बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1499

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 10 : अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय या शासकीय संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, नियोजनचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव व्यय ओ.पी.गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सारथीचे चेअरमन अजित निंबाळकर, टीआरटीआयचे आयुक्त राजेंद्र भारुड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली एकसूत्रता राहावी यासाठी आज यामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी या चारही संस्थाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये वसतिगृह योजना, परदेशी शिक्षणासाठी राबविण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना आणि पीएचडीसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समान लाभ कसा देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय या चारही संस्थांनी शैक्षणिक योजनांचा समान लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी निकष, शैक्षणिक अर्हता, देण्यात येणाऱ्या लाभाची मर्यादा इत्यादीबाबींचा समावेश असणारा सर्वकष असा प्रस्ताव तयार करून विभागास सादर करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

0000

जयश्री कोल्हे/ससं/

‘जलपर्णी’ मुक्त गोदावरी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक दि. 10 मे, 2023 (विमाका वृत्तसेवा) :- दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रीया मंदावते. शहराच्या व कारखान्याच्या सांडपाण्यातील व मलजल पाण्यातील दूषित घटक मिसळले की जलपर्णी वाढते. दूषित घटक पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहील. या जलपर्णीमुळे नदीची नेसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, रामकुंडावरील क्राँक्रीटीकरण थांबविण्यात आले असून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त या संयुक्त बैठक घेऊन यावर उपायायोजना सुचवाव्यात. तसेच कुठलेही सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे,

बैठकीत यावेळी  औद्योगिक क्षेत्रात काम करतांना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही किंवा प्रदूषण टाळून उद्योग चालविणाऱ्या शामला इलेक्ट्रा प्लाटर्स व एबीबी या औद्योगिक संस्थांचा सत्कार यावेळी श्री गमे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच  शासकीय नोकरी करुन पर्यावरण व विजेची बचत करा असा संदेश आपल्या पाठीला लावून जनजागृती करणारे महावितरणचे कर्मचारी श्री योगेश बर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

 

000

अंधेरी (पूर्व) येथे कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 10 : अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडी साठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

अंधेरी येथील मुंबई महापालिकेच्या के पूर्व वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, अंधेरी पूर्व एमआयडीसी येथे जागा उपलब्ध नसल्यामुळे गणपती मंदिरात अंगणवाडी सुरू केली आहे अशी महिलांनी तक्रार केली असून  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ जिल्हा नियोजन समितीमधून कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी. आज  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ५०० तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

कांदिवली येथील  आर  दक्षिण वॉर्ड येथे  दिनांक 11 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ रोजी पर्यंत  दुपारी ३ ते 5.30 या वेळेत  सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. 10 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना आता यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत,  या शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना आश्वस्त केले. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन रहिवाशांना आपल्या समस्यांचा पाठपुरावा मंत्री कार्यालयात देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. केसरकर यांनी ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मधील नागरिकांशी आज संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभारी जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, सर्व संबंधित विभागांचे शासकीय, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

मुंबईला गत वैभव प्राप्त करून देणार

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई अधिक चांगली व्हावी म्हणून कटाक्ष आहे. या अनुषंगा़ने मुंबईतील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील तरूण शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्याचबरोबर महिला, बालक यांच्यासह सर्व नागरिकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले, मुंबई हे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे मंदिरे, चर्च, मशिदीही आहेत. येथील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, बाणगंगा आदी परिसरांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याचप्रमाणे कोळीवाड्यांचा विकास करून तेथे फूड प्लाझा उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देताना सार्वजनिक स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यात येतील. मुंबईत अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असल्याने विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण थांबले असल्याचे सांगून या मोहिमेत पोलिसांसह शिक्षकांनीही सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. मुंबईत महिला आणि तरूणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मध्ये अधिक प्रमाणात घाऊक व्यापार चालतो. यामुळे येथे वाहतुकीची समस्या असल्याने मुंबईत दोन मोठे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई करून पादचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

या सुसंवाद कार्यक्रमात १७६ रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

पुणे, दि. १० : भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले.

भारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमीपूजन समारंभात श्री. नार्वेकर बोलत होते. कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भारती विद्यापीठाचे  कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

जो वाचायला शिकवतो तो देश घडवतो, असे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले, भारती विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नसून देशात महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखले जाते. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आदी अनेक मान्यवर व्यक्तीमत्त्वे विद्यापीठाने घडवली आहेत. देशाला उंची प्राप्त करुन देण्यात भारती विद्यापीठसारख्या संस्था आणि संघटनांचा खूप मोठा हातभार आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामध्ये अशा संस्थांनी शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाचा वाटा आहे.

श्री. नार्वेकर पुढे म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी गतीमान आणि प्रगतीशील शिक्षणातून समाजपरिवर्तन कसे करावे या संकल्पनेतून लावलेले रोपटे आज विद्यापीठाच्या रुपात विशाल वृक्ष म्हणून देशातील, जगातील अनेक विद्यार्थ्यांना सावली देण्याचे काम करत आहे. विद्यापीठाने आपली ख्याती आणि कार्य  केवळ पश्चिम महाराष्र्ट्र, पुण्यात नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यात तसेच दिल्लीसारख्या राज्यात पोहोचवले आहे.

भारती विद्यापीठाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. गेहलोत म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांचे विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या कष्टातून साकार झाले आहे. कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षण आणि आरोग्यातून बनते. स्त्री शिक्षणासाठी पुण्यातून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केले. राजस्थानात पूर्वी केवळ शासकीय शाळा होत्या. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचा शैक्षणिक विकासातील योगदान पाहून राजस्थानात खासगी संस्थांना शिक्षण क्षेत्र खुले केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. विश्वजीत कदम म्हणाले,  डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी एका जिद्दीतून भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज अनेक विद्याशाखा भारती विद्यापीठ संपूर्ण देशात चालवत आहेत. विद्यापीठाने संशोधनावर खूप लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाकडून काम सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्येयानुसार केवळ पदवीधर बनविणे नव्हे तर चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यापीठाकडून चालते. महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणारे विकासात योगदान देऊ शकतील असे युवा घडविण्याचे काम येथे चालते, असेही डॉ. कदम म्हणाले.

यावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांना मानपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला.

प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

‘विचार भारती’ या मुखपत्राच्या विशेषांकाचे आणि ‘विश्वभारती’ या इंग्रजी बुलेटिनचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

000

‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन’ शिबिराचे ११ मे रोजी आयोजन

मुंबई, दि. 11 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सकाळी 9 ते दु 1 वाजेदरम्यान श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पाटकर हॉल, चर्चगेट, मुंबई येथे  करण्यात आले आहे. या शिबिरात इयत्ता 10 वी नंतर करियरच्या संधींबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

तरी जिल्ह्यातील  इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रविंद्र सुरवसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

निलेश तायडे/स.सं

सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार

मुंबई, दि. 10 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी मुंबई शहर, जिल्ह्यातील मुंबई महापालिका क्षेत्रातील एक सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2, मुंबई शहर क्र. 3 हे कार्यालय प्रत्येक शनिवार, रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती, सह जिल्हा निबंधक साहेबराव दुतोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

नागरिकांच्या सोयीसाठी सह दुय्यम निबंधक वर्ग 2, मुंबई शहर क्र. 3 हे कार्यालय 6 मे 2023 पासून प्रत्येक शनिवार, रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. हे कार्यालय सकाळी 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहणार आहे. पर्यायी सुट्टी प्रत्येक सोमवार, मंगळवार या दिवशी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दस्त नोंदणी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. दुतोंडे यांनी केले आहे.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ.विनायक सावर्डेकर

मुंबई, दि. 10 : उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीतून केले आहे.

जगभरात वातावरणात अनेक बदल होत असून अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे आणि उष्माघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील माहिती डॉ.सावर्डेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटरhttps://twitter.com/MahaDGIPR

फेसबुकhttps://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

जयश्री कोल्हे/स.सं

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकवलेली रक्कम बेस्ट व्यवस्थापनाने महिन्याभरात जमा करावी – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. 10 : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त  झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे कॉन्ट्रक्टर मे. एम.पी. इंटरप्रायजेस व सब कॉन्ट्रॅक्टर किश कॉर्पोरेट व इतर यांनी एक हजार कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, इएसआयसीची रक्कम भरली नसल्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी संबंधितांना निर्देशित केले.

यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त संतोष देशमुख, बेस्टचे उपमुख्य व्यवस्थापक सुनील जाधव, सल्लागार पी.बी.खवरे, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या क्षेत्रीय आयुक्त पूजा सिंह, अमित वशिष्ठ, व्यवसाय कर उपायुक्त बालाजी जंगले, यांच्यासह  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.खाडे म्हणाले की, कामगारांना वेळेवर वेतन आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तरतुदी संबंधितांनी कटाक्षाने केल्या पाहिजेत. कंत्राटदार नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करत आहे का याची खातरजमा बेस्टने केली पाहिजे होती,  मात्र बेस्ट व्यवस्थापनाने ही खबरदारी घेतली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची मुख्य आस्थापना म्हणून भविष्य निर्वाह निधीची तसेच राज्य कामगार विमा (इएसआयसी) ची कंत्राटदारांनी जमा न केलेली  रक्कम  संबंधित कार्यालयात महिन्याभरात भरावी तसेच नियमांचे पालन केले नसल्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशित केले. तसेच बेस्टने जर एका महिन्याच्या आत पैसे दिले नाही तर  नियमानुसार पीएफ विभागाने बेस्ट वर कारवाई करावी. यात दिरंगाई होत असल्यास कामगार विभागांने संबंधितांवर उचित कारवाई करावी. तसेच कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचे वेतन वेळेत मिळाले पाहिजे, याची  खबरदारी सर्व आस्थापनांनी घ्यावी. तसेच राज्यात इतर ठिकाणी कंपनी, कार्यालय आस्थापना नियमितपणे कामगारांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने नियमाप्रमाणे आवश्यक निधी भरत असल्याची खातरजमा भविष्य निर्वाह निधी विभागाने करावी, असे मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी सूचित केले.

००००

वंदना थोरात/स.सं

अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंगळवार दि. ९ मे रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ मुक्त मुंबई संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

अमली पदार्थ मुक्त मोहिमेबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. मुंबई पोलिस, नार्कोटेक्स् सेल यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईबाबत यावेळी माहिती देण्यात आली. अमली पदार्थ बाळगल्याबद्दल गेल्या दहा दिवसात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये २५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६३ जणांना अटक करण्यात आली आहे तर सुमारे २ कोटी ५९ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत २२ जणांना अटक केली असून २ कोटी ६० लाख ४२ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेमार्फत केलेल्या कारवाईत २ कोटी २४ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण ७ कोटी ४४ लाखांचा माल जप्त झाला आहे.

गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमली पदार्थ विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे १३७१ पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी ७३९१ जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील ६२६३ हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील २८१९ हॉकर्स विरुद्ध देखील या मोहिमेंतर्गत कारवाई झाली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम घेण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उद्धवस्त करावे. मुंबई महानगरातील विद्यालयांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून अमली पदार्थ विरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थांचा पुरवठा रोखला पाहिजे त्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थ मुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का याबाबत दक्ष राहून कारवाई करावी. जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यासंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त श्री. फणसळकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या सुमारे ७ हजार शिक्षकांचे या मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचे श्री. फणसळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

००००

ताज्या बातम्या

विद्यार्थी स्कूल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा

0
मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना...

मराठी भाषा विभागामार्फत ‘अभिजात मराठी, माझ्या अपेक्षा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

0
मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय...

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

0
मुंबई, दि. २० : गणेशोत्सवासाठी मुर्तींचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता...

मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छी मार्केट सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. २० : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
पुणे, दि.२०: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम...