बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1498

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश

नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  वैज्ञानिक  आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

येथील प्रगती मैदानामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा लिगो-इंडिया (LIGO-India), हिंगोली, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.

राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा तसेच नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, तसेच महिला आणि लहान मुलांच्या  कर्करोग रुग्णालयाची  इमारत  यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री यांनी भारतामध्ये अलिकडच्या काळात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक  प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच  स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या  आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी  यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.

पार्श्वभूमी

महाराष्ट्रात हिंगोली येथे लिगो-इंडिया  (LIGO-India)  विकसित केले जाणार असून  जगातील निवडक लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. या परिसरातील 4 किमी लांबीची ‘भूजा’  असलेले अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम  असणार आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर लिगो-इंडिया   ( LIGO-India) समन्वयाने  कार्य करेल.

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची  नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे.  शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर  अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत  रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि दीर्घकालीन  दुष्परिणाम कमी करते.

भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात  फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे.  मॉलिब्डेनम-99  हे टेक्नेटियम-99एम चे मूळ आहे. त्याचा  उपयोग  कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर करण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो. या  सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.

कर्करोग रुग्णालयांचे आणि  सुविधांचे  राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये  कर्करोगावरील  जागतिक दर्जाच्या  सेवांचे  विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.

00000

वि.वृ.क्र.86, दि.11.05.2023

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 11 : मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने या समस्येवर उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, फेरीवाले, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, अन्न धान्य पुरवठा आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्री श्री. केसरकर यांनी ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध देण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने मुंबईतील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार आहेत. त्यांच्यासाठी ‘डे केअर’ सेंटर सुरू करण्याचे नियोजन असून त्यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल.

मुंबईतील प्रामुख्याने अनधिकृत फेरीवाले, कचऱ्याची समस्या, इमारतींमधील अत्यावश्यक सुविधा आदी विषयांबाबत रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आदेश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बचत गटांच्या सदस्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जावी याबाबतही त्यांनी निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिकांना दुकानावरून अन्नधान्य आणणे शक्य होत नाही. याकरिता अन्न धान्य वाटप करण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य सेविकांना मानधन कमी आहे, ते वाढविण्याच्या मागणीबाबत बोलताना याविषयी प्रशासकांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

या सुसंवाद कार्यक्रमात २४३ रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

‘थॅलेसिमिया’ आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण शक्य – डॉ. मधुकर गायकवाड

मुंबई, दि. 11 : थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक विकार आहे जो शरीरातील हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करतो. हा आजार झालेल्या रूग्णांनी वेळीच औषधोपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते, अशी माहिती जे.जे रुग्णालय मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

जागतिक थॅलेसीमिया दिवस दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसीमिया पीडितांच्या स्मरणार्थ आणि या आजाराने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पाळला जातो. या दिनानिमित्ताने शासनामार्फत या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगानेच थॅलेसेमिया हा आजार काय आहे, त्याची लक्षणे आणि त्यावरील प्रभावी औषधोपचार पद्धती तसेच गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 12 शनिवार दि. 13 आणि सोमवार दि. 15 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.

0000

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०९ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

परिक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मानेदेशमुख अनिकेत सिद्धेश्वर हे राज्यातून प्रथम आले आहेत. सांगली जिल्ह्यातील साळुंखे अभिजीत अशोक हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीमती कुपटे अक्षता महादेव ह्या प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज  करावेत, असे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरण

मुंबई, दि. 11 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

दिनांक 12 मे रोजी  एन वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 या वेळेत  सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

खते, बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे – पालकमंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा, तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीला अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) मनीष कलवानिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.आर. देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भूमरे म्हणाले, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुण करा तसेच शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन शेतकऱ्यांचा पिक विम्याची समस्या जाणवते. करा. पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री श्री. भूमरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी खते, बियाणे व इतर निविष्ठांबाबत नियोजन करण्यासोबतच, शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध असावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही व्हावी, असे निर्देश दिले तसेच तहसील कार्यालयात असलेल्या डिजीटल बोर्डवर कृषी विभागाने त्यांचे साप्ताहिक नियोजन, विविध योजना तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा संदेश द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही जिल्हा परिषदेचे कृषि विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मान्सूनपुर्व तयारी व पाणीटंचाई बाबतही आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारीबाबतही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या एकुण 62 गावांमध्ये मान्सुन पूर्व प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम राबविला असून जवळपास 2 हजार 687 गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरीस 165 आपत्ती प्रवण गावांमध्ये साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मान्सूनपुर्व तयारीबाबतही सादरीकरणाव्दारे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी दिली. तसेच पाणीटंचाई व जलजीवन मिशन या योजनांचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर खरिप व रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पीक स्पर्धेत अतीउच्च पीक उत्पादकता काढून प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारण विभागाच्या चित्ररथाचेही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गावपातळीवर तलाठी व कृषी सहायक यांच्यासाठीच्या लोखंडी कटेनर कार्यालयाचेही उदघाटन पालकमंत्री श्री. भूमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०६ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील नाना जोतिराम दडस  हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून ठाणे जिल्ह्यातील श्रीमती भाग्यश्री भाऊसाहेब सांगळे ह्या प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाचे परिक्षोत्तर ( अ.प.) उप सचिव  यांनी कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुंबई दि. 11 : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उप सचिव सुनिल हंजे, अशासकीय सदस्य नामदेव शिरगावकर, अर्चना जोशी, कविता राऊत  उपस्थित होते.

मंत्री श्री महाजन म्हणाले, राष्टकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रक्कमेत दुप्पट ते चौपट वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पदक विजेत्या खेळाडूंच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार याच महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 11 : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबधी दिशा देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांचे करिअर विषयक विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान तातडीने उपलब्ध होईल’’,  असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले.

शिबिर उद्घाटनावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. लोढा बोलत होते. व्यासपीठावर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, व्यवसाय व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, उपसंचालक राजेंद्र संखे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, इयत्ता 10 वी 12 वी नंतर पुढे काय संधी उपलब्ध आहेत त्याच्या मार्गदर्शनाबाबत हे शिबीर आहे. विभाग निर्माण करीत असलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपले प्रश्न नोंदवायचे आहेत. त्या प्रश्नांना ऑनलाईनच उत्तरे देण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर विषयक प्रश्नांचे समाधान तातडीने होईल.

कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या की, आपणाला जे आवडते व जे नाही आवडत, ते ठरवून करिअरचा मार्ग निवडावा. पुढील पाच वर्षात आपण कुठे राहू, याचाही विचार करावा. तुमच्यामुळे भविष्यातील भारत घडणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. विचार हे मनुष्याचे व्यक्तिमत्व घडवित असतात. त्यामुळे चांगले, प्रेरक विचार असावेत. आपल्या विचारांतून कार्य होत असते. विचार केवळ स्वत:साठी करावयाचा नसून समाजाच्या कल्याणासाठी विचार करावा. त्या पद्धतीचे करीअर निवडावे.

मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात संचालक श्री. दळवी यांनी सांगितली.

००००

निलेश तायडे/ससं/

प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

यवतमाळ,दि.११ मे.(जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदूषण विरहित १० साध्या बसेसचे  लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री यांनी फीत कापून व   पूजा करून बसेसचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसची पहाणी केली व बस चालवण्याचा आनंदही घेतला. उपस्थित अधिका-याकडून त्यांनी अद्यावत यंत्रणा असलेल्या बसची इत्यंभुत माहिती जाणुन घेतली.  अशा आणखी  नवीन ४० बसेस विभागास प्राप्त करून देण्याकरिता पाठपुरावा करून बसेस मिळवून देण्याचे आश्वासित केले.

बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व बस स्थानकातील रोड दुरूस्ती करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यानी दिल्या.  उपस्थित चालक,वाहक यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे, यवतमाळ आगर प्रमुख दिप्ती वड्डे, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभाग वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, कामगार अधिकारी सुनिल मडावी, विभागीय लेखा अधिकारी गणेश शिंदे,वाहतूक निरिक्षक हरीष थोरात तसेच बस स्थानकातील प्रवासी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतमालाच्या नुकसानीचा पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्याकडून आढावा

0
चंद्रपूर, दि. २०: गत आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री तथा...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरण जलाशयात जलपूजन

0
सातारा दि. २०: कोयना धरणात 96.38 टक्के  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयातील जलपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कोयना धरणस्थळी झालेल्या जलपुजन कार्यक्रमास...

लोकसंस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा –राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका): लोकसंस्कृतीचे जतन आणि  संवर्धन करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कला आणि संस्कृतीचे संस्कार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

0
सातारा दि. २०: सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा...

कुपोषणाविरुद्ध गडचिरोलीत ‘गिफ्टमिल्क’चा यशस्वी प्रयोग

0
गडचिरोली, दि. २० (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मुलांना रोज मिळणाऱ्या पौष्टिक दुधामुळे त्यांचे आरोग्य व आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...