सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1502

महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 3 : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे आणि अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज महिला बचत गट  उत्तम प्रकारे वस्तूंची निर्मिती करत आहेत. महिलांनी  तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे बचतगटांची मागणी लक्षात घेता स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच महापुरूष दादाभाई सहकारी गृहनिर्माण संस्था, परळ यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार स्थानिक प्रशासनाने विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. आज १४८९  तक्रारीपैकी दाखल झाल्या असून जागीच १५५ तक्रारींचे निराकरण  करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

सॅण्डहर्स्ट रोड येथील बी वॉर्ड येथे  रविवार दिनांक 7 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहेत. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत  सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

‘सारथी’च्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 3 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी  शासन सकारात्मक आहे. ‘सारथी’मार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार भरत गोगावले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. धोटे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) चेअरमन अजित निंबाळकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी), व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थाकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली यात एकसूत्रता राहावी या दृष्टीने या संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.

तसेच पुढील शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उपलब्ध व्हावेत यासाठी वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती द्यावी. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्यांकरिता ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार रुपये 10 महिन्यांसाठी  देण्याचा  निर्णय लवकरच घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकित प्रकरणांचा व्याज परतावा देऊन संबंधित प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिकेसंदर्भातील प्रस्ताव दाखल  करण्याची प्रक्रिया अंतिम  टप्प्यात असल्याचेही या बैठकीत सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीकडून मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. 3 : राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात तज्ज्ञ समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सदस्य अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तुविशारद संदीप ईश्वरे, एन. आर. शेंडे यावेळी उपस्थित होते.

दहशतवादी हल्ले, मानवनिर्मित आपत्तींमुळे जीवित आणि मालमत्तेची लक्षणीय हानी होऊ शकते आणि आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो. ही जोखीम कमी करण्याच्या उपायांद्वारे आपत्ती टाळता येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य त्या तरतुदी करण्याचे आदेश दिले होते.

या अहवालात महत्त्वाच्या मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या सुरक्षिततेचे विश्लेषण करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषिपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर ऊर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयूटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.

योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून अपप्रचाराचा मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील 10 पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आपण 1978 मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आजच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात  होते, असे राज्यपालांनी सांगितले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित मजकूर पडले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्ट‍िने पाहतात’ या वचनाचा संदर्भ देताना आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर, दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, नीलेश खरे, जयंती वागधरे, यू ट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले.

विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

००००

Governor presents Devarshi Narad Awards to 10 journalists

Maharashtra Governor Ramesh Bais presented the 22nd ‘Devarshi Narad Patrakarita Puraskars’ for the year 2023 to journalists and media personalities from Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Wed (3 May).

Ten media personalities from the print, electronic, digital and social media were given the awards.

Senior journalist from Ratnagiri Pramod Konkar, political satirist from daily Sakal Pravin Tokekar, news anchor Deepak Palsule, Times of India’s Vaibhav Purandare, Nilesh Khare, Jayanti Wagdhare, Anay Joglekar, Anshul Pandey and social media journalists Ninad Patil and Hrishikesh Magar were felicitated on the occasion.

Chairman of Vishwa Samvad Kendra Mumbai Sudhir Joglekar, Trustee Nishith Bhandarkar, Consul General of Israel in Mumbai Kobbi Shoshani and media personalities were present.

**

जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ३ : “स्थापनेपासूनच्या ५० वर्षांच्या काळात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण, रक्तपेढी, वस्ती परिवर्तन योजना यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये १८८० सेवा प्रकल्प राबविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ आहे,’’ असे प्रशंसोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सव पूर्तीनिमित्त संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याची माहिती असलेल्या ‘अहर्निशं सेवामहे’ या  ग्रंथाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि. २) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

सामाजिक उत्तरदायित्वाचा कायदा केल्यामुळे देशात आज अनेक संस्था मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करीत आहेत. मात्र अनेक संस्थांच्या कामात द्विरुक्ती आहे, तर काही संस्था ‘काम कमी, आणि प्रसिद्धी अधिक’ अशा पद्धतीचे काम करीत असल्याचे नमूद करून कॉर्पोरेट संस्थांनी जनकल्याण समितीच्या सहकार्याने आपले सामाजिक दायित्व प्रकल्प राबवावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सामाजिक उत्तरदायित्वाइतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व महत्त्वाचे आहे असे सांगून प्रत्येकाने समाजासाठी आपल्या परीने कार्य केले तर देशातील गरिबी, उपासमारी यांसह अनेक समस्यांवर मात करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले. जनकल्याण समिती स्थापनेची ५० वर्षे पूर्ण करीत आहे, त्याच वेळी रा. स्व. संघदेखील आपल्या स्थापनेच्या शतकी वर्षाकडे वाटचाल करीत आहे, असे नमूद करून जनकल्याण संस्थेने आपल्या संकल्पित सेवाभावी कार्याचा आराखडा तयार करावा व अधिकाधिक गरजू लोकांना सेवाकार्याचा लाभ द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

जनकल्याण समितीचे कार्य ५० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे याचा अर्थ त्याचा पाया बळकट आहे, असे सांगून अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या देशातील वनवासी, आदिवासी भटक्या विमुक्त जमातींपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.

यावेळी जनकल्याण समिती कोकण प्रांताचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी संस्थेच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती दिली. संदीप वेलिंग यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रकाशन सोहळ्याला रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी, उद्योजक आनंद राठी, जनकल्याण समिती कोकण प्रांताचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, महानगर संघचालक सुरेश भगेरिया, संस्थेचे आश्रयदाते व निमंत्रित उपस्थित होते.

Maharashtra Governor releases Hindi version of ‘Aharnisham Sevamahe’

Mumbai 3 : Maharashtra Governor Ramesh Bais released the Hindi edition of the book ‘Aharnisham Sevamahe’ that chronicles the history and work of the service organiastion RSS Jankalyan Samiti during the last 50 years at Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak in Mumbai on Tue (2 May).

Member of the RSS National Executive Bhaiyyaji Joshi, Founder of Anand Rathi Group Anand Rathi, President of RSS Jankalyan Samiti, Konkan Prant Dr Ajit Marathe and Mahanagar Sanghchalak Suresh Bhageria were present on the dais.

Speaking on the occasion the Governor complimented Jankalyan Samiti for its selfless work in 9 verticals such as Health, Education, Tribal Welfare, Women and Child care through its 1880 service projects. He called upon corporates to implement their CSR programmes in association with the Jankalyan Samiti.

जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाला यश, सुदानमध्ये अडकलेले नागरिक परत येण्यास सुरुवात

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये केनान शुगर कंपनी लि.  मध्ये कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० नागरिकांशी  जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे.  येथील सर्व नागरिक सुखरूप असून भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुमारे ९५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परत आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील  नागरिकांचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व त्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची ‍नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या सुदानमधील केनाना शुगर कंपनी लि.मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रवासी गटा सोबत संपर्कात आहे. येथे साधारण ४०० भारतीय नागरिक कार्यरत असतात आणि त्यापैकी १०० ते १२० नागरिक हे सांगली जिल्ह्याचे आहेत असे कळते. नागरिकांनी स्थलांतराच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि केनाना साखर कारखान्याच्या साईटवरून पोर्ट सुदान आणि पुढे त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी भारतीय दूतावासाला केली आहे.

एक्सपॅट्सच्या म्हणण्यानुसारकेनाना शुगर कंपनी लि. सर्व भारतीयांना सोडण्यास तयार आहेपरंतु कंपनीकडे सध्या त्यांना कंपनीच्या ठिकाणाहून पोर्ट सुदानपर्यंत नेण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाहीजे सुमारे १२०० कि.मी. दूर आहेत. कंपनीने सुचवले आहे की, प्रवाशांनी त्यांच्या समस्येबद्दल भारतीय दूतावासाला कळवावे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने व संवेदनशिलपणे घेत केनाना साखर कारखाना साईट ते पोर्ट सुदान आणि पुढे जाणाऱ्या भारतीयांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक संपर्क भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुदानमध्ये आपल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या ३७० भारतीयांपैकी ९५ लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.

यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना इर्मजन्सी पासपोर्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने संपर्क ठेवत दिलेला धीर व केलेल्या मदतीबद्दल यावेळी त्यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली.

०००

मंत्रिमंडळ निर्णय (दि. ३ मे २०२३)

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल.

वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Qacquuarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायर्व्हिसीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएचडी अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे.  या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

—–०—–

शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल.

शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र निधीअभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटकोर अंमलबजावणी करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा तसेच घनकचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांचे जीपीएस किंवा आयसीटी आधारित ट्रँकिंग देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छ भारत मिशन – नागरी हे राज्यस्तरावर करारनामा करतील व आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करतील.

—–०—–

रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना

 

राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तींसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, ५१ टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ते व इमारती विकास व देखभाल पूरक निधीची देखील उभारणी येईल. राज्यातील ३ लाख किमी इतक्या लांबीच्या रस्त्यांपैकी १ लाख किमीचे प्रमुख राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. या रस्त्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करावी लागते. अवजड वाहनाच्या रहदारीमुळे रस्ते खराब होतात. त्यामुळे या महामंडळाची स्थापन करण्यात येत आहे.

—–०—–

शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे मौ. उदगांव येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी येणारा १४६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येईल.

या मनोरुग्णालयास रत्नागिरीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या पदांप्रमाणे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी याठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये असून, त्यात ५ हजार ६९५ मनोरुग्णांना भरती करता येते. अंबेजोगाई येथे १०० खाटांचे वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र स्थापन केले असून, जालना जिल्ह्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे मौजे उदगाव (ता. शिरोळ) प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा निर्णय

राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिनियम लागू करण्यात आला. या दिनांकापासून ते राज्य शासनाचे करमणूक शुल्क आकारणी व वसुलीचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी करमणूक शुल्क आकारणीतून सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महसूल व वन विभागाच्या ०१ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार करमणूक शुल्क भरण्यापासून १५ सप्टेंबर, २०१७ पर्यंत दिलेली सूट पुढे १६ सप्टेंबर, २०१७ पासून ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

बार कौन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त; राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 2 : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-फाईलिंग सुविधा निर्माण करण्याचे बार कौन्सिलचे कार्य अभिनंदनीय आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठीतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

दादरमधील स्वामी नारायण मंदिर सभागृहात आयोजित मुंबई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग  आणि सुविधा केंद्रांच्या वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह राज्याचे महाधिवक्ता, राष्ट्रीय बार कौन्सिलचे अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

देशात डिजिटल व्यवस्था उभी राहत आहे. या सुविधांमुळे न्यायव्यवस्थेला गती मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक विकासकामे करीत असल्याचे सांगून वकीलांसाठीच्या नवीन प्रशिक्षण केंद्रासाठी जागा देण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सहकार्य करेल. न्यायालये, न्यायाधीशांची संख्या वाढविणे, न्यायालयांमध्ये सोयीसुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी सात हजार कोटींची तरतूद; भारतीय भाषांचा वापर करण्याचा केंद्राचा मानस – केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद केली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा असा केंद्र सरकारचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढविण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

केंद्रीय मंत्री श्री. रिजिजू म्हणाले, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त उपक्रम राबविणे महत्त्वपूर्ण आहे. केंद्र सरकारने २०१४ नंतर क्रांतिकारी निर्णय घेतले. आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त जुने कायदे हटवले. यापुढे वर्तमानात औचित्य नसलेले जुने कायदे हटवणार आहोत, अशी घोषणा देखील श्री. रिजिजू यांनी केली.  सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, विधि महाविद्यालयात आणि बार कौन्सिलमध्ये महिलांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकार काम करेल. भयमुक्त वातावरणात वकीलांनी काम करावे यासाठी संरक्षण कायदा करण्याबाबत केंद्र सरकार पावले उचलेल, असेही केंद्रीय विधि व न्याय मंत्री श्री. रिजिजू यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, नवीन वकिलांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी मुंबईतील जागा उपयुक्त ठरेल. वकिलांच्या संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करणार आहे. न्यायालयातील विविध प्रलंबित प्रकरणे डिजिटल सुविधेमुळे लवकर मार्गी लागतील, असे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील न्याय व्यवस्था डिजिटल सुविधेमुळे संपूर्ण कोविड काळातही सुरु राहिली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारदर्शकता येते. लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हळूहळू संपूर्ण न्याय व्यवस्था डिजिटल होईल. त्यामुळे नागरिकांना गतीने न्याय मिळेल. प्रशिक्षण केंद्रासाठीच्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. वेल्फेअर ॲक्टबाबत बार कौन्सिलसमवेत चर्चा करण्यात येईल. वकिलांच्या संरक्षण कायद्याबाबत सकारात्मक विचार करुन यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. लोकोपयोगी सुविधा सुरु करणाऱ्या बार कौन्सिलच्या पाठिशी उभे राहणे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील बार कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

०००

पवन राठोड/ससं/

सन २०२१-२२ चे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत असलेल्या आणि आस्थापनेत कमीत कमी ५ वर्षे सेवा झालेल्या ५१ कामगारांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. रु.२५ हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील किमान १० वर्षे विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका कामगाराची दरवर्षी कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड केली जाते. रु.५० हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गुणवंत पुरस्कारांची घोषणा कामगार दिनी करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पार पाडत या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कार्यरत अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी जाहीर केले. मंडळाच्या शिवण वर्ग, शिशुमंदिर, ग्रंथालय आदी उपक्रमांत कार्यरत सुमारे ३९५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, श्रीमती अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद – सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके संचालनालयाचे संचालक डी. पी. अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

संजय ओरके/विसंअ

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...