शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1522

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार

विविध विषयांची आढावा बैठक संपन्न

 नाशिक, दिनांक: 10 (जिमाका वृत्तसेवा) : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आरोग्य यंत्रणेकडून माहिती जाणून घेऊन त्याबाबत आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड-19, जलयुक्त शिवार अभियान, गोदावरी प्रदूषण नियंत्रण व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान व पंचनामे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. याबैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या अनुषंगाने बेडस् व ऑक्सिजनचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टेस्टींग लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यात हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर्स सुरू करण्यात येऊन त्या हेल्थ सेंटर्सचे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे ब्रँडिंग होण्यासाठी यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. या सेंटर्ससाठी  उपलब्ध करून देण्यात आलेला निधी सोयीसुविधांच्या अनुषंगाने लवकरात लवकर खर्च करण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पावार यांनी दिल्या आहेत.

जलयुक्त शिवार अभियान राबवत असतांना त्याअंतर्गत पाणलोट क्षेत्राचा विकास होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 231 गावांची जलयुक्त शिवर अभियान 2.0 अंतर्गत निवड करण्यात आली आहे. या अभियानांतंर्गत जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा,  प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY)(एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पूर्ण झालेली तसेच कार्यान्वीत असलेली गावे वगळून उर्वरित गावांपैकी काही गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 अंतर्गत गावकऱ्यांचा सहभागाने कामांचे नियोजन करण्यात यावे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयआयटी पवई यांच्या मदतीने उपाययोजना करण्याचे नियोजन करत आहे. त्याचप्रमाणे नदी प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येऊन दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे सांडपाणी नदीत मिसळते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच प्लास्टिक बंदीबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. जेणेकरून नदी  प्रदूषणामुळे येणाऱ्या पिढ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन संबंधित विभागांनी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.

मागील वर्षभरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन शासकीय रुग्णालयामध्ये असलेली ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले नवीन अत्याधुनिक आयसीयू बेडस् तसेच विविध प्रकारची यंत्रसामुग्री, प्रयोगशाळा याबाबत माहिती जाणून घेतली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. गिते यांनी सादरीकरणाद्वारे संबंधित विषयांची माहिती सादर केली.

00000000000

सहकार क्षेत्रात ‘जुनासुर्ला’ अग्रेसर व्हावे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 10 : ‘विना सहकार नाही उद्धार’, असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसं‌स्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि जुनासुर्लाने सहकाराच्या बाबतीत अग्रेसर व्हावे, अशा शुभेच्छा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, देवराव भोंगळे, हरीश शर्मा, अल्का आत्राम, चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, अमोल चुदरी, संजय येनुरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हावार, उपाध्यक्ष परशुराम नाहगमकर, मानद सदस्य माणिक पाटेवार, वासुदेव समर्थ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जुनासुर्ला येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या पतसंस्थेचे कार्यालय उभे झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. एखाद्या कार्पोरेट बँकेच्या इमारतीलाही लाजवेल, अशी ही सुसज्ज पतसंस्थेची इमारत आहे. प्रतिकार पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचितांना मदत मिळावी. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दूर होईल. या भागातील  लोकांना पतपुरवठा कमी पडत असेल तर प्रतिकार पतसंस्थेने अशांची मदत करावी, अशी अपेक्षाही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात प्रथमच सहकार मंत्री हे पद निर्माण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. केंद्र सरकारने प्रथमच मत्स्य आणि सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यामुळे देशात आता नीलक्रांती आणि सहकार क्रांती होणार हे निश्चित असल्याचेही ते म्हणाले. चंद्रपुरातील नागरिकांनीही मत्स्यसंवर्धन आणि सहकार क्रांतीत सहभागी व्हावे, असे अवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले.

जुनासुर्ला गावातील विकासासाठी आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या उभारणीसाठी मदत केली. रस्त्यांचा विकास करण्यात आला. गावाच्या विकासाबाबत केलेली मागणी नक्की पूर्ण करू अशी ग्वाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

००००००

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि 10 जिमाका : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबविलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे 125 वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव  देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समारंभाध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख, खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रवीण पोटे, परिणय फुके, श्वेता महाले, प्रा.अशोक उईके,  संस्थेचे कोषाध्यक्ष दिलिपबाबू ईंगोले, संदीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.  तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व बालरोग विभागाची नवीन वार्ड इमारत आणि आकस्मिक दक्षता कक्षाचे उद्घाटन केले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी हे कृषी प्रदर्शन मैलाचा दगड ठरलेच शिवाय जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात भारताचे नवे पाऊल टाकण्याचे काम या प्रदर्शनाने केले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याने काम केले पाहिजे यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी भाऊसाहेबांनी घेतलेले निर्णय मूलगामी परिणाम करणारे ठरले आहेत.

समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे आणि आपला महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचे श्रेय भाऊसाहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्याला  जाते. समाजातील गरीबी, जातीयता, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याचा विचार समोर ठेवून त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज हा वटवृक्ष शिक्षणाच्या विविध क्षेत्रात मानव संसाधनांची निर्मिती करणारे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

भाऊसाहेबांचे जाती प्रथा, अंधश्रद्धा निर्मुलन यासारखे समाजसुधारणेचे कार्यही बहुमोल आहे. अत्यंत ज्ञानी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या या नेत्याचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहाेचविण्यासाठी संस्थेने सुरु केलेल्या त्यांच्या स्मृती केंद्राच्या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. त्यांच्या जन्मस्थानी पापळ येथे कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल आणि संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून मेळघाटमधील रुग्णांना ने-आण करण्यासाठी संस्थेला बस उपलब्ध करुन देण्याची तर आमदार सुलभा खोडके यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था म्हणून धर्मशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करुन निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांच्या विचारांची देवाण-घेवाण शासनाने घडवून आणावी, तसेच कृषी महविद्यालये सरसकट बंद करू नयेत अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे संचलन प्रा. किशोर फुले तर आभार दिलिपबाबु ईंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य, कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

000000

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई दि १०: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना शाल, पुष्पगुच्छ तसेच ‘श्री गणेशाची’ मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दोन दिवसीय दौऱ्याचे अनुभव सांगितले. तसेच, अयोध्येत होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सन्मानार्थ रात्री भोजन आयोजित केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री तसेच आमदार, खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, ९ : महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी शरयू नदीवरील विशेष महाआरती करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज अयोध्या येथे शरयू नदीच्या किनारी झालेल्या महाआरतीत ते सहभागी झाले होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्याचे नाते खूप जुने आणि अतुट असे आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देश हा आस्थेने आणि श्रद्धेने पाहत आहे. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांचे खुल्या मनाने उत्तर प्रदेश वासियांनी उत्साहात स्वागत केल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा या परिसरात नियोजनानिमित्ताने आल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच अयोध्या नगरीत आल्यावर इथल्या जनतेने आपलेसे केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी शासन व प्रशासनातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शरयू नदीची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विशेष महाआरती झाली. शरयू नदीच्या संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली. संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी आतषबाजी करण्यात आली. राज्यातून खास गोंधळी लोककलेचे पथक शरयू नदीवर उपस्थित होते. महाआरतीच्या वेळी या पथकानेही आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
याप्रसंगी ‘लक्ष्मण किल्ला’चे मैथलीशरण महाराज, शशीकांत महाराज, उत्तप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह, राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्यातील आमदार यासोबतच खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, तसेच संत-महंत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

बीड, (जिमाका) दि. ९: मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा व मदतीपासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणेस दिले.
राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई , लिंबागणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मराठवाड्याबरोबरच विदर्भातील जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील नुकसान पाहणी साठी कृषी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत असे सांगून कृषी मंत्री श्री सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी  बीड जिल्ह्यात झालेले नुकसानीची माहिती देण्यात आली त्याची दखल घेत गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या फळबाग, मिरची, कांदा, भाजीपाला आदी पिकांची पाहणी केली. सोबतच पिंपरनई येथे वादळीवाऱ्यामुळे  शेतकऱ्यांच्या घरांची नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी संवेदनाशील होत यावेळी त्यांना धीर दिला.

महिला शेतकऱ्यांपुढे कृषी मंत्री झाले नतमस्तक

पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले असून गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे, असे पिंपर्वणी गावातील महिला शेतकऱ्यांनी कृषिमंत्री श्री सत्तार यांना सांगितले. शेतकरी व महिला व्यथा व वेदना मांडताना मंत्र्यांपुढे हात जोडत होत्या ते बघून स्वतः नतमस्तक होत कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी या आस्मानी संकटात पुढे शेतकरी हातबल झाला असला तरी राज्य शासन मदतीपासून नुकसान झालेल्या एका देखील शेतकऱ्याला वंचित राहू देणार नाही असा विश्वास दिला.
पावसाच्या तडाख्यामुळे व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात येईल असे यावेळी व्यथा मांडत असलेल्या ग्रामस्थ महिलांना त्यांनी सांगितले . जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांना यावेळी अडचणीतील नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकरराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर,  तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी श्री. गंडे यासह कुंडलिक खांडे, चंद्रकांत नवले, राजेंद्र मस्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीष ताठे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १३०२ योजनांना मंजुरी-  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ९ :  जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १३०२ योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दुर्गापूर येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे जलजीवन मिशन अंतर्गत ७.५ लक्ष क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे,  रामपाल सिंग सरपंच पूजा मानकर, उपसरपंच प्रज्योत बोरीकर, नामदेव डाहुले, आशिष देवतळे,  हनुमान काकडे, रोशनी खान, वनिता आसुटकर विलास टेम्भूर्णे,  नामदेव आसुटकर, अनिल डोंगरे, श्रीनिवास जंगम,  केमा रायपुरे, रूद्र नारायण तिवारी, अंकित चिकटे, संगीता येरगुडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता प्रशांत बुरडे, कार्यकारी अभियंता  विनोद उद्धरवार आदी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीबाबत दुर्गापूर परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी प्रलंबित होती. आज ती मागणी पूर्ण करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या टाकीच्या भूमिपूजनाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्माच्या पाच धर्मगुरूंच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात नळाद्वारे येणारे पाणी केवळ तहानच भागवणार नाही, तर या धर्मगुरूंचा आशीर्वाद सुद्धा पाण्याच्या रूपाने आपल्या घरात येईल.

कार्यक्रमाला येतांना वार्ड क्रमांक 3 मधील नागरिकांनी आपल्याला निवेदने दिली. निवेदन देताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विश्वास दिसत होता की, या परिसरातील समस्या आता पूर्णपणे निकाली निघतील. कारण या परिसराचा आमदार म्हणून जनतेने सदैव आपल्याला साथ दिली आहे. वार्ड क्रमांक ३ च्या ८० टक्के समस्या सोडविण्यात आल्या आहेत. उर्वरित छोट्या-मोठ्या नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढून नाली, पाणी सिमेंट रस्ते, ड्रेनेज आदी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देऊ. या परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्यात येणार होते, मात्र त्यासाठी आपण लढा दिला. त्यामुळे लोकांचे घर वाचले. आता मंत्री असल्यामुळे विकास कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सिद्धार्थ चौकापासून मोहर्लीपर्यंतच्या सिमेंट रस्त्यासाठी २० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभा केला. आता या मुख्य रस्त्यावरील वॉल कंपाऊंडवर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती निर्माण करण्यात येईल. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गत सात महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे आपल्या कानावर आले आहे. पुढील सात दिवसात सर्व कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुर्गापूर येथील नागरिकांनी नेहमीच प्रेमाचे कर्ज दिले आहे. आता विकासाचे व्याज देण्याची जबाबदारी माझी आहे. राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. असंघटित कामगारांना आता सुरक्षा कवच राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना आता 6 हजार रुपयांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लक्ष्यावरून थेट पाच लक्षापर्यंतचे उपचार राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. निराधार, परितक्त्या, घटस्फोटीत महिला आदींच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याची घोषणा नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

केंद्र सरकारने ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरविले आहे. जिल्ह्यात रमाई योजनेअंतर्गत ५ हजार घरकुल आपण मंजूर केले असून अजून 2700 घरकुल शिल्लक आहेत. आदिवासी बांधवांनासुद्धा शबरी घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात आपल्या जिल्ह्याचा कोटा वाढविण्यात येईल. म्हाडामध्ये महाप्रीत अंतर्गत १० हजार घरे बांधण्याचा आपण संकल्प केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विकासाची २०५ कामे पूर्ण करण्यात आली आहे. मुलींना आकाशात झेप घेता यावी म्हणून एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर – बल्लारपूर रस्त्यावर उभे करण्यात येत आहे. यात कौशल्य विकासाचे ६२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतील. या विभागाच्या विकासासाठी आपण नेहमीच अग्रेसर आहोत. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, सिंचन, मिशन कोहिनूर, मिशन जयकिसान याला आपले प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता श्री. बुरडे म्हणाले, दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेची मंजूर किंमत १५ कोटी ३३ लक्ष इतकी असून सदर निविदेचा कालावधी १५ महिने (३० एप्रिल २०२४) पर्यंत आहे. या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घर जोडणी संख्या २९०५ आहे. यात १०० टक्के प्रमाणात नळ जोडणी होणार आहे.

या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर उपांगे जसे, जोडनलिका, अशुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, अशुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, शुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, पाण्याची उंच टाकी, वितरण व्यवस्था, पुश थ्रु रोड क्रॉसिंग, किरकोळ कामे व बंधारा आदी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक सभागृहातून मानवतेचा संदेश जावा- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 09 : सामाजिक सभागृहाचा उपयोग समाज एकत्र राहावा, विविध संस्कारक्षम विचारांवर येथे संवाद होवून जीवन जगण्याचा खरा सत्याचा मार्ग शोधता यावा तसेच या सभागृहातून मानवतेचा संदेश जावा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

25/15 ग्रामीण विकास निधी अंतर्गत ऊर्जानगर, केसरीनंदन नगर येथील 40 लक्ष रुपये निधीतून निर्मित सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ऊर्जानगरच्या सरपंच मंजुषा येरगुडे, उपसरपंच अंकित चिकटे, रामपाल सिंह, नामदेव डाहुले, माजी पंचायत समिती सभापती केमा रायपुरे,

माजी जिल्हा परिषद सदस्य वनिता आसुटकर, नामदेव आसुटकर, चंद्रप्रकाश गौरकार, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष उत्तमराव पाटील व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्थमंत्री असताना येथील नागरिकांच्या मागणीनुसार 25/15 ग्रामविकास या शिर्षाखाली 40 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून या सभागृहाचे बांधकाम झाले. सभागृहाचे निर्माण हनुमान मंदिराच्या बाजूला करण्यात आले आहे. या सभागृहाचा उपयोग समाजाला एकत्र ठेवण्यासाठी करावा. एकविसाव्या शतकात माणूस माणसापासून दूर चालला आहे. इमारती उंच झाल्यात माणसे मात्र खुजी झाली. सभागृहे मोठी, भव्यदिव्य झाली पण माणसाचे हृदय मात्र संकुचित झाले आहे. त्यामुळे या सभागृहातून सेवेचा झरा वाहावा. सांस्कृतिक विषय, अध्यात्मिक, प्रेम, सहकार्य, सेवा,पर्यावरण व आपुलकी तसेच या सभागृहातून उत्तमातून उत्तम मनुष्य घडविण्यासाठी विचार व्हावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

कोंडी (नेरी)दुर्गापुर येथे काँक्रीट रोड बांधकामाचे लोकार्पण

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कोंडी (नेरी) येथे 30 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले म्हणाले, दोन वर्षाअगोदर मुख्य रस्त्याला जोडून असणाऱ्या रस्त्याचे आपण लोकार्पण केले. मात्र, पुढचाही सिमेंट रस्ता करावा अशी मागणी या प्रभागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी केली होती. या काँक्रीट रस्त्यासाठी खनिज विकास निधीतून 30 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला व आज या रस्त्याचे लोकार्पण पार पडत आहे.

या गावातील पाणीपुरवठा योजना, पिण्याचे शुद्ध पाणी (आरो), एलईडी लाईट तसेच वार्ड क्र. 3 चा प्रश्न सोडवण्यासाठी 26 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तुकूमपासून मोहर्लीपर्यंतचा रस्ता अप्रतिम होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर दुर्गापुरचा रस्ता अप्रतिम करण्यात येईल. या रस्त्यावरून जो कोणी जाईल तेव्हा निश्चितपणे नागपूरच्या जी-20 नंतर झालेल्या रस्त्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, इतके सुंदर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची नोंद इतर जिल्ह्यांनी घ्यावी, असे आपले स्वप्न व ध्येय असल्याचे ते म्हणाले.

बल्लारपूर मतदार संघाइतका विकास महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या मतदारसंघात झालेला नाही. या अर्थसंकल्पात साधारणतः पद्मापूर ते मोहर्ली रस्ता उत्तम करण्यासाठी 20 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.

तसेच दुर्गापूर ते ट्राफिक ऑफिस हा सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी 6 कोटी रु. तर पूर्ण रस्ता, लाईट व इतर गोष्टीसाठी 7 कोटी 30 लक्ष मंजूर केले आहे. रमाई आवास व शबरी आवास योजनेतून दुर्गापुर वासियांना घरे बांधून देण्यात येणार आहे. तसेच 14 एप्रिल रोजी भटक्या जमातीच्या लोकांसाठी 2803 घरांचे चेक देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पारंपरिक खेळ खेळण्याकरिता मुलींसाठी स्टेडियम उभारणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 9 : क्रीडा क्षेत्रात आपले राज्य पुढे जावे व राज्यात चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त आपल्या जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर क्रीडा संकुल, बल्लारपूर क्रीडा संकुल आणि सैनिक शाळेत हे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहेत. आता चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत असून या उपकेंद्रात पारंपरिक खेळ खेळण्यासाठी मुलींकरिता अत्याधुनिक इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुल येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर नागपूर विभाग क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विदर्भ कुस्तीगीर संघटनेचे सचिव गणेश कोहळे, विदर्भ केसरी संजय तिरडकर, श्री. वसुले, श्री. पाटणकर आदी उपस्थित होते.

वाघाच्या भूमीत सर्व खेळाडू वाघासारखाच पराक्रम दाखवतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुल वासीयांसाठी राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन ही अभिमानाची बाब आहे. संध्या गुरनुले, प्रभाकर रणदिवे तसेच येथील येथील क्रीडाप्रेमींनी तालुका स्तरावर या स्पर्धा घेण्यासाठी आपल्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यांची ही मागणी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांना सांगितल्यावर त्यांनी मूल येथे या स्पर्धा घेण्यासाठी होकार दर्शविला.

2019 मध्ये राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियम निर्माण करण्याची घोषणा आपण केली होती. त्यानुसार काही स्टेडियम अत्याधुनिक झाले. जुबली हायस्कूलच्या जागेवर शहीद बाबुराव शेडमाके स्टेडियम तयार करण्यात येईल. तालुका स्तरावर प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन अत्याधुनिक जीम तयार करण्याचे निर्देश आपण दिले आहे. वन अकादमी मध्ये स्टेडियम करिता 15 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. विसापूर येथील सैनिक शाळा देशातील उत्तम सैनिक शाळा असून येथील फुटबॉल ग्राउंड युरोप सारखे आहे. त्यामुळेच जुलैमध्ये सिनेस्टार येथे फुटबॉल खेळण्यासाठी येणार आहेत. राज्यात पोलिस विभागाचे सर्वात सुंदर जिम चंद्रपुरात आहे.

प्रस्तावित एस.एन.डी.टी. विद्यापीठात लगोरी, खो-खो यासारख्या पारंपरिक खेळांसाठी स्टेडियम तयार करण्यात येईल. फक्त मुलींसाठी देशातील हे पहिले स्टेडियम राहणार आहे.

विविध स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोहिनूर निवडण्यात येईल. मिशन कोहिनूर अंतर्गत उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी शक्तीने भाग घ्यावा. आपले उत्कृष्ट प्रदर्शन येथे करावे. पराजय झाला तरी निराश होऊ नका, वाघाच्या भूमीतून प्रेरणा घेऊन जा, असे आवाहन त्यांनी सर्व खेळाडूंना केले. तसेच येथे आलेल्या सर्व खेळाडूंना व त्यांच्या पालकांना मोफत ताडोबा सफारी करण्यात येईल. त्यासाठी क्रीडा विभाग, वन विभाग तसेच पालकमंत्री कार्यालयाने त्वरित नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

क्रीडा उपसंचालक शेखर पाटील म्हणाले, राज्यात पहिल्यांदाच तालुका स्तरावर भव्य दिव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान आहे. येथे आलेल्या खेळाडूंनी सर्वोत्तम सर्वोत्तम प्रदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले, सुरुवातीला या स्पर्धा रायगड जिल्ह्यात होणार होत्या. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील क्रीडाप्रेमींची मागणी क्रीडामंत्र्यांच्या कानावर टाकली आणि या स्पर्धा मुल येथे खेचून आणल्या. या स्पर्धेसाठी पालकमंत्र्यांनी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खेळाडूंसाठी जेवण, निवास व्यवस्था आदी उत्तम सोयी देण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी केले होते. त्यानुसारच सर्व सोयी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी नकुल राऊत व विजय तेलमसरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पोंभूर्णा तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे 23 लाख रुपये परत मिळून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षक उमेश कडू तर आभार मुलचे तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...