शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1507

महाराष्‍ट्र राज्य स्‍थापनेच्‍या ६३ व्‍या वर्धापन दिनी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण

सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया, अशा शब्दांत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्राच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच,आपल्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी प्रयत्‍न करण्याचे आवाहनही केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या सोहळ्यास मुख्य जिल्हा न्यायाधीश संजय भारुका, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी शुभेच्छा संदेश देताना म्हणाल्या, राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा. तुझा जयजयकार असो. आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मंगल, पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक पुण्यात्म्यांची, समाज सुधारकांची आठवण ठेवून, महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते.

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची प्रतिभाशाली वाटचाल सुरु आहे. या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सैन्यदल, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वच मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते.

महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. शेतकरी,कष्टकरी, कामगार यांनी आपल्या घामातून राज्य प्रगतीपथावर नेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देते. राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे आभार मानते.  शासनाने 30 एप्रिल 1997 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. याला कालच 26 वर्षे पूर्ण झाली. या निमित्तानेही मी जिल्हावासियांना शुभेच्छा देते.

कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे.

‘जत्रा शासकीय योजनांची’ हा उपक्रम 15एप्रिल ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी, आरोग्‍य, शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास, समाजकल्‍याण, पशुसंवर्धन अशा सर्व विभागांना विकासाचा निधी दिला आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ई-ग्रंथालयासाठी 2 कोटी रुपये देण्यात येत आहेत.

राष्ट्रीय अन्नधान्य अधिनियमानुसार शासनाकडून जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेतील 5 लाख 77 हजार 211 लाभार्थी व अंत्योदय योजनेतील 22 हजार 148 शिधापत्रिका याप्रमाणे इष्टांक मंजूर आहे. यांना ई-पॉसव्दारे गहू,तांदूळ या धान्याचा पुरवठा करण्यात येतो. गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 679 कुटुंबांना आनंदाचा शिधा पोहचविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंर्गत 167 वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांना 10 कोटी 99 लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या धमण्या म्हणून ओळख असणाऱ्या एस.टीचेही सक्षमीकरण करण्यात येत असून जिल्ह्यामध्ये लवकरच नवीन 196 इलेक्ट्रीक शिवाई वातानुकुलित बसेस येणार आहेत. याशिवाय 80 नवीन लालपरी गाड्या येणार आहेत. जिल्ह्यातील युवा पिढीला स्वयंरोजगार करता यावा यासाठी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान आणि आर.पी.एल. अंतर्गत 920 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील 270 उमेदवारांना नोकरी उपलब्ध करुन दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 346 जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 8 कोटी 29 लाख 75 हजार इतका मार्जीन मनी प्रस्तावित आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 68 जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 1 कोटी 71 लाख 55 हजार इतका मार्जीन मनी देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण १२ रुग्णालये कार्यरत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय हे १३० खाटांचे असून, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न केलेले आहे. या रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. जननी सुरक्षा योजनेतर्गंत 586 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सखी वन स्टॉप सेंटर योजनेतून 145 महिलांना 6 विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. महिला व बाल विशेष सहाय्यता कक्ष (महिला समुपदेशन केंद्र) या अंतर्गंत कार्यरत 3 केंद्राच्या माध्यमातून सन 2022 -23 मध्ये 302 प्रकरणे हाताळण्यात आली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत विविध योजनांसाठी 14 कोटी 78 लाख इतका नियतव्यय मंजूर होता. तो 100 टक्के खर्च करण्यात आला आहे.

आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया,  असे आवाहन करतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी नितांत प्रयत्‍न करावा, असे आवाहनही अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परेडचे निरीक्षण केले. नंतर पोलीस दलाने संचलन केले. यामध्ये परेड कंमाडर रामदास पालशेतकर यांनी नेत्तृत्व केले. या संचलनात पोलीस, गृहरक्षक दल, बँड पथक, श्वानपथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, 108 रुग्णवाहिका, सावंतवाडी आणि मालवण अग्नीशमन वाहनांचा समावेश होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांची भेट घेवून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

पुरस्कार वितरण

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्यावतीने अर्पिता मुंबरकर यांना 2013-14 मधील तर प्रज्ञा ढवण यांना 2014-15 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्ताने समाज कल्याण विभागामार्फत  घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ राम बिबवणेकर, कुंदा कांबळे, श्रावणी मेस्त्री, मृदुला चव्हाण, वक्तृत्व स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ योगिनी‍ तिर्लोटकर, आर्यन कदम,  दिप्ती जोशी, पियुष हिवाळे, निबंध स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ शुभांगी लोहार, चेतन चव्हाण, प्राजक्ता जाधव, राहूल चव्हाण यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुवर्णबाण परीक्षेत पुरस्कार मिळवणाऱ्या दिया परब, इंशात परब यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयाकडून निवड झालेल्या गट क संवर्गातील सौरभ सरनोबत, हर्षदा पोईपकर, पल्लवी सुतार, जयश्री बहिराम, संतोष राऊळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय दहिफळे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर, यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘शासकीय योजनांची जत्रा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान शासकीय योजनांची जत्रा हा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील 75 हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्याची विविध क्षेत्रात आघाडी

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आजपासून बरोबर 63 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता आपल्या राज्याला ‘जय जय महाराष्ट्र माझा-गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा बढे यांचे गीत राज्यगीत म्हणून मिळाले आहे. गेल्या 63 वर्षांत आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत भर घालीत आहेत. शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहेत. आजपासूनच शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो’ शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा निधी जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांनी घ्यावी काळजी

खरीप हंगामाला लवकरच सुरवात होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळेतच शेतीची कामे उरकावीत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून त्यानुसार पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात बी-बीयाणे, खते व किटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. यंदा एल- निनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात.

जिल्ह्यातील प्रकल्पात 40 टक्के जलसाठा

जिल्ह्यातील प्रकल्पांत 40 टक्के जलसाठा आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सिंचनाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाययोजना करीत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती

सततचा पाऊस ही बाब सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. एवढेच नव्हे, तर अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळीचा आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने 20 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.  त्याचबरोबर सप्टेंबर व नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरीता 27 कोटी 76 लाख रुपये, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची 66 कोटी 14 लाख रुपये तर मालमत्तेच्या नुकसानीची 66 कोटी 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना 33 कोटी 61 लाख रुपयांची तर सन 2021-22 अतंर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत 50 हजार 191 शेतकऱ्यांना 419 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 5 हजार 45 लाभार्थ्यांना 31 कोटी 24 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि रावेर तालुके दुर्गम क्षेत्रात येतात. या भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना पावसाळ्यापूर्वी त्यांना मिळत असलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा मंजूर

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जळगांव जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 14 गावांमध्ये 155.68 हे. आर (389.2 एकर) शासकीय जागा मंजूर करण्यात आली आहे. तसेच आगामी काळात जिल्ह्यातील 56 गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी शासकीय जमीन वितरीत करण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया योजनेंतर्गत गावोगावी इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी बी.एस.एन.एल. 4 जी टॉवर उभारणीसाठी जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 38 दुर्गम भागातील गावांमध्ये प्रत्येकी 200 चौरस मीटर जागा मंजूर करण्यात आली आहे. उर्वरीत 8 तालुक्यातील 30 दुर्गम भागातील गावांमध्ये लवकरच जागा मंजूर केल्या जातील.

48 लाख नागरिकांनी घेतला मोफत प्रवासाचा लाभ

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त राज्य सरकारने राज्यातील 75 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला एसटी बसचा प्रवास मोफत केला आहे. याचा जिल्ह्यातील 48 लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्याचाही 29 लाख महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. जिल्ह्यात दळण- वळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्याला 121 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या असून अजून 100 साध्या बसची मागणी केली आहे.

75 हजार रिक्त पदे भरण्यास मंजूरी

राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता रोजगार मेळावे घेण्यात येत असून जिल्ह्यात 16 रोजगार मेळाव्यातून 1200 उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाने येत्या 15 ऑगस्टपर्यंत 75 हजार रिक्त पदे भरण्यास मंजूरी दिली असून त्याची सुरुवात जिल्ह्यातही झाली आहे. आज प्रातिनिधीक स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आले.

जलजीवन मिशन अतंर्गत 1435 गावांसाठी 1234 कोटींचा निधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 81 गावांच्या 26 योजनांसाठी 528 कोटी 54 लक्ष 85 हजार इतका निधी मंजूर आहे. जिल्हा परिषदेमार्फत 1354 गावांसाठी 1234 कोटी 49 लक्ष निधी मंजूर आहे. अशा एकूण 1 हजार 435 गावांच्या 1 हजार 380 योजनांसाठी 1 हजार 763 कोटी 3 लक्ष 85  हजार एवढ्या निधीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. 1380 योजनांचे 100 टक्के कार्यादेश देण्यात आले आहेत. 1295 योजना प्रगती पथावर आहेत. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने  100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ गोरगरीब जनतेला देण्याचा निर्णय घेतला. याचा जिल्ह्यातील 6 लाख 16 हजार 177 एवढ्या पात्र कुटुंबांना लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघानेही सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा आपल्या आहारात तृणधान्याचा वापर करावा, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आपले हक्काचे घर मिळावे याकरीता महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात अमृत महाआवास 3.0 अतंर्गत 1 लाख 2 हजार घरकुलांचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 75 हजार 587 घरकूल पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

वाळू विक्रीबाबत सर्वंकष धोरण

राज्य शासनाने वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण नुकतेच जाहीर केले आहे. राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे व विकास कामांसाठी आवश्यक असणारी वाळू उपलब्ध व्हावी हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहेत. जळगाव जिल्ह्यातील आठ वाळू घाटांना पर्यावरण मान्यता प्राप्त असून त्यापैकी चार वाळू घाट शासकीय कामांसाठी राखून ठेवलेले आहेत. उर्वरित चार वाळू घाटांमधील वाळू दोन डेपोच्या माध्यमातून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून जिल्ह्यात मुलभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. यावर्षी 99.96 टक्के निधी खर्च करण्यात आला आहेत.

संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार

जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू नये याकरिता 2 कोटी 44 लाख रूपयांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. एल निनो च्या पार्श्वभूमीवर जुलै ते ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी 556 गावांसाठी 3 कोटी 42 लाख रुपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात आपल्या जळगाव जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबवून राज्यात प्रथम क्रमांकाचे दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले, असे सांगत पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

गुणवंतांचा गौरव सोहळा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

‘आपली पेन्शन आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबवून जळगाव जिलह्याने राज्यात प्रथम क्रमांकाचे दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा सत्कार करण्यात आला. सन 2022- 23 मध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल आदर्श तलाठी पुरस्कार मनीष लक्षण रत्नाणी (जामठी, तहसील बोदवड, जि.जळगाव).

सुधारक सन्मान पुरस्कार : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार- प्रकाश हरी नेमाडे (रा. मस्कावद, ता. रावेर), दत्तात्रय रमेश पाटील (रा. चहार्डी, ता. चोपडा, जि.जळगाव), सुनील अंबादास भामरे (रा. अमोदा, ता. यावल. जि.जळगाव).

पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्रदान : पुरस्कारार्थीचे नाव- विनयकुमार भीमराव देसले, चालक पोलिस उपनिरीक्षक, मोटार परिवहन शाळा, जळगाव),  संजय हरिदास पवार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जळगाव) नरेंद्र हिरलाल कुमावत (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जिल्हा विशेष खाखा, जळगाव), सचिन सुभाष विसपुते (जळगाव), सुनील अर्जुन माळी (जामनेर, जि. जळगाव), मनोज काशिनाथ जोशी (जळगाव), राजेश प्रभाकर चौधरी (जळगाव), सुनील माधव शिरसाट (चाळीसगाव), विजय अशोक दुसाने (जळगाव), अल्ताफ सत्तार मन्सुरी (जळगाव), अमोल भरत विसपुते (जळगाव), रवींद्र धोंडू घुगे (जळगाव).

शासकीय पदावरील निवडीचे नियुक्ती आदेश

उमेदवारांचे नाव, कार्यालयाचे नाव, पदनाम असे : अक्षय गणेश इंगळे, सुशील सुरेश निकम, मयुरेश विलास मोरे, राहुल अरुण पारधी, श्रीमती मावसकर नेहा बालकराम (वस्तू व सेवाकर विभाग, जळगाव, राज्यकर निरीक्षक). पुरुषोत्तम छगन शेवाळे (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), मनीष राजेश पाटील, वासुदेव गुलाब साळुंखे (राज्य उत्पादन शुल्क, जळगाव, दुय्यम निरीक्षक). सिद्धार्थ सोमा भालेराव आणि प्रभाकर नामदेव सोनवणे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव, चालक तथा वाहक), कुणाल राजेंद्र भदाणे, भूषण बंडू चोधरी, पूजा जयवंतराव पाटील, काजल जगतराव साळुंखे, योगिता महिपालसिंग राजपूत आणि दीपक तुळशीराम पाटील (जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव, भूकरमापक तथा लिपिक).

यावेळी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक न्याय पर्वाच्या कार्यपूर्ती अहवालाचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार (संगांयो) जितेंद्र कुंवर, तहसिलदार (महसुल) पंकज लोखंडे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय इमारत आवारात ध्वजारोहण

येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात उपवनसंरक्षक विवेश होशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांच्या सहकार्यातून एकत्रितपणे प्रयत्न केले जात असून आपला जिल्हा विकासात कायमस्वरुपी अग्रेसर राहावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते झाला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. समाधी स्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावावर असण्याबाबतची अट ही शिथिल करण्यात आली असल्याने समाधी स्थळाच्या सुशोभीकरण चा प्रश्न मार्गी लागला असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर सह संपूर्ण देशात सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या प्रभावशाली व्यक्तिमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख करावाच लागतो. महाराजांच्या योगदानातून आपली जडण घडण झाली. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व दिनांक 6 मे  ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल येथे होत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करूया आणि 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता आपण सर्व जण जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहून आपल्या लोकराजाला अभिवादन करुया. या कृतज्ञता पर्वात सर्व शाहूप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.

राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला  दवाखान्याचे डिजिटल अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होत आहे. यामध्ये मोफत तपासणी, मोफत औषध उपचार व मोफत औषधांचा समावेश आहे. गोरगरीब मजूर कष्टकरी लोकांसाठी बाह्यरुग्ण विभागाची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आली आहे, असे सांगून श्री. केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0′ या अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरुन 7 हजार मेगावॅट वीज निर्मिती करणे आणि सन 2025 पर्यंत 30 टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन 2025’ या अभियानाच्या माध्यमातून निश्चित केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत सहभाग घेण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करून देणे व अनाधिकृत रेती उत्खननास आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाची ही मान्यता मिळालेली आहे. नव्या रेती धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यात 1 मे 2023 पासून या धोरणानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा काही जिल्ह्यात 600 रुपये दराने वाळू उपलब्ध होईल. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ही या नवीन धोणानुसार विहित प्रक्रिया अवलंबून वाळू उपलब्ध करून देण्याचे नियोजित असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

राज्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण विभागाकडून दिवाळी, गुढीपाडवा, रमजान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्याची आपल्या जिल्ह्यातही तत्परतेने अंमलबजावणी झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन 2022-23 अंतर्गत 411 कोटीचा निधी विविध विकासाच्या कामावर खर्च करुन त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविला जात आहे. तर सन 2023-24 अंतर्गत 480 कोटीचा विकास निधी मंजूर

असून या अंतर्गत विविध विकास कामे केली जाणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शाहूवाडी येथे नव्या औद्योगिक वसाहतीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.  तर मजले ता. हातकणंगले येथे ड्रायपोर्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील पायाभूत सोयी सुविधांसाठी 120 कोटीचा निधीही उद्योग विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी  नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योग, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योग तर हातकणंगले तालुक्यात शेळीपालनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी नाबार्ड कडून 30 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती श्री केसरकर यांनी दिली.

कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची 93 टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अधिक गतीने सुरु असून 31 मे 2023 अखेर ही सर्व कामे पूर्ण करुन कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत 2021-22 या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात इयत्ता पाचवीचे 34 तर इयत्ता आठवीचे 42 विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले आहेत,असे त्यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून क्षकिरणशास्त्र विभागामध्ये अत्यंत आधुनिक अशी     डी. आर. सिस्टीम प्राप्त झाली आहे. या सुविधेमुळे कॅसेट शिवाय एक्सरे काढता येतो, आजाराचे अचूक निदान करण्यास मदत होते. दिवसाला सर्वसाधारण 500 एक्सरे काढता येतात. तसेच अत्यावस्थ असलेल्या रुग्णाला स्ट्रेचरवरुन न हलवता एक्स-रे काढता येतो. या सुविधेमुळे रुग्णांना अधिक गतीने आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. तसेच जिल्ह्यात राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अंमलबजावणी बाबत विविध विभागांची माहिती ही त्यांनी दिली.

प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर सोबत परेडचे निरीक्षण केले.

परेडचे पथसंचलन झाले. त्यानंतर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादनशुल्क, संचालक भूमी अभिलेख पुणे, परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई या विविध विभागात नियुक्तीचे आदेश आजच्या महाराष्ट्र दिनी पालकमंत्री केसरकर यांच्याहस्ते देण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर पोलीस दलातील 13 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह 2022 साठी प्रदान करण्यात आला, त्याबद्दल श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आदर्श तलाठी पुरस्कार, समाज कल्याण अंतर्गत स्वाधार, महाज्योती, स्टॅण्ड अप, मिनी ट्रॅक्टर या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात. समाज कल्याण च्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थी यांचा सन्मान, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या पुरस्काराचे वितरण ही करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या रिल्सचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते अनावरण

ठाणे, दि. 1 (जिमाका) – सध्या समाजमाध्यमांवर रिल्सची क्रेझ वाढली आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्स लोकप्रिय आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अशा प्रकारच्या रिल्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या रिल्सचे अनावरण ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज झाले. रिल्सच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे आदी उपस्थित होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून हे रिल्स प्रसिद्ध केले जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांना निधी वितरित करण्यात आला होता. सन 2022-23 या वर्षाच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांनी विविध उपक्रमाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी केली. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककला, पथनाट्याच्या माध्यमातून योजना पोचविण्यात आल्या. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण ठाणे कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 10 महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे अनेक योजनांची माहिती नव्याने झाली असून करिअरची पुढील दिशा ठरविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरण्याचे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले होते. ठाणे जिल्ह्यात प्रथमच महाविद्यालयात जाऊन प्रदर्शन भरविण्यात आले होते.

 

काय आहे रिल्समध्ये?

प्रसिद्धी मोहिमेचा भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी समाज माध्यमातून करण्यासाठी रिल्सचा वापर करण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले. अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी आर्थिक मदत, स्टँडअप इंडिया, शेतकऱ्यांना मिनि ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुलींसाठी असलेल्या  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत या योजनांचे रिल्स तयार करण्यात आले. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने केलेला राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेले उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचल्यास त्या योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. अधिकाधिक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.

धुळे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर आज सकाळी मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक  किशोर काळे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग उपस्थित होते.

प्रारंभी पोलिस दलाच्या बॅण्डने राष्ट्रगीत व राज्यगीत गायले त्यानंतर पोलीस दलाच्या तुकडीने मानवंदना देऊन राज्य राखीव पोलीस दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड पुरुष व महिला, पोलीस दलाच्या तुकडीने संचलन केले. संचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस अधीक्षक  रुषीकेश रेड्डी यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्वनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या कार्यपूर्ती अहवाल व शासकीय योजनांची यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

गुणवंतांचा सत्कार

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते यावेळी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अकलाड, ता. जि. धुळे येथील हर्षा केशवराव ओगले यांचा आदर्श तलाठी म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश सीताराम राऊत, हवालदार संदीप धनाजी सरग, प्रकाश रणछोड सोनार, जाकिर खान नवाज खान पठाण यांचा पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. जिल्हा युवा पुरस्कार पंकज ज्ञानेश्वर शिंदे, विकास चंद्रकांत सोनवणे, प्राजक्ता प्रकाश माळी, भटेसिंग दरबारसिंग चौधरी, जिल्हा युवा पुरस्कार संस्था श्री क्षत्रीय शिवराणा कृषी विज्ञान मंडळ, आढे, ता. शिरपूर, मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळे यांचाही रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

नियुक्तीपत्राचे वितरण

याबरोबरच वस्तू व सेवाकर विभागात नियुक्त राज्यकर निरीक्षक हर्षल प्रभाकर चौधरी, उदयकुमार शांतिलाल सूर्यवंशी, वैभव गांगुर्डे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक हेमंत प्रकाश घरटे, दगडू साहेबराव पाटील, विठ्ठल नवल बाविस्कर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चालक तथा वाहक महादेव मारुती गर्जे, ज्ञानेश्वर शांतिलाल महाले, संदीप सुभाष धनगर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक गौरव विलास सूर्यवंशी, सचिन दीपक पवार, अपूर्वा तुषार बेहेरे, नेहा संजय पाटील, वेदांत रमेश आढारे, ओंकार संजय शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील आणि गाव पातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणारे नंदलाल काशिनाथ पाटील (गरताड, ता. जि. धुळे), सुनील अभिमन सोनवणे (बोरविहीर, ता. धुळे), डॉ. किरण राजेंद्र जोशी (विरदेल, ता. शिंदखेडा) यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहिद अली यांनी केले. या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिाकरी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे (भूसंपादन), जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवू. जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनसह राज्यस्तरांवरून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी  विजयसिंह पाटील,  जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार  मिरजकर आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सामान्य माणूस, शेती आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2022-2023  मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून  363  कोटी  56  लाख रुपये पेक्षा अधिक निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे. यातून शिक्षण, आरोग्यासह अन्य विभागामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2023-24 साठी 404 कोटींचा जिल्हा नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 77 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांच्या मर्यादेत 282 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सन 2022-23 मध्ये 1 लाख 92 हजारावर शेतकऱ्यांना 32 कोटी 91 लाखाची व्याज सवलत देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात विविध आपत्तींमध्ये बाधित झालेल्या 77 हजार पेक्षा अधिक लाभार्थीच्या खात्यावर 66 कोटी 12 लाख रुपयेहून अधिक मदत वर्ग करण्यात आली आहे.

पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी व कुंडल या ग्रामपंचायतीना  मा. राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी  दोन्ही ग्रामपंचायतींचे व समस्त ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच सांगली येथे नुकत्याच पार पाडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिक्षा बागडी हिने प्रथम क्रमांकाची मानाची गदा पटकावून जिल्ह्याच्या क्रीडा लौकीकात भर घातली असल्याचे ते म्हणाले.

यंदाचे वर्ष हे एल निनो चे वर्ष असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, जलस्त्रोत बळकट करावेत. वातावरणातील बदलामुळे उन्हाचा तडाखा वाढला असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून महाराष्ट्राला त्यात प्रथम क्रमांक मिळाला हे जलयुक्त शिवार योजनेचे मोठे यश आहे. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा 2.0 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील एकूण 147 गावांची निवड  झाली आहे. या गावात पाणलोट जलपरीपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच जोडीला गाळयुक्त जमीन, गाळमुक्त धरण योजना देखील राबविली जाणार असल्यामुळे त्याचा  शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेतील वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली कामे गतीमान केली आहेत. या योजनेतील कामांसाठी 981 कोटी रूपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून स्वीकृतीसाठी ती शासनस्तरावर पाठविण्यात आली आहे. या योजनेमुळे जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. लवकरच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

सर्व नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी  मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये मार्च 2023 अखेर 3 लाख 62 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 अखेर 96 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 683 गावांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून यातील कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील पाण्याची समस्या असणाऱ्या शोषित, अतिशोषीत अशा पाच तालुक्यांतील 95 गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. पाणी बचतीसाठी ठिबक व स्प्रिंकलर सारख्या  उपाययोजना  करीता शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जादाचे 25 ते 30 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान प्राप्त होत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 2 हजार पेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना 5 कोटी 74 लाख रुपयापेक्षा अधिक अनुदान वितरित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले,  या योजनेत  गत आर्थिक वर्षात 38 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतला आहे. त्यासाठी विविध हॉस्पीटलला मोबदला म्हणून 98 कोटी 48 लाख रुपयांपेक्षा अधिक निधी दिलेला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांमध्ये सांगली  जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे केंद्र शासनाकडून यावर्षी जिल्ह्याचा कास्य पदक देऊन सन्मान केला आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. स्मार्ट पीएचसी, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सदृढ बालक मोहीम, सुंदर माझा दवाखाना या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याव्दारे सामान्य माणसाला आरोग्य विषयक मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा – मॉडेल स्कूल या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत  172  जिल्हा परिषद शाळा मॉडेल  स्कूल  केल्या आहेत. दुसऱ्या टप्यात 141 शाळा  मॉडेल स्कूल होतील आणि  136 शाळांची तिसऱ्या टप्यासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी व्यक्त केला.  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आत्तापर्यंत 15 हजार पेक्षा जास्त घरकुले पुर्ण झालेली असून 6 हजार 700 पेक्षा जास्त घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

कामगारांना व त्यांच्या कुटुंबाला सन्मान मिळावा, कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबाजवणी सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात 71 हजार पेक्षा अधिक कामगारांना शैक्षणिक योजनासाठी  141 कोटी 28 लाख रुपये,  आरोग्य विषयक योजनासाठी  2 कोटी 13 लाख रुपये,  इतर आर्थिक योजनासाठी  89 लाख रुपये,  सामाजिक योजनांच्या लाभासाठी – 4 कोटी 56 लाख रुपये असे एकुण 148 कोटी 86 लाख अनुदान देण्यात आले आहे.            पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली-मिरज ही नगरी नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सांगली  येथे  नव्याने  होणाऱ्या अद्ययावत  नाट्य  मंदिरासाठी 25 कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये,  दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरूड येथील स्मारकासाठी 20 कोटी रुपये  निधीची  तरतुद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नविन, सुसज्ज व जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी नविन पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत लवकरच पूर्ण होत आहे. ही इमारत पर्यावरणपूरक वास्तू असणार आहे. जिल्ह्यातील आटपाडी, कडेगाव व कुंडल या पोलीस ठाण्याच्या इमारतींचे नविन  बांधकाम  सध्या  सुरू  आहे. त्याही लवकरच पूर्ण होतील.

वंचित घटकांच्या विकासासाठी शासन अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करीत आहे. सन 2022-2023    या   आर्थिक   वर्षात   अनुसूचित   जाती  उपयोजनेचा निधी 100 टक्के खर्च  करण्यात आला आहे.  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेतून 108 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 27 वसतीगृहांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर 15 हजारावर विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सन्मानासाठी राज्य शासन नेहमी अग्रेसर राहिले आहे. राज्य शासनाने महिलांच्या सन्मानासाठी  त्यांना एस.टी बसच्या प्रवासात तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली आहे. सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 25 लाखाहून अधिक  महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांसाठी एस. टी. प्रवास विनामूल्य केला असून मार्च 2023 अखेर या योजनेचा लाभ 21 लाखाहून अधिक  ज्येष्ठ नागरीकांनी घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले.

अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे गोरगरीबांचा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला. सांगली जिल्ह्यामध्ये सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा 4 लाख पेक्षा अधिक  लाभार्थ्यांना मिळाला आहे.  चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये वापर करा, निरोगी आरोग्यासाठी हे आपल्याला आवश्यक आहे.

भारत देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री यांनी सन-2014 मध्ये जाहिर केला होता. त्यास अनुसरुन कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील 500 ग्रामपंचायतीची निवड करुन त्याठिकाणी ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे नियोजित आहे. त्यास अनुसरुन दि. 5 मे 2023 ते 6 जुन 2023 कालावधी राज्यामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये मोफत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील युवकांना मोफत व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे  विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर, सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास आराखडा सन 2023-24 पासून तयार करावयाचा आहे. हा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्या संधीचा वापर करून अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे साध्य ठरवावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सूचना, माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. ज्याव्दारे जिल्ह्याचा परिपूर्ण व सर्वंकष आराखडा तयार करू शकू. आणि विकसीत भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देवू, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

राज्य शासन नोकर भरतीलाही प्राधान्य देत असून आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या १५ उमेदवारांना  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. याबरोबरच पोलीस दल, जिल्हा प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कामगार विभागाच्या वतीने दीपक पांडुरंग देशमुख यांना उपचारासाठी 25 हजाराचा आणि अक्षय विभुते यांना परदेशी शिक्षणासाठी 50 हजाराचा धनादेश वितरीत करण्यात आला.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल, बँड, श्वान, निर्भया, डायल 112, फौंरेन्सीक लॅब, बीडीडीएस आदि पथकांचा समावेश होता. पत्रकार दिपक चव्हाण यांचा  दिव्यांगाच्या विविध योजनांबाबत चित्ररथाचाही यामध्ये सहभाग होता.

या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व  विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

ठाणे, दि. 01(जिमाका) – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राहिलेले राज्य आहे. कृषि, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण , आर्थिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आपला नावलौकिक मिळवला आहे.  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या राज्याचा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार  सर्वांनी करावा.

राज्याच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. तसेच रस्ते, उड्डाणपूल आदींची कामेही सुरू आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी 900 बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तसेच आजपासून जिल्ह्यात 9 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत आहेत, असेही श्री. शिनगारे यांनी सांगितले.

नागरिकांना आपले घर बांधण्यासाठी माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आजपासून अंमलात आणले आहे. जिल्ह्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाच्या विविध रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 10 उमेदवारांना यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते नियुक्तीची शिफारसपत्रे देण्यात आली. यामध्ये राज्य कर निरीक्षक व राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील उमेदवारांचा समावेश होता.

या कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर पहिल्यांदाच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही पोलीस दलाच्या बँड पथकाने वाजविले. यावेळी झालेल्या संचालनालनात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड, पोलीस आयुक्तालय, जिल्हा ग्रामीण पोलीस, पोलीस बँड पथक, अग्निशामक दल, ठाणे महापालिका सुरक्षा रक्षक दल, रुग्णवाहिका आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी चारुलता धानके यांनाही विशेष पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, तहसीलदार युवराज बांगर, दिनेश पैठणकर आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.

नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची देशात ओळख   -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार,दि.1 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): ज्याप्रमाणे आज आपण राज्याचा 63 वा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहोत, त्याचप्रमाणे चालू वर्ष हे नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात जिल्हा निर्मितीसह येथील सर्वच क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल थक्क करणारी अशीच आहे. तसेच वाढत्या दळण-वळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे, असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काढले.

ते आज महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,  जि.प उपाध्यक्ष सुहास नाईक,  जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, जात पडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मुख्याधिकारी पुलकीत सिंह, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, हे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्याचे प्रशासकीय संकुल, जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेची इमारत, जिल्हा न्यायालयाची इमारत, जिल्हा ग्राहक मंच, शासकीय ग्रंथालय, तहसील व उपविभागीय कार्यालयांच्या इमारती, शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसह सार्वजनिक बांधकाम भवन यासह सर्वच विभागांची स्वतंत्र कार्यालये, स्वतंत्र इमारती जिल्ह्यात सुरु झाली आहेत. वाढत्या दळण-वळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. राज्यातील सर्वाधिक  आदिवासी बहुल जिल्ह्यांपैकी म्हणून एक हा जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यासह, राज्यातील आदिवासी बांधवांचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्याचा सामाजिक, व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक उपाययोजना जिल्हाधिकारी, जिल्हा पोसीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध यंत्रणांच्या मध्यमातून हाती घेतल्या आहेत. येथील आदिवासी बांधवांसह सर्व समुदायातील नागरिकांना त्यांच्या पायावर भक्कमपणा उभे करून स्वावलंबी करण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकासाचा 25 वर्षांपूर्वी केलेला संकल्प आज साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे.

ते पुढे म्हणाले, नंदुरबार हा शेतीप्रधान जिल्हा आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखी आणि समाधानी कसा राहिल यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत.  जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी २ लाख ८८ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट असून त्यासाठी २१ हजार ५७४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ८७ हजार ९९० मॅट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत २४ शेतकऱ्यांच्या वारसांना ४८ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ५ हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १ लाख १२ हजार शेतकऱ्यांना १३ हप्त्यांचे वितरण झाले आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे बाधित नुकसानग्रस्त  १०७ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये ४ हजार ७३० हेक्टरसाठी ८ कोटी, १३ लाख,२३ हजारांची मदत सरकारच्या वतीने वितरित केली जाणार आहे.

जिल्ह्यातील एकही माणूस उपाशी राहू नये या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचे मार्च २०२३ अखेरपर्यंत ४ लाख ९९ हजार ७५५ इतके वितरण करण्यात आले आहे. तसेच दिवाळी, गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनमित्त ४ लाख ८३ हजार केसरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’  या अभियानातून १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना विवध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.

यावेळी बोलताना आपल्या भाषणातून पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, या भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. आदिवासी भागातील गाव, वाडे-वस्त्यांवर आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या मुलभूत सविधा पुरविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून कामे जलद गतीने पूर्ण केली जाणार आहेत. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, नवे वाळू वितरण धोरण, मुख्यमंत्री सहाय्यक कक्ष, ग्रामपंचायतींचा विकास, जलजीवन मिशन जलयुक्त शिवार 2.0, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, व जिल्हा नियोजनाच्या तरतूदींचा गोषवारा सांगत, कोरोनाबाबत सतर्क राहण्याचेही आवाहनही त्यांनी यावेळी जिल्हा वासियांना केले.

महाराष्ट्र गीताने दुमदुमला परिसर

आजच्या महाराष्ट्र दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपरांची गाथा सांगणारे कविवर्य श्री. राजा निळकंठ बढे यांची रचना असलेले  ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’  हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून राष्ट्रगीतासोबत भविष्यात प्रत्येक शासकीय कार्यक्रमात म्हटले जाईल. ते आजच्या माहाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र गीताने आज हा कार्यक्रम व परिसर दुमदुमून गेला.

यांचा झाला सन्मान..

राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाननिमित्त व कामगार दिनाननिमित्त विविध विभागामार्फत दिल्या जाणारे पुरस्कार व सन्मान यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले, ते पुढील प्रमाणे आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, पोलीस हवालदार विलास पाटील, लक्ष्मीकांत निकुंभ, रविंद्रसिंग पाडवी, पोलीस नायक पंकज महाले यांना पोलीस महासंचालक सन्माचिन्ह 2022 देण्यात आले. तर महसुल व वन विभागामार्फत तलाठी बळीराम चाटे  यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत ‘Gendr Sensitive Role Model Award ’ म्हणून जिल्हास्तरावर 24 पुरुषांना नामांकन मिळाले असून त्यापैकी भीमसिंग पाडवी, मगन गावित, गोपाल पावरा यांना  ‘सुधारक’ सन्मान प्रदान करण्यात आला. युवा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून  जगदीश वंजारी, रोमाना पिंजारी, ऋषिकेश मंडलिक, पल्लवी प्रकाशकर, मुकेश पाटील, तेजस्विनी चौधरी यांना  जिल्हास्तरीय युवा पुरस्कार (युवक व युवती ) पुरस्कार  प्रदान करण्यात आला तर नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार तसेच युवक मित्र परिवार,कोठली ता.शहादा यांना जिल्हा युवा पुरस्कार (संस्था ) प्रदान करण्यात आला.

नियुक्ती आदेशाचे वाटप

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली त्यात भूमी अभिलेख विभागातील निकिता बच्छाव, मयुर बडमे, ऋषिकेश चौरे, शिमान गावित, शैलजा पाटील यांना भूकरमापक तथा लिपिक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आली. तसेच वस्तु व कर सेवा विभागामार्फत चेतन मराठे, तेजस्वी ठाकरे यांना राज्यकर निरीक्षक पदाची तर जिल्हा शल्य चिकित्स संवर्गात डॉ.संजय गावित यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विपुल जितेंद्र अहिरे, भूमिका आगळे, हर्षल भटकर, हर्षदा महाले या  विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे शुभेच्छा पत्र  देण्यात आले. तर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात उत्कृष्ट काम करणारे कृषि अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषि अधिकारी किशोर हडपे, निलेश गढरी, जिल्हा संसाधन योगेश कहार यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते नदीच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलांच्या वारस दिलवरसिंग पाडवी, अशोक पाडवी यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून  आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आला.

यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.  संचलनात जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, 207 वज्र आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सहभाग घेतला.

यावेळी जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उप विभागीय पोलस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, शिक्षणाधिकारी सतीष चौधरी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, यांचेसह विविध कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी अधिकारी-कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधव कदम यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुबे,  जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नाशिक, दिनांक: 01 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितीन मुंडावरे, विठ्ठल सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभागामार्फत रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी ‘फिरते पथक’ (बालकांचे आरोग्य, शिक्षण व पुनर्वसन) हा प्रकल्प सहा महिन्यासाठी नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या फिरत्या पथकाच्या वाहनाला जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रकल्पाचा शुभारंभ केला. यावेळी समेवत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल दुसाने, परिविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, कायदा व परीक्षा अधिकारी ज्योती पठाडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई, दि.1 : महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना डॉ. कल्याणकर यांनी यावेळी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त किशन जावळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस विभागात विविध ठिकाणी 24 वर्षे सेवेचा उत्तम अभिलेख राखलेले पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शंकरराव नाळे  यांना उल्लेखनीय सेवेबद्दल, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भिका चच्हाण यांना नक्षलवाद्यांना एन्काऊंटरमध्ये मारणे, जळगांव येथील दंगलीमधील गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणे अशा विविध उल्लेखनीय कामांबद्दल तसेच नेरुळ पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक महेश हंबीरराव पाटील, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश गोपाळ खांडेकर, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पो.ह. जगदिश सुरेश पाटील,नवी मुंबई विशेष शाखेचे पो.ह.महेश पंढरीनाथ वायकर, तळोजा पोलीस ठाण्याचे पो.ह.विजय भागवत पाटील, गव्हाणफाटा वाहतूक शाखेचे पो.ह.लक्ष्मण श्रीरंग पवार, नवी मुंबई गुन्हे शाखेचे पो.ह. भानुदास बिरु मोटे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

             यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक,  सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदिंनी संचलनाव्दारे प्रमुख अतिथी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

            या कार्यक्रमास उपायुक्त (महसूल) श्री.मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य),श्री.मनोज रानडे,                उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव,  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन निंबाजी गिते आणि शुभांगी पाटील यांनी  केले.

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...