सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 157

श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • परळी औष्णिक विद्युत केंद्राचा आढावा

बीड दि.१९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारा ज्योर्तिलिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगून संबंधित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, निटनेटके पणा, सर्व सोयी सुविधांयुक्त दर्शन मंडप, तसेच तीर्थक्षेत्र बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना किती वेळ शो असेल, त्यामध्ये भाविकांना कोणत्या बाबी दाखविल्या जातील, यासह देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा दर्जेदार असायला हव्यात असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये 92 कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 286.68 कोटीच्या विविध 92 कामांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

दर्शन मंडपाचे काम, परिसर सुधारणा, मंदिरा भोवती दगडी फरशी, वास्तुशिल्प प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, सौर दिवे बसविणे, उद्यान विकसित करणे,  संरक्षण भिंतीचे बांधकाम, वाहनतळ यासह सुरू असलेल्या विकास कामांबाबत मुख्य वास्तुविशारद कृष्णकुमार बांगड यांनी माहिती दिली.

परळी औष्णिक विद्युत केंद्राचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. शासकीय विश्रामगृह येथील आढावा बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सादरीकरणाद्वारे औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती दिली. यामध्ये प्रस्तावित संच क्रमांक-1 ची मंजुरी व उभारणी, सौर ऊर्जा प्रकल्प मान्यता, राखेचे प्रदूषण व उपाययोजना, औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, थर्मल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, थर्मल कॉलनी परिसरात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. परळी औष्णिक विद्युत केंद्राबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपले सहकार्य असेल असे पवार यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी उपस्थित होते.

०००

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, दि. 18:- ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरीत मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उद्वीग्न भावना व्यक्त केल्या.                                                                                            शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

लोकांची कामे तात्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही. प्रत्येक नागरिकांचे शासनाशी सदैव काम पडते असेही नाही. अनेक शेतकरी नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे. यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात. तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात. नियमात असणारी कामे तात्काळ मार्गी लागलीच पाहिजेत. यात दिरंगाई होता काम नये असे त्यांनी सांगितले. जनसंवादात आलेली निवेदने ज्या अधिकारी व कार्यालयांना निर्देशित केली आहेत त्याबाबत संबंधितांनी पुन्हा विचारणा केल्यास कठोर कार्यवाही करू असे ते म्हणाले.

या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पांदन रस्ते, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य ,समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक व महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने देवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.

00000

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जवळपास 70 कोटी खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा व विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, कृपाल तुमाने, अभिजीत वंजारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, संचालक डॉ.अजय चंदनवाले, सहसंचालक विवेक पाकमोडे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदी उपस्थित होते.

श्री फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या मध्य भारतातील मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय संस्था आहेत. सर्व स्तरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र आधुनिक काळाशी अनुरूप अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज भासू लागल्याने येथे आधुनिक संसाधनांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध पायाभूत सुविधांमुळे या संस्थांच्या गुणात्मकतेत वाढ होणार आहे. या दोन्ही संस्थांमध्ये दर्जेदार सुविधांच्या निर्मितीसाठी व अद्ययावत उपचारासाठी जवळपास हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रयत्नातून ह्या संस्था आधुनिक भारतातील ‘स्टेट ऑफ आर्ट’ वैद्यकीय संस्था म्हणून नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

रुग्णालयांना समाजातील आशेचे केंद्र  म्हणून बघितल्या जाते. वैद्यकीय उपचार व शिक्षण क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर राहाव्यात तसेच खाजगी संस्थांच्या तुलनेत येथील शिक्षण, सुविधा व उपचार अधिक दर्जेदार असावे असे सांगून श्री फडणवीस यांनी बाह्यरुग्ण तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांच्या निर्मितीवर प्राधान्याने भर द्यावा अशी सूचना केली. यातूनच नजीकच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट झालेला आपल्या दृष्टीस पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात प्रारंभ होत असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन करण्यात आलेली कामे

येथे कार्यरत 250 निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह, रुग्णांना ने-आण करण्यासाठी ट्रॉमा इमारत ते बाह्य रुग्ण विभाग यांना जोडणारा स्काय वॉक (4.93 कोटी), ऑडिटोरियम (5.25 कोटी), गंभीर आजारांचे निदान करणारी यंत्रणा न्यूक्लिअर स्कॅन (8. 29कोटी), हृदयविकार असलेल्या रुग्णांचे निदान करण्यासाठी कार्डियाक कॅथ लॅब (6.87 कोटी), अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक सर्जरी सिस्टीम (20.82 कोटी), कॅन्सरसारख्या व इतर दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचाराकरिता मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली न्यूक्लियर मेडिसिन सिस्टीम (8.29 कोटी), स्मार्ट क्लास रूम (1.5 कोटी), रुग्णालयाशी संबंधित इतर सुविधा (11 कोटी)

आयजीएमसीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीएमसी) येथे मेगा डायलिसिस सेंटर व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

येथील विद्यार्थ्यांसाठी 3 व्हर्चुअल स्मार्ट वर्ग खोल्या तयार झाल्या असून उर्वरित चार वर्ग खोल्यांना मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली व त्याबाबतचे प्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. रुग्णालय व महाविद्यालयाला आवश्यक त्या विविध यंत्रसामग्रीच्या उभारणीबाबत शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयातील काही कामांना मान्यता मिळाली परंतु निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी रुग्णालयात कार्यान्वित विविध कक्षांची माहिती देणारे सादरीकरण केले.

लोकार्पण करण्यात आलेली कामे

येथील पाचशे खाटांच्या इमारत निर्मितीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. येथील विविध प्रकारच्या सोयी सुविधांच्या निर्मितीची कामे प्रगतीपथावर असून समन्वयाने व गतीने कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना केल्या.

मेगा डायलिसिस सेंटरसाठी 80 लक्ष सीएसआर निधीतून 10 मशीन लावण्यात आल्या. हे केंद्र औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अधिपत्याखाली येत असून डायलिसिस मशीन चालवण्यासाठी येथे तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेला रुग्णसेवेसाठी रक्तपेढी विभागासाठी रक्त संक्रमण व्हॅन तसेच र 1 कोटी 70 लक्ष किमतीच्या चार ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांचे तात्काळ रोगनिदान करण्यासाठी नमुन्यांची तपासणी इथेच करता यावी यासाठी मॉलिक्युलर लॅब स्थापित करण्यात आली असून 13 कोटी 50 लक्ष एवढा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून ही लॅब कार्यान्वित झाली आहे

0000

‘रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 18 :- सर्वसामान्यांच्या मनात एखादी प्रॉपर्टी, घर, फ्लॅट घेतांना अनेक प्रकाराच्या शंका असतात. या शंकांचे तेवढ्याच पारदर्शिपणे समाधान होणे आवश्यक असते. रियल ईस्टेट क्षेत्राला शासन पातळीवर पारदर्शिपणे सहकार्य व्हावे यादृष्टीने आपण अनेक बदल केले. ‘रेरा’ सारखा कायदा देशात आपण सर्वात अगोदर सुरू केला. सुमारे 50 हजार प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी झाले हे आपल्या राज्याचे सर्वात मोठ यश आहे. संपूर्ण देशात नोंदणी झालेल्या प्रकल्पाएवढी ही संख्या आहे. यातून निर्माण झालेली विश्वासार्हता रियल ईस्टेट क्षेत्राला अत्यंत सहायभूत ठरली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल सेंटर पाँइट येथे नरडेकोच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधानपरिषद सदस्य संदिप जोशी, ॲड अभिजित वंजारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रविण दटके, माजी खासदार कृपाल तुमाणे, नरडेको विदर्भचे नुतन अध्यक्ष डॉ. कुणाल पटोले, चेयरमन घनश्‍याम ढोमणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नरडेको विदर्भ ही संस्था विकासकांच्या हितासमवेत ग्राहकांच्या हिताला अधिक जपणारी आहे. यात सर्वसामान्यांचे हित अधिक जपल्या जाते. शासनाच्या विविध धोरणांची नरडेको प्रामाणिकपणे अंमलबजावणी करते ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशाच्या विकासाला रियल ईस्टेटने लावलेला हातभार अधिक महत्वाचा आहे. 65 टक्के जीडीपी शहरातून आहे हे लक्षात घेवून आम्हीही या क्षेत्रात अधिक पारदर्शकता यावी यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. आता कोणत्याही रियल ईस्टेट उद्योजकाने आपले प्रपोजल एखाद्या कार्यालयात दाखल केले तर त्याला मंजूरीच्या प्रक्रियेत कोणत्या टेबलवर किती वेळ लागतो याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

00000

विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य -केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

  • हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा
  • कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहीमेला गती देण्याचे निर्देश
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक 

नागपूर, दि. 18 :- प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, हवामान अनुकूल पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि बाजारपेठेतील दुवे यांचा योग्य समन्वय शेतक-यांनी राखण्याची गरज आहे. कृषी विभागानेही देशातील अनेक भागात त्या त्या हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करण्याचे निर्देश केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी विभागाला दिले. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे व आयडीशिवाय कृषी योजनाचा लाभ न देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. येत्या काळात विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.

अमरावती रोडवरील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या सभागृहात आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. चौहान बोलत होते. यावेळी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान विकास रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह संबंधित विभागाचे केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान, कृषी क्षेत्रातील आव्हाने, खरीप हंगाम २०२५, खते आणि बि बियाण्यांची उपलब्धता, विकसित कृषी संकल्प अभियान, ॲग्रीस्टॅक अभियान, पुढील वर्षाचे नियोजन याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी दिली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, हवामान बदलानुसार तसेच पर्जन्यमानुसार पिकांचे विशेषतः राज्यातील कापसाचे वाण अधिकाधिक विकसित करण्याची गरज आहे. कमी पर्जन्याच्या प्रदेशातही अधिकाधिक पीक देणारे वाण विकसित होण्याची गरज आहे. राज्याचे ‘बेस्ट क्रॅापिंग मॅाडेल’ विकसित करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री श्री. चौहान यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

राज्यातील कृषी तसेच ग्राम विकास विभागात सुरू असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बैठकीदरम्यान कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, सँड बँक या उपक्रमांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

महाराष्ट्रातील सक्सेस स्टोरीजदेशभर पोहोचवा

सादरीकरणादरम्यान राज्यातील विविध भागातील शेतक-यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील शेतकरी रावसाहेब मोहिते, बीड जिल्ह्यातील  रूई (धानोरा) येथील रेशमाची शेती करणारे शेतकरी एकनाथ टाळेकर, यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथील आर्चिडची शेती करणा-या शेतकरी वंदना राठोड यांच्या यशकथा देशभरात विविध माध्यमातून पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.                                                                                                                   

केंद्र पुरस्कृत योजनाचा घेतला आढावा

केंद्रपुरस्कृत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेल्फ हेल्प ग्रूपअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिली.  मनरेगाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. यात मनरेगाच्या उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.

 एक कोटी लखपती दीदींचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांचा महिलांना आधार मिळाला आहे. महिलांनी या रकमेतून विविध व्यवसाय सुरु केले आहेत. महिलांना आवश्यक खर्च भागवण्यास देखील या पैशांची मदत होत आहे. यासोबतच महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी लखपती दीदी ही योजना राबविण्यात येते. येत्या काळात एक कोटी लखपती दिदी बनविण्याचे राज्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिली.

0000000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

रायगड जिमाका दि. 18- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी करून काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्विस रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या महामार्ग संदर्भात मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग तर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

माणगाव येथील आनंद भुवन सभागृहात मुंबई गोवा महामार्ग आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते.

या बैठकीत रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ते महाड पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा आढावा  घेण्यात आला. माणगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामामध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना सेवा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहॆ. त्यामुळे जिथे केंद्राकडून निधी उपलब्ध होऊ शकणार नाही त्यासाठी राज्य शासनाला परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. अर्थसंकल्पत निधीची तरतूद करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. तसेच या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

पर्यायी मार्ग उपलब्ध करा

सध्या माणगावातील बायपास तातडीने पूर्ण होणार नाही हे खरे आहे. परंतु, इंदापूर ते कशेणे कालवा रोड पर्यायी मार्ग तसेच माणगाव शहरातील मोर्बा रोड, कालवा मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग असा पर्यारी मार्ग उपलब्ध करा येऊ शकतो.  तसेच  साईनगर कालवा मार्ग, भादाव ते विंचवली हा मार्ग झाल्यास कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून सुटका होईल. माणगाव शहरातील नगरपंचायत हद्दीत उपकालवा जातो. या कालव्यालगत पाटबंधारे विभागाची जागा आहे. त्या जागेतून रस्ता बनविल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. या पर्यायी मार्गांसाठी  केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल.  वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अशा सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या. इंदापूर माणगाव बायपासचे टेंडर निघाले आहे. परंतु, लोणेरे येथील महामार्ग चे काम पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करणाऱ्या नवीन कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिली. याबाबत उच्च स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई गोवा महामार्ग लगत अनेक छोटी मोठी गावे आहेत. तेथील नागरिक महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्या नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. जिथे गरज वाटेल तिथे सर्विस रोड बनविले पाहिजेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

सर्विस रोड बनवत असताना तेथे पाणी साचणार नाही यासाठी बाजूला गटारी सुद्धा बांधली गेली पाहिजे. सर्विस रोड वरून नागरिकांची मोठी वाहने सुद्धा या बाजूकडून त्या बाजूकडे सहजरीत्या गेली पाहिजेत यासाठी योग्य ती उंची राखूनच काम केले गेले पाहिजे. नागरिकांचे हित बघूनच अधिकाऱ्याने काम करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे. असे आदेश त्यांनी यावेळी  दिले.

खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी या महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने सूचना केल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. या बैठकीला जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न

ठाणे,दि.18(जिमाका):- नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

कल्याण शहरातील नविनतम आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस कल्याण-डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे. एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरटीओ विभाग राज्याला महसूल देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे. म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली, एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत व परिवहन सेवेचे एसटी ड्रायव्हर, कंडक्टर किंबहुना आरटीओ विभागाचे अधिकारी-कर्मचारी आहेत त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काय आपल्याला सहकार्य लागणार आहे ते पूर्णपणे सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल.

ते पुढे म्हणाले की, आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं काम करताय आणि मला आठवतंय की, गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्या महायुती सरकारने एवढे जलद निर्णय घेतले आणि त्या टीममध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही आमची एक टीम आहे आणि आमची ही टीम पूर्वीच्या गती पेक्षा अधिक वेगवान गतीने पुढचाही कारभार करणार आहे. नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल.

आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय आणि या माध्यमातून देखील मग आता परवाना देण्याचं काम देखील पूर्वीसारखं नसून तुम्ही आता परवाना देताना त्यामध्ये देखील नवीन टेक्नॉलॉजी आणताय. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, नाशिक मध्ये एका अपघातात 25 लोक मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा राज्यातले सगळे ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केले आहे आणि त्यामुळे अपघातांमध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आपली संस्था जगली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने इज ऑफ बिजनेस आणि इज ऑफ लिविंग ही आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळेल. एसटीला आपण लाईफ लाईन म्हणतो. पहलगाम मध्ये जेव्हा आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं, त्यांच्या नातेवाईकांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपण त्यांच्या त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेले काम खऱ्या अर्थाने जनसेवेचे आणि लोकभावनेचे आहे.

आपल्याला आता आपला वेग वाढवायचा आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आरटीओ विभाग हे दोघांचे एकमेकांशी एवढी सांगड आहे की, एकमेकांना परिपूर्ण असा हा विभाग आहे असे सांगून ते म्हणाले की, आपण नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा दिल्या पाहिजे. यामध्ये ई-गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला, आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की इज ऑफ लिविंग म्हणजे सगळ्यांचे जीवन सुलभ झाले पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांना मंत्रालयापर्यंत चकरा माराव्या लागू नयेत व त्यांचं काम जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर झालं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आपण जे नवनवीन उपक्रम हाती घेतोय त्याच्या मागचा उद्देश शेवटच्या माणसाला आपली चांगली सेवा देणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स, परमिट, रिन्यूअल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजेत. लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये, त्याचा निपटारा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि प्रलंबित कामे शून्यावर आणली पाहिजे, यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीमही आपल्याकडे आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा इमारतीमधून तुमच्याकडून जास्तीत जास्त कार्यक्षम काम होईल, पारदर्शकता येईल आणि नागरिकांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, योगायोग बघा आज या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देणाऱ्या पाच रिक्षा चालकांचा सत्कार झाला. आज त्यांचा सत्कार करताना मला आठवतंय की, साधारण 80 ते 90 च्या दशकात मी सुद्धा डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत असताना ह्याच कल्याणच्या परिवहन कार्यालयाने रिक्षा चालकाचा पहिला परवाना मला दिला होता. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये या इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचा शुभारंभ होतोय. गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम झाले आहे. आरटीओची अनेक कार्यालये आपण निर्माण केलीत. विभागाच्या अनेक मोक्याच्या जागा ज्या झोपडपट्ट्यांनी सगळ्या जागा व्याप्त झालेल्या आहेत त्या शिंदे साहेबांना विनंती केली आहे की ज्या आमच्या 54 विविध ठिकाणी चांगल्या जागा ज्या आहेत, त्या परत कोणी घेऊ नये यासाठी आम्ही सुद्धा पीपीपी तत्त्वावरच त्या जागा विकसित करू जेणेकरून आमच्या विभागाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी आपण लायसन्स देत होतो ते म्यानुअली देत होतो आणि आपण आता ते ट्रॅकच्या माध्यमातून जे लायसन्स देणार आहोत, त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम परिवहन सेवेमध्ये करता येईल. एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की गेली ८५ वर्षे परिवहन विभाग या राज्यातील जनतेला अविरत सेवा देत आहे. महिन्याभरापूर्वीच वरळीला अतिशय चांगल्या प्रकारच्या परिवहन कार्यालयाचे सुद्धा भूमिपूजन केले आहे. ती इमारतही दोन ते अडीच वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे एआय टेक्नॉलॉजीवर आधारित आपण चांगला विकास करतोय, चांगले निर्णय घेतोय आणि परिवहन सेवेला कशी बळकटी देता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजही सगळे लोकं हे सांगतात की, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे परिवहन सेवा असताना त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या चांगल्या विकासकामांना त्यांनी चालना दिली होती ते आज पर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं, तेवढं एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात घडले आहे. या निमित्ताने मी ग्वाही देतो की, पुढल्या काही वर्षांमध्ये अजून चांगली सेवा या राज्याला देण्यासाठी परिवहन सेवा कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा या विषयावरील पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे हेमंगिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले.

00000

 

कल्याण-डोंबिवलीचे रूप आता स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.18(जिमाका)- आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, असे कल्याण-डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या  आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिवलीचे रूप, स्वच्छतेच्या माध्यमातून निश्चित बदलेल,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, सुलभाताई गायकवाड, राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, परिमंडळ- 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, इतर पदाधिकारी, माजी पालिका सदस्य महापालिका अधिकारी ,मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, मीही मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रम सुरू केला, “स्वच्छता असे जिथे- आरोग्य वसे तिथे” हे वाक्य उधृत करून त्यांनी या स्वच्छता उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आज लोकार्पण झालेले सगळे प्रकल्प लोकाभिमुख आहेत, अशा शब्दात आयुक्तांची प्रशंसा करीत विकासाला पैसे कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वेगवेगळ्या प्रकल्पांचे विशेषतः स्वच्छता उपक्रमाचे आज लोकार्पण  होत आहे. शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेचे पालन करावे, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.

कल्याण डोंबिवलीच्या वाढत्या लोकसंख्येला सक्षम प्रणालीची गरज होती. त्यामुळे घनकचऱ्याचा हा नवीन उपक्रम उभा राहत आहे, या उपक्रमांमध्ये महापालिकेतील कामगारांना देखील समाविष्ट करून त्यांना रोजगार द्यावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

कल्याण परिक्षेत्रात मोठे प्रकल्प उभे राहण्यासाठी शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. सावळाराम क्रीडा संकुलात देखील आता एलिवेटेड स्टेडियम होईल, अशी माहिती खासदार डॉ.शिंदे यांनी दिली.

आज लोकार्पण होणाऱ्या उपक्रमांची माहिती नेटक्या शब्दात विशद करून कल्याण-डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून  आपल्या सर्व नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच मोलाचे आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले.

आजच्या कार्यक्रमात कचरा संकलन, वाहतूक आणि रस्ते स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ, परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप , रिंग रोड मधील बाधित लाभार्थ्यांना पुनर्वसन धोरणानुसार सदनिकांचे वितरण,MUTP प्रकल्पातील बाधितांना चाव्यांचे वितरण, टिटवाळा (पूर्व) येथील जागेवर उभारलेल्या सौर ऊर्जेवर आधारित उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबालपाडा क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन, परिमंडळ तीन मधील दामिनी पथकासाठी वाहनांचे हस्तांतरण ई कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता उपक्रमाच्या वाहनांना ध्वजांकन केले.

00000

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम-  केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव

नागपूर, दि.१८ :  आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड देतात. आपल्या शेतातील उत्पादनासाठी घाम गाळतात. त्यांच्या घामाला, कष्टाला न्याय देण्यासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम म्हणून कृषी विभाग आता काम करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानअंतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड . माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड . आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरु नितीन पाटील, कृषी आयुक्त सुरज मांडरे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ.एम.एल.जाट, डॉ.एस.के.सिंग, डॉ.अमरेश कुमार नायर, डॉ.डी.के. यादव, डॉ. राजवीर सिंह व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेती व शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेअंतर्गत देशात १६ हजार वैज्ञानिक आहेत. त्यांचे विविध पिकांवर सतत संशोधन सुरु असते. याचबरोबर परिषदेअंतर्गत ११३ संशोधन केंद्र आहेत. यातील ११ केंद्र महाराष्ट्रात आहेत. याचा जोडीला जिल्हा कृषी केंद्र, प्रगतशील शेतकरी, राज्य सरकारचे कृषी कार्यालये आहेत. या सर्व यंत्रणेमध्ये एकसुत्रतेचा अभाव लक्षात घेऊन एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम या संकल्पनेची नितांत गरज होती असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

कृषी हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गौरवशाली भारत, समृद्ध भारत पाठोपाठ शक्तीशाली भारत निर्माण केला आहे. भारत आता वैभवशाली राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. याला अधिक भक्कम जर करायचे असेल तर विकसित शेती व विकसित शेतकरी हे तत्व आपण जपले पाहिजे. विकसित खेती व समृद्ध किसान पाठोपाठ विकसित व गरिबीमुक्त गाव हे शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात जलसंधारणाची जी कामे केली त्याला तोड नाही. जलयुक्त शिवार महाराष्ट्राला वरदान ठरले. संयम, धैर्य व निश्चयी वृत्तीने त्यांची कार्यशैली कोणत्याही आवाहानात डगमगली नाही या शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेचे सर्व संशोधक व वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या कृषी विकासाचा रोडमॅप तयार करतील असे त्यांनी सांगितले.

देशात कृषी संशोधन करणाऱ्या लॅबची कमतरता नाही. संशोधकाची कमतरता नाही. शासकीय कृषी विभागाचीही कमतरता नाही. कमतरता आहे लॅबला अर्थात संशोधनाला शेताच्या बांधावर पोहोचविण्याची. ही कमतरता भरुन काढण्यासाठी वर्षातील एक महिना कृषी संशोधक, अधिकारी हे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाला जवळ करण्याशिवाय पर्याय नाही. याच बरोबर विविध खतांसाठी कंपन्यांना शासन जी सबसिडी देते ती सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा आम्ही निर्णय घेत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

२०२६ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे १२ तास मिळेल स्वच्छ वीज– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   

राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. यातून १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम आम्ही सुरु केले असून आजच्या घडीला यातील ४ हजार मॅगावॅटची निर्मिती पूर्णत्वास आली असल्याचे ते म्हणाले. २०२६ च्या अखेरपर्यंत आम्ही दिवसाचे १२ तासही वीज देण्यासह राज्यात १२ महिने विजेची उपलब्धता करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीप्रश्न मार्गी लागावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरता यावे यादृष्टीने देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या नळगंगा-वैनगंगा या प्रकल्पाचे काम यावर्षी सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर तापी मेगा रिचार्ज हा जगातील आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पाचे काम आपण हाती घेतले आहे. समुद्राला वाहून जाणारे सुमारे 35 टिएमसी पाणी या प्रकल्पातून आपण आणणार आहोत. बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील खारपान पट्टा क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. येथील लाखो शेतकऱ्यांचे जिवनमान या प्रकल्पातून उंचावले जाईल असे ते म्हणाले.

राज्यातील कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना आपण जागतिक बँकेशी चर्चा करुन सुरु केली. सुरुवातीला आपण 5 हजार गावे यासाठी निवडले.  या गावानी साध्य केलेला बदल पाहून जागतिक बँक पुन्हा सहकार्यासाठी तयार झाली. आता त्यांच्या सहयोगातून राज्यातील सुमारे 7 हजार 500 गावात एकात्मिक पद्धतीने काम करुन कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतीसाठी शेतमजूरांचा प्रश्न सर्वत्रच भडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय अधिक भक्कम करुन तो शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्राम विकास आणि कृषी विकास याचे आदर्श मॉडेल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये विकसित करुन दाखविले आहे. शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मातीपासून प्रदूषित पाण्यापर्यंतची आव्हाने असून संशोधक यातून मार्ग देत आहेत. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कटीबद्ध असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मृद स्पेक्ट्रल व कापसावरील गुलाबी बोंड अळीला प्राथमिक अवस्थेत नियंत्रणासाठी उपयोगी पडणाऱ्या एआय फेरोमन ट्रॅकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि.१८ : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली  हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.
🔶 सहल तपशील –
          सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
          शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
          कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
          प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
          प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे
🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.
🏰 प्रमुख स्थळांची माहिती –
          रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
          लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
          कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
          शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
          भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
          प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
          कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
          पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –
            उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३एसी), सुपीरियर (२एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –
          भारत गौरव ट्रेनने प्रवास
          वातानुकूलीत/ विनावातानुकूलीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
          सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
          ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
          प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
          सुरक्षा व्यवस्था.
❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –
          साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
          खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
          इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
          कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.
🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
          पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
          दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
          तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
          चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
          पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
          सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).
📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संकेतस्थळ- www.irctctourism.com
00000

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...