सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 155

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १९ : पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० मे २०२५ पासून सुरू होत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून, अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात, असेही श्री.पाटील सांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. १९ : विलेपार्ले मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय संबधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावेत, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार पराग अळवणी, सचिव संदीप देशमुख, मुख्य अभियंता रामा मिटकर, उप सचिव चं. द. तरंगे, अवर सचिव दुर्गाप्रसाद मैलावरम आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले, उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांसंदर्भात विभागाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी. तसेच भूखंड क्रमांक १८७, नगर योजना, विलेपार्ले (पूर्व) या भूखंडावरील योजनेमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. भोयर यांनी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 

मुंबई, दि.१९:- अतिरिक्त  ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावा, असे  शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस  संचालक (माध्यमिक) श्री. पालकर, संचालक (प्राथमिक) श्री. गोसावी, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले, मुंबईत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत समायोजन होण्यासाठी महापालिका व शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी. पती – पत्नी शिक्षक समायोजन संदर्भातील प्रकरणे वेगळी कळवावीत.

या बैठकीत शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षक समायोजन, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन यासह शिक्षकांच्या समस्या मांडल्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या शिक्षकांच्या समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असे, राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १९  : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री  ‌प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मंत्रालयात आयोजित मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये श्री. सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह  एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी  अंमलबजावणी दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये  वाहतूक कोंडी समस्येने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये ते प्रभावीपणे राबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविले असल्याचेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल, असे  श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल, अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार वाहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर  महापालिकांनी स्वीकारावे, जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 19 : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी करा, शहरातील होर्डिंग्ज व बॅनरची  स्थिती तपासून घ्या, जनतेला वेळेत माहिती पुरविण्याकरिता डीडीएमए चॅटबॉटचा वापर करा, जलाशय व धरणाच्या ठिकाणी पर्यटकांचे अपघात होणार नाही यासाठी उचित काळजी घ्या आणि  साथीचे रोग पसरणार नाही याची काळजी घेवून उचित आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागाची मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आर. बालसुब्रमण्यम, आयुक्तालयातील महसूल विभागाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा, पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दूरदृष्यप्रणालीद्वारे वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

यावर्षी हवामान विभागाने विदर्भात वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी चोख भूमिका बजावत मनुष्य व प्राणीहानी होणार नाही व वेळेत नागरिकांना मदत पोचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले.

गोसेखुर्द, अपर वर्धा, ईसापूर आदी धरणांसह राज्याच्या सीमेलगत संजय सरोवर आणि मेडिकट्टा धरणातील पाणी पातळी कमी करण्यात यावी अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विभागात एकूण 16 मोठे धरण, 42 मध्यम तर 320 लघु असे एकूण 378 धरण असून पुर नियंत्रणाच्यादृष्टीने त्यांची पाणी पातळी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.  शहरातील धोकादायक होर्डिंग्ज व बॅनर ची तपासणी करून ते वेळीच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुर परिस्थिती व अतीवृष्टी झाल्यास त्याची माहिती वेळीच नागरिकांना देण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याने तयार केलेले  डीडीएमए चॅटबॉट, साथीदार ॲप अन्य जिल्ह्यांनीही तयार करावे व त्याचा वापर करावा तसेच केंद्रिय जल आयोगाचे फ्लडवॉच ॲप या अधिकृत ॲप प्रमाणे अन्य शासकीय ॲपचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.                                                      गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील गर्भवती महिलांना आधीच सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात यावे, गेल्या पाच ते दहा वर्षात जलाशय व धरणांच्या ठिकाणी पर्यटकांचा अपघात असेल अश्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी अशा सूचनाही श्रीमती बिदरी यांनी यंत्रणांना दिल्या

प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर मनपा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा विभाग, हवाई दल, सशस्त्र दल, केंद्रिय जल आयोग, आरोग्य विभाग यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मान्सून मधील अतिवृष्टीचा सामना करण्याकरिता केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

00000

परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई दि. १९ :-  परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात परिवहन विभागातील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या.

बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र  होळकर आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ऑनलाइन  बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या  विशेषतः महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्याही प्राध्यान्याने सोडवाव्यात. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच यावेळी मागील वर्षी राबविलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

१.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीन पटीने मोठे असून आता वाढवण बंदर हे जगात पहिल्या प्रमुख दहा बंदरात गणले जाणार आहे. त्यामुळे हे बंदर पुढील २० वर्षात नवीन अर्थव्यवस्था निर्माण करेल. एकट्या मुंबईत सध्या १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१३-१४ या तुकडीच्या भारतीय विदेश सेवेतील १४ अधिकाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास आदी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी बंदराचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी कोस्टल मार्ग तयार करण्यात येत आहे. अटल सेतूमुळे तिसरी मुंबई तयार होत आहे. त्याचबरोबर आता मुंबईत ‘एज्यूसिटी’ तयार करण्यात येत आहे. या एज्यूसिटीत देशातील १२ विद्यापीठ असतील. ही ‘एज्यूसिटी’ २०० एकर जागेवर उभी करण्यात येणार असून यामध्ये अंदाजे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतील. तसेच ३०० एकर जागेवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईला तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी १००० एकर जागेवर नॉलेज सिटी उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात संपूर्ण बदललेली मुंबई दिसेल.

विदेश सचिव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या संवादात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावरील गुंतवणूक संधी, परराष्ट्र धोरणाशी संबंधित राज्याचा सहभाग, विकसित भारत तसेच महाराष्ट्रातील विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांविषयी विचारविनिमय झाला.

0000

संजय ओरके/विसंअ/

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIRENDRA DHURI

विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था

मुंबई, दि. १९ : विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजात तसेच शासनाच्य विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे आहे. विधिमंडळ समित्या संसदीय लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे. या समित्यांना कार्य करताना विशेष अधिकार प्राप्त असतात. प्रशासन समजून घेण्यासाठी आणि कामकाजाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी विधिमंडळ समित्या ही एक उत्तम व्यवस्था आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सन २०२४-२५ या वर्षासाठी गठीत करण्यात आलेल्या विधिमंडळ समित्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड.आशीष जयस्वाल, विविध समित्यांचे प्रमुख, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  विधानमंडळाचे कामकाज केवळ सभागृहातच चालत नाही, तर समित्यांच्या माध्यमातूनही  चालत असते.  सभागृहामध्ये वेळेचे बंधन असल्यामुळे अनेकदा एखाद्या विषयावर सखोल चर्चा करता येत नाही. अशा वेळी समित्या त्या विषयाचा सखोल अभ्यास करून संबंधित विषयाला न्याय देतात. ज्यावेळी कॅगचा अहवाल विधानमंडळासमोर मांडला जातो. त्यामध्ये लेखापरीक्षण व निरीक्षणे नोंदवलेली असतात. अशावेळी संबंधित विभागांच्या सचिवांकडून माहिती मागवली जाते, सत्यता तपासली जाते आणि त्यानंतर अंतिम अहवाल सभागृहात सादर केला जातो.

विनंती अर्ज समितीचे महत्त्व अधोरेखित करताना, मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले की, पूर्वी या

समितीला काम नाही असे समजलं जायचे  मात्र, मी स्वतः पहिला विनंती अर्ज नागपूरमध्ये पोलिसांचे शासकीय निवास, झोपडपट्टीतील लोकांना मालकी हक्काचे पट्टे, व ‘नॉन-क्रिमी लेयर’ची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केला. या अर्जाच्या अहवालावर आधारित शासनाने पहिल्यांदा शासन निर्णय (जीआर) काढला आणि झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले. समित्यांमधील सदस्यांचा सहभाग शासन आणि विधिमंडळ यांना समृद्ध करतो. असे सांगून सर्वांना  शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व समित्यांचे प्रमुख व सदस्य यांचे अभिनंदन केले.

शासन आणि प्रशासनात विधिमंडळ समित्यांचे कामकाज महत्वाचे – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

“विधानमंडळ समित्यांचे कामकाज सुरळीत व योग्य पद्धतीने चालले पाहिजे. समित्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान हे अधिवेशन कालावधीतील कामकाजा इतकेच शासन आणि प्रशासनात महत्त्वाचे आहे. भारताने संसदीय लोकशाहीची मूल्ये अंगिकारली असून, गुणवत्तेच्या कसोटीवर आपली लोकशाही अजूनही अबाधित आहे. विधिमंडळ समित्या विशिष्ट विषयांचा तपशीलवार अभ्यास करतात आणि सूचना व शिफारशी देतात. या शिफारशी अधिवेशनात मांडल्या जातात व त्यावर आधारित निर्णय घेतले जातात. त्यामुळे समित्यांचा उपयोग प्रशासन आणि शासन निर्णय प्रक्रियेत प्रभावीपणे होत असतो. या वर्षी २९ समित्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांनी समित्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करून सदस्यांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

VIRENDRA DHURI

समितीच्या माध्यमातून थेट मत मांडण्याची संधी – अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

विधिमंडळ समितीमार्फत विधिमंडळाचे काम करण्याची संधी लोक प्रतिनिधींना  मिळते. आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची आणि एखाद्या विषयाला न्याय देण्याची संधी उपलब्ध होते.तसेच शासनाला यासंदर्भात जाब विचारण्याची ताकत सुध्दा समितीच्या कामकाजात आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

विधिमंडळ समितीचे कामकाज आव्हानात्मक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विधिमंडळ समित्यांचे सर्व कामकाज गोपनीय असते. जोपर्यंत समितीचा निर्णय मंजूर होत नाही तोपर्यंत समितीचा अहवाल सभागृहात किंवा पटलावर ठेवला जात नाही.समितीच्या सदस्यांनी समित्यांच्या अधिकाराचा योग्य पध्दतीने उपयोग करावा लोकहितासाठी याचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल  याचा अभ्यास करावा तसेच समितीच्या कामकाज वेळी स्थानिक राजशिष्टाचार पाळला पाहिजे, असे सांगून  कामकाज करताना प्रत्येक सदस्यांनी आपले  उत्तरदायित्व समजून सहभाग नोंदवावा.

विधिमंडळ समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजपासून समित्यांच्या कामकाजाला सुरुवात होत आहे. या केवळ समित्या नसून त्या लघुविधानमंडळ’ आहेत. या समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर समित्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. समित्यांना संविधानाने विशेष अधिकार दिले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सभा कशा आयोजित करता येतील, समित्यांचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील, तसेच समित्यांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता कशी आणता येईल, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे, समित्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल, वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावर या समित्या वेळोवेळी शासनाला सूचना करतील. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी समित्यांद्वारे एकत्र येऊन जनतेसाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : गृहनिर्माण धोरणाच्या  माध्यमातून सर्वांसाठी घरे या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असून, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार यांसारख्या विविध समाजघटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेता, सर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी गृहनिर्माण धोरणाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

कागल, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.19 (जिमाका): कागल, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जलद गतीने मार्गी लावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज मंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कागल गडहिंग्लज तालुक्यातील विविध विषयांच्या आढावा बैठका संपन्न झाल्या, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे ,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सोहम भंडारे, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व संबंधित नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल म्हाडा लॉटरी 2021 या म्हाडा गृहप्रकल्पाची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करुन या प्रकल्पासाठी पैसे भरलेल्या लाभार्थ्यांकडे त्या त्या सदनिकेचा ताबा तात्काळ द्या. कागल येथील पुलाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या गुरुवारी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा. गडहिंग्लज शहरातील दुंडगा मार्ग, मेटाचा मार्ग, धबधबा मार्गाबाबत तसेच झोपडपट्टी नियमितीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर बैठक घ्यावी. तसेच हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले. काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करा. हिरण्यकेशी नदीतील गाळ काढणे तसेच गडहिंग्लज शहरातील पूररेषा निश्चित करण्याची कार्यवाही जलद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीचे ड्रोन सर्वे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यावर ड्रोन सर्वे तात्काळ करुन धरणग्रस्तांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्या, अशा सूचना करून ते म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत कडगाव येथील मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी चावडीकरिता आरक्षित जागेमध्ये ग्रामपंचायतीचे बांधकाम करण्याबाबत उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय घ्या. कागल तालुक्यातील करनूर येथील पूरबाधित शेतकऱ्यांना भूखंड मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असून यास त्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूखंड वाटपाची कार्यवाही जलद करा. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

बसवेश्वर मंदिराच्या 42 गुंठे जमिनीपैकी महाराष्ट्र सरकारकडे वर्ग झालेली साधारण 18 गुंठे जमीन पूर्ववत बसवेश्वर मंदिराकडे वर्ग करण्यासाठी या देवस्थानच्या सदस्यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाकडे अपील दाखल करावे, असे त्यांनी सांगितले. यासह प्रलंबित विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्या त्या विभागाच्या प्रश्नांची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

000000

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...