गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1496

युवकांनी आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुंडलिक नगर, तिरुमला मंगल कार्यालयात  राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन  मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी उपसंचालक गणेश दंदे,  प्रादेशिक कार्यालयाचे सतिश सुर्यवंशी,  औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे, कर्नल सतिश ढगे, प्रायार्य डी. एम. पाटील, मार्गदर्शक अनिल जाधव, ॲड राहूल नांवदर याच्यांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची  उपस्थिती होती.

युवकांना प्रशिक्षणातून सक्षम बनवण्यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. हे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेऊन करिअर करावे. स्पधेच्या युगात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी व्हावे. त्याप्रमाणे आत्मनिर्भर होण्यासाठी यासर्व सुविधासह मार्गदर्शन शिबिराचाही लाभ घ्यावा. नव मतदारांने आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन श्री. सावे यांनी केले

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावित्यता विभाग अनुसूचित जाती व नवबौद्धाच्या मुलामुलींना शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामार्फत आयोजित 10 वी 12 वी उत्तीर्ण मुला मुलींसाठी छात्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमांत लेफ्टनंट कर्नल सतिश ढगे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाले की, स्वत:मधील क्षमता ओळखून करिअर करावे. अभ्यासात सातत्य , मेहनत याबरोबरच शिबिराच्या माध्यमातून मिळणारे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या क्षमता विकासासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे असते. ते मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबिरातून मिळत असल्याचेही ते म्हणाले.

अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ : केंद्र आणि राज्य शासन सहकार खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे काम करीत आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

दादरमधील स्वामी नारायण मंदिराच्या योगी सभागृहात आयोजित को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन,मुंबईचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, धनवर्षा समुहाचे अध्यक्ष अंशुमन जोशी, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे यांच्यासह युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, बॅंका ह्या देशाची अर्थव्यवस्था आहेत. देशाची अर्थव्यवस्था ही जागतिकस्तरावर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी दावोस येथे कोट्यवधींचे औद्योगिक करार करण्यात आले आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार विभागात अमुलाग्र बदल केले जात आहेत. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल. त्यांच्या अडीअडचणींबाबत मार्ग काढला जाईल. को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या माध्यमातून बॅंकाना बळकट करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन ही बॅंकेच्या एकेका कर्मचाऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभी राहते, ही कौतूकास्पद बाब आहे. रंगभूमी आणि चित्रपटांमधील कलाकारांसह बॅंकांमध्ये देखील अतिशय उच्च स्तर असलेले कलाकार आहेत, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. ज्या बॅंका, संस्थांमध्ये सांस्कृतिक चळवळ असते ती संघटना संस्कारी असते. हा अनमोल ठेवा जपला पाहिजे, अशी भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बॅंकामधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, गीतगायन, पोवाडे, नाटक, हास्यविनोद अशा विविध कलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

०००००

कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.12: पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले असून कायदा व सुव्यवस्था असलेले शहर म्हणून नागपुरची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

लकडगंज येथील आधुनिक सोयीसुविधायुक्त पोलीस  स्टेशन, पोलीस  उपायुक्त कार्यालय तसेच 348 निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक संदिप बिष्णोई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे अजय गुल्हाने आदी उपस्थित होते.

पोलीसांसाठी निवास संकुल बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला असून राज्यात 1 लक्ष सेवानिवास बांधण्यात येणार असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस   स्टेशनच्या बांधकामासोबत निवास संकुल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस गृहनिर्माण विभागाने बांधकामामध्ये होत असलेला विलंब टाळुन सर्व सुविधायुक्त सेवानिवास प्रकल्पाला गती द्यावी अशी सुचना यावेळी केली.

नागपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस   स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार मंजुरी देण्यात येईल. पोलीसांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सुविधा सुरु राहावी यासाठी बँक ऑफ इंडिया सोबत करार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी डिजिटल हेल्थ फाईल तयार करण्यासाठी  आवश्यक निधी  उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर अपघातमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सुचना करतांना शहरातील अपघात व मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अपघात प्रवण स्थळांचा शोध घ्यावा. शहरातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. पोलीस   दलाने गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करावी. पुर्व नागपूर येथे शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प सुरु झाले असून नागपूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

लकडगंज येथे देशातील स्मार्ट पोलीस स्टेशन व निवासी संकुलातील बांधकाम पूर्ण झाले असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी विविध विकास प्रकल्पांच तसेच नागरी सुविधाबद्दल माहिती दिली.

प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करुन लकडगंज स्मार्ट पोलीस   स्टेशन, 348 निवासी सदनिका व इतर कार्यालयांच्या बांधकामसाठी 150 कोटी रुपये खर्च झाले आहे. पोलीस  दलाला अत्याधुनिक 70 वाहने तसेच 100 हिरो मोटर सायकल उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. त्यासोबतच पार्डी येथे नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत पोलीस   स्टेशनचे बांधकामाचे भुमिपुजन, कामठी येथे पोलीस   गृहनिर्माण अंतर्गत 52 गाळ्यांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी लकडगंज पोलीस   स्टेशन तसेच निवासी संकुल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा सत्कार करण्यात आला. तसेच निवासी संकुलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरांचा ताबा यावेळी देण्यात आला. पोलीस   स्टेशनच्या बांधकामसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रसन्न ढोक, विनय सारडा, अनिल सारडा यांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन पोलीस  उपायुक्त गोरख भांमरे तर आभार सहपोलीस आयुक्त अश्वथी दोरजे यांनी मानले.

00000

 

 

गावदेवी परिसर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुंबईदि. 12 मुंबईकरांसाठी विविध पायाभूत तसेच आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत आहे.  मुंबईच्या सुशोभीकरणसौंदर्यीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित असून गावदेवी परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जोसेफ बाप्टिस्टा उद्यानमाझगाव येथे भंडारवाडा जलाशय क्रमांक ३ ची पुनर्बांधणीत्यावर महापालिकेचे कार्यालय व प्रेक्षणीय अवलोकन सज्जापरिसर सुशोभीकरण या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमहिला व बाल विकासकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेस्थानिक आमदार यामिनी जाधवयशवंत जाधवमाजी आमदार मधू चव्हाण,मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह पदाधिकारी – अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीनागरिकांच्या सदिच्छा राज्य शासनाच्या पाठीशी आहेत. सर्वसामान्य लोकांसाठीच हे सरकार आहे. राज्याचा विकाससर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम हे शासन करीत आहे. शेतकरीकष्टकरीकामगारमहिला अशा सर्वासाठी आम्ही काम करतोय. त्यामुळेच त्यांचे आशीर्वाद राज्य शासनाच्या पाठीशी आहेत. ते म्हणाले की,  गावदेवी परिसरातून संपूर्ण मुंबई दिसते. यापुढे येथील विकास कामातून मुंबईचं विहंगम दृष्य दिसेल. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामाचा आमचा आग्रह आहे.

गावदेवी मंदिर येथील उद्यान आणि परिसर विकासासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल. गावदेवी येथील  देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दहा महिन्यात अनेक प्रलंबित निर्णय राज्य शासनाने मार्गी लावले. मुंबई बदलत आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने अनेक विकास कामे सुरू केली. पुढील दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई होणार आहे. मुंबईचा पैसा मुंबईकरांसाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मेट्रोसागरी किनारा रोडट्रान्स हार्बर लिंक रोड अशी अनेक विकास कामे सुरू आहेत. मेट्रो-२ मेट्रो-७ सुरू करतोय. मेट्रो-३ चा पहिला टप्पा लवकर पूर्ण होतोयअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले कीसुशोभीकरण करत असताना मुंबईकरांच्या आरोग्याकडे लक्ष देतोय. ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले आहेत. शाळामहाविद्यालयांच्या परिसरात असणाऱ्या अनधिकृत ड्रग व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करून ड्रग्ज फ्री मुंबई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले कीमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात आहे. विविध विकासकामे मुंबई आणि राज्यात होत आहेत. सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम राज्य शासन मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी यावेळी मुंबई सौंदर्यीकरण कार्यक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी देवीची मूर्ती भेट देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. 

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज २०९ तक्रारींचे निराकरण

मुंबई, दि. 12 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात घाटकोपर पूर्व येथील  एन  वॉर्ड येथे आज 490 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 209 तक्रारींचे निराकरण  करण्यात आले आहे उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

दिनांक 15 मे रोजी भांडुप वेस्ट  एस  वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते 5.30 वाजता  सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ६० कोटींचा निधी वितरित

मुंबई दि. 12 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये इतका निधी शासनाकडून आज दिनांक 12 मे 2023 रोजी  वितरीत करण्यात आलेला आहे. समाज कल्याण आयुक्तालयाकडून हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे.

मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे  सुकर व्हावे यासाठी राज्यात  मागासवर्गीय   मुलामुलींसाठी  शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात 441 ( मुले- 229  व  मुली-212) शासकीय  वसतिगृहे  सुरू असून  त्यामधून  मोफत निवास, भोजन, शैक्षणिक  साहित्य  इ. सोयीसुविधा  पुरविण्यात येतात.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु  शासकीय  वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या  अनुसूचित जाती व नवबौध्द  विद्यार्थ्यांपैकी  इयत्ता 11 वी व 12 वी तसेच यानंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून  मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.60,000/- इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका  क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.51,000/- व  इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  रू.43,000/- इतकी रक्कम  सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रू.126 कोटी इतका निधी वितरीत  करण्यात आलेला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत रू.150 कोटी  इतकी  तरतूद करण्यात आली  असून  त्यामधून यापूर्वी रू.15 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.आता रू.60 कोटी इतका निधी शासनाकडून  दिनांक 12 मे,2023 रोजी  वितरीत करण्यात आलेला आहे.

000000

 

पाऊस कमी आल्यास आकस्मिक उपाययोजनेसाठी सज्ज राहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.12 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार या हंगामात पाऊस कमी आल्यास पीकपद्धतीत बदल व अन्य उपाययोजनांच्या पर्यायासाठी प्रशासनाने तयार असावे, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे आयोजित नागपूर जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनिल केदार, राजू पारवे, विकास कुंभारे, समिर मेघे, आशिष जायसवाल, अभिजित वंजारी, टेकचंद सावरकर, प्रवीण दटके, मोहन मते, उपाध्यक्ष कुंदा राऊत, कृषी सभापती प्रवीण जोध, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदिंची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी यावर्षीच्या कृषी विभागाच्या नियोजनांचे सादरीकरण केले. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत मांडलेल्या विविध सूचनांचे स्वागत केले. ते म्हणाले, यावर्षी बियाण्यांची उपलब्धता आहे. याशिवाय उच्चप्रतीचे घरगुती बियाणे निर्मितीची तयारी आहे. खतांची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे. मागील वर्षीचा साठा 80 टक्के उपलब्ध आहे. त्यामुळे खतांची अडचण नाही. तथापि, बियाणे, खते, किटकनाशके यांचा तुटवडा भासणार नाही अशी तरतूद करुन ठेवा.

‘अल निनो’च्या प्रभावाने पावसाला उशीर झाला तर कदाचित कापसाची पेरणी कमी होईल. अशावेळी आकस्मिक कृती आराखडा तयार ठेवा. सोयाबीन, तुरीचे बियाणे अधिक लागले तर त्याची उपलब्धता ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यांत्रिकीकरणाच्या संदर्भात अधिक भर या मोसमात द्यावा. रुंद वरंभा सरी पेरणीयंत्र (बीबीएफ) द्वारे पेरणी करावी. यामुळे जमीनीत पाण्याचा ओलावा अधिक राहतो व निचरा होतो. जिल्ह्यात अधिकाधीक पेरणी यंत्रामार्फत व्हावी, यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून यावर्षी ड्रोनद्वारे फवारणी करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागाला तशी सूचना केली आहे. बचत गटांना यामध्ये सहभागी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री सौर ऊर्जामध्ये नागपूर जिल्ह्यात काम चांगले झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. 30 टक्के फिडर उभारण्यात आले आहे. पुढील काळात संपूर्ण शाश्वत ऊर्जावर आधारीत रचना करण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित फिडर लवकर उभारली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात अतिरिक्त 10 हजार हेक्टर क्षेत्र वाहितीखाली आले आहे. जिल्ह्यातील 243 गावांची निवड झाली आहे. जुन्या गावांना देखील सहभागी करा. यामध्ये सामाजिक संस्थांना सहभागी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना खासगी खरेदी-विक्री करतांना फसवणूक होत असल्याचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिले. त्याबाबत गृहखाते प्रचलित कायद्याद्वारे कारवाई करतील. तसेच किटकनाशके, खते, बियाणे यामध्ये फसवणूक होणार नाही, यासाठी तपासणी यंत्रणा गतीशील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विक्रमी तूर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ई-ऑफिस बळकटीकरणाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लॅपटॉप वितरीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद उपरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद मनोहरे यांनी केले.

०००००

 

 

नवकौशल्य,रोजगार संधी यांचा तरुणाईने लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला,दि.12(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन रोजगार इच्छुक आणि संधी यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या उपक्रमात आपण सहभाग द्यावा. या शिबिरांच्या निमित्ताने आपल्या समोर येणारे नवकौशल्य, दर्जेदार शिक्षण- प्रशिक्षण आणि रोजगार संधी याचा तरुणाईने लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय  येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमास विधानपरिषद  सदस्य आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार गोवर्धन शर्मा तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सुचना विज्ञान केंद्राचे नितीन चिंचोले, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे तसेच या शिबिरात युवक युवतींना  समुपदेशन, रोजगारांच्या संधी, नवीन तंत्रज्ञान व करिअर याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. ज्ञानसागर भोकरे, गजानन कोरे,सचिन बुरघाटे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

युवकांनी व पालकांनीही लाभ घ्यावा- उपमुख्यमंत्री फडणवीस

त्यानंतर दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराचे उद्घाटन करुन उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात सर्व २८८ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम घेण्यात येत आहे.  १० वी,  १२ वी नंतर नव्या शिक्षण, प्रशिक्षणाच्या वाटा आणि रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहिती व्हाव्या. तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, त्यासाठी मिळणारे अर्थसहाय्याचे मार्ग हे ही माहिती व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळाला अपेक्षित उद्योगांतील कौशल्याच्या मागणीनुसार विविध अभ्यासक्रम तयार करुन त्याचे प्रशिक्षण युवकांना देणे. त्यातून त्यांना रोजगाराची संधी किंवा स्वतः उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्याचा विकास, समुपदेशन हे सगळं या शिबिरातून दिलं जाईल, त्याचा युवकांना लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

आपणच व्हावे आपल्या जीवनाचे शिल्पकार- आ.मिटकरी

विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शासनाने हा एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. वाढते बेरोजगारीचे प्रमाण ही चिंतेची बाब असून या उपक्रमांचा उपयोग प्रत्यक्ष संधी उपलब्ध होण्यात व्हावा. जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योगाची उभारणी व्हावी. त्यातून स्थानिक पातळीवरच रोजगार संधी मिळेल. उभारण्यात आलेले उद्योग हेच बेरोजगारीच्या समस्येचे उत्तर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी करांमधून  मिळणारे उत्पन्न हे शिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी वापरले. त्यातून निर्माण झालेल्या शिक्षीत आणि प्रशिक्षीत मनुष्यबळामुळे राज्याचा विकास झाला. ज्या अर्थी,या उपक्रमाला शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे त्या अर्थी  शाहू महाराजांच्या नावाला साजेसे कार्य या उपक्रमातून व्हावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ. मिटकरी पुढे म्हणाले की, या शिबिराला उपस्थित युवक युवतींनी मिळणाऱ्या माहितीचा लाभ घ्या. त्यातून मिळणाऱ्या संधीचे सोने करा. आपण स्वतः आपल्या मेहनत आणि हुशारीच्या बळावर प्रगती करा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हा, असा संदेश त्यांनी उपस्थित तरुणाईला  दिला.

स्वयंरोजगाराकडे वळा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्यात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दर महिन्याला रोजगार मेळावे घेतले जातात. त्यातून अनेकांना संधी मिळत आहे. आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळणारी माहिती व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. आयटीआय सारख्या संस्थांमधून दिले जाणारे विविध व्यवसाय अभ्यासक्रम हे केवळ नोकरीची संधीच देत नाही तर स्वयंरोजगाराची संधीही देतात. युवकांनी स्वतः स्वयंरोजगाराकडे वळावे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांची माहिती घ्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

प्रास्ताविक गजानन चोपडे,आभारप्रदर्शन द.ल. ठाकरे तर सूत्रसंचालन गटनिदेशक मंगेश पुंडकर यांनी केले.

शिबिरानिमित्त विविध संस्था व शासनाच्या विभागांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच विविध कर्ज योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावले होते. तेथेही विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच दिवसभराच्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केले. याशिबिराला शेकडो युवक युवती उपस्थित होते.

०००००

 

 

‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई

मुंबई, दि. 12 : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात येत आहे. या माध्यमातून यंत्रणेत काम करणाऱ्यांमध्ये  क्षमता वृद्धीसह प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास सहाय्य होईल’’, असा विश्वास मिशन कर्मयोगी भारतचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयातील परिषद सभागृहात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने ‘कर्मयोगी भारत’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रातील दुपारच्या सत्राला संबोधित करताना श्री. रामादुराई बोलत होते. व्यासपीठावर मिशन कर्मयोगी भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, कॅपॅसिटी बिल्डींग कमिशनचे सचिव हेमांग जानी, प्रशासक प्रवीण परदेशी, अप्पर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, एनआयसीचे राज्य माहिती अधिकारी श्री. पारीसनी, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर उपस्थित होते.

श्री. रामादुराई म्हणाले की, देशात सध्या चलनरहीत, पेपररहीत सेवा उपलब्ध आहे. त्यानुसार शासकीय सेवेतही भविष्याचा विचार करून प्रशासकीय यंत्रणेत क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. पुढे चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे जग आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे मनुष्यबळ शासनात असावे. मिशन कर्मयोगी भारतचा उद्देशच ‘रूलबेससह रोलबेस इंडिया’ निर्माण करणे आहे. त्यानुसारच कर्मयोगी भारत मिशन अंतर्गत आयजीओटी (iGOT-Integrated Government online Training) या कर्मयोगीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ घेवून आपली क्षमता वृद्धी करावी.

मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंग यावेळी म्हणाले की, मिशन कर्मयोगी भारतला महाराष्ट्रात संधी मिळाली आहे. हे मिशन गुड गव्हर्नन्ससाठी आहे. शासकीय योजनांमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. कौशल्य विकसित करून यंत्रणेला सक्षम करण्याचे काम मिशन कर्मयोगी भारतमधून होत आहे. राज्याच्या गरजा, नियम, कायदे व भाषेला अनुसरून अभ्यासक्रम आहे. आय गॉट प्लॅटफॉर्मवर 4 लाख 60 हजार हून अधिक लोकांची नोंदणी झाली आहे. शासनात दर्जेदार काम होण्यासाठी कर्मयोगी भारतचा उपयोग होणार आहे.

चर्चासत्रादरम्यान सचिव श्री. जानी यांनी मिशन कर्मयोगी भारत सोबत सामजंस्य करार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे सांगितले. प्रशासक श्री. परदेशी यांनी  शासनात काम करताना बदली झाल्यानंतर किंवा नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर नवे ज्ञान, माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रशिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरू पाहिजे. अन्यथा प्रभावी काम होत नाही. त्यामुळे आयजीओटी (iGOT-Integrated Government online Training) हे कर्मयोगी प्लॅटफॉर्म उपयुक्त असून यामध्ये आरटीआय, पार्लमेंटरी प्रोसीजर, नोटींग अँड ड्राफ्टींग,फायनान्सीयलसारखे उपयुक्त कोर्सेस उपलब्ध असल्याचे  सांगितले.

अप्पर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर ‘माईंड सेट’ व्हायला वेळ लागतो. त्यासाठी मिशन कर्मयोगी भारत निश्चितच मदत करेल. यामध्ये विविध प्रशिक्षणे आहेत. ते वेळेनुसार अधिकारी घेवू शकतात.

००००

निलेश तायडे/ससं/

 

 

जनसामान्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे – पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन

यवतमाळ, दि १२ :   सिकलसेलसारख्या आजारावर मात करण्यासोबत विविध शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. प्रत्येकाला वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्त संकलन आवश्यक आहे. जिल्ह्यात रक्त तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान मोहीम गरजेची आहे. यामुळे जनसामान्य नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले.

स्थानिक दर्डा सभागृहात पोलिस दलाच्या वतीने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, रेड क्रॉसचे सचिव  किशोर दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री मार्गदर्शन करीत होते.

जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवड‌्यावर मात करण्यासाठी जिल्हा पाेलीस दलाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पहिल्याच रक्तदान मोहिमेत एक हजार रक्त बॉटल्सचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांनी रक्तदान करून रक्तदान मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी पोलीस दलासह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकही रक्तदानासाठी उत्स्फुर्तपणे पुढे आले होते.

पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस दलाच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. रक्त संकलनामुळे सरकारी रूग्णालयात गरजवंताना सहज रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि वेळेवर उपचार करणे शक्य असल्याचे मत त्यांनी नोंदविले.

किशोर दर्डा यांनी रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळते. दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवित रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पहिल्या रक्तदान शिबीराचे संयोजक म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी केले होते. यावेळी एसडीपीओ संपतराव भोसले, परिविक्षाधीन डिवायएसपी विनायक कोते, दिनेश बैसाने,अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, एलसीबी पीआय प्रदीप परदेसी, ठाणेदार रवींद्र जेधे (बाभूळगाव), दीपमाला भेंडे (लोहारा), उमेश बेसरकर (कळंब) , प्रकाश तुनकलवार (यवतमाळ ग्रामीण), संजय खंडारे (वडगाव जनगल), अजित राठोड (जिल्हा विशेष शाखा), शासकीय रक्तपेढीचे प्राध्यापक विशाल नरोटे, एकनिल ब्लड बँकेचे सागर तोडकर, डॉ. प्रकाश नंदुरकर, अविनाश लोखंडे, अनंत कौलगिकर, गोपाल शर्मा, संकल्प फाउंडेशन, दिनदयाल प्रबोधनी, दि अर्बन बँक आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.

००००००००

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...