शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1516

शेळी-मेंढी समूह प्रकल्प, मेंढी – शेळी विकास महामंडळाच्या नव्या प्रक्षेत्राचा अहमदनगर जिल्ह्यात १ मे रोजी शुभारंभ

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालनास महत्त्वाचे स्थान आहे .राज्यातील शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळी-मेंढी समूह प्रकल्प व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे नवीन प्रक्षेत्र १ मे रोजी शुभारंभ होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यामध्ये समूह विकासामधून शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देवून शेळी मेंढी पालन संबंधीत नवीन उद्योजक निर्माण करणे. शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्या माध्यमातून त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करून त्यांचे या व्यवसायाबाबतचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचाविण्यास यामुळे मदत होणार आहे.या भागातील शेळी मेंढी पालकांना सतत निर्माण होणारा शेळया व मेंढ्याच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्नही सुटणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत शेळ्या- मेंढ्या पासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण होवून रोजगार निर्मिती सुद्धा होईल.

जिल्ह्यामध्ये शेळी उद्योगाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करता येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकारी विकास महासंघाचे सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीस प्रधान सचिव जगदीशप्रसाद गुप्ता, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात हरकती, आक्षेप कळविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १३ : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता प्रकाशित करण्यात आलेला आहे. या प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यातील माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास  १५ एप्रिल २०२३ पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला कळविण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

            राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यात क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)” “शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार” “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)” असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “पुरस्कार” या टॅबमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

            प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यानुसार नमूद केलेल्या माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. १३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई मेल आयडीवर विहीत नमुन्यात कळविण्यात यावेत. याबाबतचा विहीत नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “ताज्या बातम्या” या टॅब मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या हरकती अथवा आक्षेपांचे निराकरण / स्पष्टीकरण दि. १५ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या संकेतस्थळावर “पुरस्कार” या टॅबमध्ये प्रसिध्द करण्यात येईल.

            क्रीडा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असून, तो अंतिम नाही, असे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

०००

पवन राठोड/ससं

जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे आव्हान नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे – राज्यपाल रमेश बैस

नागपूर, दि १३ : जगात कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज आहे. ही एक संधी मानून जगाची गरज पूर्ण करण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या मदतीने कुशल मनुष्यबळ निर्मितीत जग व भारतदेशादरम्यान दुवा म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या ११० व्या दीक्षान्त समारंभात केले. पदवीधरांनी स्टार्टअप निर्मितीत पुढाकार घेऊन देश विकासात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात राज्यपाल बोलत होते.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.जी. सिताराम, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, जग सद्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. जपान, इटली, जर्मनी, फ्रांस, पोर्तुगाल आदी देशांमध्ये तरुणांची संख्या कमी असल्याने या देशांपुढे कुशल मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. उलटपक्षी भारतात २९ वर्षांखालील तरुणांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अशा स्थितीत जगाची कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज भारतदेश भागवू शकतो व येथील तरुणांनाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. जगातील देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या मदतीने  नागपूर विद्यापीठाने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी जग व भारतदेशादरम्यान दुवा म्हणून कार्य करावे, असे श्री. बैस यांनी सांगितले.

आपल्या देशात काही कामांना कमी दर्जाचे समजण्यात येते. मात्र, काळानुरुप बदल स्वीकारत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. पदवीधरांनी कोणतेही काम कमी न लेखता रोजगारासाठी पुढे आले पाहिजे. पदवीधरांनी देश विकासात हातभार लावण्यासाठी स्टार्टअप निर्माते व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. सद्याचे युग हे समन्वयाचे आहे. नागपूर विद्यापीठानेही आपल्या विद्यापीठात दर्जेदार शिक्षण व उत्तमोत्तम उपक्रम राबविण्यासाठी देशातील अन्य सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांसोबत समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठानेही या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन अन्य विद्यापीठांसाठी आदर्शवत कार्य करावे, अशा अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. शुभांगी परांजपे यांना मानवविज्ञान शाखेतील ‘मानवविज्ञान पंडित’ (डी. लिट.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवी प्राप्त पदवीधर आणि हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ च्या परीक्षांमध्ये विविध विद्याशाखांतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदानाची घोषणा केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. टी.जी. सिताराम यांनी नागपूर विद्यापीठाने संशोधनकार्य गतीने करण्याचे आवाहन केले. बदलत्या काळात देशातील विद्यापिठांनी अद्यापन पध्दतीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य मंच उपलब्ध करुन देण्याकडेही लक्ष्य देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सिताराम म्हणाले. त्यांनी यावेळी देशातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला आणि नवीन शैक्षणिक धोरणांतील महत्वाच्या बाबीही अधोरेखित केल्या.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा उंचावत गेलेला आलेख मांडत विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी राज्यपाल, प्रमुख अतिथी, कुलगुरु, प्र-कुलगुरु, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या मिरवणुकीने सभागृहात प्रवेश केला. राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत  आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नंदिनी सोहोनीला 7 सुवर्ण पदके

विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ परीक्षांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या १०८ गुणवंत विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.जी. सिताराम यांच्या हस्ते पदके व पारितोषिक प्रदान करण्यात आली. यावेळी नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या नंदीनी सोहोनी या विद्यार्थीनीला बी.ए., एल.एल.बी परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्ल  7 सुवर्ण पदके व २  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

२८० पदवीधारकांना ‘पीएचडी’

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या आचार्य अर्थात पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) पदवी प्राप्त २८० पदवीधरांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेच्या ९७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या ३८, मानव विज्ञान विद्या शाखेच्या ११२ आणि आंतर -विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील ३२ पदवीधरांचा समावेश आहे.

भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती १७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

मुंबई, दि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वितरण

          सातारा दि. 13 : पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलतनगर-मरळी येथे निवडक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वाटप करण्यात आले.

          सातारा जिल्ह्यात एकूण ३ लाख ८७ हजार ४४१ ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त झाले आहेत. या संचामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वाटप सुरू झाले असून उद्यापर्यंत बहुतांश शिधा वाटप पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

          पाटण तालुक्यासाठी 45 हजार 500 आनंदाचा शिधा संच प्राप्त झाले आहेत. त्यांचे शासकिय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत  पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते दौलत नगर आणि मरळी येथील रास्त भाव दुकानातील लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी   पालकमंत्री श्री. देसाई यांनी हा लाभ तालुक्यातील  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

          यावेळी  प्रांताधिकारी सुनील गाडे व संबंधित अधिकारी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सावळीविहीर कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा अहमदनगरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला देण्यास मान्यता – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १३ : उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळीविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा देण्यास आज मान्यता देण्यात आली.

मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री श्री.विखे-पाटील यांनी याबाबत बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विज्ञान केंद्राची जागा देण्यास मान्यता दिली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टू आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी अर्थसंकल्पात अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची घोषणा केली होती. त्यानुसार अहमदनगर येथे हे महाविद्यालय होत आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सुस्पष्ट आराखडा तयार करावा. महाविद्यालयासह परिसरात विविध विभाग, शेती आणि चारा उत्पादन क्षेत्र चालविण्यासाठी 100 एकर जागेची आवश्यकता असून यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या 125 एकरपैकी 75 एकर जागा निश्चित करण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रक्रिया संबंधितांनी त्वरित मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

या महाविद्यालयात पशु विज्ञान केंद्र, पदविका महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करावा. महाविद्यालय परिसरात पशुवैद्यकीय चिकित्सालय संकुल, सुसज्ज बाह्य आणि आंतररूग्ण विभाग आणि ग्राहकांसाठी निवास सुविधा असणार आहे. वैद्यकीय, शस्त्रक्रिया, निदान, रुग्णवाहक चिकित्सालयीन विभाग असतील. पशुधन प्रक्षेत्र संकुलमध्ये पशुधन, विविध प्रजातीचे प्राणी, चिकित्सा शिकविण्यासाठी उत्पादन न करणाऱ्या प्राण्यांचे एकक, चारा आणि चारा उत्पादन क्षेत्र यांच्या देखभालीसाठी पशुधन युनिट आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन- पालकमंत्री

सातारा दि. 13 : महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर, मरळी ता. पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  दि. 19 एप्रिल ते 23 एप्रिल 2023 असे चार दिवस कार्यकम होणार आहेत.

          दौलतनगर, मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या आयोजना विषयी  बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञारेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, प्रांताधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          कार्यक्रमांची सुरुवात शासनाच्या विविध विभागांकडील योजनांच्या चित्ररथाने होणार आहे. यामध्ये 24 विभागांकडील 26 चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासोहब देसाई यांनी केलेल्या कार्याची व त्यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे दर्शन घडविणारे चित्ररथही सहभागी होणार आहे. मरळी येथून सुरु होणारी चित्ररथांची दिंडी पाटण येथे विसर्जित करण्यात येणार आहे.

          याबरोबरच आरोग्य तपासणी शिबीर, शासकीय योजनांची माहिती देणारे  प्रदर्शन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच विविध प्रवचने व किर्तन, भजन, जागर यांचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीरामध्ये उपस्थितांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

कुक्कुटपालन व्यवसायाच्या वृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १३ : कुक्कुटपालन व्यवसायात वृद्धी व्हावी, तो शेतकरी हिताचा व्हावा या दृष्टीने आणि महाराष्ट्र अंडी समन्वय समितीची (एमईसीसी) स्थापना करण्याच्या अनुषंगाने सर्वंकष विचार करून अहवाल सादर करावा. त्याचा सकारात्मक विचार करून राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कुक्कुटपालन समन्वय समितीची आढावा बैठक मंत्रालयात आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह कुक्कुटपालन शेतकरी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनीधी उपस्थित होते.

मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, एनईसीसीप्रमाणे एमईसीसी स्थापन करण्यात येईल का याबाबत सर्वंकष अहवाल सादर करण्यात यावा. कुक्कुटपालन हा देखील शेतीव्यवसाय समजण्यात यावा. तसेच, हैदराबाद शासनाप्रमाणे कमी दरात कुक्कुटपालकांना कमी दरात पीक देता देणे, कोल्ड स्टोरेजसाठी अनुदान, पोल्ट्री शेड बांधकामावरील मालमत्ता कर रद्द करणे, पोल्ट्री व्यवसायासाठीचे वीज बील शेती पंपाच्या दराप्रमाणे आकरणे, शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करणे, अंड्यांसाठी उत्पादन खर्चावर आधारित एमएसपी दर प्रणाली ठरविणे या विषयासंदर्भात कंपनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित चर्चा करून, सर्वंकष प्रस्ताव पाठवावा. कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन सकारात्मक विचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्यवसाय वाढीचे शुल्क हे उत्पादन किमतीच्या २५ टक्के देण्याबाबतच्या सूचना संबंधित कंपन्यांना मंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना

मुंबई, दि. १३: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवार, दि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह, चित्रपट आणि मुलाखतीचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी ११ वाजता ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण तसेच सायंकाळी ६ वाजता ‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मृदुल निळे यांची घेण्यात आलेली विशेष मुलाखत सायं. ७.३० वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १४, १५ आणि १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होणार आहे.

महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण ट्विटर या समाजमाध्यमावर होणार आहे. तसेच ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ हे माहितीपट फेसबुकवर वरील वेळेत पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे यु ट्यूब चॅनलवरील कम्युनिटी या टॅबमध्येही हे दोन्ही माहितीपट पाहण्यासाठी उपलब्ध असतील. याबरोबरच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे थेट प्रसारण ट्विटर, फेसबुक आणि यू ट्यूब या माध्यमांवरून करण्यात येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.*

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

महापुरुष डॉ. आंबेडकरया माहितीपटाविषयी..

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटे कालावधीचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथया चित्रपटाविषयी…

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

बाबासाहेब आंबेडकरया माहितीपटाविषयी…

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

दिलखुलासआणि जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत

महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मृदुल निळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. १४, शनिवार दि. १५ आणि सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शुक्रवार, दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सायं. ७.३० वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरुन ही मुलाखत पाहता येणार आहे. ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विचार आणि योगदान’ या विषयावर सविस्तर माहिती प्रा. निळे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून दिली आहे. ही मुलाखत प्रा. भोसले यांनी घेतली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरे तर खूप मोठे असून हा उपक्रम राबविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हूराज बगाटे, विभागाचे अधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडक ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने लोकहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. ‘आनंदाचा शिधा’ चे वितरण हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवाळीत याचे वाटप केले तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता देखील गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत आहे. हा शिधा संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. १०० टक्के साहित्य जिल्ह्यांना पोहोचले आहे, यातील शिधा संचचे ७० टक्के लाभार्थ्यांनी उचल केली आहे. उर्वरित साहित्य वाटप करण्यात यावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडत आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची दुःख जाणून घेत आहोत. त्यासाठी प्रभावी उपाययोजना देखील करत झालेल्या नुकसानाचे पंचनामेदेखील करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहोत.  केंद्र सरकारच्या धर्तीवर असलेली पी. एम. किसान योजना तशीच राज्य शासनाने ही ‘नमो सन्मान’ योजनाही सुरू केली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी १८०० रुपये देत आहोत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आनंदाचा शिधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत एक कोटी ५८ लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आनंदाचा शिधा, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज लाभार्थ्यांना मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधता येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

‘आनंदाचा शिधा’ मुळे आनंद मिळाला – लाभार्थ्यांची प्रतिक्रिया

‘आनंदाचा शिधा’मुळे आम्हाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असून आमच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. कितीही रांगा असल्या, तरी शिवभोजन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अकोला, हिंगोली, ठाणे, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, मुंबई शहर व मुंबई उपनगर, जळगाव या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. तसेच या योजनांच्या बाबतीत जिल्हास्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.

प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते”आनंदाचा शिधा” संचाचे वितरणही लाभार्थ्यांना यावेळी करण्यात आले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...