रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1503

गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि २ मे:- गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन  रहावे लागते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी २  ते रात्री १० या वेळेत सुरु राहाणार असून कामगार, मजूर अशांसाठी  हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काल कामगार दिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन भोसा येथे करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड,  उपवनसंरक्षक श्री धनंजय , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड उपस्थित होते.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांची कामावर जाण्याची वेळ सकाळची असल्यामुळे या लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आपला दवाखान्याचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले. त्याचवेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दवाखाना सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर आज आपला दवाखाना जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आज त्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण ३७  दवाखाने उघडणार असून पैकी बारा आज सुरू झालेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा सुविधा आणि औषधे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आरोग्य विभागाने प्रत्यक्षात पुढे न्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गरीब लोकांना साध्या बाह्य रुग्ण सेवेसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते. तिथे तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसते तरीही त्याचा आर्थिक भार शहरी भागातील गरीब लोकांना बसतो. आपला दावाखान्याच्या माध्यमातून ही व्यवस्था आता बदलता येईल. लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणीच आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यामुळे  गरीब लोकांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्यासाठी होणारा खर्च आपल्याला आपल्या उत्तम आणि चांगले सेवेच्या माध्यमातून टाळता येईल. आपली सेवा चांगली राहील याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

सुरुवातीलाच योग्य निदान व उपचार मिळाल्यास अनेक आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापासून वाचू शकतात.  आपल्याकडे आरोग्य क्षेत्रातील या मिसिंग लिंक आपला दवाखानाच्या माध्यमातून दूर होतील अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केली.  महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्या देशात मोठे आहे आणि यामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. जर ह्या कर्करोगाचे प्रारंभीच योग्य निदान होऊन उपचार मिळाले तर कर्करोग गंभीर स्वरूप घेण्यापासून टाळता येऊ शकतो.  त्यामुळे ह्या मिसिंग लिंक या दवाखान्यामुळे पूर्ण होतील. तसेच कामगारांना आपला दवाखाना उपयुक्त राहील. सर्व सेवा सुविधा या दवाखान्यात नि:शुल्क आहेत. त्यामुळे  शहरी भागातील नागरिकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तन्वीर शेख, डॉ. प्रीति दुधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर,डॉ. संजना लाल वैद्यकीय अधिकारी, डॉ.नाझिया काझी वैद्यकीय अधिकारी, लव जेठवा, डॉ. प्रमोद लोणारे, व नागरी आरोग्य केंद्र 1,2,3, येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत पांटील यांनी केले

काय असणार आपला दवाखान्यात

बाह्य रुग्ण सेवा, मोफत उपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चसािवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण इत्यादी.

गरजेनुसार ७ तज्ञ सेवा

फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ , मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ.

उपलब्ध अधिकारी/ कर्मचारी

वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी आणि मदतनीस एवढे केंद्रात सेवा देण्यासाठी नियुक्त राहतील.

००००००००

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत;  मुख्यमंत्र्यांनी केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन

मुंबई, दि. २ : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीसाठी भूमिगत ऑप्टीकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.

यावेळी महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या परिणामांसाठी एक प्रसार मंच म्हणून हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या वरील संशोधन प्रकल्पांमधून भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनद्वारे पुस्तके, जर्नल लेख, तांत्रिक अहवाल, एमएससी प्रबंध, पीएचडी शोध प्रबंध, इंटर्नशिप प्रबंध आणि लोकप्रिय लेख यांचा समावेश असणार आहे.

कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकामांबाबत धोरण निश्चित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २ :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्वेक्षण करा. गरज भासल्यास समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज स्मारक, तसेच भिंवडी-कल्याण-शीळफाटा रुंदीकरणातील बाधितांना मोबदला याबाबतही चर्चा झाली. त्याबाबत विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.

मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ भाऊसाहेब दांगडे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, कैलास जाधव यांच्यासह सर्वपक्षीय संघर्ष समितीचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, महेश पाटील, गजानन मंगरूळकर आदींसह जयेश भाग्यवंत महाराज, आर्किटेक्ट राजीव तायशेटे आदी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.

ते म्हणाले की, श्री. संत सावळाराम यांचे यथोचित स्मारक व्हावे ही ग्रामस्थांची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि हे स्मारक यासाठीचा संयुक्त भूखंडही निश्चित करण्यात आला आहे. इमारत व स्मारकाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. हे स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी नियोजन करा.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांबाबत त्यांच्या नागरी समस्या सोडविण्याकरिता सर्वंकष धोरण आखण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या मालमत्ता कराबाबत आणि या गावातील बांधकामांबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल. त्यासाठी सर्वेक्षण करणे, आवश्यकता भासल्यास समिती स्थापन करणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणात काही गावांतील जमिनींचे भूसंपादन झाले, पण त्यांचा मोबदला योग्यदराने गेला नाही. त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि त्याबाबतचे धोरण आणि दर निश्चित करावे. जेणेकरून या गावांना वारंवार मोबदल्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीत खासदार डॉ. शिंदे, आमदार श्री. पाटील यांनीही सहभाग घेतला. या २७ गावांना मालमत्ता करात सवलत मिळावी, बांधकामांबाबत धोरण निश्चित व्हावे यासाठी त्यांनी भूमिका मांडली. या २७ गावांतील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपये, तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

तरुणांच्या योगदानामुळे भारत विकसित राष्ट्र होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली,(जिमाका)दि.02 : लोकसंख्या व तरुणाईचा फायदा घेऊन चीन, अमेरिका यांसारखे देश विकसित झाले. भारताने जर येथील तरूणांचे योगदान वाढविले, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्योगांना मनुष्यबळ हवे तर तरुणाईला रोजगार हवाय. असे असतानादेखील आपल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणी शासनामार्फत दोघांचा दुवा म्हणून कौशल्य प्राप्त तरुणांची निर्मिती करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असून प्रशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी चालून येतील व बेरोजगारीचे प्रमाण आपोआपच कमी होईल.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेले तरुण तरुणी आहेत. ते पुढे उद्योगांना आपली सेवा पुरवतील. गडचिरोली जिल्ह्यात आता संधी निर्माण होत आहेत. आज गडचिरोली जिल्ह्यात १० पेक्षा जास्त उद्योग आलेले आहेत व येत आहेत. जिल्ह्यातील तरुणाईला जास्त संधी उपलब्ध होत असून पुढच्या काळात त्यांना कामही मिळेल. आपल्याकडे असलेल्या खनिज संपत्तीचा उपयोग केला पाहिजे.  कोनसरी  प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होत आहे. लोह उद्योगात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. लोह उद्योग  मोठया प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. यात गडचिरोलीच्या तरुणांना प्राधान्य राहील. त्यातून त्यांना रोजगार प्राप्त होऊन जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल असे ते यावेळी म्हणाले.

तरुणांनी निराश होऊन चालणार नाही. त्यांनी निराश न होता कौशल्य प्राप्त करुन प्रशिक्षण घेतल्यास ते रोजगारात मोठी भरारी घेऊ शकतात असेही ते यावेळी म्हणाले. मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशीर्वाद व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच आमदार देवराव होळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन योगेंद्र शेंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास यंत्रणा गडचिरोली व डॉ. माया राऊत सहायक प्राध्यापक कृषी विद्यापीठ गडचिरोली यांनी केले.

खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली,(जिमाका)दि.02 :  खरीप हंगामापूर्वी  जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते गडचिरोली येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सादरीकरण केल्यानंतर ते उपस्थितांना उद्देशून बोलत होते. शेतकऱ्यांच्या धावपळीच्या मौसमात अनेक खते व बियाण्यांचे पुरवठादार फसवणूक करतात. यातील काळाबाजार व भेसळ रोखण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरवठादारांची बैठक घेऊन याबाबत त्यांना स्पष्ट सूचना देऊन काळाबाजार करणाऱ्या पुरवठादारांचे परवाने कायमस्वरूपी बंद करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात 1.34 लक्ष शेतकरी खातेदार आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वहिताखालील 2.54 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील 67000 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यात खरीप 2.09 लाख हेक्टर, 0.36 लाख हेक्टर रब्बी व उन्हाळी 0.09 लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी गेल्या वर्षी झाली. यावर्षी एकूण 225940 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी करण्याचे नियोजन आहे. यात भात 1.87 लाख हेक्टर, मका 3000 हेक्टर, तूर 8000 हेक्टर, सोयाबीन 1600 हेक्टर, तीळ 900 हेक्टर व कापूस 21120 हेक्टर वर करण्याचे नियोजन आहे.

पालकमंत्री फडणवीस यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार चढउतार होण्याची शक्यता असल्याने पिक वाचविण्यासाठी उपाययोजनांचे नियोजनही कृषि विभागाला करण्याचे सांगितले. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून कामे हातात घेऊन पावसाचे पाणी जास्तीत जास्त कसे साठवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर आपण पाणी अडवून जिरविले तर निश्चितच रब्बी पिकांनाही फायदेशीर ठरेल. यातून जिल्हयातील उत्पादकता वाढेल. कृषिविषयक योजनांच्या प्रसारासाठी कार्यशाळा, बैठकांचे आयोजन गावागावात करा. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद मोहिम वाढवा, यातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ गतीने मिळण्यास मदत मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात बागायती पिकांनाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. यासाठी चांगला आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक योजना तयार करण्याचा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र वाढले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल असे प्रतिपादन त्यांनी बैठकीत केले. त्यामुळे आता येणारा खरीप हंगाम यशस्वी करा असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. पिक कर्ज मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक असून शेतकऱ्यांचा पिक विमाही काढून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे व महिलांसाठीच्या शासकीय योजना या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

स्मृती उद्यान व एकल केंद्राचे लोकार्पण

गौण वन उत्पादनांच्या संबंधात ग्रामसभांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतांचा विकास एकल केंद्रातून केला जात आहे. आतापर्यंत 543 ग्रामसभांतून 218 ग्रामसभा प्रशिक्षित केल्या. यातील 1166 प्रतिनिधींनी प्रशिक्षण प्राप्त केले आहे. या एकल केंद्राच्या नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्मृती उद्यानाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. याचे लोकार्पण पालकमंत्री फडणवीस यांचे हस्ते संपन्न झाले. सदर उद्यान वन विभागामार्फत चालविले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेले उद्यान आता सुरू झाल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार

लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून 14 ऑगस्टला कोविडमुळे होऊ न शकलेली सोयाबीन परिषद घेऊ, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषी महाविद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत पाटील, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, कृषी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्यासह संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते.

देशात सर्वाधिक सोयाबीन घेणाऱ्या जिल्ह्यात लातूरचा दुसरा क्रमांक लागतो त्याचबरोबर देशात तेल बिया संशोधनात इथल्या तेल बिया संशोधन केंद्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळे इथल्या कृषी महाविद्यालयाचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे या महाविद्यालयाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तत्काळ देण्यात येतील. आपल्या कृषी विद्यापीठाला 50 कोटी रुपये यावर्षी दिले असून आज अनुसूचित जातीच्या 100 मुलींसाठीचे वस्तीगृहाचे उदघाटन आपण केले. अजून एक मुलींचे आणि एक मुलांच्या वस्तीगृहाची गरज लक्षात घेऊन तेही मंजूर करण्यात येत असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लातूर जिल्हा प्रशासनाची जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीनची मागणी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी आपल्याला सांगितले. इथल्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कृषी शिक्षण, संशोधनासाठी दिली आहे, त्यांच्या आरोग्यासाठी आपण दहा एकर जागा देऊ, अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली. तसेच कोविड काळामुळे मधले दोन वर्षे जी सोयाबीन परिषद झाली नाही ती लातूर मध्ये 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती केली जाणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळे शासनाकडून आता शेतकऱ्यांचा फक्त 1 रुपया मध्ये विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पूर्वी केंद्र सरकार कडून सहा हजार मिळत होते. त्यात आता राज्य शासन सहा हजार रुपये देणार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे मिळून आता वर्षांला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर अवकाळीचे अस्मानी संकट कोसळले आहे. लातूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या, त्यातून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कल्पना आपल्याला आली. जिल्हा प्रशासनाने ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले होते त्या प्रमाणे पंचनामे झाल्याचे सांगून शासन नियमाप्रमाणे मदत करणार असून अजूनही काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि यांनी येत्या काळात विद्यापीठ कृषी संशोधनावर भर देणार देणार असून आपण आल्या नंतर अनेक संशोधक, प्राध्यापक यांना परदेशी पाठवून नवनवे या क्षेत्रातील तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठविण्यात आले आहे. येणाऱ्या काळात अनेक बियाण्यामध्ये, आणि इतर पिका मध्ये आम्ही संशोधन करू फक्त राज्यातीलच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना आमच्या संशोधनाचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमापूर्वी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला. त्यात या महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम इंगळे यांनी अत्यंत सुंदर लावणी नृत्य सादर केले. या विद्यार्थ्याने सतत 12 तास लावणी नृत्य केले आहे. त्या नृत्याची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या विद्यार्थ्यांचे कृषी मंत्र्यांनी सत्कार करून विशेष कौतुक केले. त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रम केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

तेल बिया संशोधन केंद्रातील बियाणे साठवणूक गोडाऊनचे उदघाटन

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या तेल बिया संशोधन केंद्रात बि – बियाणे साठवणुकीसाठी नवीन 100 बाय 50 चौ. फूटचे 80 लाख 60 हजार एवढ्या किंमतीचे गोडाऊन उभे केले आहे त्याचे उदघाटनही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. हेमंत पाटील, कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 5 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबिरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करियर शिबिराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची तसेच इतर माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड ( QR CODE ) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

मुंबईत कुर्ला येथे उद्या आयोजन

            छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्या शनिवार दिनांक 6 मे रोजी कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

०००

इरशाद बागवान/विसंअ/

लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद घेणार- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

लातूरच्या तेलबिया संशोधन केंद्राची १ हजार एकर जमिनी तेल बि-बियाण्याच्या संशोधनासाठी तयार

लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार

लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून 14 ऑगस्टला कोविड मुळे होऊ न शकलेली सोयाबीन परिषद घेऊ अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषी महाविद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खा. हेमंत पाटील, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, कृषी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्यासह संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते.

देशात सर्वाधिक सोयाबीन घेणाऱ्या जिल्ह्यात लातूरचा दुसरा क्रमांक लागतो त्याच बरोबर देशात तेल बिया संशोधनात इथल्या तेल बिया संशोधन केंद्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळे इथल्या कृषी महाविद्यालयाचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे या महाविद्यालयाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्काळ देण्यात येतील. आपल्या कृषी विद्यापीठाला 50 कोटी रुपये यावर्षी दिले असून आज अनुसूचित जातीच्या 100 मुलींसाठीचे वस्तीगृहाचे उदघाटन आपण केले. अजून एक मुलींचे आणि एक मुलांच्या वस्तीगृहाची गरज लक्षात घेऊन तेही मंजूर करण्यात येत असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लातूर जिल्हा प्रशासनाची जिल्हा रुग्णालयासाठी  लागणारी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीनची मागणी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी आपल्याला सांगितले. इथल्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कृषी शिक्षण,संशोधनासाठी दिली आहे, त्यांच्या आरोग्यासाठी आपण दहा एकर जागा देऊ अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली. तसेच कोविड काळामुळे मधले दोन वर्षे जी सोयाबीन परिषद झाली नाही ती लातूर मध्ये 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती केली जाणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळे   शासनाकडून  आता शेतकऱ्यांचा फक्त 1 रुपया मध्ये विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याच बरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पूर्वी केंद्र सरकार कडून सहा हजार मिळत होते. त्यात आता राज्य शासन सहा हजार रुपये देणार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे मिळून आता वर्षांला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर अवकाळीचे अस्मानी संकट कोसळले आहे. लातूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या, त्यातून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कल्पना आपल्याला आली. जिल्हा प्रशासनाने ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले होते त्या प्रमाणे पंचनामे झाल्याचे सांगून शासन नियमाप्रमाणे मदत करणार असून अजूनही काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि यांनी येत्या काळात विद्यापीठ कृषी संशोधनावर भर देणार देणार असून आपण आल्या नंतर अनेक संशोधक, प्राध्यापक यांना परदेशी पाठवून नवनवे या क्षेत्रातील तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठविण्यात आले आहे. येणाऱ्या काळात अनेक बियाण्यामध्ये , आणि इतर पिका मध्ये आम्ही संशोधन करू फक्त राज्यातीलच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना आमच्या संशोधनाचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमापूर्वी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला. त्यात या महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम इंगळे यांनी अत्यंत सुंदर लावणी नृत्य सादर केले. या विद्यार्थ्याने सतत 12 तास लावणी नृत्य केले आहे. त्या नृत्याची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या विद्यार्थ्यांचे कृषी मंत्र्यांनी सत्कार करून विशेष कौतुक केले.त्या बरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रम केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

तेल बिया संशोधन केंद्रातील बियाणे साठवणूक गोडाऊनचे उदघाटन

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या तेल बिया संशोधन केंद्रात बि – बियाणे साठवणुकीसाठी नवीन 100 बाय 50 चौ. फूटचे 80 लाख 60 हजार एवढ्या किंमतीचे गोडाऊन उभे केले आहे त्याचे उदघाटनही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. हेमंत पाटील, कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

00000

 

नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

नंदुरबार,दि.1 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे 30 चाचण्या मोफत करण्यात येतील.

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजीटल अनावरण करण्यात आले.

यावेळी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश सुर्यवंशी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वळवी आदी उपस्थित होते.

आपला दवाखाना केंद्रातून बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रेसाठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ञ सेवा देणार आहे त्यात फिजीशियन, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान,नाक,घसा तज्ञांचा समावेश राहील.

00000

 

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,दि.2 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार येथील नविन कृषि भवन इमारतीचे उद्धाटन  पालकमंत्री डॉ.गावित हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमांला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील,कोळदा कृषी विद्यान केद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राजेंद्र दहातोंडे, प्रकल्प संचालक प्रदिप लाटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या, धरण व बॅरेजमध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून हे पाणी औद्योगिक प्रकल्प, पिण्यासाठी देवून सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत देवू शकतो इतका पाणीसाठा आपल्या जिल्ह्यात आहे. म्हणून आगामी काळात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, बॅरेजांनी गती देण्यासाठी मागील काळात भरपूर प्रमाणात निधी दिला. त्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास आले. नर्मदा प्रकल्पातील आपल्या वाट्याचे पाणी आपणांस मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे हित बघून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले तरच ही गोष्ट लवकर होऊ शकेल असे मत त्यांनी यावेळी मांडले.

पुढे बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, शाश्वत सिंचनाच्या उपाययोजना होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध जलस्रोतांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी शेती, फलोत्पादनाच्या कृषी व आदिवासी विकास विभागाच्या शेडनेट, पॉलीहाऊस, ड्रीप योजना अर्थसहाय्याच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मधल्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांना शेडनेट दिले. शेडनेट योजनेतून अवघ्या 10 गुंठे जमीनीवर सरासरी 5 ते 10 लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देवून कमी वेळेत, कमी खर्चात, कमी मेहनतीत उत्पन्न तिप्पट ते चारपट वाढले पाहिजे  यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डाब येथील स्ट्रॉबेरी खरोखर सुंदर आहे. या भागातील स्ट्रॉबेरीचा दर्जा उत्तम असून त्याला चवही अंत्यत चांगली आहे. याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. आपल्या तोरणमाळ व डाब येथील थंड भागात होणारी पिकांना चालना देण्याची गरज आहे यासाठी नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. तसेच ब्रोकोली सारख्या पिकास चांगला दर असल्याने या पीकाच्या  लागवडीसाठी चालना द्यावी. शेतकरी  स्वत:च्या पायावर भक्कम कसा ऊभा राहील तो आर्थिक दृष्टया सक्षम कसा राहील याची मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार येथील कृषी चिकीत्सालय व बळकटीकरणाच्या  उर्वरीत कामासाठी यावर्षी निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

00000

 

ताज्या बातम्या

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

0
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात...