रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1505

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ

मुंबई,दि.१ : शिवराज्यभिषेक सोहळा  350 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने 350  दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग नमस्ते फॉउंडेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन संचालक‍ बी.एन.पाटील उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते दादरच्या सावरकर स्मारक पर्यंत ही रॅली आज सकाळी काढण्यात आली.

000

ई वेस्ट कचरा संकलनासाठीच्या ॲटो टिप्परचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर, दि.1(जिमाका):  महापालिकेच्या ऑटो टिप्पर गाड्यांमधे थोडा बदल करुन त्यामध्ये घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलन करण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. या ॲटो टिप्परचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम आरटीओ ऑफिस रोड, पितळी गणपती या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, निलेश देसाई, अजित ठाणेकर, वैभव माने आदी उपस्थित होते.

महानगरपालिका अंतर्गत घरगुती कचरा उचलण्यासाठी 169 ऑटो टिपर मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. कंटेनर मुक्त कोल्हापूरची संकल्पना राबवत असताना मागील दोन वर्षांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक असलेले कंटेनर काढून प्रत्येक घराबाहेर जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या ऑटो टीपरद्वारे घरगुती ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन त्याचे संकलन व प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पावर दैनंदिन नेण्यात येतो. यामध्ये बऱ्याच वेळा सॅनिटरी वेस्ट, घरगुती घातक कचरा या कचऱ्यामधून एकत्र येतो. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून इंदोर पॅटर्नच्या धर्तीवर महानगरपालिकेमधील ऑटो टिप्पर गाड्यांमध्ये थोडा फार बदल करुन त्यावर घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलन करण्यासाठी प्रत्येक गाडीच्या मागे स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक कप्प्याला वेगवेगळ्या रंगाचे कलर कोड देण्यात आले आहेत.

हे मॉडिफिकेशनचे काम कळंबा जेल मार्फत करण्यात आले असून महानगरपालिकेने निधी खर्च केलेला आहे. घरगुती घातक कचरा जसे ट्यूबलाईट, बल्ब, पेस्टिसाइड, रंगाचे डबे,बॅटरी सेल, डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट जसे सॅनिटरी नॅपकिन, डायपर,मेडिसिन, ग्लोज, मास्क आणि ई वेस्ट जसे जुने कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू ,खराब मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी यांचे वर्गीकरण करुन त्याचे स्वतंत्रपणे संकलन केले जाणार आहे या संकलन केलेल्या कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कचऱ्याचे वर्गीकरण करुन महानगरपालिकेच्या ऑटो टिप्पर गाडीमध्ये स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी केले आहे.

महापालिकेच्या पहिल्या ई लायब्ररीचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर, दि.1(जिमाका):  ई वॉर्ड पितळी गणपती जवळील एम्पायर टॉवर इमारतीमध्ये महापालिकेची पहिली ई-लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. या लायब्ररीचे लोकार्पण पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, रमेश कांबळे,  सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, ग्रंथपाल रत्नाकर जाधव उपस्थित होते.

ही लायब्ररी महासर्वसमावेशक आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेच्या ताब्यात विकासकाकडून प्राप्त झालेल्या ई वॉर्ड पितळी गणपती जवळील एम्पायर टॉवर इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. शहरात स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात असून बऱ्याच विद्यार्थ्यांना पुणे येथे अथवा कोल्हापूरातील खासगी अभ्यासिकेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य कुंटुबातील विद्यार्थ्यांना अर्थिकदृष्टया खाजगी लायब्ररीमध्ये जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने हि लायब्ररी तयार केली आहे. यासाठी महापालिका स्वनिधीतून रु.१३ लाख २१ हजार ६०६ रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. या लायब्ररीची एकाच वेळेस ४० विद्यार्थी अभ्यास करू शकतील इतकी क्षमता आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सुविधा, ए.सी रुम अशी अद्यावत ई लायब्ररी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या लायब्ररीचा उपयोग हाईल.

विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करुन शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करुन शालेय शिक्षण क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठे आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम केल्यास अधिकाधिक शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना उपक्रमांतर्गत ही प्रणाली विकसित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला अर्थसाह्य केले आहे.

शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेली आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय जाहीर करून मंत्री केसरकर म्हणाले, भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे, असे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शैक्षणिक व्यवस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आजघडीला शालेय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण यांच्यामधील सीमारेषा पुसल्या जाणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना घडवित असताना वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे, पादत्राणे वगैरे बाबी पुरवितो, मात्र त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम मार्गदर्शनातूनच येईल. त्यासाठी भाषा, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला रुची निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेल्या या आधुनिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होऊन त्यांना त्यात रुची निर्माण होईल. त्यातून केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्येही ते यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण शिवाजी विद्यापीठात सुमारे ५० वर्षांनंतर आल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर यांनी विद्यापीठाच्या बांधणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे आर्किटेक्ट व अभियंते आर.एस. बेरी यांच्या आठवणी जागविल्या. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण क्षेत्रात केलेले काम आणि गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीत शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने उंचावत ठेवलेली गुणवत्ता याबद्दल मंत्री केसरकर यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये सध्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांच्या १०४ संकल्पनांचे आधुनिक आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या आधारे सुलभीकरण करण्यात आले आहे. विज्ञानातील अवघड व क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास त्यामुळे सोपे होणार आहे. ही प्रणाली प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमधील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी या प्रणालीचे निर्माते व विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. सुधीर देसाई आणि डॉ. वैशाली भोसले यांनी या आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे सादरीकरण केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवपुतळा, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाल्याबरोबर मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

हॅम रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीसाठी बिनतारी संदेश यंत्रणा प्रकल्प कोल्हापूरमध्ये कार्यान्वित

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारत देशातील पहिला सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर,  रेडिओ ॲमॅचुअर क्लब कोल्हापूर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, IEEE संस्था अमेरिका यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेला तंत्रज्ञानावर आधारित भूर्प्रवण भागासाठी गुणकारी संदेश यंत्रणेच्या प्रकल्पाचे आज जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर प्रवणतेचा विचार करून पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा ही संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते.

या यंत्रणेचा वापर करणाऱ्या या हौशी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीच्या कालावधीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण सुरू राहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील पूरबाधित होणारी गावे आंबेवाडी व चिखली या तिन्ही ना हम रेडियो तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचं काम या प्रकल्पाने केलेला आहे.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारांनी करण्यात आलेला अशा स्वरूपाचा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये तसेच दुरुस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पूरबाधित भागाशी व्यत्यविरहित संदेश देवाण-घेवाण सातत्याने करता येणार आहे लोकांचे स्थलांतर काही लोक अडकले असतील तर त्यांची सुटका शोध व बचाव इत्यादी सर्व कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री प्रसाद संकपाळ यांनी प्रकल्पाविषयीची माहिती मान्यवरांना विशद केली माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हित कापून तसेच या यंत्रणेचा वापर करून या दोन गावांमध्ये संदेश देवाण-घेवाण करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण तसेच छत्रपती मालोजीराजे इत्यादी मांडणीवर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील हॅम रेडिओ मेंबर श्री नितीन ऐनापुरे यांच्या विशेष प्रयत्नांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा पतदर्शी प्रकल्प करणे शक्य झाले आहे श्री नितीन आनापुरे या प्रकल्पाचे केअरटेकर म्हणून यापुढे काम करणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि.1(जिमाका):  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भागवत कराड यांच्यासह मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.  कोल्हापूर येथील पितळी गणपती, ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग येथील रुग्णालयाचे जिल्हास्तरीय उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ.पी. एस. कांबळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरु करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.

महाराष्ट्र दिनानिमित्ताने कोल्हापूर जिल्हयातील २८ आरोग्यवर्धनी केंद्रापैकी ६ नगरपालिका क्षेत्रात व १ महानगरपालिका क्षेत्रामधील संस्थेचे रुपांतर, “हिंदु ऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये करण्यात आले आहे.

आरोग्यवर्धनी केंद्राअंतर्गत बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी व सर्व तपासण्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. “आपला दवाखाना” ची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असून सर्व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

आपला दवाखाना पन्हाळा अंतर्गत जुनी पंचायत समिती इमारत, कागल अंतर्गत हुतात्मा तुकाराम हॉल, मुरगूड, गडहिंग्लज अंतर्गत लाखे नगर, शाहुवाडी अंतर्गत उचतनगर, शिरोळ अंतर्गत भैरेवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी अंतर्गत आसरानगर येथे व महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत पितळी गणपती ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग, कोल्हापूर येथे आजपासून ‘आपला दवाखाना’ रुग्णासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगामध्ये सन २०२१-२२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण २८ आरोग्य वर्धनी केंद्रे ( न.पा. १६ व मनपा १२) मंजूर करण्यात आले आहे. सदर आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये १ वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस.), १ स्टाफ नर्स, १ बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी प्रमाणे मुनष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे स्वरुप – राज्यभरात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा असेल. तसेच बाहय रुग्ण विभागात वैद्य, स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञ, बाल आरोग्य तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ असतील. या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशिय कर्मचारी, अटेंडंट, गार्ड आणि सफाई कामगार आदी मनुष्यबळ असेल.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी १ मे २०२३ पासून “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” कार्यान्वित करण्यात आला. त्याचप्रमाणे या प्रकल्पाची लोकोपयोगिता लक्षात घेऊन या केंद्रांच्या संख्येत वाढ करुन उर्वरीत ठिकाणी पुढील ६ महिन्यात हा दवाखाना कार्यान्वित करुन त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.01(जिमाका) : शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागेल त्याला फळबाग, पिक विमा 1 रुपयात, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

समता मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या आणि अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे पालकमंत्री यांनी निरिक्षण केले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा करताना राज्याने केलेली प्रगती सर्वाना आश्चर्यचकित करणारी आहे. केवळ शेजारी राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाच्या एकंदर विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिशादर्शक ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगुन शिंदे सरकारने सादर केलेल्या पहिल्याच अर्थ संकल्पात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

यामध्ये केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहिर केली आहे. केंद्र  सरकारच्या वार्षिक 6 हजार  रुपयांसोबतच आता राज्य सरकार सुद्धा 6 हजार रुपये प्रती वर्ष देणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये महासन्मान निधी मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातील 3 लक्ष 52 हजार  शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

त्याचबरोबर यापुढे पीक विमा योजनेसाठी शेतकरी हिस्सा शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे. याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुद्धा यापुढे विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न देता शासन स्वतः  शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना  लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवित आहे. फळबाग लागवड वाढविण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर आता ‘मागेल त्याला फळबाग’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी शासनाने प्रथमच सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई दिली. जिल्ह्यातील 59 हजार 689 शेतकऱ्यांना  44 कोटी 99 लक्ष 14 हजार 713 रुपये शेतकऱ्यांच्या  खात्यात जमा झाले आहे.

यासोबतच नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मे महिन्यापासून या धोरणाची राज्यात व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  राज्य शासनाच्या या क्रांतिकारी  निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होऊन त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न आवाक्यात येईल.

ग्रामीण भागात  स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार होण्यासाठी आणि प्रशासकिय सेवेत आपल्या जिल्ह्यातील मुलांची टक्केवारी वाढण्यासाठी ‘गाव तिथे वाचानालय’ निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 4 कोटी 50 लक्ष रुपयांना मान्यता दिली आहे. या वाचनालयात स्पर्धा परीक्षेची उत्तमोत्तम पुस्तके युवकांना गावातच उपलब्ध होतील.

केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘जल जीवन मिशन’ मध्ये आपल्या जिल्हयाने उत्कृष्ट कामगिरी केली असुन आतापर्यंत 3 लक्ष 50 हजार कुटुंबाच्या घरी नळ जोडणी झाली आहे. उर्वरित 1 लक्ष 72 हजार नळ जोडण्या मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर या योजनेचा पाठपुरावा आणि नियोजन केल्यामुळे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.

 

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत यवतमाळ जिल्हयाने अंत्योदय, प्राधान्य व शेतकरी अशा सर्व योजनांच्या 6 लक्ष 10 हजार 768 शिधापत्रिका धारकांच्या 22 लक्ष 77 हजार 310 लाभार्थाची 100 टक्के आधार जोडणी केली आहे. 100 टक्के आधार जोडणी करणारा यवतमाळ हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

सर्व योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासकीय योजनांची जत्रा: सर्व सामान्यांच्या विकासाची यात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला  आहे. 15 एप्रिल ते 15 जून यादरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत असून आपल्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या योजनांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्य  किमान 75 हजार लाभार्थ्यांना आपण एकाच वेळी विविध योजनांचा  लाभ देणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

माजी सैनिकांच्या कल्याणार्थ ध्वजदिन निधी संकलन करण्याचे उदिष्ट जिल्ह्याने 100 टक्के पुर्ण केले यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह पालकमंत्री यांच्याहस्ते जिल्हाधिकारी तसेच प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सविता चौधर यांना प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची यशोगाथा या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास मुंडे, विजया पंधरे, सहाय्यक  पोलीस उपनिरिक्षक परिवहन विभाग प्रमोद जिड्डेवार, पालीस हेडकॉन्स्टेबल निलेश दायमा, पोलीस चालक नरेश राऊत तसेच आदर्श तलाठी गणेश तेलेवार, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धा परितोषिक अंतर्गत तलाठी श्रीमती दिपाली आंबेकर यांना महाराष्ट्र शासनाचा तृतिय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळव्याध या आजाराच्या सर्वाधिक शल्यकर्म चिकित्सा करण्याचे विक्रमी कार्य केलेल्या डॉ. अंजली गवार्ले यांची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. यासाठी त्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण, जिल्हा आर्थिक विकास महामंडळातर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

00000000000

 

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली, १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीता सोबत राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा… उपस्थितांनी गाऊन ध्वजवंदन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी  कस्तुरबागांधी स्थित महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन अभिवादंन केले.

या कार्यक्रमास राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगडी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारीमहाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागंतदिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कस्तुरगांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय व महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने  पदमावती कला संस्कार समुहाच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी  चार वाजता पासून सुरु होणार आहे.

यासह सार्वजनिक उत्सव समिती यांच्यावतीने माणिक निर्मित  अतुल अरुण दाते प्रस्तुत ललना मना  कवियत्री, गीतकार, स्त्री संगीतकार, कथा लेखिका , दिग्दर्शिक , निर्मित्या  यांना मानाचा मुजरा… स्त्री कलानिर्मितीची 700 वर्ष !!  असा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता श्रीराम सेंटर, मंडी हाऊस येथे होणार असून दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी बांधवांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटावा, असे आयोजकांच्यावतीने आव्हान करण्यात  आले आहे.   

ग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमांची गरज- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.१: ग्राम विकासाला प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमांमुळे ग्रामीण कामगारांची प्रगती होण्यास मदत होईल, असे विचार राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शिवाजीनगर येथील हातकागद संस्था येथे आयोजित मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मंत्री प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत, खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, खादी ग्रामोद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज आहे. खादी म्हणजे केवळ कापड नसून पर्यावरणाचा संतुलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे साधन आहे. ग्रामीण भागातील कारागिरांना स्वतः पायावर उभे करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता शहरी भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

श्री. साठे म्हणाले, माती कलेला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. खादी हे एक स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत होण्याकडे एक वाटचाल आहे. खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून अशा उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात जिल्हानिहाय मेळावे, प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत.

श्री. बडवे म्हणाले, ग्रामोद्योगमाध्ये ग्रामीण आणि उद्योग या दोन गोष्टींची सांगड आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकाला उद्योगाची माहिती मिळण्यास स्वत:बरोबर देशाची प्रगती करण्यास हातभार लागतो. पुरस्कार मिळणे ही एक प्रेरणा असून आगामी काळात चांगले कार्य करण्याची उर्जा मिळते, असेही श्री.बडवे म्हणाले.

नित्यानंद पाटील प्रास्ताविकात म्हणाले, या प्रदशर्नाच्या माध्यातून कुंभार उद्योग व मातीकला उद्योगाशी निगडीत राज्यातील उद्योजक एकत्र आले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन हे उद्योग वाढीसाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महामंडळाच्यावतीने आयोजित निंबध स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग’ या त्रैमासिक अनावरण करण्यात आले. हे प्रदर्शन ३ मे पर्यंत सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत खुले असणार आहे.
000

पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १: पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे ग्रामीण पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या पोलीस वाहनांच्या हस्तांतरण कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक खर्च केला पाहिजे, असे विचार व्यक्त करुन श्री. पाटील म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी पोलीस विभाग अद्ययावत करण्यासाठी डीपीडीसीतून भरीव निधी देण्यात येईल. त्यातून केवळ वाहनेच नव्हे तर अत्याधुनिक साधनसामुग्री, सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, सीसीटीव्ही यंत्रणा आदींवर भर देण्यात यावा. पोलीसांची निवासस्थाने, कार्यालयांचे अद्ययावतीकरण यासाठीदेखील निधी देऊ. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आदींसाठी पोलीस दलानेही पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. गोयल यांनी प्रास्ताविकात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी ९ स्कॉर्पिओ व ९ बोलेरो अशी १८ चारचाकी वाहने आणि ६ मोटारसायकल  घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या वाहनांचे हस्तांतरण तसेच तयार करण्यात आलेल्या नवीन टेनिस कोर्टचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

000

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...