शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1506

‘देखो आपला महाराष्ट्र’ हे ७५ सहलींचे टुर पॅकेज – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबई मध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहली, मेस्मरायजिंग कोकण दहा सहली, कल्चरल पुणे सात सहली, स्पिरीचुअल नाशिक चार सहली, मिस्टीकल अमरावती दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.

000

मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सी साईड प्लाझा आणि लेझर शो देखील आयोजित होणार

मुंबई दि. १ : देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज (दिनांक 1 मे 2023) केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली.

या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा करून महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विविध सूचना केल्या.

महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण 53 मीटर लांब व 5 मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त श्री. चहल यांनी नमूद केले.

दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा यांनी दिली.

000

आसमंतात निनादले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ चे सूर; महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 01 : राष्ट्रगीत व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या मंगलमय सुरांत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात प्र. विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर महाराष्ट्रगीत झाले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे मंगलमय सूर आणि उत्साहाने क्रीडा संकुलाचा परिसर निनादून गेला होता. विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर विविध सुरक्षा दलांच्या जवानांनी पथसंचलन करून मानवंदना दिली.  विविध पथकांच्या शिस्तबद्ध कवायतीला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते विविध विभागांच्या गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले. तसेच शासनाकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

 

 

महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे राज्य करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

नागपूर दि. ०१ : महाराष्ट्र हे  देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. आगामी काळात त्याला आणखी प्रागतिक करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असून महाराष्ट्र हे  ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ असणारे राज्य करू, असा निर्धार  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले.

ते म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात सत्ता परिवर्तनानंतर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान हा शाश्वत विकासाचा मुद्दा हाती घेतला आहे. निसर्गातील काही बदलांमुळे शेतकऱ्यांना  अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली. सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना त्याला जोड म्हणून सुरू केली. केंद्राचे सहा व महाराष्ट्राचे सहा हजार असे एकूण १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्ह्यातील अडचणीत शेतकऱ्यांना आपण अन्नधान्य मिळण्याकरीता ५ जणांच्या कुटुंबाला ९ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षाला २१ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत जमा होणार आहेत. २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

तथापि, यामुळे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार टप्पा २ सारखी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.जलसंधारण क्षेत्रात भूजलस्तर वाढल्याबाबत राज्याच्या कार्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला नुकतेच पुरस्कृत केले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार-२ मध्ये कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 243 गावामध्ये ही  योजना राबविली जाणार आहे.  एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देण्याचा महत्वाकांक्षी निर्णयही  शासनाने घेतला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून त्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच नैसर्गिक दृष्टचक्रात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा हजार कोटी रुपये मदत केली गेली. तर नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये दिले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत  गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांकरता एसटी बसेस मध्ये ५० टक्यांची सूट दिली आहे. घरी मुलीचा जन्म झाल्यावर लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे अशा प्रकारची लखपती योजनाही शासनाने आणली आहे. यासोबत यावर्षी दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी आवास योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती, आदिवासी यांच्याशिवाय ओबीसींसाठी यावर्षी तीन लाख घरे या योजनेंतर्गत बांधणार आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 300 पेक्षा जास्त दवाखान्याचे लोकार्पण होत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये १२ दवाखान्याचे आज लोकार्पित होत आहे.

नागपूरच्या विकासाकडे आपले लक्ष अधिक असल्याचे  यावेळी त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नागपूर जिल्ह्याला अर्थसंकल्पातून भरीव निधी देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नागपूर-गोवा मार्गासाठी  ८६ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपये, मिहान प्रकल्पासाठी आणखी १०० कोटी रुपये, नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी रुपये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी २२८ कोटी रूपये,शैक्षणिक क्षेत्रात शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ५० कोटी रुपये, संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी २० कोटी रुपये, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त १० कोटी रुपये, संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीसाठी ६ कोटी रुपये,लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरला अभिमत विद्यापीठाचा दर्जा, महाराष्ट्र विधी विद्यापीठ इमारतीसाठी निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाला दीड हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

आज राष्ट्रगीतासोबत महाराष्ट्र गीत सुद्धा राज्यात म्हटले गेले. आपल्या भाषणात याचा उल्लेख करून त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र हा प्रगतीशील राहिलाच आहे.त्याला अधिक प्रगतीशील करायचा शासनाचा प्रयत्न आहे. आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना सोबत घेऊन एक प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकार हे सातत्याने कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

कस्तुरचंद पार्कवरील या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्ह्यातील विविध पदावरील सनदी अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी स्वातंत्र्य सैनिक क्रीडा, कला व विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते या ठिकाणी विविध पथकांमार्फत संचलन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर व महेश बागदेव यांनी केले.

*****

 

सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  •   जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ
  •   बारा ठिकाणी होणार मोफत उपचार
  •   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतून डिजिटल पद्धतीने लोकार्पण
  •   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून उपस्थिती

नागपूर,दि.01 : यंदाच्या अर्थसंकल्पात पाचशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या शुभपर्वावर दोनच महिन्यात 317 दवाखाने आज राज्यभरात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 12 दवाखाने सुरु झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा  उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीने मुंबईवरुन  या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण राज्यात 317 ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती होती. उस्मानाबादहून आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत उपस्थित होते.

आपला दवाखाना हा एक अतिशय लोकाभिमुख उपक्रम आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून 30 विविध सेवा निःशुल्क देण्यात येणार आहे. या दवाखान्यांमध्ये विविध एक्सपर्टला बोलवून एक्सपर्ट कन्सल्टेशन देखील निःशुल्क मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होत असून आपल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात आज त्याचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकार्पणप्रसंगी आ.प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य उपसंचालक डॅा. विनिता जैन यांच्यासह महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 12 ठिकाणी शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्ह्यात बारा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील डोरले ले आऊट,  ग्रामीणमधील हिंगणा, कामठी, कुही ,मौदा, वाडी, मोवाड ता. नरखेड, पारशिवणी, रामटेक, थापा ता. सावनेर, उमरेड आणि भिवापूर अशा एकूण 12 ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

निःशुल्क तपासणी, उपचार आणि औषधी

आपला दवाखान्यामध्ये मोफत उपचार, तपासणी आणि औषधी देण्यात येणार आहेत. दवाखान्यात सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. बाह्यरुग्ण सेवा, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण या सुविधा प्रामुख्याने पुरविण्यात येणार आहेत.

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा या दवाखान्यात पुरविण्यात येणार आहेत.  यात फिजिशियन स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, नाक कान घसा तज्ज्ञ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ असणार उपलब्ध

दवाखान्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, मदतनीस यांचा समावेश असणार आहे.

 

*****

 

एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई–ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.

 

स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा    

एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.

एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी

आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.

आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.

यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.

यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी … एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्याच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा 1: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी  अधिकारी  ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियेाजन अधिकारी शशिकांत माळी  यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

वने, पर्यटन व स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून पर्यटनात वाढ करावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्राथमिकता ठरवून त्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार दोन वर्षाचा आराखडा तयार करावा.  डोंगर उतारावर बांबूची लागवड करणे, विस्तारीत महाबळेश्वर पर्यटन क्षेत्र तापोळा भागात विकसित करणे, जलसंधारणाची कामे करणे, सिंचन विभागाकडील जुन्या बंधा-यांची मजबूतीकरण करणे, धरणातील गाळ काढणे व जलसाठ्यामध्ये वाढ करणे. डोंगरी भागात पाटाऐवजी पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे, स्मार्ट प्राथमिक केंद्र, स्मार्ट शाळा, पर्यटन केंद्र या सर्वांचा विकास आराखड्यामध्ये समावेश असावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

0000

पर्यटन जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळख मिळवून देणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 1-सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या वाढीला मोठा वाव असून पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी  अधिकारी  ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

विस्तारित महाबळेश्वर पर्यटन क्षेत्र तापोळा परिसरात विकसित करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  कास, बामणोली, कोयना अशा अनेक पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. या माध्यमातून एक आदर्श पर्यटन जिल्हा म्हणून साताराची ओळख निर्माण करण्यात येईल.  जिह्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील.  जिल्ह्याने राज्याला भक्कम असे नेतृत्व देण्याचे काम केले आहे. आपला जिल्हा हा क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याला दिशा देण्याचे काम ही सातारा जिल्ह्याने केले आहे. जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात भरीव क्रांती केली आहे. सहकार, औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधली आहे. सहकाराच्या माध्यमातून साखर उद्योग, दूध उत्पादन यासह बँकिंग क्षेत्रातील भरीव काम केले आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा नियोजनच्या ४६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. तसेच स्मार्ट प्राथमिक शाळाही उभारण्यात येत आहेत.  विकासात राज्यातील अग्रेसर जिल्हा निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.  कामगारांच्या हिताचे निर्णय शासन घेईल, असे प्रतिपादनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये आदर्श तलाठी पुरस्कार, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांचे पुरस्कार व महिला बाल विकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक जिल्हास्तरीय पुरस्कार, तसेच राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य उपायुक्त (प्रशासन), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयातील नियुक्ती आदेशाचे वाटप, सामाजिक न्यायपर्व पुस्तिका व यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, याचे समाधान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला, कष्टकरी-कामगार आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाणीवपूर्क प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातूनही पंचामृत संकल्पनेतून सर्व सामन्यांच्या हितांच्या गोष्टींना, विकासाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरु होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात. अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत. सामान्य माणसांला आरोग्य सेवा, उपचाराचा बोजा उचलावा लागू नये अशी ही तरतूद आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महिला, शेतकरी यांच्या करिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची तसेच गरींबाकरिता घरे विशेषतः ओबीसींसाठी घर निर्मिती, रोजगार निर्मितीवर भर याबाबतही माहिती दिली.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल.

सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून आपला दवाखाना योजनेच्या विस्ताराचे अनावरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी आभार मानले.

000

शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद दि 01 (जिमाका)- शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करीत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्सा टप्यासाठी जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलिस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विक्रीकर सहआयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, आजपासून बरोबर 63 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता आपल्या राज्याला राज्यगीतही मिळाले आहे. याबाबतचा निर्णयही आपल्या सरकारने घेतला आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा- गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा बढेयांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे. शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने आता ‘सततचापाऊस’ ही बाब सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. एवढेच नव्हे, तर अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळो वेळी तातडीने मदत जाहीर केली आहे.जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या करिता 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’हा अभिन व उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 75 हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्याचा मागील वर्षाचा खर्च रुपये 2400 कोटी होता. तो यावर्षी 3400 कोटी करण्यात आलेला आहे. या अंतर्गत 21 लाख मजूर कुटुंबांना अकुशल स्वरूपाचे काम दिले आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी वेग वेगळे लोकाभिमुख निर्णय घोषित केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने विहिरींची संख्या, अंतराची अट, भुजल प्रमाणपत्र रद्द केले आहे. वृक्ष लागवडी अंतर्गत मोहोगणी, मिलीया डुबिया सारखी वृक्ष लागवड व जवळपास 70 प्रकारचे वृक्ष लागवड, वन औषधी व ड्रॅगनफ्रुट, केळी, द्राक्षतसेच फुल पिके देखील योजनेतून घेण्यात येत आहे. मनरेगाअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना घोषित केली असून 1 किलो मीटर कामासाठी रुपये 24 लक्ष अनुदान देण्यात येते. राज्यामध्ये जवळपास 38 हजार किलो मीटर रस्ते मंजूर केलेले असून त्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये 4000 किलो मीटर रस्ते मंजूर केले आहे. जेकी राज्यामध्ये सर्वाधिक आहेत. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा खर्च 99 कोटी रुपये होता. तो या वर्षी 170 कोटी झालेला आहे.राज्यात खर्चानुसार आपल्या जिल्हाचा 5 वा क्रमांक आहे.वृक्ष लागवडी मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली असून राज्यामध्ये देखील आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. गुरांचे गोठे देखील मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेले असून राज्यात आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक गुरांचे गोठे मंजूर केले असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

भाषणातील महत्वाचे मुद्दे:

· खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर

· खरीप हंमागा मध्ये शेतकरी बांधवांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप

· महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 994 कोटीरकमेचा कर्ज मुक्तीचा लाभ

· प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 26 हजार शेतकरी लाभार्थ्यांना 80 कोटी इतक्या रकमेच्या कर्जमुक्तीचा लाभ

· नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा सुरुवातीपासून राज्यामध्ये प्रथमस्थानी

· प्रकल्पामधून 1 लाख 13 हजार शेतकऱ्यांना 734 कोटी रुपयांचे अनुदान वाटप

· खरीप हंगामामध्ये 1 लाख 91 हजार सभासदांना 1 हजार 330 कोटी तर रब्बी हंगामामध्ये 64 हजार सभासदांना 623 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

· गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 175 प्रस्तावांना मंजूरी

· प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपला जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर-927 उद्योजकांना कर्जाचे वाटप

· 75 वर्षांवरील 36 लाख एवढ्या नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला

· महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत- 14 लाख 30 हजार महिलांनी घेतला लाभ

· दिवाळीनंतर गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात अंदाजे 10 लाख 60 हजार किटचे वाटप

· प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना मिळून 1 लाख 20 हजार मेट्रीक टन मोफत धान्य वितरीत

· सरासरी दरमहा 22 लाख 40 हजार लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ

· शिवभोजन-एकूण 61 शिव भोजन केंद्रांमधून दैनदिन 7 हजार शिव भोजन थाळी वाटप

· आज पर्यंत 50 लाख गरजूंनी घेतला योजनेचा लाभ

· जिल्ह्यातील 25 तृतीय पंथीयांना रेशन कार्ड आणि 47 तृतीय पंथीयांना ओळखपत्राचे वाटप

· कै. गोपिनाथराव मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत 1 हजार 500 कामगारांना ओळखपत्र

 

पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण-

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण्‍ आणि विहीत विभागाच्या 17 उमेदावारास नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले. तसेच पोलिस दलामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये उमाजी पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मनिष कलवानिया, पोलिस अधिक्षक, जयदत्त भवर, पोलिस उप अधीक्षक, मच्छिंद्र सुरवसे, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस निरीक्षक,रामेश्वर रेंगे, , पोलिस निरीक्षक,अतुल वाळेक, , पोलिस निरीक्षक, गणेश नलावडे , पोलिस निरीक्षक,रोहित गांगुर्डे, देविदास शेवाळे, शिवाजी घोरपडे, अमोल सोनवणे, अशोक अवचार, इ. समावेश होता.

· राजेश चिंतामण भोसले पाटील- छत्रपती शिवाजी महाराजवन श्रीपुरस्कार 2018

· शिवाजी नाग नाथराव राऊत- छत्रपती शिवाजी महाराजवन श्रीपुरस्कार 2019

· शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड- शैक्षणिक संस्था विभागस्तर 2018

· वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन फाऊंडेशन तिसगाव- सेवा भावी संस्था विभागस्तर 2018

· जय विश्व कर्मा सर्वोदय संस्था बीड बायपास रोड –सेवाभावी संस्था विभागस्तर 2019

· दिपक एरंडे- तलाठी यांना सन्मान पत्र व रोख रक्कम देण्यात आली.

‘शासकीय योजनांची जत्रा’ चित्ररथाचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते उद्घाटन

गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचला जावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून या योजनेची जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. यावेळीआमदार संजय शिरसाठ, विशेष पोलिस महानिरीक्षक के. प्रसन्ना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...