहेत. जी-20 मध्ये भारताला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा असून 500 कामे मुंबईत सुरू आहेत. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

यावेळी अटल महाकुंभ कार्यक्रमात अटल गीतगंगा या अटलजी यांच्या कवितेवर आधारित कार्यक्रमात व्हायोलीन वादक सुनीता भुयान यांनी वादन आणि कवितेचे गायन केले. लेखक, गायक हरीश भीमानी यांनीही आज सिंधू ज्वार उठा…. ही अटलजी यांची कविता गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

यावेळी आमदार आशिष शेलार यांनी मुंबई आणि अटलजी यांचे नाते स्पष्ट केले. प्रास्ताविक अमरजीत मिश्र यांनी केले.

000000

राज्यपालांच्या हस्ते समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता ‘साहित्य गंगा’ पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. ८ : समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्तर भारतीय महासंघ या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन तसेच संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘साहित्य गंगा’ पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन  येथे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, माजी आमदार राज पुरोहित व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते ओ. पी. व्यास, पंडित कालीनाथ मिश्र, गिरीश मिश्रा, प्रशांत मलिक, के. पी. पांडे, कमलेश दुबे, आर. पी. व्यास, शैलेंद्र भरती यांसह ३५ व्यक्तींना ‘साहित्य गंगा’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

0000

 

Governor presents ‘Sahitya Ganga’ Awards of Uttar Bhartiya Mahasangh

 

Governor Bhagat Singh Koshyari attended the Gaurav Samaroh and ‘Sahitya Ganga’ Awards presentation ceremony on the occasion of completion of 28 years of service by Uttar Bhartiya Mahasangh at Raj Bhavan Mumbai.

National President of the Mahasangh Dr Yogesh Dube and former MLA Raj Purohit were present.

The Governor presented the ‘Sahitya Ganga’ Puraskars to 35 personalities including O P Vyas, Pt Kalinath Mishra, Girish Mishra, Prashant Malik, K P Pandey, Kamlesh Dubey, Shailendra Bharatti and others.

0000

राज्यपालांच्या हस्ते ‘एक और दुष्यंत’ या गजल संग्रहाचे प्रकाशन

मुंबई, दि. ८ : बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या ‘एक और दुष्यंत’ या गजल संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

मुंबई हिन्दी अकादमी या संस्थेतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष पवन तिवारी, सचिव रामकुमार, साहित्यिक डॉ. करुणाशंकर उपाध्याय आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध लेखक राजेंद्र श्रीवास्तव, मनोज कुमार गोयल, ‘पासबान ए अदब’चे संस्थापक कैसर खालिद, शायना एन.सी, डॉ. स्मिता दातार, संजीव निगम, अनघा गांगल, राखी तांडेल व प्रवीण कुमार सागर यांना साहित्य, समाज व शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

0000

 

Governor releases the book of Ghazals ‘Ek Aur Dushyant’

Mumbai, Date. 8 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘Ek Aur Dushyant’, a collection of Gazals by real estate developer and poet Atul Agrawal at Raj Bhavan Mumbai.

The book release programme was organised under the aegis of Mumbai Hindi Akadami.

        President of the Akadami Pawan Tiwari, Secretary Ramkumar, writer Prof. Karunashankar Upadhyay and others were present.

        The Governor felicitated eminent personalities from the field of Literature, social work and education on the occasion.

Founder of Pasbaan E Adab Qaiser Khalid, Shaina N C, Rajendra Shrivastava, Dr Smita Datar, Manoj Kumar Goyal, Rakhi Tandel, Pravin Kumar Sagar and Sanjeev Nigam were prominent among those who were felicitated.

0000

पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अकोला, दि.8(जिमाका)- ई-चावडी प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ई-चावडी प्रणाली शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

तहसिल कार्यालयात आज ई-चावडी प्रणाली शिबीराचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार सुनिल पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आदि उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, महसूल संबंधित विविध कामकाजाकरीता नागरिकांना कार्यालयाचे पायपीट करावी लागतात. ई-चावडी प्रणालीच्या माध्यमातून सातबारा व त्याबाबत त्रुटी, कृषक-अकृषक कर, अनधिकृत विषयक दंड भरणे अशा विविध सुविधा नागरिकांना घरबसल्या पाहता व ऑनलाइन दंड वा शुल्क भरणा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ह्या सुविधा  पारदर्शक व गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे सूचना यावेळी त्यांनी दिले.

ई-चावडी प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुकांना 25 गावे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकोला तालुक्यात 203 गावाचा समावेश असून संपूर्ण तालुका ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दि. 8 ते 18 जानेवारी दरम्यान तालुक्यातील 178 गावांचे विशेष शिबीरांव्दारे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच 25 गावामध्ये यापुर्वीच ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या शिबीरामध्ये 178 गावांचे महसुली अभिलेख, जुन्या नोंदी, जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशांचे आधुनिकीकरण, आठ-अ आणि फेरफार इ. ई-चावडी प्रणालीव्दारे संगणकिकृत करण्यात येणार आहे. याकरीता 12 समन्वयकाची नेमणूक करण्यात आले असून त्यांच्या निरिक्षणात दि. 18 जानेवारीपर्यंत ई-चावडी प्रणाली पुर्ण करुन नागरिकाकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सुनिल पाटील यांनी दिली.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वाना लिखाडे यांनी केले

000000

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.८ : मराठी भाषिक युवकांनी विविध क्षेत्रात पुढे जावे यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गोव्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री गोविंद गावडे, संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार रामदास फुटाणे, डॉ.पी.डी.पाटील, गिरीष गांधी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या सेवेत मराठी माणसाचे प्रमाण कमी आहे. मराठी टक्का वाढविण्यासाठी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र शासन स्तरावर असे प्रयत्न होत असताना युवकांनी इतर क्षेत्रातील संधींचाही विचार करावा.

राज्यातील बहुतांशी विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेला प्राधान्य देतात, ते उद्योग-व्यवसायाकडे फारसे वळत नाहीत. चांगली संधी असताना मराठी तरुण राज्याबाहेर जायला तयार होत नाही. सर्व क्षेत्रात मराठी टक्का वाढवायचा असल्यास नव्या पिढीत धाडस निर्माण करावे लागेल. मराठी माणूस जगात पुढे जायचा असेल तर तशी मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, मन-बुद्धीला समृद्ध करणारी आणि हृदयात आनंद निर्माण करणारी मराठी भाषा इतरांना आनंद देणारी कशी होईल याचे चिंतन करण्याची गरज आहे. जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी आपली भाषा दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी ही ऐतिहसिक वारसा सांगणारी, अध्यात्म विचार आणि साहित्यिक वैभव असलेली भाषा आहे. आपण जगातील १९३ देशांपैकी सांस्कृतिक वारशात पहिल्या १० मध्ये आहोत. मराठीला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून चार दिवसाच्या चिंतनातून मराठी पुढे नेण्यासाठी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, संत वाङ्मायाने मराठी भाषेला समृद्धी दिली. पर्यावरणावर प्रेम करणारी, सृष्टीचे महत्व जाणणारी, परमेश्वरी चिंतनात रमणारी, कर्तव्यपूर्तीसाठी पराक्रमाची गाथा सांगणारी, उत्तम प्रपंच करण्याचा संदेश देणारी, इंग्रजांना स्वराज्याच्या घोषणेने घाम फोडणारी मराठी भाषा आहे. उत्तम व्यवहाराचा मंत्रही मराठीने दिला आहे. मराठीची ऊर्जा आणि शक्ती विश्वकल्याणासाठी उपयोगात यावी, असा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे.

मराठी ज्ञानाची भाषा व्हावी असा प्रयत्न आहे. जगात हजारो भाषा संपुष्टात आल्या आहेत. मराठी ज्ञान विज्ञान, शास्त्र, व्यापाराची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. जगातले उत्तम ज्ञान मराठी भाषेत आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘मराठी पोर्टल’ लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न आहे. मराठी सर्वांना श्रेष्ठ करणारी भाषा व्हावी, सर्वांना आनंद देणारी भाषा व्हावी यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी ज्ञानेश्वर मुळे यांनीदेखील विचार व्यक्त केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते संमेलन आयोजनासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
000

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे, दि.८ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, प्रदीप गंधे, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे, सचिव संदीप ओंबासे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासन नेहमीच खेळ आणि खेळाडूंना पाठिंबा देते. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जातो. जागतिक स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग-१ च्या पदावर नियुक्ती दिली जाते. सुरूवातीला हौस म्हणून खेळले जाणारे खेळ आता करियर म्हणून खेळले जात आहेत. खेळाडूंना आर्थिक बळ देण्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने या क्रीडा स्पर्धा आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा आयुक्त डॉ. दिवसे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या स्पर्धांचा भविष्यात जिल्हा विकास क्रीडा आराखडा तयार करण्यास उपयोग होईल. या स्पर्धांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मदत होईल असे सांगून या स्पर्धांसाठी वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री श्री.पाटील यांना धन्यवाद दिले.

श्री. शिरगावकर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेविषयी माहिती दिली. या स्पर्धांमुळे खेळाविषयीची आवड घराघरात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तायक्वांदो स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. तसेच दादोजी कोंडदेव पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजते तसेच प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिम्नॅस्टिक स्पर्धेस भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेडाळूंनी यावेळी प्रात्यक्षिके सादर केली.
000

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.८ : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतिगृह संकुलाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्त्व आहे.

देशाच्या विकासात स्टार्टअपची भूमिका महत्त्वाची

भारतीय युवकांनी तंत्रज्ञान युगात आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारत आणि महाराष्ट्रातही अनेक स्टार्टअप तयार होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. या वेळेचा उपयोग आपण केला तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख प्रस्थापित करता येईल. या अमृतकाळात पुढील २५ वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो.

औद्योगिक विकासासाठी उत्तम शिक्षण आवश्यक

आज तंत्रज्ञान क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. संरक्षण उत्पादनात आपण आयात करणारे होतो. मात्र आज अनुकूल व्यवस्था निर्माण केल्याने आपण संरक्षण उत्पादने निर्यात करू शकतो. पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठाने मनुष्यबळ विकासाचे मोठे कार्य केले.

भारती विद्यापीठाने विदेशासारखे शैक्षणिक परिसर निर्माण केले. एक मिशन म्हणून त्यांनी हे काम हातात घेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले. भारती विद्यापीठाने विदर्भातही असा शैक्षणिक परिसर निर्माण करावा. मराठवाडा आणि विदर्भात अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

स्व.पतंगराव कदम यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद

स्व.पतंगराव कदम यांच्याकडे पाहिल्यावर आश्वासकता वाटायची. त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद होती. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हणून १९० पेक्षा अधिक संस्था भारती विद्यापीठांतर्गत दिसून येतात. केवळ उच्च शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे कार्य त्या माध्यमातून होते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविणाऱ्याला

अदार पुनावाला यांना या पुरस्काराच्या माध्यमातून देशातर्फे धन्यवाद देण्याचे काम झाले आहे. जगाला भारताची ताकद दाखविण्याचे कार्य सीरम इन्स्टिट्यूटने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लस निर्मितीचा निर्धार केला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचली. म्हणून सीरमसारख्या संस्थेचा अभिमान वाटतो. स्व.पतंगराव कदम यांच्या नावाचा अर्थात शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविण्याचे कार्य करणाऱ्याला दिला ही महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता – शरद पवार

खासदार श्री.पवार म्हणाले, आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमारेचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. या नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देशाला देईल असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात द्रष्टे म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नाचा जाणकार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार अदार पुनावाला यांना देण्यात आल्याचा आनंद आहे.

जगात १६० देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक १०० मुलांपैकी ५० मुले सीरमची लस वापरतात. महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून अदार पुनावाला यांनी वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १५० पेक्षा अधिक वाहने दिली आहेत. मानवाचे प्रश्न सोडविण्याचे काम करताना समाजाला मदत करण्याचे कार्य ते करत असतात.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज ही संस्था विविध विद्याशाखांमध्ये प्रगती करीत आहे. हिमाचल प्रदेश आज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. हिमाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकीक मिळविला आहे.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे गेल्यास सुधारणा निश्चितपणे करता येते. वैद्यकीय क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. हिमाचल प्रदेशने वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसोबत उच्च शिक्षण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टीट्यूटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारत आणि जगाची लशीची मागणी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ७० ते ८० देशांना मदत करता आली. राज्य आणि केंद्र सरकारचेही यात सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण भारतात आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५८ वर्षाच्या काळात ९० हून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा स्व.पतंगराव कदम यांनी घालून दिला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही विद्यापीठाने अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात विद्यापीठाच्या रुग्णालयाने रुग्णसेवेचे काम केले. गोरगरिबांच्या सेवेसाठी नूतन सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. संस्थेने मानवता जपण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या हस्ते पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदार पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. पवार यांनी भारती विद्यापीठ गोल्डन ज्युबिली म्युझियमला भेट दिली.
000

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध, विकास निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ८ – पालकमंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्याच्या त्यातही पाटण तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

विकास कामांमध्ये तालुका नेहमीच अग्रेसर राहील यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून जिल्हा तसेच पाटण तालुक्याचा एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. ग्रामीण भागात विविध सुविधांची निर्मिती होत असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. देसाई महणाले की, आज राज्याला एका सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून लाभली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज १८ तास काम करत आहेत. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची माहिती आहे. तसेच डोंगरी भागातील प्रश्न ही त्यांना चांगले माहिती आहेत. डोंगरी भागाच्या विकासासाठी भरघोस निधी नक्कीच देण्यात येईल. पाटण शहराचा पाणी प्रश्न एका वर्षात सोडवण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्यामध्ये ९५.०० लक्ष रुपयांचा मोरगिरी – नाडे ढेबेवाडी रस्ता ते आंब्रुळे. चेापडी येथे  बेलवडे फाटा ते बनमागे चेापडी रस्ता सुधारणा करणे,  ९५ लक्ष.  त्रिपुडी ते कवरवाडी रुंदीकरण व सुधारणा करणे.  ४ कोटी. कवरवादी ते चेवलेवडी रस्ता अडीच कोटी. पाटण शहर पाटण नगरपंचायतीमध्ये नगरविकास विभागांतर्गत मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
00000

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...