रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 159

सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने
  • हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप

नागपूर, दि. १७ :  नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी इच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २१ झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील 3 हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानाद्वारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी  तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, भांडेवाडी या 3 झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना  पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत  दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

उर्वरित चिंचभुवन, शामनगर, गिट्टीखदान, पन्नालाल देशराज नगर, आदिवासी नगर, पुनापुर, वाठोडा, भरतवाडा, हुडकेश्वर, कुराडपुरा, शोभाखेत, बिनाकी, कोष्टीपुरा, ठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी 2 झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.

  मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल हजार ५१ नागरिकांकडून निवेदने

सर्वसामान्य नागरिकांना जनता दरबारातून आपले प्रश्न मार्गी लागतात असा लोकांचा विश्वास वाढीस लागला आहे. यासाठी जाणिवपूर्वक महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूर मध्ये मुख्यमंत्री या नात्याने मी करतो. यात प्राप्त झालेल्या लोकांच्या निवेदनांवर गंभीरतेने विचार करून पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने भव्य मंडप व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत अप्रत्यक्षरित्या प्रशासन व शासकीय प्रणालीबाबतचा विश्वास दृढ केला.  राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या शिष्ट मंडळानी भेट घेवून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. यात संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करणे व त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणे, पारंपारिक तेल घाणी उद्योगाच्या पुर्नविकासासाठी मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणे, तेलघाणीतील सुटे तेल विक्रीवर शासनाचे निर्बंध उठविणे आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

या शिष्टमंडळात माजी खासदार रामदास तडस, डॉ. भुषण कर्डिले, गजानन शेलार, संजय विभुते, बळवंतराव मोरघडे, पुष्पाताई बोरसे, अतुल वांदिले, जगदिश वैद्य, कुणाल पडोळे, प्रविण बावनकुळे, नरेंद्र सुर्यवंशी, भगवान बोरसे हे पदाधिकारी सहभागी होते.

00000

सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमुळे दहशतवादविरोधी लढ्याला मोठे बळ; जगासमोर भारताची एकजूट दिसणार

मुंबई दि. १७ : ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणतात की, पहेलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं मी समजतो. विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं.

संपूर्ण जगासमोर दहशतवादाची गंभीर समस्या आहे.  त्या विरोधात  ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रीतीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल, असा मला विश्वास वाटतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.

0000

विकासकामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबारदिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शासकीय यंत्रणांनी विकासकामे नियम आणि निकषाप्रमाणे मुदतीत पूर्ण करावीत; कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच  जिल्हा वार्षिक योजनेत कोणतेही प्रस्ताव सादर करताना  तेथील स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन व त्यांची शिफारस घेऊनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत.

आज नियोजन भवनात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी विधानपरिषदचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, माजी मंत्री तथा आमदार डॉ.  विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर  जिल्हा नियोजन अधिकारी, नंदुरबार शशांक काळे, उपस्थित होते. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला.

सन 2024-25 या संदर्भ वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांचा 31 मार्च, 2025 अखेरपर्यत वार्षिक योजनांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा सन 2024-25

दिनांक 31 मार्च, 2025 अखेर झालेला खर्च                                        (रुपये लाखात)

क्र. योजना मंजूर नियतव्यय प्राप्त तरतुद वितरीत तरतुद झालेला खर्च  खर्चाची टक्केवारी
1. सर्वसाधारण योजना 19200.00 19200.00 19200.00 19087.79 99.42%
2. आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) 38925.00 38925.00 38925.00 38611.00 99.20%
3. अनुसुचित जाती उपयोजना 1400.00 1400.00 1399.50 1399.50 99.96%
  एकूण नंदुरबार जिल्हा 59525.00 59525.00 59524.50 59098.29 99.28%

 

 बैठकीत सन 2024-25 मधील कामांचा आढावा घेण्यात आला.

  • पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानुसार  शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु.
  • अन्न परीक्षण प्रयोगशाळा ( food testing lab)  ला देखील मंजुरी.
  •  कृषी कार्यालय सर्व प्रयोगशाळांसाठी सुसज्ज इमारत उभारणार.
  • टंचाईग्रस्त वाडी पाड्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी 123 गावांना टँकर मिळणार
  • स्मशानभूमी  नसलेल्या 5 गावांना स्मशानभूमी कामांना मंजुरी.
  • 3 ग्रामपंचायत कार्यालय इमारत व बँक साठी निधी मंजूर  ग्रामपंचायत कार्यालयात बँकेची सुविधा होणार सुरु.
  • बँकेची सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी बचत गटातील बँक सखी देणार सेवा .
  • सरकारी कार्यालयामध्ये टप्याटप्याने अभ्यांगतासाठी पाणी व स्वच्छतागृहाची सोयीसुविधा .
  • रुपये 1 कोटी खर्चाच्या फिश क्लस्टरला मंजुरी
  • अंगणवाडी मध्ये आहार  शिजवण्यासाठी साहित्य वाटपास मंजुरी
  • प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र होणार प्रमाणित आवश्यक साहित्यासाठी आरोग्य विभागास निधी मंजुर
  • लहान मुलांसाठी रुपये 3  कोटी निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे पीआयसीयु (PICU)  कार्यान्वित होणार.
  • नंदुरबार शहरातील चार ठिकाणी सिग्नल साठी रुपये 50 लक्ष मंजूर
  • पोलीस दलाच्या वाहनासाठी रुपये 1.50 कोटी उपलब्ध
  • पोलीस अधीक्षक कार्यालय : सौर विद्युत व्यवस्थासाठी निधी मंजूर.

वरील मंजुर कामांच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले असुन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी  नियोजन विभागाचे अभिनंदन केले.

जिल्हा वार्षिक योजना मंजुर नियतव्यय सन 2025-26           (रुपये लाखात)                                                                        

क्र. योजना मंजूर नियतव्यय
1. सर्वसाधारण योजना 21300.00
2. आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) 42954.15
3. अनुसुचित जाती उपयोजना 1400.00
  एकूण नंदुरबार जिल्हा 65654.15

  बैठकीपूर्वी झाला गुणगौरव सोहळा..

यामध्ये सर्व सनसनाटी व कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे कामी  जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. तसेच माननीय मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांना बक्षीस जाहीर झाले अशा कार्यालयांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे कार्यालय (सी. के. ठाकरे), तालुका कृषी अधिकारी धडगांव (आर. एम. शिंदे) , सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार (नितीन वसावे), तालुका वैद्यकीय अधिकारी धडगाव (कांतीलाल पावरा), कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग नंदुरबार (निलेश पाटील),  मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार (राहुल वाघ), व उपवनसंरक्षक कार्यालय,अक्कलकुवा.

तसेच बिहार येथे खेळण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने 56 गोल्ड, 45 सिल्वर, आणि 48 ब्राँझ  असे एकूण 149 पदके मिळवलीत.   या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूलचे खेळाडू सौरभ राजपूत याच्या निर्णायक गोलने महाराष्ट्र मुलांच्या रग्बी संघाला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये ब्राँझ पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे तसेच त्यांच्या सोबत असलेला खेळाडू प्रणव गावित व त्यांचे मार्गदर्शक खुशाल शर्मा यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व पदक देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांना सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत हुडको यांच्याकडून प्राप्त सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

000000

 

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरीता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टाटा ग्रुप, नगरविकास विकास, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपी टेक विद्यापीठाचे कुलगुरू सुनील जी. भिरुड, टाटा टेक्नॉलॉजीसचे कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यावर भर

श्री. पवार म्हणाले, औद्यागिक प्रशिक्षणाला काळानुरुप अत्याधुनिक बनविण्याची गरज होती, कृत्रिम बुद्धीमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्राकरिता टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्य शासनाने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापिठातील केंद्राकरीता टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत

श्री. पवार पुढे म्हणाले, पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलीकडील काळात पिंपरी-चिंचवडमुळे पुणे शहरालादेखील औद्यागिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा औद्योगिक विकास होताना आयटी पार्कसारख्या संस्था स्थापना झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत संचालित बाणेर येथील कौशल्यवर्धन केंद्रातून युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगाधंद्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे प्रात्याक्षिकही दिले जाणार आहे. यामुळे युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार तसेच औद्यगिक क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी

या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पीईबी इमारत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी. सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे दर्जेदार पद्धतीने गतीने पूर्ण करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विविध सार्वजनिक विकासकामे सुरु असून अधिकाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करावे, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट-डॉ. राजेंद्र भोसले

पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्रातून दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये २७९ कोटी ६७ लाख इतकी असून या रक्कमेपैकी रुपये २३७ कोटी ७२ लाख रुपये इतकी रक्कम टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडून तर उर्वरित खर्च रुपये ४१ कोटी ९५ लाख रुपये नगर विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे १ एकर (३ हजार ६०५ चौ.मी.) जागा उपलब्ध देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे २२ हजार चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नवउद्योजक, स्टार्टअप यांच्यासोबत लाखो युवकांना लाभ होणार आहे, असे प्रास्ताविकात  डॉ. भोसले म्हणाले.

000

 

‘महाराष्ट्र दर्शन’ भित्तीपत्रकांचे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात १९ मे पासून प्रदर्शन

मुंबई, १७ मे २०२५ : महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र दर्शन’ या विशेष उपक्रमांतर्गत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सचित्र भित्तीपत्रकांचे १९ ते २१ मे २०२५ या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र दर्शन’ या प्रदर्शनाद्वारे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार असून, मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचा अनुभव घेता येणार आहे.

000

 

मुंब्रा येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; ६३.९८ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. १७: ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतुकीवर अमित गार्डनजवळ, मुंब्रा रोड, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे १६ मे २०२५ रोजी कारवाई केली. टेम्पो क्र. एम एच ०५ एएम १२६५ या वाहनावर संशय आल्याने वाहनावर छापा घालून गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याच्या (गोवा राज्यात निर्मित) एकूण ८०० बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहे. या कारवाईमध्ये वाहनासह एकूण ६३ लाख ९८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे जुल्फेकार ताजअली चौधरी (वाहनचालक) यास अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख आयुक्त, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक वैद्य, श्री.पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी.धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर.महाले, आर.के.लब्दे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी.थोरात, जवान पी.ए.महाजन, श्रीमती एस.एस.यादव, एम.जी.शेख आदींचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास अधिक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी हे करीत आहेत.

000

पश्चिम बंगालचे सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक अरुण गोराईन निलंबित; निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई

मुंबई, १७ : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अरुण गोराईन, सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक (ASM), काकद्वीप उपविभाग यांनी स्वपनकुमार हालदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), 131-काकद्वीप विधानसभा मतदारसंघ यांच्या लॉगिन तपशीलांमध्ये बेकायदेशीरपणे आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून काही अर्ज निकाली काढले.

या प्रकरणी श्री.गोराईन यांना काकद्वीपचे एसडीओ आणि ईआरओ यांच्याद्वारे १७ मार्च २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर २४ मार्च २०२५ रोजी दिलेल्या उत्तरात त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे नमूद करून अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. त्यांनी झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

तथापि, त्यांनी अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या अधिकाऱ्याच्या लॉगिनमध्ये आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून त्यावर आलेल्या ओटीपीचा वापर करत फॉर्म क्रमांक ६, ७ आणि ८ वर कारवाई केल्यामुळे ही कृती फसवणूक आणि अप्रामाणिक हेतू दर्शवते. ही कृत्ये केवळ शासकीय कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणाच नव्हे तर जनप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३२ अंतर्गत निवडणूक यादी तयार करण्याच्या कर्तव्यातील उल्लंघन देखील ठरते.

या अनुषंगाने, पश्चिम बंगाल सेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, १९७१ मधील भाग IV, नियम ७(१)(अ) नुसार श्री.गोऱाईन यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मोठी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक असलेले आरोपपत्र, साक्षीदारांची विधाने आणि संबंधित दस्तऐवज जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी, दक्षिण २४ परगणा यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

निलंबनाच्या कालावधीत श्री.गोराईन यांना त्यांच्या सेवा अटींनुसार निर्वाह भत्ता मिळेल, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

000

पालकमंत्र्यांनी केली नुकसाग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

नंदुरबारदिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : राज्यात यावर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरांत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

घटनास्थळी तातडीने भेट

चिंचपाडा, भिलाटी, बंधारहट्टी भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. पालकमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सोबत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तातडीने पंचनाम्याचे आदेश

पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “घरांचे आणि शेतीचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे पूर्ण करावेत. ज्यांचे घरे राहण्यास असुरक्षित आहेत, त्यांना तात्पुरते घरकुल उपलब्ध करून द्यावे.” तसेच त्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे पालकमंत्री ॲड. कोकाटे

राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यंदा मौसमी पावसाचे आगमन वेळेपुर्वी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीच्या कामांची आखणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. “शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले. 

प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोणताही प्रभावित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. दरम्यान, या पावसात जिवीतहानी झाली नसली तरी काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत.

00000

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या सूचना

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर

सोलापूर, दि. 16- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात निर्माण होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम दि. 15 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी 1 ऑगस्ट 2025 रोजी स्मारक उद्घाटनाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाची पाहणी केली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पालकमंत्री गोरे यांचे स्वागत करून त्यांना स्मारक कामाची माहिती दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, सिनेट सदस्य तथा भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री माऊली हळणवर, शिवाजी कांबळे, शिवाजी बंडगर, अमोल कारंडे, सोमेश्वर क्षीरसागर, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी स्मारक व विद्यापीठाच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले. यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. निधीची कमतरता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून त्यासंदर्भात तरतूद करू. दि. 15 जुलै पर्यंत काम पूर्ण करून 1 ऑगस्ट 2025 रोजी स्मारकाचा उद्घाटन करू, असेही ते यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या वनविभागाच्या आरक्षित जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निश्चित मदत करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी 50 लाखांचा निधी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती वर्ष असून वर्षभर विद्यापीठाच्यावतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी निधीची मागणी केली. यावेळी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समिती मधून 50 लाखांचा निधी जाहीर केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर व स्मारक समितीच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांचे यानिमित्त आभार मानले.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

ठाणे,दि.16(जिमाका):- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या परवानग्या घेवून कुणाचीही अडवणूक न करता कामे तातडीने पूर्ण करावीत. जनतेच्या हिताच्या आड येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणे, हे या शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉ.बालाजी किणीकर या मान्यवर लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, एमएमआरडीएच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, सह व्यवस्थापकीय संचालक आस्तिक पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले की, नालेसफाई व्यवस्थित करा. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या होर्डिंग्जची तपासणी करा, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करा. धोकादायक असणारी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावीत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे दुरुस्ती तात्काळ करा. कोणत्याही परिस्थितीत मॅनहोल उघडे राहता कामा नयेत, त्यावर जाळीची झाकणे लावावीत. रेल्वे आणि महापालिकांनी आपापसातील समन्वय आणि नालेसफाई योग्य रीतीने पूर्ण करा. झाडांची छाटणी पूर्ण करा. महावितरणने विशेष काळजी घ्यावी. सर्पदंश, विंचूदंश यावरील औषध साठा योग्य प्रमाणात करून ठेवावा. आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रांवर उपस्थित राहावे.

मोडकळीस आलेल्या शाळांची विशेष काळजी घ्यावी. तात्पुरत्या निवारास्थळांची तयारी ठेवावी. पावसाळ्यात पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्याय व्यवस्था तयार ठेवावी. सखल भागात पाणी तुंबणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तयार ठेवाव्यात. पट्टीच्या पोहणाऱ्या स्वयंसेवकांची पथके सज्ज ठेवावीत. धोकादायक इमारतींची नोंद अद्ययावत करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतरित करावे. पुरेसा धान्यसाठा करून ठेवावा, असे सांगून टीडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके सज्ज ठेवावीत. ठाणे जिल्ह्याची एकूण परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या ठाणे आणि कल्याण येथील पथकांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत ठाणे जिल्ह्यात थांबावे, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या तयारीबाबत तर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गजानन गोदेपुरे यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, एनडीआरएफ, आरोग्य विभाग, टीडीआरएफ इत्यादी विभागांनी आपापल्या विभागाने मान्सूनपूर्व उपाययोजनांबाबत केलेल्या तयारीची माहिती उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांना दिली.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...