गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 1509

वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतिमान होईल- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर दि. 24 (जि. मा. का) : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा पोलीस दलास (शहरी व ग्रामीण) जिल्हा विकास यंत्रणेच्या निधीतून प्राप्त झालेल्या वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, रणजीतसिंह मोहिते – पाटील, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, निवासी उपजल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे आदि उपस्थित होते.

जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून शहर पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 9 चारचाकी व 4 दुचाकी तसेच ग्रामीण पोलीस दलास 12 चारचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. त्यांचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

 यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संपूर्ण पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परतेने कार्य करत असते. पोलीस दलाच्या अधिक क्रियाशीलतेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलास वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ सेवा देण्यासाठी, दुर्घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पोलीस दल अधिक गतीमान होणार आहे. तसेच यापुढेही पोलीस दलाच्या बळकटी करण्यासाठी अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशीही श्री. विखे पाटील यांनी ग्वाही दिली.

00000

 

 

जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी परस्पर सहकार्याने कार्य करावे- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन सकारात्मकतेने काम करत असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी परस्पर सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी कार्य करावे. अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेची कामे आत्मियतेने करून मार्गी लावावीत, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा विकास यंत्रणांतर्गत सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकाऱ्यांचा कामकाज आढावा व पदाधिकारी यांच्या समवेत समन्वय बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, रणजीतसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. परंतु, काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यांना तात्काळ मदत करावी. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही विचार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियानातून शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून १६०० रोव्हर मोजणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे भविष्यात मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच, हातपंप दुरूस्तीची कामे तात्काळ करावीत. मंगळवेढा येथे बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्ग लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. उजनी विभागाचा उजवा कालवा फुटल्याने शेतात पाणी गेल्याने शेत, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेत, पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाटबंधारे व कृषि विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

00000

‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 24 : ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज’ याअंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही जबाबदारी स्वीकारून इतरांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम दिनांक 02 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणारे पाच जिल्हे, पाच समन्वयक तसेच 30 शाळा आणि विद्यार्थ्यांचा आज मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते. प्रधान सचिव रणजित सिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेटस् चेंज प्रकल्प संचालक रोहीत आर्या आदी यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ट कार्य केले आहे. या उपक्रमास शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून राज्यातील 12 हजार 678 शाळांनी तसेच सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुलांमध्ये आगळी शक्ती असते. त्यांनी प्रेमाने सांगितलेले पालकांसह समाजही ऐकतो. कचरा टाकणे ही वाईट प्रवृत्ती असून त्याबाबत जागृती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे ती निर्माण केली आहे. हा उपक्रम राज्याला आणि देशालाही दिशा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेऊन प्रवृत्तीमध्ये बदल घडविण्याचा चमत्कार केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण आणि श्रमाला महत्त्व यावर भर देण्यात आला आहे. यामुळे विविध क्षेत्रांत कुशल नागरिक घडतील आणि त्यांना जगभर मागणी असेल, असे ते म्हणाले. यावर्षीपासून विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, मौजे, वह्या शासनामार्फत दिल्या जाणार असल्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना कोडिंगचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून उत्कृष्ट काम केलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. हा उपक्रम राबविताना आलेले अनुभव सांगून यापुढेही स्वच्छतेसाठी आयुष्यभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्री नृसिंह विद्यालय, चास; औरंगाबाद जिल्ह्यातील फातेमा गर्ल्स उर्दू हायस्कूल, नागसेन कॉलनी; बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषद श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा, एनव्ही चिन्मय विद्यालय शेगाव, कोठारी गर्ल्स हायस्कूल नांदुरा, देऊळगाव राजा हायस्कूल, युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव; गडचिरोली जिल्ह्यातील राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली; जालना जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर, जनता हायस्कूल, मत्स्योदरी विद्यालय, नेत्रदीप विद्यालय मोतीगव्हाण, शांतीनिकेतन विद्यामंदिर, झेडपीपीएस भिलपुरी (केएच); कोल्हापूर जिल्ह्यातील उषाराजे हायस्कूल, मुंबई नॉर्थ जिल्ह्यातील कार्तिका हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीईएस मायकेल हायस्कूल, पीव्हीजी विद्याभवन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चेंबूर कर्नाटक हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय कुर्ला; नागपूर जिल्ह्यातील एसएफएस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज; नाशिक जिल्ह्यातील रचना माध्यमिक विद्यालय, मराठा हायस्कूल; पुणे जिल्ह्यातील पीईएस मॉडर्न गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर, महात्मा गांधी विद्यालय मंचर, सीबीटी साधना कन्या विद्यालय; रायगड जिल्ह्यातील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालय; सातारा जिल्ह्यातील सरस्वती विद्यालय कोरेगाव; सोलापूर जिल्ह्यातील केएलई अन्नाप्पा काडादी हायस्कूल, मनपा गर्ल्स मराठी शाळा क्र. 16, श्री सिद्धेश्वर बालमंदिर आणि झेडपीपीएम स्कूल होटगी या शाळांचा समावेश आहे.

या शाळांसह बुलढाणा, जालना, मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील समन्वयक, शिक्षणाधिकारी यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार; पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई -पंचनामा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना आणण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अवर्षण अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली असून, आता एनडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे सर्व टाळण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी आपापल्या विभाग आणि जिल्ह्यांमध्ये घ्यावी.  नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाचे मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातही आपण सर्वांनी दक्ष राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन आपले काम जवाबदारीने करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दिवसभर चाललेल्या या राज्यस्तरीय परिषदेत महत्त्वाचे विषय तसेच फ्लॅगशिप योजनांवर विचारमंथन करण्यात आले. उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री कृषि सन्मान योजना 2.0, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण आणि चर्चा करण्यात आली. याच परिषदेत मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण देखील करण्यात आले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून मुख्य सचिव यांचा सत्कार

राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2023 रोजी निवृत्त होत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव यांच्या कार्याचा गौरव करीत विशेष सत्कार केला. शासन आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करत केंद्र शासनाच्या योजना राज्यात गतिशील करण्यासाठी तसेच राज्य शासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यातील सहभागासाठी मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.

या एक दिवसीय परिषदेला मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि दरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात मृद व जलसंधारण, मदत व पुनर्वसन, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी येत्या काळात राज्य शासनाच्या संबंधित विभागामार्फत विविध समस्यांबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणार- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

सातारा दि. २४ : बचतगटांसाठी त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग होणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मॉल उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय योजना संवेदनशिलतेने राबवाव्यात असे सांगून केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, बचतगटांना आवश्यक असणारी मदत करण्यासाठी शासन सज्ज आहे. घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना जमीन नसेल तर जमीन देण्यासाठी महसूल विभागाने कार्यवाही करावी. प्रधानमंत्री आवास योजनेस चालना देऊन गतीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी श्री.  कराड यांनी स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, पीएम किसान, सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम व बचतगट आदींचा आढावा घेतला.

00000

बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा विविध योजनांचा उद्देश- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

सातारा दि. २४ : केंद्र शासनाने बँकिंग क्षेत्राशी निगडीत योजना सुरू केल्या आहेत. बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा या विविध योजनांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

सातारा येथील फर्म रेसिडेन्सी येथे पश्चिम महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. कराड बोलत होते. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सोलापूरचे खासदार जयसिद्देश्वर महास्वामी, आमदार जयकुमार गोरे, नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदीप परांदे, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे लीड बँक मॅनेजर व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

आर्थिक साक्षरता महत्त्वाची असल्याचे सांगून केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, लोकांना आर्थिक साक्षर करणे ही बँकांची जबाबदारी आहे. तसेच आर्थिक शिक्षणासोबतच डिजीटल व्यवहारांची माहितीही जनतेपर्यंत पोहचवावी. उद्योग, व्यापार करू इच्छिणाऱ्या प्रत्येकास कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने मुद्रा, स्वनिधी यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ जास्तीतजास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे ही सुद्धा बँकांची जबाबदारी आहे. रोजगार निर्मितीसाठी मुद्रा योजना ही महत्त्वाची आहे. तसेच कृषि क्षेत्रासाठी चांगल्या प्रमाणात  वित्त पुरवठा करणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, कृषि कर्ज पुरवठा, पशु संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठीचा अर्थ पुरवठा यांचा आढावा घेतला.
00000

पालकमंत्र्यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

पुणे, दि. २४: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल, प्रकल्पाशी संबंधित विकासक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकंमत्री श्री. पाटील म्हणाले, दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र १९ लाभार्थ्यांना येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी. श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी. गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची ५६ मीटरपर्यंत वाढविण्याबाबत आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला दिल्या.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी योजनांबाबत माहिती दिली.

पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना, श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, कसबा पेठ, आणि ७२१ गुजरात कॉलनी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

000

प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणतीही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा (डेटा) आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचे आयोगाने खुलासा केला आहे.

आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.  पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना कळविले असल्याचे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी पत्राद्वारे कळविले आहे.

00000

पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. २४ : “देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे”, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर व्हावा, यासाठी  पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  मंत्री श्री. चव्हाण  बोलत होते.

यावेळी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडियन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएलचे व्यवस्थापक अकेला वि.ऐन.एस. के. लक्ष्मणराव, गेलचे व्यवस्थापक शंतनू बासू, पीसीआरएचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, ‘सक्षम २०२२’ मध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. इंधन बचत या उपक्रमांतर्गत राज्यात सर्वाधिक कार्यक्रम करून देशात सर्वोच्च स्थान पटकावले, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करा इंधन बचतीचा संदेश घरोघरी पोहोचवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हे देखील घरोघरी पोहोचवले असून याच धर्तीवर ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाची राज्यभरात प्रचार व प्रसिद्धी उपक्रम  राबवावेत. नव्या पिढीला ही आव्हाने समजली पाहिजेत, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.

इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध  नाटिकांचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर म्हणाले, की  २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘ऊर्जा संरक्षण नेट झीरोच्या दिशेने’ या टॅग लाईनसह संरक्षण क्षमता महोत्सव ‘सक्षम-२०२३’ चे आयोजन केले  असून, सक्षम-२०२३ अंतर्गत राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध १०००  पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यांनी आभार मानले.

0000

परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून केलेले काम प्रशंसनीय -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. २४ (जिमाका) : भारतीय डॉक्टर व परिचारिकांचा विशेषतः दक्षिण भारतातील परिचारिकांचा परदेशात सर्वत्र बोलबाला आहे. हे समर्पित भावनेने काम करणारे क्षेत्र असून, कोविड काळात याचा प्रत्यय आला आहे. कोविड काळात परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून केलेले काम प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज काढले.

कुंभारी (ता. द. सोलापूर) येथील श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या नवीन बी. एस्सी (नर्सिंग) महाविद्यालयाच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, प्रणिती शिंदे, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, प्रकाश यलगुलवार आणि नरसिंग मेंगजी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, एम. एम. पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बिपीन पटेल यांच्यासह ट्रस्टचे संचालक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय, आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या तुलनेत दर्जेदार नर्सिंग शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या कमी होती. याउलट आखाती देशांसह सर्व जगभरात भारतीय डॉक्टर व दक्षिण भारतातील परिचारिका यांचा बोलबाला आहे. नवीन नियमानुसार कार्यरत वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंग कॉलेजला मान्यता दिल्याने दर्जा वाढून, परिपूर्ण शिक्षण मिळेल व परिचारकांची दर्जेदार पिढी घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, या भव्य दिव्य नर्सिंग महाविद्यालयातून ज्ञानाने परिपूर्ण पिढी घडावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्नरत असल्याचे सांगून श्री. विखे पाटील यांनी राज्यातील दोन वंदे भारत ट्रेन्स, सोलापूरमधून गेलेले तीन राष्ट्रीय महामार्ग यांचा उल्लेख करत एमआयडीसीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र हे खऱ्या अर्थाने लोकसेवेचे, देह झिजविण्याचे असून, कोविड काळात डॉक्टर, परिचारिकांनी समर्पण भावनेने काम केले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्‌घाटनासाठी तत्कालिन राष्ट्रपती उपस्थित राहिले होते. नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री उपस्थित आहेत, याचा आनंद आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे व ते चालवणे हे कठीण काम असते. प्रवरा येथील वैद्यकीय महाविद्यालय सुव्यवस्थित चालविण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्य भूमिका आहे. याच पद्धतीने सोलापूरच्या विकासासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभो, असे सांगून सेवेचे व्रत या नर्सिंग महाविद्यालयातून पुढे चालू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण व त्यानंतर महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी महाविद्यालयाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात बिपीन पटेल यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा हेतू विषद केला. आभार अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, महाविद्यालयाचा शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...