सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 158

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईल, हा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूया, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

श्री बावनकुळे म्हणाले, या यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे. अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

0000

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील १४ वैयक्‍तिक वनहक्क दावे धारकांना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित या वितरण कार्यक्रमप्रसंगी आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे उपस्थित होते.

यावेळी केळापूर, घाटंजी, झरी जामणी तालुक्यातील लाभार्थ्यांना डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते पट्टे वाटप करण्यात आले. त्यात कमलाकर कनाके, धर्मा पेंदोर, नागोराव आडे, महादेव पेंदोर, नागोराव चिकराम, जनाबाई कुळसंगे, पुरुषोत्तम तोडसाम, ज्ञानेश्वर सिडाम, समदुराबाई कनाके, गजानन मेश्राम, माधव मेश्राम, धर्मा सोयाम, मारोती मरस्कोल्हे, लखमा आशाम या लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे सहायक महसूल अधिकारी विलास वानखेडे , जिल्‍हा वनहक्क व्‍यवस्‍थापक रुपेश श्रृपवार, तालुका वनहक्क व्‍यवस्थापक नितीन राठोड व शैलेश कणेर हे उपस्थित होते.

00000

 

 

 

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

  • पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा
  • जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार
  • वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा

यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहीत दरात उपलब्ध व्हायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे, खतांची विक्री, जादा दर, लिंकींग किंवा साठेबाजीसारखे प्रकार आढळल्सास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. बैठकीस अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. त्याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांना नोटीस देवून खुलासे मागविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ.बाळासाहेब मांगुळकर, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री.दरोई, उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पिकाचे उत्तम दर्जाचे, खात्रीशीर बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होता कामा नये. अनेक ठिकाणी जास्त दराने बियाणे विकले जातात किंवा लिंकींग करून कृषी निविष्ठा दिल्या जाते. बरेचदा जास्त मागणी असलेले बियाणे, खतांचा साठा केला जातो. जिल्ह्यात कुठेही असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात बोगस, बियाणे, लिंकींग, साठेबाजीबाबत तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करा. कक्षात तक्रारींसाठी पुर्णवेळ सुरु राहतील असे दुरध्वनी, मोबाईल क्रमांक व कर्मचाऱ्यांची चांगली टिम नेमा. ठिकठिकाणी तक्रार संपर्क क्रमांकाचे बोर्ड लावण्यात यावे. जिल्ह्यात कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये. जास्तीत जास्त ठिकाणी अचानक भेटी द्या. कृषी निविष्ठांचे नमुने घ्या. ते तपासणीसाठी पाठवा, बोगस आढळल्यास न्यायालयात प्रकरणे सादर करा. दोषींवर गुन्हे सिद्ध होईल, यादृष्टीने न्यायालयात बाजू मांडा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या विविध उद्दिष्टांच्या अपुर्णतेबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. रेशीम शेतीचे 2019 एकरचे उद्दिष्ट असतांना ते 675 एकर इतकेच साध्य झाले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे उद्दिष्ट देखील अपुर्ण आहे. यावर्षी किमान एक हजार शेतकरी तुती लागवड करतील, असे नियोजन करा. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे उद्दिष्ट देखील वाढवा. यासाठी बॅंकांना सूचना देऊन अधिक प्रस्ताव मंजूर होतील, यासाठी प्रयत्न करा. कृषी विभागाच्या सर्वच योजनांचे उद्दिष्ट साध्य झाले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जात असतांना लोकप्रतिनिधींना बोलवा. जिल्ह्यात यावर्षी 31 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीची मृद पत्रिका देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना पत्रिकेचे वितरण करतांना लोकप्रतिनिधींना बोलविण्यासोबतच त्यांना माती परिक्षणाचे महत्व समजून सांगण्यासाठी कार्यक्रम घ्या. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे अर्थसहाय्य कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

यवतमाळ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी किमान 10 हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली पाहिजे. बांबू अतिशय चांगले पिक आहे. या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट द्या. याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच घेऊ. रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले होते. या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचे शासनाने धोरण आणले. पुर्वी कनेक्शनसाठी भरलेले पैसे सौरपंपाच्या कनेक्शनमध्ये समाविष्ठ करण्यात येणार होते. परंतू आता शासनाने पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पैसे भरलेले असे 5 हजार 575 शेतकरी असून त्यांना साधारणत: 5 कोटींचा परतावा केला जाणार आहे. सदर परतावा थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

जिल्ह्यात खरीपाचे 9 लाख हेक्टरवर नियोजन

जिल्ह्यात खरीपाचे 9 लाख 9 हजार 497 हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस 4 लाख 91 हजार हेक्टर, सोयाबीन 2 लाख 78 हजार हेक्टर, तुर 1 लाख 30 हजार हेक्टर व अन्य पिकांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्याला सोयाबीन वगळता 19 हजार 890 क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. कापुस पिकाचे 24 लाख 56 हजार पाकीटे तर सोयाबीनच्या 69 हजार क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. सर्व प्रकारच्या एकून 2 लाख 70 हजार मेट्रीक टन रासायनीक खतांची मागणी राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

000000

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज नंदुरबारच्या नियोजन भवनात आयोजित 2025-26 या वर्षासाठीच्या खरीप पर्व  आढावा बैठकीत मार्गदर्शन केले.

कोकाटे यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे आणि औषध यांचे योग्य नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य गुणवत्ता असलेले इनपुट्स मिळावेत यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. राज्यभरात बोगस बियाणे व औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, सुर्यफुल, कापूस, मुग, उडीद, तुर, सोयाबीन आणि भुईमुग यांसारख्या प्रमुख पिकांचे लागवड नियोजित आहे. यासाठी एकूण 27 हजार 194 क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. तसेच 1 लाख 41 हजार 550 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, खत उत्पादक कंपन्यांना 97 हजार 300 मे. टन पुरवठ्याचे नियोजन देण्यात आले आहे. सद्यस्थितीत 8 हजार 544 मे. टन रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध आहे.

कृषी विभाग व कृषी विद्यापीठात काही तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ही पदे तात्काळ भरण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.राज्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने 31 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

या बैठकीस माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त,सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर(तळोदा) अंजली शर्मा (नंदुरबार) राहूल कनवरिया (शहादा) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी. के. ठाकरे, तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक व विषयतज्ज्ञ उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खत व औषधांच्या पुरवठ्याचे सखोल नियोजन करण्यात आले असून, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतसामग्री उपलब्ध होण्याची खात्री दिली गेली आहे. बोगस बियाणे व औषधांवर कारवाईसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासन सज्ज आहे, असे स्पष्ट संकेत कृषीमंत्री कोकाटे यांनी दिले.

यावेळी कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2025-26 व शेतकऱ्यांना मार्गदर्शन पुस्तिकेचे पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

000000

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बिबवेवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक ॲड. सुभाष मोहिते, विजय मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यात सहकारी चळवळ वाढविण्यामध्ये धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘प्रकरणे’ दाखल करावी लागणार आहेत. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल. सहकारी बँकेने आपल्या व्यवहारात मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे, सहकारी क्षेत्रातील बँकेने अपेक्षित उद्दिष्टांपेक्षा अधिक नफा मिळविण्यास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

रामराज्य सहकारी बँक मागील २५ वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना पुढे आणून त्यांची पत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये संचालक मंडळ, सभासद कर्जदारांचे फार मोठे योगदान आहे. सभासदांचे हित जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बँकेने ठेवी वाढविण्यासोबत खात्रीलायक कर्जदार मिळविण्याकरिता प्रयत्न करावे. नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करावा. बँकिंग व्यवसायात विश्वासर्हता जपणे गरजेचे आहे. तरुणांना संधी देऊन त्यांना बँकीग क्षेत्राचे प्रशिक्षण देण्याचे काम करावे. थकीत कर्जाकडे बारकाईने लक्ष द्यावे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असून सहकारी बँकांनी राज्य सहकारी बँकेसोबत संलग्न झाले पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

संस्थापक श्री. विजय मोहिते यांनी प्रास्ताविकात रामराज्य सहकारी बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात एकूण ८ शाखा असून नागरिकांना बँकिंग सुविधा पारदर्शक पद्धतीने देण्यात येत आहे, असे म्हणाले.

श्रीमती लोणकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर ॲड. मोहिते यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.
0000

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे 3 लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी, ग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

असा असेल बायो-डायव्हर्सिटी पार्क

निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणूकी विषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशा शास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

00000

 

एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, ता. १७ –  शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली.


यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी,  उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डा. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सोनम देशमुख, सुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूर, प्रकल्प संचालक संजय गदरे, वित्तीय संचालक श्री विनोद टंडन, नागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धन, सल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तसेच त्यांना  प्रकल्पाची माहिती दिली. कंपनीतर्फे ३० एकर जागेवर बांधकाम  करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे.
यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता
M/s. SusBDe  नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, सेंद्रिय खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत.  सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermantation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या ३० एकर जागेव्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh Waste Prossessing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे.
या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली.

०००

‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांची मुलाखत

Oplus_16908288

मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 20, बुधवार दि. 21, गुरूवार दि. 22, शुक्रवार दि. 23 आणि शनिवार दि. 24 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारण होणार असून या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी तसेच दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. निवेदक निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुलाखतीच्या पहिल्या भागात अवैध मासेमारीच्या नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा, मत्स्यव्यवसायाला देण्यात आलेला कृषीचा दर्जा, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर, मासेमारी तलावांचे ‘डिजिटलायझेशन’, मच्छिमार संस्थांना समन्यायी पध्दतीने तलावांच्या वाटपाचे धोरण,  देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी अशा अनेक विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. यामध्ये  पर्यटनवाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग, ‘गाळमुक्त नदी’ मोहिम, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन,  सामान्य जनतेचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या ‘पालकमंत्री कक्षा’ची देखील सविस्तर माहिती मंत्री श्री. राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

000000

समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा

Oplus_131072

मुंबई, दि.१७ :  भारतीय संविधान (१२९ वा सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व बँक ऑफ इंडिया, विविध बँका व विमा कंपन्यांशी विस्तृत सल्लामसलत केली.

मुंबईच्या ताज हॉटेल येथे आज समांतर निवडणूक संदर्भात लोकसभा सदस्य पी.पी.चौधरी, लोकसभा सदस्य धर्मेंद्र यादव, राज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

समितीने राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समांतर निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व प्रशासकीय परिणामांवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी समितीला आश्वासन दिले की, एक सखोल अभ्यास केला जाईल आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रावर एकत्रिक निवडणुकांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती समितीला दिली जाईल.

यानंतर, समितीने महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता, यांच्याशी एकत्रिक निवडणुकांच्या घटनात्मक, तार्किक आणि इतर बाबींवर चर्चा केली.

समितीने नंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींशी निवडणुकांच्या असमकालीनतेमुळे होणाऱ्या आर्थिक धोरणांवरील परिणामांविषयी संवाद साधला. आरबीआयच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ते या विषयावर सखोल आणि सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि वारंवार निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय व धोरणात्मक अनिश्चिततेचा प्रभाव समजून घेतील.

शेवटी, समितीने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, एलआयसी, जीआयसी आणि नाबार्डसह बँकिंग व विमा क्षेत्रातील प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, एकत्रिक निवडणुकांचा बँकिंग व क्रेडिट संस्कृतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ते ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या माध्यमातून सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि त्याचे निष्कर्ष समितीला सादर करतील.

000

 

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा

पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटी मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मे. टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.

यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करुन १ ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशीन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.

याशिवाय पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजिर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आमदार श्री. शेळके यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविल आणि समाधान व्यक्त केले.
0000

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...