शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1520

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे दि. ११ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी महात्मा फुले यांच्या निवास्थानी असलेल्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी भिडेवाडा येथेही भेट देऊन महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन केले.

000

अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

यवतमाळ, दि ११ एप्रिल :  सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे.  या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा  कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी  प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा  लाभ देण्यात येतो.

सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.

बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.

काय आहे योजनेचा उद्देश?

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न  प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.

कोठे संपर्क करावा

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

कोणते अन्नप्रक्रिया उद्योग

दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,

लस्सी.

■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,

आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट

प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व

प्रकारची तेल उत्पादने.

■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,

ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.

■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य

इत्यादी.

■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे

इत्यादी.

■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.

■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.

                                                   000

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ११, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकरी  रेखा सुनिल परीट यांच्या अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्ष बागेची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‍विषय मांडून शेतकऱ्यांना नुकसानीबाबत मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, प्रकल्प संचालक आत्मा जी. घोडके, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोजकुमार वेताळ, तहसीलदार जीवन बनसोडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात 20 गावातील 92 शेतकऱ्यांचे 34.85 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष, आंबा, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती घेवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत ‍मिळवून देण्यसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी ‍दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तहसिलदार व कृषि अधिकारी यांना सूचना दिल्या.

अवकाळी पावसामुळे ७  एप्रिल रोजी डफळापूर गावच्या शेतकरी रेखा परीट यांच्या 17 गुंठे द्राक्ष बागेचे पूर्ण नुकसान होवून विक्री योग्य तयार झालेली द्राक्षबाग पूर्णपणे कोसळली. कृषि पदवीधर मुलाने मोठ्या कष्टाने उभी केलेली द्राक्षबाग वादळवाऱ्यात नष्ट झाली. 30 रूपये किलोने द्राक्षबागेचा विक्रीसाठी सौदाही झाला होता. मुलाच्या कष्टावर निसर्गाने पाणी फिरवले या शब्दात रेखा परीट यांनी आपले दु:ख पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासमोर व्यक्त केले.

संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली.

000

महात्मा जोतिराव फुले यांना राजभवन येथे अभिवादन

मुंबई, दि. ११ : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव विपीनकुमार सक्सेना सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

००००

Tributes offered to Mahatma Phule at Raj Bhavan

Floral tributes were offered to the portrait of  Mahatma Jyotirao Phule on the occasion of the birth anniversary of the great social reformer at Raj Bhavan today.

Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Vipin Kumar Saxena, Joint Secretary Shweta Singhal and officers and staff of Raj Bhavan offered floral tributes on the occasion.

0000

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी माजी लोकसभा सदस्य समीर भुजबळ, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव विलास आठवले, अवर सचिव मोहन काकड, सुरेश मोगल, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

म.वि.स./जनसंपर्क

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

अहमदनगर, दि. 11 : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी  संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्की घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे‌. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.

वनकुटे ग्रामदैवत मंदिरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.  सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते‌.

०००००

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. 11 : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

 Governor pays tribute to Mahtama Phule

Governor Ramesh Bais offered floral tribute to the statue of Mahatma Jyotiba Phule on the occasion of the Birth Anniversary of the great social reformer at the New Maharashtra Sadan in New Delhi.

0000

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ११ : भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपसचिव प्रकाश येंदरकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ तसेच मागासवर्ग कर्मचारी संघटनेचे (मंत्रालय) अध्यक्ष भारत वानखेडे, पदाधिकारी भास्कर बनसोडे, सुभाष गवई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 ०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विनम्र अभिवादन

मुंबई, दि. ११ : भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, विकास कुंभारे, किशोर जोरगेवार,सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

 

०००

प्रवीण भुरके/स.सं

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार

मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार यावर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

०००

ताज्या बातम्या

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री...

0
पुणे दि.८ : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित...

रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना वेळेत पूर्ण करा –  वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
रोपवेच्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश नागपूर,दि.08 : विदर्भातील पर्यटन आणि तिर्थक्षेत्रात रामटेकचे अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी स्थानिकांना रोजगार निर्मितीची विविध संसाधणे उपलब्ध होण्यासाठी रामटेक...

उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

0
मुंबई, दि. 8:- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकलेल्या 171 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुरक्षित ठिकाणी...

पालकमंत्री संजय राठोड यांनी रामकथा आयोजन व्यवस्थेचा आढावा घेतला

0
६ ते १४ सप्टेंबरला मोरारी बापू यांची रामकथा यवतमाळ, दि.८ (जिमाका) : यवतमाळ शहरानजीक लोहारा येथे चिंतामणी कृषी बाजार समितीच्या प्रांगणात दि.६ ते १४ सप्टेंबर...

वैद्यकीय महाविद्यालयात विविध सुविधा उपलब्ध करणार – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा; वरिष्ठ डॉक्टरांनी ओपीडीत उपस्थित राहण्याचे निर्देश यवतमाळ, दि.८ (जिमाका) : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करुन...