शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1521

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली माझोड येथील पीक नुकसानीची पाहणी

अकोला,दि.10 (जिमाका)-   अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी आज अकोला तालुक्यातील माझोड येथे प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले. त्यांचे समवेत आमदार वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चौकशी केली. तातडीने पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आश्वस्त केले.

00000

ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : मुंबईत भाऊचा धक्का आणि ससून डॉक प्रमुख मच्छिमार बंदरे आहेत. येत्या  वर्षभरात ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ससून डॉक विकासासंदर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मच्छिमारांच्या सुविधांसाठी मिरकरवाडा, भाऊचा धक्का आणि ससून डॉक हे तीन बंदरे विकसित करण्यात येत आहेत. मत्स्य उत्पादन, विक्रीसाठी मच्छीमार बांधवांना हक्काच्या बाजारपेठेसाठी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार आहे. ससून डॉकचे आधुनिकीकरण करुन सर्व वितरण सुविधा वर्षभरात उपलब्ध करण्यात येतील.

 

ससून डॉक प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 5.39 हेक्टर असून याबाबत सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत वेगवेगळी 31  प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ससून डॉक येथे आता 1 हजार 669 कार्यरत नौका, तर 11 हजार 838 मच्छिमार असून या सर्वांना सोयीसुविधा मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार अल्स्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ससून डॉक येथे नवीन मत्स्य लिलाव आणि मत्स्य हाताळणी केंद्र, जाळी विणकाम गृह, ॲप्रोच रोड तसेच रस्ते काँक्रीट आच्छादनासह रस्त्यांची सुधारणा, बर्फ कारखाना, मल:निस्सारण/ विषारी कचरा संकलन केंद्र, कचरा कुंड्या, सुरक्षा भिंत, मासळी हाताळणी यंत्रणा, हवा हाताळणी यंत्रणा, सध्या असलेल्या इमारतींचे आधुनिकीकरण, मच्छिमारांकरिता विश्रांतीगृह, महिलांकरिता विश्रांतीगृह, सुरक्षारक्षक गृह, व्हिक्टोरिया बेसिनचा गाळ उपसणे, मत्स्य बंदरावर सीसीटीव्ही निगराणी, प्रसाधनगृहांचे नूतनीकरण, रेडिओ कम्युनिकेशन टॉवर साहित्यांसहित, विद्युत पुरवठा व वितरण व्यवस्था, पाणीपुरवठा जलवाहिनी, पंप हाऊस, भूमीगत पाण्याची टाकी, शुध्द पाणी आणि इंधन पुरवठा, अग्निशमन उपकरणे, जेट्टीचे सक्षमीकरण, स्लीप वे अशी कामे करण्यात येणार आहेत.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली चौकशी

अकोला,दि.10 (जिमाका)-  बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे भेट देऊन उपचार घेणाऱ्या जखमींची  आपुलकीने चौकशी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे आज दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी आले. त्यांचे समवेत आमदार वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे आदी उपस्थित होते. या सर्व जखमींची श्री. महाजन यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना दिल्या जात असलेल्या उपचार सुविधांची माहिती घेतली.

अकोला येथील रुग्णालय व्यवस्थापन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कामकाजात सुधारणा होण्यासाठी तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आपण लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहोत. त्यात हे प्रश्न सोडविण्याचा व जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. आरोग्य विभागातील वर्ग 3 व 4 ची पदे भरण्याची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करु, असेही त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

मृतांच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे  मदत देण्यात येईल याशिवाय जखमींना मदत व उपचार सुविधा शासनातर्फे पुरविण्यात येईल, असेही श्री. महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

00000

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय व वसतिगृह इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि. १० : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण अमरावती केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत व वसतिगृह इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नवीन प्रशासकीय व वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, सुलभाताई खोडके, अशोक उईके, रामदास तडस, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, प्र. शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण अमरावती प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता पकडे (यावले) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन प्रशासकीय तसेच वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १९ कोटी रुपये खर्च आला असून अद्ययावत तंत्रज्ञानाने या दोन्ही इमारती सुसज्ज आहेत. प्रशासकीय इमारतीमध्ये २०० विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या वातानुकूलित वर्ग खोल्या, अद्यायावत ग्रंथालय, कम्प्युटर हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, ऑडिओ-व्हिडिओ हॉल, संचालक कक्ष तसेच कार्यालय अशा १४ कक्षांच्या समावेश आहे.

वसतिगृहामध्ये १२० मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था असून ६० खोल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी ग्रीन बिल्डींग संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. इमारतीमध्ये अद्ययावत श्रोतागृह ध्वनीरोधक व्यवस्थेसह स्थापन करण्यात आले आहेत. तसेच इमारतीच्या छतावर शंभर किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती प्लाँटची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थी केंद्री इमारतीच्या बांधकामाबाबत श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

000

मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. १० : रिद्धपूर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्त्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी समिती १५ दिवसात स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत श्री. फडणवीस यांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे आढावा घेतला व त्यानंतर श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री गोविंदप्रभू राजमठ, श्री यक्षदेव बाबा मठ, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्राला भेट दिली. खासदार डॉ.अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार परिणय फुके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रणजीत कुमार शुक्ल, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, निवेदिता चौधरी यांच्यासह गोपीराज बाबा शास्त्री, मोहनदास महाराज, यक्षदेव बाबा बीडकर, बाभुळकर बाबा शास्त्री, वैरागी बाबा, कारंजेकर बाबा, वाईनदेशकर बाबा शास्री आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे, तशीच ती मराठी भाषेचीही काशी आहे. विद्यापीठाचे काम पुढे नेण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल. विद्यापीठाच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींसाठी निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे, श्री यक्षदेव महाराज मठ येथेही भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे उपमुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात आला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे रिद्धपुर येथे सुरू केलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्रालाही श्री. फडणवीस यांनी भेट दिली.

000

 

 

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 10 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, सुलभाताई खोडके, अशोक उईके,  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, प्र. शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.  संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व येथे घडली. आपल्या मातोश्रींचे शिक्षण याच संस्थेत झाले. याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही संस्थेसाठी ‘शताब्दी’ ही  ‘इतिश्री’ नसून एक नवीन टप्पा असतो. या संस्थेने एकल विद्यापीठापर्यंत जाण्याचा मानस ठेवला आहे. संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. शासनाने यासाठी 25 कोटी रुपये दिले आहेत. संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. एकल विद्यापीठासाठीही शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. संस्थेने ‘आयकॉनिक संस्था’ म्हणून विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करावा. या संस्थेला जेव्हा 125 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा संस्थेचा गौरव केवळ विदर्भात नव्हे तर राज्यभर व्हावा, या दृष्टीने प्रयत्न व्हावा ,असेही ते यावेळी म्हणाले .

श्री  हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. रिद्धपुर येथे मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. अमरावती येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल . शैक्षणिक हब म्हणून जिल्ह्याचा विकास होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येणार आहे. भारत हा ‘युवकांचा देश ‘आहे . येथील युवा लोकसंख्येला मानव संसाधनांमध्ये परावर्तित करून विकास साधण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांनी  संस्थेच्या निर्मितीपासून आजवर झालेल्या प्रगतीची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या ब्रिटिश काळातील किंग एडवर्ड कॉलेज व सध्याच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या संस्थेची सुरवात लोक वर्गणीतून झाली. या  संस्थेला सन 2021 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला .संस्थेत आज 22 अभ्यासक्रमांचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे ही आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली .

कार्यक्रमाचे संचालन मंजुषा वाठ यांनी तर आभार साधना कोल्हेकर यांनी मानले.

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई, दि. १०: राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला.

दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे :

अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,

नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,

पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार,

छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.

एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

तूर, चना, उडीद डाळींचा साठा संकेतस्थळावर अद्ययावत करावा – शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे

मुंबई, दि. 10 : राज्यातील तूर, चना व उडीद या डाळींचा संबंधित आस्थापनांकडे असलेला साठा https://fcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून आठवड्यातून किमान एकदा (दर शुक्रवारी) अपलोड करावा, अशा सूचना मुंबईचे शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिल्या आहेत.

तूर, चना व उडीद या डाळींच्या साठ्याच्या अनुषंगाने साठ्याचे प्रकटीकरण, निरीक्षण आणि पडताळणीबाबत केंद्र सरकारने 29 मार्च 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील तूर, चना व उडीद या डाळींचा साठा आठवड्यातून किमान एकदा ग्राहक व्यवहार विभागाच्या https://fcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून अपलोड करावा. तसेच तूर, चना व उडीद या डाळींची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. बगाटे यांनी म्हटले आहे.

०००००

श्री.गोपाळ साळुंखे/स.सं./

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. 10 (विमाका वृत्तसेवा) : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देऊन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराणे, तर सटाणा, शेमळी, अजमोर – सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापूर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी 8 एप्रिल,2023 रोजी बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाणचे प्रांत बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी  निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डाळिंब, पपई व इतर पिकांच्या  झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शन

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या भाषणातून केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

राज्यात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील बंदाघाट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग याबद्दल माहिती देत आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.

000

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...