गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
Home Blog Page 1529

मशरूम शेती : आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत

राज्य व केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास निधीमधून आठ लाखाचे अनुदान घेऊन वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शेतकरी दादासो आत्माराम पाटील यांनी शिव प्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्म सुरू केली. यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेशातील ICAR-DMR सोलन येथे मशरूम लागवड तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग करून त्यांनी यशस्वी मशरूम शेती केली आणि शेतकऱ्यांसाठी मशरूम शेती आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत असल्याचा मार्ग दाखवून दिला.

मशरूम शेती बाबत माहिती देताना श्री. पाटील यांनी सांगितले, शिवप्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्ममध्ये 16 तांत्रिक आणि गैरतांत्रिक मजुरांच्या सहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बग्यास, कोंबडीचे खत, गव्हाचा कोंडा, जिप्सम, एरिया हे सर्व एकत्र करून ओले केले जाते. कंपोस्ट खत निर्मिती हा यातील महत्त्वाचा भाग आहे.

कंपोस्ट खत निर्मितीनंतर फेज एक मध्ये भरलेले सर्व साहित्य तीन दिवस ठेवले जाते. कंपोस्ट मिश्रण कंडिशनिंग आणि पाश्चरायझेशनसाठी सहा-सात दिवस भरले जाते. कंपोस्ट 56 ते 59 डिग्री सेल्सियस तापमानात चार ते सात तासासाठी पाश्चराईजड केले जाते. पाश्चरायझेशननंतर कंपोस्ट 25 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड केले जाते. आणि स्पॉनिंग केले जाते. स्पॉनचा वापर 0.5 ते 0.75 टक्के दराने केला जातो.

स्पॉनिंगनंतर कंपोस्ट पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये भरले जाते आणि स्पॉनरनसाठी  खोल्यांमध्ये हलवले जाते. यासाठी 23 ते 25 सेल्सिअस तापमान, 85 ते 90 टक्के आद्रता आणि C02-10000ppm पेक्षा जास्त  आवश्यक आहे. स्पॉनरन पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 दिवस लागतात. C02 कमी करण्यासाठी ताजी हवा दिली जाते या टप्प्यात तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस आणि आद्रता 80 ते 85 टक्के असते ताजी हवा दिल्यानंतर मशरूम काढण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात एका खोलीतून 30 दिवस मशरूम काढता येते.

दहा किलोच्या एका बॅगमध्ये 50 ते 100 ग्रॅम स्पॉन टाकल्यानंतर यातून दीड ते दोन किलो मशरूमचे उत्पादन मिळते. एका बॅच मधून सरासरी दीड टन उत्पादन मिळू शकते. एक महिन्यात तीन बॅच मधे चार ते पाच टन उत्पादन मिळते. मुंबई, बेंगलोर यासह मोठ्या शहरात याची विक्री व्यवस्था असून उत्पादन खर्च वजा जाता 18 ते 25 टक्के नफा मिळू शकतो.

मशरूम शेती कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा नवा स्त्रोत असल्याने शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे व श्री. पाटील यांच्याप्रमाणे आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग स्वीकारावा.

                                                                                                –  जिल्हा ‍ माहिती कार्यालय,  सांगली

‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ

अकोला दि.5(जिमाका) – राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आज आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात आले. जिल्ह्यात 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधा वितरीत होईल.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘आनंदाच्या शिधा’ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, पुरवठा अधिकारी प्रतिक्षा देवणकर, विजय अग्रवाल, विठ्ठल सरप व लाभार्थी उपस्थित होते.

शिधा वितरण प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकऱ्यांना सण उत्सव साजरे करता यावे याकरीता आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयामुळे  गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला असून निश्चितच त्यांना लाभ होणार आहे.आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी, अशी सूचना आ. सावरकर यांनी केली.

असा असेल आनंदाचा शिधा

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे रवा, चणाडाळ, साखर व पामतेल हा शिधा देण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 100 रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत होणार आहे.

जिल्ह्यातील 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना मिळेल ‘आनंदाचा शिधा’

अंत्योदय अन्न योजना, शेतकरी व प्राधान्य कुटूंब योजनेतील 3 लाख 31 हजार 357 लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत होणार आहे. तालुकानिहाय शिधा वाटप याप्रमाणे :

अकोला तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6637, प्राधान्य कुटूंबातील 49551, शेतकरी 6872 असे एकूण 63060 लाभार्थी. अकोला शहरात अंत्योदय अन्न योजनातील 1416, प्राधान्य कुटूंबातील 38658, शेतकरी 717 असे एकूण 40791 लाभार्थी. अकोट तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6516, प्राधान्य कुटूंबातील 27813, शेतकरी 10066 असे एकूण 44395 लाभार्थी. बाळापूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5433, प्राधान्य कुटूंबातील 32071, शेतकरी 1968 असे एकूण 39492 लाभार्थी. बार्शीटाकळी तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6973, प्राधान्य कुटूंबातील 26253, शेतकरी 2428 असे एकूण 35654 लाभार्थी. मुर्तिजापूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5987, प्राधान्य कुटूंबातील 27714, शेतकरी 7478 असे एकूण 41179 लाभार्थी. पातूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 4964, प्राधान्य कुटूंबातील 22083, शेतकरी 2289 असे एकूण 29336 लाभार्थी. तेल्हारा तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5990, प्राधान्य कुटूंबातील 24980, शेतकरी 6480 असे एकूण 37450 लाभार्थी. अंत्योदय अन्न योजनातील 43 हजार 936, प्राधान्य कुटूंबातील 2 लाख 49 हजार 123, शेतकरी शिधापत्रिकाधारक 38 हजार 298 असे एकूण 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे.

1061 केंद्रावर वितरण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 1 हजार 061 स्वस्त धान्य दुकानाव्दारे आनंदाचा शिधा वितरण होणार आहे. त्यात  अकोला तालुक्यातील 124, अकोला ग्रामीण 174, बार्शीटाकळी 127, मुर्तिजापूर 163, बाळापूर 114, पातूर 94, तेल्हारा 99 व अकोट 166  केंद्रावर वितरीत होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी दिली.

000

श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पूजन

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र.  १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.

“जोतिबाच्या नावानं चांगभल…!” च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासन काठ्या नाचवत देहभान विसरुन सहभागी झाले आहेत. या सर्व भाविकांना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासन काठ्यांचे पूजन केले.

पालकमंत्र्यांकडून वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राची पाहणी-

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने जोतिबा मंदिरात भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राचे दालन सतत 24 तास कार्यरत ठेवले असून या केंद्राची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

क्षणचित्रे-

1) श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती, तर देवस्थान समितीकडून यात्रेचे नीटनेटके नियोजन व स्वच्छतेबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे.

2) पालकमंत्र्यांकडून मानाच्या सासनकाठीचे पूजन

3) देवस्थान समितीकडून मानाचा फेटा घालून पालकमंत्र्याचा  तसेच अन्य मान्यवरांचा सन्मान

4)  पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बस सेवा

5) यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

6)  स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे मोफत नियोजन

7) जोतिबाच्या नावानं चांगभल…! चा सातत्याने भाविकांकडून जयघोष, भाविकांमध्ये अपूर्व उत्साहाची

     लाट…..कडक उन्हातही भाविकांचा उत्साह कायम

8) रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्र निर्माण करून सतत 24 तास खुले ठेवण्यात आले आहे.

000

मंत्रिमंडळ निर्णय

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीच्या 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित बैठकीत, सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने, शेतीपिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषि विभागाने समिती नियुक्ती करावी असा निर्णय झाला होता. त्यानुसार सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करून शासनास शिफारशी करण्याकरिता कृषि व पदुम विभागाच्या 21 डिसेंबर 2022 च्या शासन आदेशाद्वारे अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

या समितीने सततच्या पावसासाठी निकष निश्चित करण्याबाबत तयार केलेल्या अहवालात शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.

दि. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मि.मी पाऊस झाल्यास; आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत अधिकचा 50 टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पावसाचा पहिला ट्रीगर लागू राहिल.

अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रीगर लागू झाल्याच्या दिनांकापासून 15 व्या दिवसापर्यंत सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI) निकष पुढीलप्रमाणे तपासण्यात येतील. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक फरक (NDVI) जर ०.५ किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू राहील. तथापि ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा NDVI हा 15 व्या दिवसाच्या NDVI पेक्षा जास्तच असायला पाहिजे.

सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि 33 टक्के पेक्षा जास्त शेतीपिकांचे  नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे, जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्तावांकरिता वरील निकष वापरून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने मदत देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष लागू राहील.

—–०—–

नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार; अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ. खर्च देखील आकारण्यात येतील. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरिक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकीर, भू-विज्ञान व खनीकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.

—–०—–

नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी

मुंबईतील फोर्ट परिसरातील भारतीय नौदलास दिलेल्या सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ या संस्थेस भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र दराने नुतनीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेस फोर्ट महसूल विभागातील भूकर क्र. २/४ क्षेत्र ७४१३.१७ चौ.मी. या भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मंजूरी देण्यात आली. पुढील तीस वर्षांच्या कालावधीसाठी हा भाडेपट्टा राहील.

—–०—–

नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता; ४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार

नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.

या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल. यामध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ किमी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५ किमी). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० किमी) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे.

—–०—–

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार; जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ (भाग), मौ. देवनार, देवनार डम्पिंग ग्राऊंड, गोवंडी, मुंबई या जमिनीवरील महापालिका शाळा, इतर शिक्षण, खेळाचे मैदान, विद्यार्थी वसतिगृह व उद्यान/बगीचा ही आरक्षणे वगळून भूखंड भरणी स्थळाचे नामनिर्देशानसह उद्यान, बगीचाचे आरक्षण दाखवणाऱ्या फेरबदलास मान्यता देण्यात आली. याठिकाणच्या खेळाच्या मैदानावरील साधारणतः ३१ हजार २०० चौ.मीटर क्षेत्राचे आरक्षण वगळण्यात आले आहे.

—–०—–

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार; १४ नव्या पदांना मान्यता

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

याकरिता अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. सध्या या संवर्गात १३८ पदे मंजूर आहेत आणि संस्था निहाय कमाल विद्यार्थी संख्या १३७ आहे. या निर्णयामुळे मंजूर विद्यार्थी पद संख्या १३७ वरून २०९ इतकी होणार आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालय, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमध्ये ही पदे निर्माण करण्यात येतील.

—–०—–

महावितरणला कर्जासाठी शासन हमी देण्यास मंजुरी

थकीत देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेण्यास महावितरण कंपनीला शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

विलंब अदायगी अधिभार व संबंधित बाबी (Late Payment Surcharge and Related Matters ) नियम २०२२” अंतर्गत महावितरण कंपनीस कर्ज घेण्यासाठी ही शासन हमी देण्यात आली आहे.

महावितरण कंपनीकडे महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांची थकीत देणी २९ हजार २३० कोटी इतकी असून यामध्ये मुद्दल १७ हजार २५२ कोटी आणि व्याज ११ हजार ९७८ कोटी इतके आहे. महावितरण कंपनीने विविध वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला प्रस्ताव स्वीकारावा या अटीवर ही शासन हमी देण्यात आली आहे.

—–०—–

अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा वेतन आयोग

अकृषि विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतनसंरचना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ५ कोटी ९० लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

—–०—–

नॅक, एनबीए मुल्यांकनासाठी आता महाविद्यालयांना मार्गदर्शन; उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी ‘परिस स्पर्श’

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने नॅक, एनबीए मुल्यांकनासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात सध्या ३ हजार ३४६ महाविद्यालयांपैकी १ हजार ३६८ महाविद्यालयांचे नॅक मुल्यांकन झाले आहे. सद्यस्थितीत १ हजार ९७८ महाविद्यालयांचे नॅक मुल्यांकन झालेले नाही. तसेच ७०४ तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे एनबीए मुल्यांकन झालेले नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यशाळेमध्ये महाविद्यालयांना मुल्यांकनासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्ष (PARAMARSH) योजनेच्या धर्तीवर राज्याकडून ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा राहील. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येईल. या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी येणाऱ्या १३ कोटी ५० लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

00000

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.5 :- जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स आणि वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ‘जेएनपीटी’ बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. आता वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेता येणार आहे. वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वाढवण बंदराची जागा देशातील सर्वोत्तम जागा आहे. वाढवण भागातील समुद्रात नैसर्गिक खोली असल्याने येथे मोठ्या आकाराची जहाजे सहजपणे नांगरता येऊ शकणार आहेत.

जलवाहतूक व्यवस्था अतिशय उपयुक्त असून किफायतशीरही ठरु शकते, या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलवाहतूक क्षेत्राला विशेष चालना दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स म्हणाले की, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. बंदरे विकास, जलवाहतूक व्यवस्थापन तसेच घन कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने या क्षेत्रांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येईल.

जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात नैसर्गिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. महाराष्ट्रास जलवाहतूक क्षेत्रात नक्कीच सहकार्य करण्यात येईल व जलवाहतूक व्यवस्थापन अधिक बळकट करण्यास मदत करण्यात येईल, असे श्री. हर्बेर्स यांनी सांगितले.

वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनीही जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रातील संधींबाबत सूचना मांडल्या.

नेदरलँड्‌समध्ये जलवाहतूक प्राचीन काळापासूनच प्रचलित असून मोठ्या प्रमाणात वाहतूक व अंतर्गत व्यापार जलमार्गानेच चालतो. देशात नद्या व कालवे मिळून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत जलमार्ग असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

——000——

मुदखेड अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख

मुंबई, दि. ५ : नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा व ट्रकच्या भीषण अपघतात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय मुदखेड व विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

०००

शिधा वाटपापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यातील लाभार्थींसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला.  शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी चार लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात आनंदाचा शिधा वाटप केला. शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे व त्याचे वाटपही राज्यात सर्वत्र सुरु आहे. याची कोल्हापूर जिल्ह्यातही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटप अंतर्गत सुमारे ७५ टक्के शिधा प्राप्त झाला आहे. उर्वरित शिधा दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. या शिधा जिन्नसमध्ये रवा, साखर, चणाडाळ व पामतेलचा समावेश आहे. दिनांक १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. कवितके यांनी दिली.

०००

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

           नागपूर, 04: कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या  भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन या दुमजली इमारतीत साकारले आहे.

            भारत देशाच्या पौराणिक, ऐतिहासिक वैशिष्ट्यांसह  स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची सचित्र माहिती दर्शविण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राची इमारत उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या इमारतीच्या लोकार्पणपूर्व पाहणीसाठी उपमुख्यमंत्री याठिकाणी आले होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार  प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित, भारतीय विद्याभवनच्या संचालक अन्नपूर्णी शास्त्री आदी उपस्थित होते.

         तीन एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राची दुमजली इमारत आहे. पहिल्या माळ्यावर महाकाव्य रामायणाच्या प्रसंगांची विविध चित्रांच्या माध्यमातून मांडणी केली आहे.  या दालनात रामायणाचे रचियता महर्षी तुळशीदास यांच्यापासून ते रामायणाची मूळ कथा एकूण 108 चित्रांच्या माध्यमातून  मांडण्यात आली आहे. चित्रांतील प्रसंग  व व्यक्तिमत्व समजण्यासाठी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतील माहितीही या ठिकाणी आकर्षकरित्या देण्यात आली आहे. राजमहालाप्रमाणे आतील सजावट असून तशीच रंगसंगती, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना करण्यात आली आहे.

     इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र दालन साकारण्यात आले आहे. 1857 ते 1947 या कालावधीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक आणि 1947 ते 2023 पर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या परमवीर चक्र प्राप्त जवानांच्या कार्याची माहिती येथे देण्यात आली आहे. श्री.फडणवीस यांनी या सांस्कृतिक केंद्राच्या दोन्हीही दालनाची पाहणी केली. येथील विश्वस्तांसोबत बैठक घेऊन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.

     तत्पूर्वी, श्री फडणवीस यांनी या परिसरात आगमन झाल्यानंतर महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. मंदिराच्या विश्वस्तांसोबत त्यांनी बैठक घेतली.

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त

मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड देत मेळघाटातील एका अल्पभूधारक शेतकरी बांधवाने प्रगती साधली आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिजूधावडी नजिकच्या बारू या दुर्गम गावाचे रहिवासी किसन भुऱ्या कासदेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. डोंगराळ भागातील शेती, दळणवळणाची अल्प साधने, साधारण परिस्थिती या परिस्थितीतून मार्ग काढत श्री. कासदेकर यांनी मुख्य पीकांबरोबरच परसबाग, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षापासून कासदेकर हे शेती करत आहेत. आपल्याकडे केवळ 1.53 हेक्टर शेती आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कमी जागेत अधिक उत्पन्न देणा-या पिकांचा, तसेच पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली. कृषी विभागाच्या कार्यशाळा, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, अभ्यास दौरे यातही ते आवर्जून सहभागी होऊ लागले. त्यांचा जिज्ञासा पाहून त्यांना अधिका-यांकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळू लागले.

 

शेतात सुरूवातीला पाण्याची सुविधा नसल्यामुळे केवळ खरीप पिके घेतली जायची. त्यानंतर कासदेकर यांनी शेतात विहिर निर्माण केली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पीके घेता येणे शक्य झाले. कासदेकर यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मिरची, टमाटे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच उन्हाळ्यात भुईमुगाचे पीक घेण्यास सुरूवात केली.

या पिकांबरोबरच त्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला, मिरची, वांगी, मेथी, कोथिंबीर, चवळी, वाल, पुदिना, कढीपत्ता, लसूण, मुळा आदींचीही लागवड सुरू केली. त्याचबरोबर, त्यांनी शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, बांबू, शेवगा, पेरू, बोर, सुबाभूळ अशा फळझाडे व इतर झाडांची लागवड केली. शेताच्या बांधावर 127 विविध झाडे त्यांनी लावली. सफरचंद, सुपारी, फणस, द्राक्ष, नारळ अशा झाडांची लागवडही त्यांनी प्रायोगिक तत्वावर केली.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी परसदारातील कुक्कुटपालन सुरू केले. ‘ग्रामप्रिया’ कोंबडीचे पालन करून कमी गुंतवणूकीतही उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत कसा आकाराला येतो व कुपोषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी ते कसे लाभदायी ठरू शकते, त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दर्शवले. त्याचप्रमाणे, त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून बायोगॅस युनिट उभारले. गॅसनिर्मितीनंतर उर्वरित स्लरीचा त्यांनी गांडूळ खतनिर्मितासाठी वापर केला. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य व्यवस्थापन व वापर करून शाश्वत शेतीचे आदर्श उदाहरण कासदेकर यांनी निर्माण केले.

इतर शेतकरी बांधवांनाही ते पूरक व्यवसाय, तसेच विविध प्रयोगांबाबत सातत्याने मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, तसेच आदिवासी शेतकरी कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

– हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती  अधिकारी, अमरावती

पशूसंवर्धन क्षेत्रात महिलांचा महत्त्वाचा वाटा

            जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे असलेले योगदानावर चिंतन चर्चा होत असते. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, खेळ, कला, व्यवस्थापन, व्यापार अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान केल्या जातो. तथापि भारतासारख्या पारंपरिक कृषिप्रधान देशात, पशूपालन या क्षेत्रातही महिलांचे भरीव योगदान आहे हे नाकारता येत नाही. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याची जिद्द, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड, सुलभ संवाद कौशल्य,  उपजत संघटन शक्ती व काळाच्या ओघात येणारे आत्मभान अशा अनेक गुणांनी पशुपालन क्षेत्रातील महिलावर्ग स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून पुढे सरसावताना दिसत आहे. मात्र भारतीय परंपरेतील रुजलेली लिंगभेद आधारित मानसिकता, कामाची असमान विभागणी आणि वेतनातील फरक, व्यावसायिक मर्यादा अशा अनेक बाबींमुळे आजही महिलांना सरस कामगिरी करताना अडचणी जाणवतात. पशुपालन क्षेत्रात पशुधनाचे संवर्धन करण्यात महिलांचा मोठा वाटा राहिला आहे, म्हणून त्यांची भूमिका समजून घेणे गरजेचे ठरते.

            जगभरात महिलांचे कृषीक्षेत्रातील योगदान पाहील्यास, विकसनशील देशात सरासरी 40 टक्के वाटा आहे तर भारतात हे प्रमाण 30 टक्के एवढे आहे. भारतात सुमारे 75 दसलक्ष महिला केवळ दुग्धव्यवसायात गुंतलेल्या आहेत. यावरून पशुपालन क्षेत्रात महिलांना असलेल्या रोजगाराच्या  विपुल संधीची कल्पना येईल. आजही कृषी क्षेत्रात विविध लघू व मध्यम क्षेत्रात कार्यरत कुशल-अकुशल मजूर म्हणून काम करणाऱ्या सुमारे 70 टक्के महिला आहेत. कृषी घटकातून प्राप्त झालेल्या खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगात सुमारे 80 टक्के महिलाच आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण बाजारपेठेत मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेतही महिला कामगारांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भारताचा विचार केल्यास विविध क्षेत्रांमध्ये तसेच विशेषता कृषी क्षेत्रामध्ये महिलाराज आहे असे म्हणता येईल. परंतु स्त्री पुरुष समानता या दृष्टी स्त्रियांची सद्यस्थिती पाहिल्‍यास कृषिपूरक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मिळणारा कामाचा मोबदला अल्प असल्याचे दिसून येते ग्रामीण भागात तर ही असमानता अगदी कामाच्या वाटपावरुन सुद्धा दिसून येते. पशुपालन क्षेत्रातही जनावरांचे व्यवस्थापन, गोठ्याची साफसफाई, चारा-पाण्याची व्यवस्था, पशुधनाची खरेदी-विक्री तसेच पशुजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री अशा विविध क्षेत्रात महिलांचे व्यापक योगदान आहे तरीदेखील अनेक घटकांमुळे महिला आजही दुर्लक्षित आहेत. आजही महिला पशुपालक उत्पादक किंवा महिला पशुधन व्यापारी एकसंध आढळून येत नाहीत याचा अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर तसेच सामाजिक, आर्थिक आणि नैतिक विकासावर होत असतो.

पशुपालन क्षेत्राची महिलांच्या दृष्टीने उपयुक्तता

            कृषिपूरक घटकांमध्ये पशूपालन हे एकमेव असे क्षेत्र आहे की ज्या मध्ये महिलांचा प्रवेश इतर घटकांपेक्षा अधिक सुलभतेने होताना दिसतो. अगदी लहान असल्यापासून पशुधनाशी महिलांचा संबंध येत असतो. दैनंदिन गोठ्यातल्या जनावरांना चारा पाणी करणे,  त्यांचे उपचार करणे, औषध उपचारासाठी दवाखान्यात नेणे याचबरोबर दूध किंवा अंडी अशा पशुउत्पादनांची जवळच्या स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे या गोष्टी घरातील लहान-सहान मुलीपासून ते मोठ्या महिलांपर्यंत बिनदिक्कत पार पाडल्या जात असतात. त्यामुळे पशुधन व्यवस्थापन हे महिलांसाठी नवीन क्षेत्र नाही. भारताच्या कित्येक भागात लग्नामध्ये नववधूला गाई, शेळ्या, मेंढ्या असे पशुधन भेट देण्याची पद्धत प्रचलित होती. कदाचित काही भागात अथवा समुदायात आजही ही प्रथा दिसून येते. आजही भारतीय कुटुंबव्यवस्थेत अन्नसुरक्षा आणि अर्थसुरक्षा ही निर्विवादपणे महिलांनी व्यापलेली क्षेत्रे आहेत. आजही कुटुंबातील सर्व घटकांच्या आहाराचा, आरोग्याचा बारकाईने अभ्यास महिलांचा असतो. बचतीचे संस्कार महिलांना उपजतच असल्याने आजही विविध बचत गटांच्या नेतृत्वात महिला अग्रभागी आहेत उत्तम संवाद कौशल्य आणि नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची हौस महिलांना स्थानिक पातळीवरील बचत गटांना उभारण्यात साहाय्यभूत ठरतात. भटक्या अवस्थेत मानवास स्थिर जीवनशैली पशुपालनाच्या माध्यमातूनच झालेली आहे ही निर्विवाद गोष्ट असून शिकारीसाठी बाहेर पडणाऱ्या माणसांच्या तुलनेत मागे राहणाऱ्या स्त्रियांनी शेती आणि पशुपालन यास अंगीकारून मानवी वसाहतीस चालना दिलेली आहे.

            महिला या उत्तम व्यवस्थापक तर असतातच त्याशिवाय त्यांचे संवादाची जाळे सामाजिक संपर्क म्हणजे सोशल नेटवर्किंग उत्तम असते. आपल्या जबाबदाऱ्या चटकन ओळखून नियोजित काम प्रामाणिकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न महिला आवडीने करतात. महिला बचतगटाकडे पाहिल्यास त्यांच्यामध्ये उपजत असलेल्या संघटन कौशल्यचीही आपल्याला जाणीव होईल. आजही शहरी असो की ग्रामीण विविध क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी तोडत महिलावर्ग पुढे येताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं या महिला-भगिनी आपापले कुटुंब समर्थपणे सांभाळत करताना दिसतात आणि म्हणूनच महिलांनी विशेषतः ग्रामीण महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सहज सुलभ असलेलं पशूपालन या क्षेत्राची निवड केल्यास त्यांचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकतो.

पशुसंवर्धनात महिलांचे योगदान

            आज भारत देश दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील सुमारे १६ टक्के दूध निर्मिती हे आपल्या देशात होते. दरवर्षी दूध उत्पादन आलेख वाढताच आहे, थोड्याबहुत फरकाने असेच चित्र अंडी व मास उत्पादनाचे आहे. याचे निर्विवाद श्रेय पशूपालन करणाऱ्या कामगारांपैकी 60 ते 70 टक्के असलेल्या महिलांचे आहे. गुजरातमधील अमूल या दूध महापूर योजनेतून वर आलेल्या ब्रँडची पार्श्वभूमी आपण पाहिल्यास ग्रामीण भागातील दूध उत्पादक पशुपालकांची जाळे आणि महिलांचा सक्रिय सहभाग हे प्रमुख कारण आहे. भारताच्या विविध भागात असलेले अस्सल देशी पशूधन हेसुद्धा महिला वर्गाने जोपासले असल्याचे आपल्याला आढळते. आपल्या कुटुंबाचे आणि पशुधनाचे आहारशास्त्र योग्यपणे ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या गोठ्यात असणारे पशुधन कसे असावे हे महिला ठरवतात. जनावरांच्या खाण्यापिण्यातील सूक्ष्म बदल महिला सहजपणे ओळखतात. पारंपारिक औषधउपचार पद्धती हा सुद्धा ज्ञानवारसा महिलावर्गानेच पुढे चालवलेला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पशूंचे चारा व्यवस्थापन, आरोग्य उपचार, पैदास व्यवस्थापन तसेच पशु उत्पादनांचे मार्केटिंग/विपणन व्यवस्थापन अशा अनेक बाबींमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे आपण पाहतो. म्हणून एकूणच पशुसंवर्धन क्षेत्रात महिलांचे लक्षणीय योगदान आहे. शिक्षणक्षेत्रातही संशोधन आणि विस्तार कार्य अशा क्षेत्रात महिलावर्ग पुढे असल्याचे दिसून येते. पशुपालन क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध आहेतच याशिवाय सोबत कार्यरत असलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास, सशक्तिकरण आणि समानतेची बीजे रोवलेली आहेत. गरज आहे ही फक्त पशुपालक भगिनींनी संघटित होऊन काम करण्याची आणि समाजाने देखील आपली मानसिकता बदलण्याची.

महिलांना पशुसंवर्धनात येणाऱ्या अडचणी व उपाय

            ग्रामीण भागात महिलांना काही अडचणी जरूर येतात. अगदी जनावरांच्या खरेदीपासून ते व्यवस्थापन आणि विक्री करेपर्यंत किंवा पशु उत्पादने बनवून प्रक्रिया करून त्यांची विक्री करेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भारताच्या अनेक भागात विशेषता ग्रामीण भागात महिलांच्या कामास दिला जाणाऱ्या मोबदल्यात असमानता दिसून येते. आजही अशिक्षित स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी पशुधनाचे व्यवसायिक प्रशिक्षणाच्या संधी महिलांना हव्या तशा उपलब्ध होत नाहीत. बाजारपेठांमध्ये अडत्या किंवा मध्यस्थाशिवाय त्यांना सहजासहजी वावरता येत नाही. गाठीशी पुरेसे पैसे नसल्याने बरेचदा इच्छा असूनही काही व्यवसाय म्हणून करता येत नाही. तसेच तुलनेने महिलांना भांडवल उभे करण्यासाठी पतपुरवठादार ग्रामीण भागात सहजासहजी मिळत नाही. नवीन व्यवसाय सुरु करण्यास आवश्यक तो आत्मविश्वास किंवा मानसिक आधारही अनेक कुटुंबातून महिलांना मिळत नाही. व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी पत म्हणून महिलांच्या नावे स्थावर जंगम मालकीहक्क नसल्याने अडचणी भासतात. साधे पशुधनाची मालकी हक्क नसल्याचे सुद्धा दिसून येते. सांस्कृतिक आणि सामाजिक बंधनाच्या चौकटी, कौटुंबिक जबाबदारी, निर्णय क्षमतेचा अभाव, उत्पन्न मर्यादा, श्रमविभागणी अशा अनेक गोष्टींनी अनेकदा पशुसंवर्धन व्यावसायिक  म्हणून पुढे येण्यात महिलांना अडथळे येतात.

            अडचणींचे एवढे भलेमोठे डोंगर असूनही महिलावर्ग अजिबात ही खचून न जाता नवे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतानाचे आपल्याला दिसते. एकीचे बळ या म्हणीप्रमाणे समविचारी महिलांनी संघटित होऊन प्रयत्न केल्यास अडचणींवर नक्कीच मात करता येईल. आज आपण अमूल या गुजरात राज्यातील दूध संघाचे भव्य उद्योगातील रुप पाहतो. मात्र त्याच्या तळाशी गावपातळीवरील महिला वर्गांनी वेचलेले कष्ट सहज दिसतील. अशिक्षित महिला कामगारांनी आपल्या कुटुंबातील सुशिक्षित मुली मुले यांची मदत घेत पशुपालन क्षेत्राची तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती कायम घेत राहिली पाहिजे. सुशिक्षित महिला कामगारांनी जो व्यवसाय करावयाचा आहे त्याबद्दलची व्याख्याने, माहिती पुस्तक, प्रशिक्षणे, प्रक्षेत्र भेटी अशा माध्यमातून ज्ञानवृद्धी करायला पाहिजे. महिलांसाठी कार्यरत विविध संघटनांनी सेवाभावी संस्थांनी खास महिलांसाठी म्हणून शेळीपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती व्यवसाय, परसबागेतील कुक्कुटपालन अशा पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण वर्गाचे नियमितपणे आयोजन करायला हवे. काही संस्था किंवा बिगर शासकीय संघटनाच्या माध्यमातून अशी प्रशिक्षणे अथवा कार्यक्रम घेतली जातात मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच अनेकदा अशी असे कार्यक्रम शेतीतील हंगामी का काळात होत असल्याने महिला भरीव उपस्थिती दर्शवू शकत नाहीत. आज विविध कृषी प्रदर्शनात बचत गटाच्या माध्यमातून अनेक लघुउद्योग करणारे महिलांचे समूह दिसतात. अशांशी संवाद साधत बचत गटाचे व्यवस्थापन आणि निर्मिती व विक्री याबाबत इतर महिलांनी शिकून घेण्याचा प्रयत्न करावा.

            निमशहरी किंवा शहरालगतच्या भागातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग वगैरे व्यवसायात उत्तम संधी असतात. जसे देवस्थान लगतच्या भागात पेढे, शहरातील मोठ्या हॉटेल्सला लागणारे दूध, दही, पनीर, खवा, श्रीखंड यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवणे, पशुधनास लागणारे मुरघास, कांडीखाद्य, खनिज मिश्रणे बनवणे यासारखे लघुउद्योग करता येण्याची शक्यता पडताळून पहावी. गावपातळीवरील पशूसखी किंवा अनेक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात महिला पशुवैद्यकीय अधिकारी देखील कार्यरत असतात. त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा महिला म्हणून आपण जरूर प्रयत्न करावा. उत्साही स्वयंरोजगारासाठी धडपडणाऱ्या एखाद्या भगिनीस पशुसंवर्धन विषयक माहिती आणि मानसिक बळ देण्यात नक्कीच आनंद वाटेल

            शासन स्तरावर महिला केंद्री योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे अनुषंगाने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. मानव विकास निर्देशांकच्या परिमाणात महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग अशा महत्वपूर्ण बाबींवर 2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या माध्यमातून आज महाराष्ट्रात लाखाच्या आसपास बचतगट कार्यान्वित असून सुमारे 15 लाख महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

            आज भारतासारख्या विकसनशील देशात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता खाद्यान्नाची मोठी गरज भासणार हे उघड आहे. वातावरणातील बदल, अनियमित पर्जन्यमान, जमिनीचा उतरलेला कस, पीक पद्धतीत झालेले बदल, लागवड क्षेत्रातली घट, अनिश्‍चित बाजारभाव अशा अनेक कारणांमुळे आजच्या काळात “अन्नसुरक्षा” ही बाब महत्वाची होत आहे. अफाट लोकसंख्येला प्रथिनांचा स्वस्त आणि मुबलक स्त्रोत तसेच वनस्पतीजन्य महाग प्रथिनांना भक्कम पर्याय म्हणून दूध, अंडी, मांस अशा प्राणिजन्य प्रथिनांचा आहारामध्ये समावेश वाढत आहे. ही प्राणिजन्य प्रथिने बदलत्या आहारशैलीचा अविभाज्य भाग बनत असल्याने निश्चितच सर्वदूर बाजारपेठेत यास मोठी मागणी आहे, त्यामुळे विविध गटातील महिला भगिनींनी नेमकी ही संधी ओळखून या क्षेत्रात उपजीविका आणि रोजगारासाठी पुढे यायला हवे.

  • माहिती स्त्रोतः डॉ स्नेहल पाटील, पशुधन विकास अधिकारी

 (संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला)

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...