शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1508

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन दिवसात ११६७ हेक्टर नुकसान, शासन स्तरावरून लवकरच मदत – पालकमंत्री गिरीष महाजन

जिल्ह्यात चार दिवसात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावली

लातूर दि.30 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अशा अवकाळी पावसामुळे हिरावला जातो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आपण सगळे निसर्गापुढे हतबल आहोत. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मार्चमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी 10 कोटी 77 लाख रुपये मदत दिली आहे. मागच्या चार दिवसात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वीज पडून जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू, 100 जनावरे मयत झाले आहेत. 1 हजार 167 हेक्टर एवढ्या शेत जमिनीवरील फळपिकं, हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. शासन स्तरावरून यासाठीही सर्वोत्तोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आज चिंचोली काजळे ता. औसा येथील हणमंत गोविंदाचार्य उपाध्याय यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे झालेले नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत खा. सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., गुरुनाथ मगे, शिवदास मिटकरी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

टेंबी ता. औसा येथील शेतकरी शौकत इस्माईल सय्यद हे दि.28 एप्रिल रोजी वीज पडून मयत झाले आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची तीन मुलं आणि कुटूंबियांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वन केले. शासन स्तरावरील मदत तात्काळ द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना यावेळी दिल्या.

या पाहणी दौऱ्यानंतर झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीशी सामना करावा लागत आहे. 25 एप्रिलपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळ – वारा व काही भागात गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावले आहेत. हे सगळे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पालकमंत्र्यांना दिली.

या बैठकीला खा. सुधाकर शृंगारे, आ.अभिमन्यू पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्यानंतर तात्काळ नुकसान झालेल्या 22 हजार 191 शेतकऱ्यांच्या या नुकसानी पोटी शासनाने 10 कोटी 7 लाख 77 हजार एवढा निधी मंजूर केला. ही मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा घेतला आढावा

जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात 45 टक्के पाणीसाठा आहे, तर निम्न तेरणा प्रकल्पात 53.17 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण 8 मध्यम प्रकल्पात 34.54 एवढा तर 128 लघु प्रकल्पात 24.52 टक्के एवढा पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हात्रे यांनी दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन महिने उशिरा पाऊस सुरु होईल. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी प्रशासनाला दिली.
**

सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.३० (जिमाका) : समाजाप्रति काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात “नाम फाऊंडेशन” चा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पावस येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, जिल्हा नियोजन समिती व “नाम फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौजे पावस येथे गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण शुभारंभ सोहळा ज्येष्ठ अभिनेते तथा “नाम फाऊंडेशन” चे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व लोकप्रिय विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिजीत पानसे, मल्हार पाटेकर यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता, वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता जावेद काझी, पावस ग्रामपंचायत सरपंच चेतना सामंत, ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीतील 7 नद्यांचा गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. आज कोकणामध्ये प्राधान्याने करावयाचे काम म्हणजे नद्यांमधील गाळ काढणे, तेथील जनतेला, वाडया-वस्तींना पूर समस्येपासून सुरक्षित करणे, हे आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम “नाम फाऊंडेशन” धडाडीने करीत आहे. त्यामुळे समाजाप्रति सामाजिक कार्य करताना भविष्यात “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घेवूनच पुढे जावे लागेल.

ते म्हणाले, दोन वर्षापूर्वी चिपळूण शहर येथे भयंकर पूर आला होता. त्यावेळी प्रशासन आणि “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून वशिष्ठी नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. मागच्या वर्षीही आधीच्या वर्षीप्रमाणेच भरपूर पाऊस पडला परंतु यावेळी पूर आला नाही. याचे खरे श्रेय प्रशासनासोबत “नाम फाऊंडेशन” चे आहे. राजकारण्यांशी थेट संवाद साधणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांना सडेतोड प्रश्न विचारणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणारे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हे रत्नागिरी मध्ये साकार होत आहे. त्याच्या उद्घाटनाला आपण यावे, असे निमंत्रण पालकमंत्री उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांना दिले. भविष्यात “नाम फाऊंडेशन” आणि शासन असे एकत्रित मिळून काही करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करु. ज्या पध्दतीने आपण एक वेगळा पायंडा आपल्या कामांतून मांडलेला आहे, आदर्श उभा केला आहे, त्याचे शासनाने देखील अनुकरण करणे गरजेचे आहे आणि याच भावनेतून एखादा सामंजस्य करार (MOU) करता आला तर त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे आश्वासन श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, प्रशासन आणि “नाम फाऊंडेशन” माध्यमातून पावस येथे गौतमी नदीचे गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. परंतु ही नदी पुन्हा प्रदूषित होणार नाही, नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नदीमध्ये गाळ साठून नदी कोरडी व प्रदूषित होते, आणि पाणी बाजारपेठेत शिरण्यापर्यंत आपण वाट बघायलाच नको. शासन – प्रशासन त्यांचे काम करीत असते मात्र नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की, पुन्हा ही नदी प्रदूषित होणार नाही.

ते पुढे म्हणाले, नाम फाऊंडेशन म्हणजे आम्ही नाही तर आपण सर्व मिळून आहोत. हे फाऊंडेशन आपल्यामुळेच उभे आहे. टाटासारखी संस्था आता “नाम”शी जोडली गेली आहे. लवकरच उद्योगपती अजीज प्रेमजी आपल्या या फाऊंडेशनसोबत करार करणार आहेत. नागरिकांच्या समस्या मिटविणे, त्यांची सोय होणे गरजेचे आहे परंतु सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्या उपलब्ध सुविधेची काळजी लोकसहभागातून घेणे, ही तुमची-आमची सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून 42 कि.मी. म्हाडा नदीचा गाळ काढल्याने तेथे निर्माण झालेल्या समृध्दीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शासकीय सेवेत असलेली मुले या अभियानाचे खरे आधारस्तंभ असून प्रशासन म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे करीत असलेल्या कामांचे श्री. पाटेकर यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

श्री.अनासपुरे यांनी आपल्या मनोगतपर भाषणामध्ये “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
0000000

सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत

मुंबई, दि.३०:  सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालू असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

बार्टीच्या माध्यमातून सध्या आयबीपीएस, बँकिंग व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या 30 संस्थाचा करार कालावधी संपृष्टात आलेला असुन कोविडच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया न राबवता एक वर्ष मुदतवाढ देण्याचा तत्कालिन परिस्थितीत सन 2021 मध्ये निर्णय घेण्यात आला होता. सदर निर्णय हा बार्टीच्या नियामक मंडळाने घेतलेला आहे.

सन 2017-18  मध्ये एकूण 6900 विद्यार्थ्यांना 23 हजार प्रति विद्यार्थी याप्रमाणे 34 लक्ष 50  हजार एका संस्थेला निधी देण्यात येत होता, अशा राज्यातील एकूण 46 संस्थांना 16 कोटी 21 लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत देण्यात येत होते. त्यामध्ये नंतर पोलीस भरती प्रशिक्षण योजनेचा समावेश करण्यात आला आहे. विभागाने या प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला असता असे निर्देशनास आले की, ज्या संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे तेथील विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण पूर्ण घेतल्यानंतर होणारी निवड व रोजंदारीचे प्रमाण हे अत्यल्प आहे. तसेच बार्टीने मध्यंतरीच्या काळात या संस्थांची तपासणी केली असता काही संस्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यामुळे अशा संस्थांकडून प्रशिक्षण देणेबाबत भविष्यात विभागाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारे आहेत. तसेच दिवसेंदिवस प्रशिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत चालली असून सन 2023-24 या वर्षात 27600 विद्यार्थ्यांवर प्रतिसंस्था 4 कोटी 41 लक्ष याप्रमाणे 46 संस्थांवर एका वर्षासाठी 202 कोटी 86 लक्ष तर पाच वर्षाकरिता 1 हजार 14 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणे रूपये 10 लक्ष पेक्षा अधिक रकमेच्या खर्चांच्या योजनांसाठी ई निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण योजनांवर पुढील पाच वर्षात रूपये एक हजार कोटी पेक्षा अधिकचा खर्च येणार असल्याने ई निविदा प्रक्रिया राबविल्याशिवाय प्रशिक्षण संस्थाची निवड करणे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाच्या विपरीत होणार आहे. सदर प्रक्रिया ही शासनाच्या कामगार व उद्योग विभागाच्या शासन निर्णय सन 2016 च्या निर्देशानुसार व चीफ़ विजिलन्स कमिशन (CVC) यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणेच काम करावे लागणार आहे.

विद्यार्थी हिताला कोणतीही बाधा निर्माण होईल असे कार्य बार्टी व सामाजिक न्याय विभागाकडून होणार नाही. पारदर्शक पध्दतीने प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाची निवड, गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण व विद्यार्थी हीत याबाबींचा विचार करुन बार्टीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक खंबीर, प्रभावीपणे पद्धतीने राबविण्याचे निश्चित केले आहे. बार्टी ने सर्व प्रश्न सक्षमपणे हाताळले आहेत व येणाऱ्या काळात देखील विभागाने तसेच बा्र्टीने अधिक पारदर्शकपणे व गतिमान पद्धतीने योजना राबविण्यावर भर दिलेला आहे.

विभागात अनेक कामे पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजनांची प्रभावी व यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे व येणाऱ्या काळात देखील तितक्याच गतिमान पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे.  राज्याचा सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्था त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्था सदैव कार्यरत असुन कायम प्रयत्नशील आहे.

शासनाने तसेच बार्टी संस्थेने विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले आहे व विद्यार्थी कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे असेही बार्टीचे महासंचालक  सुनील वारे  यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीसाठी दिले आहे.

000

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

मुंबई, दि.३०: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे ७५ सहलींचे टुर पॅकेज उद्या दि. ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून सदर टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन) सौरभ विजय, व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, जणू प्रत्येकासाठी इथे काहीना काही आहेच.

सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात.

अजिंठा व वेरुळच्या लेण्या ह्या सर्वांनाच भूरळ घालतात. कोकणात गणपतीपुळे, तारकर्ली सारखे समुद्र किनारे असंख्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव, नाशिक मधील मंदिरे, पुण्यातील संस्कृती आकर्षण ठरत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे बघूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटक निवास (MTDC Resort) व उपहारागृह (Restaurant) उघडले आहेत. यामुळे पर्यटनांसाठी राहण्याची, खाणपाणाची सोय या पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतून प्राप्त झाल्या आहेत.

पर्यटक आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासातून मनसुक्त भ्रमंती करु शकतात. एमटीडीसी पर्यटक निवासाचे जाळे तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, माथेरान, खारघर एलिफंन्टा, टिटवाळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक, कार्ला, शिर्डी, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, छत्रपती संभाजी नगर, अजिंठा, वेरुळ, भिमाशंकर, ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, चिखदरा इत्यादी ठिकाणी पसरले आहेत.

दि.01 मे 2023 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 75 टुर पॅकेज सुरु करत आहेत. या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल.

अनुभावत्मक पर्यटन अंतर्गत कोकणातले काताळ शिल्प, विदर्भातले वन्यजीव, भंडारदरा येथील निसर्ग भ्रमंती, गिर्यारोहण, अवकाश निरीक्षण, कांदळवन इत्यादींचा अनुभव घेता येईल. सोबत गाईडची साथ असणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विश्वास आहे की, या टुर पॅकेज मधून पर्यटकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रत्येक व्यक्ती जाण्यास उत्सुक राहील.

**

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे,  वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहकार विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अमित सैनी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

श्री.सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कोलकाता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, वित्त अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

००००

स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या दुसऱ्या नरेंद्र यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामुहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री.बैस बोलत होते.

यावेळी हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.

भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील व अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘मन की बात’ चे प्रसारण दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा आकाशवाणीवरून झाल्यापासून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. स्वच्छ भारत, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यासह अनेक विषयांवर मोदी यांनी ‘मन की बात’ मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे ते ‘परीक्षेवर चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले. ‘मन की बात’ ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून ‘मन की बात’ चा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरो यांनी ‘मन की बात’ मधील भागांवर आधारित मांडलेल्या प्रदर्शनाला राज्यपालांनी  भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय प्रकाशन विभागाच्या पुस्तक दालनाला देखील भेट दिली.

00000

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन

चंद्रपूर, दि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वन विभागाने कार्य करायचे आहे. वन विभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला पुढे नेणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे आपला विभाग देशात सर्वांत अग्रेसर राहील, यादृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न करा, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन करण्यासाठी वन अकादमी येथे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद थाटात संपन्न झाली. या परिषदेत मार्गदर्शन करतांना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्याचे वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकसंवाद वाढविण्यावर भर द्यावा. विभागाप्रती जनतेच्‍या मनात सन्‍मान निर्माण होईल,  आपुलकी वाटेल असे आचरण करावे तसेच मानव – वन्यजीव संघर्षात संबंधित कुटुंबाला त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी. याबाबत कुठलीही हयगय होता कामा नये. आजही वृत्तपत्रात पर्यावरण, वृक्ष, वन्यप्राण्यांचे महत्त्व यावर लिखाण करणाऱ्यांची कमतरता आहे. ही उणीव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भरून काढावी. त्यासाठी दोन महिन्यातून एकदा आपल्या विभागाबाबत अभ्यासपूर्ण लेख लिहावा.

नियोजन, गुणवत्ता आणि कामाचा वेग हे सूत्र ठरवून विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. मंत्रालयातील फाईल्सवर वेगाने निर्णय होणे अपेक्षित आहे. वन विभागाला ज्या विविध स्त्रोतांमधून निधी मिळू शकतो त्याबाबत पाठपुरावा व प्रयत्न करावे. मनरेगाच्या निधीचा जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. वनउपजांवर आधारित उद्योगांना चालना देणे हा आपला उद्देश आहे. त्यासाठी वनांशी संबंधित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतील गावांमध्ये वनउपज लागवड करण्याकरिता विभागाने प्रोत्साहित करावे. वनउपजांवर आधारित कॉमन सर्व्हिस सेंटर चंद्रपुरात असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कल्याणकारी राज्य म्हणून जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची (महाराष्ट्र वन उद्योग विकास महामंडळ) संकल्पना पुढे आली आहे. या महामंडळाच्या सविस्तर अभ्यासासाठी चार-पाच जणांची एक समिती तयार करावी. १४२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वनउपजांशी संबंधित असलेली उत्पादने नक्कीच लागणार आहेत, हे वनविभागाने लक्षात घ्यावे.

सैन्याच्या धर्तीवर इको क्लबची पदरचना करताना त्यासमोर ग्रीन हा शब्द लावण्याबाबत नियोजन करा. ग्रीन youtube वर वनांशी संबंधित व्हिडिओ अपलोड करावे. राज्यातील पर्यावरण संस्थांची नोंदणी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात इको क्लबचे एक मुख्यालय असणे आवश्यक आहे. वनविभागाने ॲप विकसित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देता येऊ शकते का, याची पडताळणी करावी. डिजिटल माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोड विकसित करणे, पर्यावरणावर आधारित साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, स्लोगन, वादविवाद स्पर्धा, परिसंवाद आदीचे नियोजन करणे यासाठी वन विभागाने समन्वयातून पुढाकार घ्यावा.

वनविभागात जवळपास साडेपंधरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत, असे सांगून वनमंत्री म्हणाले, शेवटच्या फळीतील कर्मचारीसुद्धा पर्यावरण व जंगलाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. अशा कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा, चांगले निवासस्थान उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. वनविभागाचे विश्रामगृह, कार्यालय उत्तम असले पाहिजे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प क्रमांक एकवर येण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, वन अकादमीच्या परिसरात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते बेकरीचे उद्घाटन झाले. त्यानंतर वन विकास प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थींसाठी दोन बसगाड्यांचे लोकार्पण त्यांनी केले. या दोन्ही बस वातानुकुलीत व आरामदायी असून प्रशिक्षणार्थींना शहरात व परिसरातील वनांमध्ये प्रवासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.

जगभरातील पर्यटन बघा

देशातील उत्तम सफारी, चांगले पर्यटन आपल्या राज्यात विकसित व्हावे, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवावा. वन्यप्राणी बचाव केंद्राबाबत चांगला प्रस्ताव तयार करण्यासाठी टीम तयार करावी. यासाठी वरिष्ठ वन अधिकारी यांच्या टीमने बाली (इंडोनेशिया), बँकॉक (थायलंड), सिंगापूर या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची तसेच गुजरात मधील जामनगर, केवडिया या भारतातील ठिकाणांच्या सफारीची पाहणी करून अभ्यास करावा, अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या.

७५ हजार विद्यार्थ्यांना जंगल दर्शन

पर्यावरण हृदयापर्यंत पोहोचविण्यासाठी बालमनावर प्रयोग करणे आवश्यक आहे. ‘चला जाणुया वनाला’ या अंतर्गत ७५ हजार विद्यार्थ्यांना जंगलाचे दर्शन घडविण्यात येईल. इको क्लबमध्ये केवळ जिल्हा परिषद व आश्रमशाळाच नव्हे तर चांगल्या खाजगी शाळांचा सुद्धा समावेश करावा. प्रत्येक जिल्ह्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे फेडरेशन तयार करावे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. राज्यात सध्या ८ हजार ८०७ शाळांचा इको क्लबमध्ये समावेश आहे.

परिषदेचा पहिला दिवस

या परिषदेमध्ये अमृतवन, बेलवन, सर्पदंशावरील लस निर्मिती, संशोधनात्मक कामे, उजाड टेकड्यांचे हरितीकरण, चित्रपट निर्मितीसाठी स्थळांची निवड, पडीक ओसाड जमिनीचे व्यवस्थापन, शहर-नगर-महानगर येथे वृक्ष लागवडीसाठी आराखडा निर्मिती, मनरेगाअंतर्गत अभिसरण व रोपवाटिकेची कामे, ‘चला जाणुया वनाला’ उपक्रम, इको क्लब आराखडा व अंमलबजावणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी वनमंत्रांच्या हस्ते ताडोबातील पारंपरिक वनौषधी पुस्तिकेचे, चंद्रमा त्रैमासिक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गवत पुस्तिका व नकाशा तसेच वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांनी तयार केलेली ‘मास्टरमाइंड टायगर आर टी – 1’ या चित्रफीतीचे विमोचन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा सत्कार

वनविभागाला उत्कृष्ट सेवा देऊन पुढील तीन महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात नितीन गुदगे, रंगनाथ नाईकवाडे, गुरुनाथ अनारसे, दिगंबर पगार, नानासाहेब लडकत, प्रदीपकुमार व सत्यजित गुजर या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

००००००००

महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण

सोलापूर, दि. 30 (जि. मा. का.) – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या  जनसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी घोषित करण्यात आलेल्या या योजनेचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आपला दवाखाना ठिकाणे पुढीलप्रमाणे – अक्कलकोट शहर – अक्कलकोट नगर परिषद, नगरपालिका मराठी शाळा, माणिक पेठ, अक्कलकोट, बार्शी शहर – बार्शी नगरपरिषद, लोढा प्लॉट, बार्शी, माढा शहर – कुर्डूवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र, कुर्डवाडी, माळशिरस – माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार, माळशिरस, मंगळवेढा शहर – मंगळवेढा नगरपरिषद योग भवन नाका, मंगळवेढा, मोहोळ शहर – मोहोळ नगरपरिषद, दत्त मंगल हॉल, मोहोळ, पंढरपूर शहर – पंढरपूर नगरपरिषद, क्लॉक रूम, सांगोला नाका, पंढरपूर. सांगोला शहर – सांगोला नगरपरिषद जि. प. शाळा, चांदोलीवाडी, सांगोला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे म्हणाल्या, ‘आपला दवाखाना’ मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, 30 प्रकारच्या प्रयोग शाळा चाचण्या, मोफत‌ कार्यशाळा तपासणी, टेलि कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषत: संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहेत.

00000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

मुंबई, दि.३० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

000000

विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते.

कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, पराग आळवणी, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचे सकाळी 10.45 वाजता घैसास सभागृहात आगमन झाले. मान्यवरांच्या सन्मान कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवून 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्वागत केले.  या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सोय मुंबईतील 5 हजार 200 ठिकाणी करण्यात आली होती.

00000

ताज्या बातम्या

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...