शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1515

चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज रात्री दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईसह राज्यात सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच इंदू मिल येथे साकारण्यात येणाऱ्या स्मारकाचा कामाला गती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जागतिक दर्जाचे स्मारक तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.13 :  आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मिहान सेझ मधील टेक महिंद्राच्या डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा पुरविणा-या डिजिटल डिलिव्हरी सेंटरचे उदघाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. आज सर्वत्र वापरात असलेली युपीआय डिजिटल पेमेंट सिस्टीम हा या बदलाचा एक भाग आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात या डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात संवादाचे जाळे विस्तारले आहे. डिजिटल डिलिव्हरी सेंटरच्या माध्यमातून सुमारे पंधराशे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा पुरवठ्याच्या माध्यमातून ही संधी निर्माण झाली असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. देशातील विविध भागातील तरुण या ठिकाणी रोजगाराच्या शोधात येतात. या तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी मिहान या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. देशाची अर्थव्यस्था पुढे नेण्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यांनी केले तर आभार राजेश चंद्रमणी यांनी मानले.

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – सचिव सुमंत भांगे

मुंबई ,दि.१३: राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव  सुमंत भांगे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

            भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज दि १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री.भांगे यांनी राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला त्याप्रसंगी बोलत होते.

            समाजाप्रती चांगलं  कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या  पाठीशी शासन खंबीर आहे. येणाऱ्या काळात “खात्याची ओळख”, “रयतेचा दरबार” यासारखे  अभिनव उपक्रम राज्यातील जनतेसाठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री भांगे यांनी सांगितले. तसेच विभागात अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया होण्यासाठी विभागाच्या आकृतीबंधास शासन मान्यता घेणेबाबतचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त यांना यावेळी दिलेत.

            यावेळी  राज्याचे समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुण्याचे सुनिल वारे, सहसचिव दिनेश डिंगळे, लीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक, आयुक्तालयातील सर्व उपायुक्त, सर्व प्रादेशिक उपायुक्त उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद उपस्थित होते. राज्यात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा यावेळी राज्यातील क्षेत्रिय अधिकारी यांनी सादर केला.

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

मुंबई, दि. १३:- मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री

मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती  महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवी मुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी  खुला करण्यात आला आहे. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपुलाकरिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान

सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  नुकतेच मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मार्गिकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते. बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत बीकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत, तसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात  होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगती महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेकर उन्नत मार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांची जलद जोडणी करण्याच्या दृष्टीने प्राधिकरण कार्यतत्परने सर्व प्रकल्पांचे  लोकार्पण करत आहे. घाटकोपर येथील छेडानगर हे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या  प्रवाशांना सिग्नल वर बराच वेळ थांबावं लागत असे. आज उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ज्याच्यामुळे आता मुंबई च्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत राज्यातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन ठेवूनच राज्य सरकार काम करत आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, तसा संकल्प या जयंतीदिनी आपण करू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून  वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे. यामुळे आपला देश आणि महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य म्हणून काम करत आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या वंचितांच्या कल्याणाचा, समानतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था काम करत आहेत. या विभागाच्या योजनांकरिता भरीव निधीची तरतूद देखील  केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुशासनाचे आणि कल्याणकारी राज्याचे समाधान नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही वाटचाल करत राहू, याची ग्वाहीदेखील देतो.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या जयंती निमित्ताने आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  सहसचिव दिनेश डिंगळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जयंती निमित्ताने मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट  करून रांगोळी टाकण्यात आली होती. राज्यभरात  सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर

मुंबई, दि.१३ : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मुलाखती यशदा, पुणे येथे दिनांक १० ते १३ एप्रिल २०२३ या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सदर परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी २०३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील असे आयोगाने कळविले आहे.

000000

राजू धोत्रे/विसंअ

विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई दि. १३ :विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत  दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी शेळी-मेंढी गट वाटप योजना राबविण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे शेळी-मेंढी असणे आवश्यक असून, विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प  (VMDDP) विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात राबविण्यात येत असून, यासाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करावा.  व्हीएमडीडीपी अंतर्गत खरेदी उपक्रम वाढविण्यासाठी दुध उत्पादन कंपनीची स्थापना करण्याबाबत सकारात्मक विचार करणार.  दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दूग्ध विकास बोर्ड व सहयोगी संस्थांद्वारे कृत्रिमरेतनाची सेवा शेतकऱ्यांना संतुलित पशु खाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पशुखाद्य पुरके पुरवठा, ॲनिमल इंडक्शन याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना व पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड व अन्य संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचेही मंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यासाठी क्षेत्र निश्चित करावे असेही मंत्री श्री.विखे पाटील यानी सांगितले.  या बैठकीस विभागाचे सचिव प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम, स.सं

राज्यातील १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १३ : राज्य शासनाने अर्धवेळ पदावरील ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याची बाब अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नवीन आकृतीबंधानुसार अर्धवेळ ग्रंथपाल पद हे मृत संवर्ग करण्यात आले असून या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...