गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1492

दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी!

नवी दिल्ली, १५ :  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे,  विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.

मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहासकालीन अनेक पैलूंचा उलगडा केला. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ – मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र – कोकण व दक्षिण भारत हे कार्यक्षेत्र कसे होते याबद्दल त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुद्धा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि त्यातून मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधून प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असून अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

विजय काकडे, कमलेश पाटील, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांचीही प्रबोधनपर भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले,  शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये 14 मे हा दिवस  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज  यांची जयंती साजरी करावी. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

00000

 

 

 

 

 

जी-२० ऊर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू

मुंबई, 15 :- भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी ऊर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

तिसऱ्या उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठकीच्या पहिल्या दिवशी, भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या विशेष संबोधनात शाश्वत ऊर्जा स्रोत आणि त्यांचे संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या धोरणांचा विकास आणि अवलंब करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. “शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी जी-20 राष्ट्रांवर एक अद्वितीय जबाबदारी आहे.” असेही श्री. दानवे म्हणाले.

या दृष्टीने या अशा प्रकारच्या ऊर्जा संक्रमणाबाबत (ऊर्जास्रोतांच्या वापरातील बदल) भारत आघाडीवर असून जगात करत असलेले नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे, धोरणे आखणे आणि नियमन करणे याबाबत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निधी पुरवठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात वित्तीय संस्था सुद्धा महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. उद्योग जगत, दीर्घकाळ चालू शकणाऱ्या पद्धती राबवून अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकते. एकापेक्षा जास्त सदस्य राष्ट्र असलेल्या जागतिक संघटना विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवू शकतात आणि सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे, नागरिकही त्यांच्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून या चळवळीचा एक भाग बनू शकतात, असे काही उपायही रावसाहेब पाटील दानवे यांनी या बैठकीत आपले विचार मांडताना सुचवले.

ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि ईटीडब्लूजीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे देखील या बैठकीत आणि विचारविनिमयामध्ये सहभागी होते.

तिसऱ्या ईटीडब्लूजी बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीच्या निमित्ताने तीन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये धोरणकर्ते, बहुस्तरीय संघटना, वित्तीय संस्था, व्यापारी संघटना आणि विषयतज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी या इतर कार्यक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता.

कमी खर्चाचे आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने बहुस्तरीय विकास बँकांसोबत कार्यशाळा– बॅटरी, साठवणूक, हरित हायड्रोजन, किनारपट्टीवरील वारे, जैवऊर्जा आणि कार्बन कॅप्चर युटीलायजेशन यांसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी देशांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.

न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद – कोळसा क्षेत्रातील संक्रमणासमोर, प्राथमिकतेने कोळशावर आधारित अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली.  संस्थामक शासन, भूमी आणि पायाभूत सुविधा मालमत्ता यांचा इतर कारणांसाठी वापर, जागतिक स्तरावरील यशस्वी उपक्रमांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञानात्मक आणि आर्थिक साहाय्य यावर भर देण्यात आला.

जैवइंधनावर परिसंवाद – जागतिक जैवइंधन आघाडी तयार करण्यासह जैवइंधनासंदर्भात सहकार्यविषयक आघाडी बळकट करण्याच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानासह जैवइंधनाचा विकास आणि  वापर अधिक गतीने करण्याच्या उपाययोजनांवर या परिसंवादात चर्चा झाली.

या मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावरील चर्चा आणि प्रगती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहील. 17 मे 2023 रोजी या तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा समारोप होणार आहे. सदस्य देशांमधील करार आणि सहमती स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहाय्यकारक ठरण्याची अपेक्षा आहे.

०००

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १५ : विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले.

कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाली, त्यावेळी ते  बोलत होते.

आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी उणापुरा एक दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे. वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामायिक शैक्षणिक वेळापत्रक चुकते.  त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे, तसेच गुणपत्रिकांचे देखील वितरण वेळेवर झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने असे विद्यार्थी आपणास निवेदन लिहितात. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पहावे.

काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा सादर केला. तसेच १८ उद्दिष्ट पूर्तीबाबत (कि रिझल्ट एरियाज)  अद्ययावत माहिती दिली.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी देखील आपल्या विभागांशी संबंधित माहिती दिली. विद्यापीठांच्या कुलगुरुंनी धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपल्या विद्यापीठाच्या तयारीची माहिती दिली.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, एसएनडीटी महिला  विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ कारभारी काळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि) माधुरी कानिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत आदी उपस्थित होते.

००००

 

दिलखुलास कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मुलाखत

मुंबई, दि. 15 : राज्य शासन जनकल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना जिल्ह्यातील कृषी, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करतांना स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, कृषीचा विकास करताना शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देणे तसेच तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून विकास करणे, अशा विविध विषयांवर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 16, बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि.18 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतली आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १४४ तक्रारींचे निराकरण

मुंबई,दि. १५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात भांडूप (प.) एस  वॉर्ड  येथे आज १ हजार ८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील १४४ तक्रारींचे तत्काळ निराकरण  करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे  स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

महिलांना तक्रारींसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

दिनांक १६ मे रोजी गोवंडी पूर्व, एम वॉर्ड येथे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते ५.३० वाजेदरम्यान सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

उदयपूर/चंद्रपूर, दि. 15 मे 2023:  पश्चिम क्षेत्रातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लुप्त होणाऱ्या कला कौशल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यासाठी पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांतून त्या त्या राज्यातील लुप्त होत चाललेल्या कला कौशल्यांचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र देशात अव्वल क्रमांकावर राहावे यासाठीही श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सूचना केल्या.

शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे नूतन अध्यक्ष ना.श्री सुधीर मुनगंटीवार, प.क्षे.सां.केंद्राच्या संचालिका श्रीमती किरण सोनी गुप्ता, श्री संतोष जोशी, श्री अशोक परब, प्रा.युगांक नाईक प्रत्यक्षात उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्यासह इतर सदस्य राज्यातील शासकीय अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांसाठी व योजनांसाठी सीएसआरमधून निधी मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. सीएसआर निधीमुळे यापुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजनांना निधीची कमतरता जाणवणार नाही, असे ते म्हणाले. या बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.

सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञान विकीपीडियावर आणणार

पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांकडे मोठा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञानाचा खजिना असून या सांस्कृतिक वारशाची तसेच पारंपरिक ज्ञान व साहित्याची माहिती विकीपेडीयावर नवीन पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या. यासंदर्भात विकीपीडियाचे जागतिक संचालक श्री. होरे वर्गीस आणि त्यांच्या चमूने या बैठकीसमोर सादरीकरण केले.

कलाकारांचे मानधन वाढविण्याचा प्रयत्न

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राशी संबंधित योजना आणि कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांचे मानधन अनेक वर्षे वाढवले गेलेले नाही. हे मानधन काळानुरूप वाढविण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक खात्याला शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याची माहिती श्री मुनगंटीवार यांनी दिली.

देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राशी समन्वय निर्माण करणार

देशातील विविध भागात असलेल्या विविधतेतही सांस्कृतिक एकता विद्यमान आहे. त्यामुळेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचे आयोजन करताना देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांशी सांस्कृतिक कार्य विषयात योग्य तो समन्वय साधला जायला हवा असे ना.श्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले.

गेट वे ऑफ इंडिया येथे दर सप्ताहात होणार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

भारतात येणारे परदेशी पर्यटक तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देत असतात. त्यांच्यासमोर पश्चिम क्षेत्रातील चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण केल्यास या भागातील कला कौशल्यांच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचवणे सोपे जाईल, असे मत ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. त्याला समिती सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया येथे दर आठवड्यात शनिवार रविवारी सहा सदस्य राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची कायमस्वरूपी योजना आखण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे इतर अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य त्यांना मदत करतील.

पंढरपूर येथे होणार भक्तीसंस्कृती संमेलन

राज्यातील वारकरी संप्रदाय आणि भक्तीसंस्कृती ची माहिती देशातील इतर राज्यांना व्हावी या करता पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्तिकी वारीच्या काळात पंढरपुरात राष्ट्रीय भक्तीसंस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषण चवरे या कामात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला मदत करणार आहेत.

नागपूर येथे व्याघ्र परिषद

पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यातील व्याघ्र प्रकल्प, त्यातील गावे, तिथली निसर्गप्रेमी संस्कृती यांची माहिती जगाला करून देण्यासाठी नागपूर येथे व्याघ्र परिषद घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पश्चिम क्षेत्राचे सांस्कृतिक गीत बनविणार

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे स्वतःचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक गीत तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला गेला.

पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांचे संमेलन

पश्चिम क्षेत्रातील भारत रत्न आणि पद्म पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे संमेलन आयोजित करण्याच्या सूचना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. या संमेलनात केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसह पश्चिम क्षेत्रातील सर्व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वरीष्ठ अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे. या संमेलनात या पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत थेट चर्चा करून सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी त्यांच्या सूचना समजून घेतल्या जातील.

प्रत्येक राज्याच्या नावावर किमान एक तरी गिनीज जागतिक विक्रम असावा

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सदस्य राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या नावाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक तरी गिनीज जागतिक विक्रम असला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

पश्चिम क्षेत्रातील गड किल्ल्यांविषयी विशेष कार्यक्रम

पश्चिम क्षेत्रातील प्रत्येक राज्याला चांगला ऐतिहासिक वारसा असून त्यातील गड किल्ल्यांशी अनेक ऐतिहासिक कथा जोडल्या आहेत. त्या कथांसह या गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून विशेष योजना आखण्याचे निर्देश श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रशासनाला दिले आहेत.

पुढची बैठक मुंबईत

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची पुढील बैठक मुंबईत जून अखेर किंवा जुलै पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री. मुनगंटीवार यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,दि.१५ : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना आपल्या कार्यअहवालासह शनिवार दि. २० मे पर्यंत अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये करावयाचा आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी बालविवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या क्षेत्रात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला असावा.

पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये  हा उपक्रम योग्य पदधतीने राबविण्याची दक्षता घ्यावी, तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी  व संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवावा. ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. याबाबतचाच महिला व बालविकास विभागाचा शासननिर्णय दिनांक ९ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि.१५ – अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देवून पाहणी केली आहे.

जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये, समाज माध्यमांवर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाकावी, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.

०००००

 

बोगस बियाणे विक्री रोखा, पीक कर्ज वितरणात सुलभता आणावी – पालकमंत्री गिरीष महाजन

लातूर, दि. 15 (जिमाका) : खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता बाळगावी. यासाठी कृषि विभागाच्या दक्षता पथक आणि भरारी पथकांनी सतर्क राहून बियाणे विक्रीचे संनियंत्रण करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले. तसेच पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करता बँकांनी कर्ज वितरणात सुलभता आणण्याच्या सूचना केल्या.

खरीप हंगामपूर्व तयारी बैठक पालकमंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषि विकास अधिकारी एस. आर. चोले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते.

खरीप हंगाम हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असून बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते वेळेत आणि मागणीनुसार उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी मागणी आणि पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे सोयाबीनच्या बियाणांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता ठेवावी. घरचे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना उगवण क्षमता तपासणीबाबत मार्गदर्शन करावे. तसेच उगवण क्षमता तपासूनच बियाणे वापरण्याचे आवाहन करावे, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले.

शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी, पेरणीसाठी पीक कर्ज वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. बँकांनी पात्र शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्ज वितरणात सुलभता आणावी. जिल्हास्तरावर नियमितपणे बँकांची बैठक घेवून कर्ज वितरणाचा आढावा घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी केल्या. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. पीक विमा मिळण्यासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावी. केवळ तांत्रिक कारणांमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे सिंचनासाठी फायदा झाला असून या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करावीत. त्यामुळे भविष्यात सिंचनासाठी अधिकाधिक सुविधा निर्माण होतील, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले. तसेच अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा. जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानी होण्याचे प्रमाण अधिक असून हे टाळण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. या संशोधनाला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

वन्यजीवांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतील संरक्षक कुंपण करणे आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे. सौर कृषिपंपांची मागणी वाढत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जावा, असे आमदार बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
प्रमाणीकरण न झालेले बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याने बियाणे न उगविण्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे प्रमाणीकरण न झालेले बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देवू नये, असे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी सांगितले.

गतवर्षी शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव झालेल्या मंडळांमध्ये कृषि विभागाने शंखी गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करावे. यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना माहितीपत्रिका, व्हिडीओ आदी साहित्याद्वारे माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी होणाऱ्या सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठीही शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे. सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून प्रत्येक गावामध्ये किमान पाच शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आयोजित शिबिरांमध्ये शेततळ्यांचे अर्ज भरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केल्या.

खरीप हंगामात 6 लाख 41 हेक्टरवर होणार पेरणी

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. जिल्ह्यात यंदा 6 लाख 41 हजार 250 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक 4 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 90 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणीचे नियोजन असल्याचे श्री. गावसाने यांनी सांगितले. पेरणीसाठी 3 लाख 67 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे आवश्यक असून शेतकऱ्यांकडे 5 लाख 19 हजार 600 क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. बियाणे बदलासाठी आवश्यक 1 लाख 28 हजार 450 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित पिकांचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी खताचा सरासरी 96 हजार 581 मेट्रिक टन वापर होतो, गतवर्षी 1 लाख 5 हजार 575 मेट्रिक टन वापर झाला होता. यावर्षी 1 लाख 12 हजार 260 मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. महिनानिहाय त्याचे वितरण केले जात आहे. नॅनो युरियाप्रमाणेच नॅनो डीएपीचा वापर करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बोगस बियाणे, खतांची विक्री रोखण्यासाठी गुण नियंत्रण पथकांमार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. याविषयीच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच राज्यस्तरावर टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहिती श्री. गावसाने यांनी दिली.

पीक प्रात्याक्षिके, शेतीशाळा, हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण, पिकांची उत्पादकता, नैसर्गिक आपत्ती आदी बाबींचा आढावाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी घेतला. शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाने तयार केलेल्या घडीपुस्तिका, भित्तीपत्रिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

शासन आपल्या दारी – शासनाचा अभिनव उपक्रम  

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट आर्थिक तरतूद केली जाते. शासकीय यंत्रणा योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते.

शासनाची  नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. यासाठी शासनाने शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केले आहे.

जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची’ नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून यापूर्वी राबविण्यात आलेला आहे व या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राज्यातील सर्वत्र राबविण्यात येत आहे. याबाबत विविध लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार हा उपक्रम राज्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.

राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 15एप्रिल  ते 15 जून 2023 या कालावधीत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान राबवण्यात येत आहे. याचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येईल. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी दिनांक 15 एप्रिल ते 15 मे, 2023 या कालावधीत करण्यात येत आहे. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्याची यादी तयार करणे तसेचत्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे अपेक्षित आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75  हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचे ध्येय सर्व जिल्हाधिकारी ठरविणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर  व तालुका स्तरावर दोन  दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमापूर्वी सर्व प्राप्त अर्जांच्या बाबतीत निर्णय घेवून या संदर्भातील आयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या समन्वयाने करणार आहेत.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मध्ये उपलब्ध असलेल्या निधीच्या कमाल 00.2 टक्के निधी (1 कोटी रुपयांच्या मर्यादेत) वरील प्रयोजनासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्व विभागांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देतील.  15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानाबाबतचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांनी मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करण्यात येणार आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर 

ताज्या बातम्या

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

0
आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण मुंबई, दि. २१ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...