शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1523

आदिवासी विकास विभागात राज्यातील ६४५ रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित- डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक. 9 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा):  राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व  वर्ग-चार कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांमुळे राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कुल येथील प्रांगणात रोजंदारी पदावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आल्याचे नियुक्ती आदेशाचे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉ.हिना गावित, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल, सहाय्यक प्रकल्पाधिकारी संजय काकडे, सायरा बानू हिप्परगे, किरण मोरे, संजय चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर आदि उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आज नंदुरबार प्रकल्पांतील नंदुरबार, नवापूर ,शहादा येथील 113 वर्ग-चार कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तींचे आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करुन लाभ मिळणारअसून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, मागील काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कंत्राटी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले होते तर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री असताना राज्यातील 1 लाख 35 हजार अनुशेषाचे रिक्त पदे भरण्यात आली होती तर 50 हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदे ऑगस्ट पर्यंत भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी अनेक आंदोलन,निवेदन देण्यात आली होती याचा पालकमंत्री डॉ.गावित यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात आले असून आदिवासी विकास विभागातील दहा वर्ष पूर्ण झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे, त्यामुळे कायम झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच पालकमंत्र्यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप  करण्यात आले.

व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे- नरेंद्र पाटील

             सांगलीदि. ९, (जि. मा. का.) : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांच्या कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका समन्वयकाची नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभार्थी – बँक संवाद मेळावा धनंजय गार्डन हॉल, सांगली येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख, दिपक शिंदे, पृथ्वीराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

            श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे 60 हजार लाभार्थी असून विविध बँकांनी जवळपास 4 हजार 62 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. शासनाने 390 कोटींचा व्याज परतावा महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिला आहे. कर्ज वाटपात सांगली जिल्ह्यातही चांगले काम झाले असून महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 24 कोटींचा व्याज परतावा लाभार्थ्यांना दिला आहे. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखाहून 15 लाखापर्यंत वाढविण्यात आली असून व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्ष इतके आहे. सामान्य व्यवसाय करणाऱ्यांनाही कर्ज पुरवठा महामंडळाकडील योजनांमधून होतो. छोट्या उद्योगासाठी दोन लाखापर्यंतचे कर्ज प्रोजेक्ट रिपोर्ट विना मिळू शकते. ट्रॅक्टर योजनाही लवकरच सुरू करणार आहोत. महामंडळाच्या लाभार्थ्यांना थेट मॅन्युफॅक्चरकडून विशेष सवलतीमध्ये ट्रॅक्टर मिळण्यासाठी मागणी केली असल्याचे ते म्हणाले.  अडचणी अनेक आहेत पण त्यावर मात करण्याचे काम केले पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध बँकाच्या स्टॉल्सला भेटी देवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, बऱ्याच विद्यार्थ्यांची फी भरण्याची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तसेच डीग्री घेतल्यानंतर पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी व कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

            आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांची कर्ज प्रकरणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मंजूर करण्यास सुरूवात केली असून 5 कोटी 52 लाखाची कर्ज प्रकरणे मंजूर करून वितरीत केली आहेत. महामंडळाच्या योजनांचा युवकांना लाभ देण्यासाठी तालुकानिहाय बँकेचे अधिकारी नेमून पाठपुरावा केला जाईल. ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज वितरणात अव्वल आहे त्याचप्रमाणे युवकांच्या बाबतीतही बँक चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            यावेळी उपस्थित विविध बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन करताना कर्ज प्रकरणात प्रोजेक्ट रिपोर्ट महत्वाचा असल्याचे सांगितले.

            प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेतलेल्या यशस्वी लाभार्थ्यांचा व कर्ज वितरणात उत्कृष्ट काम केलेल्या बँक प्रतिनिधींचा तसेच शाहीर प्रसाद विभूते यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

            प्रास्ताविकात महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी महामंडळाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली व आभार मानले.

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. ९ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री

नवी दिल्ली, ९ : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निणर्यांची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील वातावरण भक्तीभावाने भारावलेले असून श्री राम मंदिराच्या गर्भगृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंदिराचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. तसेच हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी मंदिर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

नवी दिल्ली, ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्रीमहाराष्ट्रातील मंत्रीखासदारआमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उभयतांनी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी  करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलग्राम विकास मंत्री गिरीष महाजनबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईरोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेकामगार मंत्री सुरेश खाडेशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरउद्योग मंत्री उदय सामंत यासोबतच खासदार राहुल शेवाळेश्रीकांत शिंदेहेमंत पाटीलकृपाल तुमाणेसदाशिव लोखंडेश्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

ईस्टर निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई दि. 9 : ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण आजही सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील  खरबूज लागवड तंत्रज्ञान

बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.

भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी ‘मूल्य साखळी विकास कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पॉलीहाऊस खरबूज (हॅगींग) उत्पादन तंत्रज्ञान

खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीकडेच्या क्षेत्रात होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्वावर पॉलीहाऊसमध्येही करण्यात येत आहे. पॉलीहाऊसमधील नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड करता येते. पिकाचा कीड व रोग यापासून चांगल्याप्रकारे संरक्षण करता येते. फळधारणा चांगल्या प्रकारे होते, तसेच पाणी आणि खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू व दुर्गापुरा मधु या वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे. पॉलीहाऊस मध्ये खरबूजाची लागवड करण्यासाठी  नोन यु कंपनी या कंपनीचे मधुमती, अलीया, माधुरी-२ या वाणांची शिफारस केली आहे.  पॉलीहाऊसमध्ये लागवड करताना उंच गादीवाफे तयार करून खरबूजाची लागवड केली जाते.

दोन गादीवाफ्यामधील अंतर ४ फुट  आणि दोन रोपांमधील अंतर १.५ फुट ठेवावे. गादीवाफा उंची १.५ फुट व रुंदी २ फुट असावी. १० गुंठ्यामधील रोपांची संख्या २ हजार ४०० ते २ हजार ४५० इतकी असावी.

छाटणी व परागीभवन तंत्रज्ञान

मुख्य वेलीला येणाऱ्या बाजूच्या फांद्या वेळोवेळी काढणे अत्यंत गरजेचे असते. येणाऱ्या पहिल्या ७ ते १० पानानंतर पहिल्या फळांची फलधारणा करून घेणे गरजेचे आहे. परागीभवन योग्य वेळ सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६ या कालावधीमध्ये करावे. एका वेळी शक्यतो एकच फळ ठेवावे. परागीभवन करत असताना वातावरणातील आदर्ता ८० टक्के असावी.

परागीभवन केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांमध्ये खरबुजाचे फळ काढणीस तयार होते.फळ   काढणीस आल्यानंतर  रीफ्रॉक्टोमीटरच्या सहाय्याने यातील साखरेचे प्रमाण १४ ते १५ ब्रिक्स झाल्यानंतर याची काढणी करावी. प्रत्येक वेलीला साधारणतः १.५ ते २.० किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळते.

 खरबूज पिकाचे पाणी व्यवस्थापन

खरबूज हे पिक अत्यंत जास्त पाण्याला बळी पडणारे पिक असून, यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन या पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे असून शक्यतो ४ लिटर प्रति तास क्षमता असणारी डिप लाईनची निवड करावी. ढगाळ वातावरण असेल तर अतिशय कमी पाणी लागते. खरबुजाला फळधारणा तसेच फळ फुगवण कालावधीमध्ये जास्त पाणी लागते. २ ते ३ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन याप्रमाणे आपण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

 खरबूज पिकाचे खत व्यवस्थापन

प्रति हेक्टर २०० :१००: १०० नत्रः स्फुरद : पालाश प्रती हेक्टर द्यावे. नायट्रोजनची मात्रा लागवड करतेवेळी तसेच वाढीच्या अवस्थेमध्ये करावी. फॉस्परस करिता सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर करावा. पोटॅश हा घटकदेखील वाढीच्या सुरवातीपासून लागतो या प्रमाणे याचे नियोजन करावे. मायक्रोन्यूट्रियंट व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही संतुलित वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. फळाला छेद जाऊ नये म्हणून सुरवातीपासून कॅल्शियम व बोरॉन या दोन्ही अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे महत्त्वाचे असते.

काढणीपश्चात व्यवस्थापन

पक्व फळे काढल्यानंतर कोरोगेटेड बॉक्समध्ये फोमनेटच्या सहाय्याने पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठविली जातात. प्रती वेल १.५ किलोपर्यंत फळे मिळतात. भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये पॉलीहाऊस मध्ये भारतीय पद्धतीने मातीमध्ये व डच पद्धतीने कोकोपीट यो बॅग्ज (हायड्रोपोनिक्स) या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यात आलेली आहे.

कोकोपीट मधील खरबूज लागवड

कोकोपीट हे मुख्य माध्यम वापरूनदेखील  खरबूज  लागवड करता येते. कोकोपीट हे पूर्णतः निर्जतुकीकरण केलेले असावे यामध्ये कोणत्याही बक्टेरिया अथवा बुरशीचा प्रादुर्भाव नसावा. याचा सुरवातीचा विद्युत वाहकता (ईसी) साधारणतः १ ते १०ms/cm व सामू हा ५.५ ते ६.५ पर्यंत असावा. तसेच सोडियमचे प्रमाण ९  टक्क्यापेक्षा कमी असावे. कोकोपीट हे लगेच सुकत असल्यामुळे यामध्ये सुरवातीला थोड्या प्रमाणात वर्मीक्यूलाईट  या माध्यमाचा वापर करावा.

पाणी व्यवस्थापन करत असताना प्रति दिन १ ते २ लिटर प्रति चौ. मी या प्रमाणात व्यवस्थापन करावे. प्रत्येक बॅगला पाणी निचरा व्यवस्था असावी. खत व्यवस्थापन हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने करावे लागते. यामध्ये विद्युत वाहकता व सामुचा आधार घेऊन सर्व खतांचे मिश्रण तयार करून वापरणे गरजेचे असते. पाणी व खते यामध्ये २५ टक्के बचत होते. कोकोपीट मधील खरबूज पिक ८ ते १० दिवस लवकर तयार होते. पुन्हा तेच माध्यम वापरून आपण लागवड करू शकतो.

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलीहाऊसमधील (हॅगींग) खरबूज लागवड केली जाते. पॉलीहाऊसमधून खरबुजाचे उत्पादन चांगले मिळते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खरबुजाचे पीक घ्यावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन यशवंत जगदाळे (विषय विशेषज्ज्ञ उद्यानविद्या-भाजीपाला गुणवत्ता केंद्र) यांनी केले आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी  वितरण

मुंबई दि. ८: नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या कलेच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने  दि.१० एप्रिल २०२३ रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये एक लक्ष, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सन्मानित केले जाणारे मान्यवर:

नाटक : कुमार सोहोनी(2020) गंगाराम गवाणकर (2021), कंठसंगीत :  पंडितकुमार सुरशे (2020)  कल्याणजी गायकवाड (2021),उपशास्त्रीय संगीत :  शौनक अभिषेकी (2020)  देवकी पंडीत (2021),चित्रपट ( मराठी) :  मधु कांबीकर (2020)   वसंत इंगळे (2021), किर्तन :  ज्ञानेश्वर वाबळे  (2020)   गुरुबाबा औसेकर (2021),शाहिरी :  अवधूत विभूते (2020)  कै. कृष्णकांत जाधव(मरणोत्तर) (2021),नृत्य :  शुभदा वराडकर (2020)   जयश्री राजगोपालन (2021),कलादान :  अन्वर कुरेशी  (2020)   देवेंद्र दोडके (2021),वाद्यसंगीत : सुभाष खरोटे  (2020)   ओंकार गुलवडी  (2021), तमाशा :  शिवाजी थोरात (2020)   सुरेश काळे (2021),लोककला :  सरला नांदुरेकर (2020)    कमलबाई शिंदे (2021),आदिवासी गिरीजन :  मोहन मेश्राम (2020)   गणपत मसगे (2021) या मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या पुरस्कार प्रसंगी उत्सव महासंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळूंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदी कलाकारांचे नृत्य, नाटय, भक्ती, संगीत, रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण होणार आहे. या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००

स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.८ : स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती काम करताना संवेदना असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान २०२२-२३ करीता आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

जमशेद भाभा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस (एन.सी.पी.ए.), नरीमन पॉईंट, मुंबई येथे यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि विश्वस्त श्रीमती दीपाली भानुशाली, डॉ एस.एस. मुंद्रा, यशराज रिसर्च फाउंडेशनचे सल्लगार डॉ.डी. के. जैन, प्रो. राम चरण, प्रो. गोविंदराजन पद्मनाभन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्था समाजाप्रती काम करताना त्यांच्यामध्ये संवेदना असतात. जे लोक समाजाप्रती काम करतात, ज्यांचे कार्य चांगले असते त्यांच्या पाठीमागे समाज उभा असतो. यशराज रिसर्च फाऊंडेशनचे समाजाप्रती अत्यंत चांगले कार्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या तीन श्रेणीतील काम चांगले आहे. या तीन श्रेणीवर शासन काम करत आहे.

यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम या श्रेणीसाठी ‘सर्च’ (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. अभय बंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथील  प्रा. नवकांता भट यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लोकांचे जीवनमान उंचावणे या श्रेणीत ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सरोज महापात्रा यांनी स्वीकारला आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी डॉ. अजय भूषण पांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्च (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस व येथील  प्रा. नवकांता भट यांना  प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि प्रदान (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस आणि डॉ. अजय भूषण पांडे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात आली. यावेळी डॉ.अजय पांडे यांनी पुरस्काराची एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री साहाय्यता निधीमध्ये देत असल्याचे जाहिर केले.

2022-2023 साठी यशराज भारती सन्मान खालील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम : या सन्मानाची 2 श्रेणीत विभागून देण्यात आला. पहिली म्हणजे सर्च (SEARCH), गडचिरोली या संस्थेची जी दुर्गम भागात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. जी की विशेषत: नवजात बालकांच्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करते. या श्रेणीतील दुसरे सन्मानकर्ते प्रा. नवकांता भट आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे जो एकाच कन्सोलद्वारे अनेक निदान चाचण्या करतो. या मशिनच्या विकासामुळे आरोग्य सेवा क्षेत्रावर मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे आणि ते अधिक कार्यक्षम आणि परवडणारे आहे.

लोकांचे जीवनमान उंचावणे: या वर्षासाठी हा सन्मान ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस देण्यात आला. ही संस्था बऱ्याच काळापासून विकास क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेने जवळजवळ 19,47,979 कुटुंबांपर्यंत मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ही संस्था महिला विकास आणि लिंग संवेदना याविषयावर चांगले काम करत आहे.

एथिकल गव्हर्नन्स : या श्रेणीसाठी हा सन्मान डॉ. अजय भूषण पांडे यांना देण्यात आला. डॉ.पांडे हे महाराष्ट्र केडरमधील सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सध्या एप्रिल, 2022 पासून राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गेल्या दशकभरात, डॉ. पांडे यांनी वित्त, आधार, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रात योगदान दिले आहे.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली, ८ :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आज पासून उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. शिंदे यांचे स्वागत केले. तसेच उत्तर प्रदेश वासियांनी श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.

या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीष महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री  तसेच आमदार सहभागी आहेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार  आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या  येथे ‘प्रभू श्री रामचंद्र’ यांचे दर्शन घेतील.

०००

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...