गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1493

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ

सातारा दि. 15 : दौलतनगर ता.पाटण जि.सातारा  येथे  शासन आपल्या दारी -२०२३ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी सुमारे १९ हजार लाभार्थ्यांना १३ मे रोजी किंवा त्यापूर्वी लाभ देण्यात आला. उर्वरित सुमारे ८ हजार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरी किंवा गावात स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत पुढील ८ दिवसात लाभ पोहोचविण्यात येणार आहे.

            या अभियानासाठी विविध विभागांकडून सुमारे 27 हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांचा विभागनिहाय  निश्चित केलेली लाभार्थी संख्या, वाटप /लाभार्थी संख्या व घरोघरी जाऊन लाभ देणे शिल्लक संख्यांचा तपशिल अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

        महसूल विभाग पाटण  – 10622 – 5513 – 5109, महसूल विभाग  कराड(सुपने मंडळ)- 1393 – 1294 – 99, पंचायत समिती पाटण – 9371 – 8042 – 1329, पंचायत समिती कराड(सुपने मंडळ) – 86 – 58 – 28, तालुका कृषि अधिकारी कराड(सुपने) – 257 – 166 – 91, तालुका कृषि अधिकारी पाटण – 1295- 882 – 413, नगरपंचायत पाटण – 400 – 150 – 250, महावितरण तारळे/पाटण/मल्हारपेठ – 657 – 350 – 307, वनविभाग पाटण – 60 – 26 – 34, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी/ पाटण-चष्मा वाटप – 99 – 43 – 46, दुय्यम निबंधक कार्यालय पाटण 117 – 90 – 27, वेलफेअर बोर्ड सातारा 836 – 716 – 120, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सातारा जिल्हा – 19 – 0 – 0, जिल्हा रुग्णालय कराड/PHC सुपने 10 – 10 – 0, अण्णासाहेब आर्थीक  विकास महामंडळ 38 –  36 – 2, पंडित दिन दयाळ उपाध्याय महा रोजगार मेळावा 700 – 498 – 0, आरोग्य शिबीर 1200 – 1133 – 0, बँक ऑफ महाराष्ट्र 2 – 2- 0 असे एकूण एकंदर 27162 – 19009 – 7855.

            या अभियानाच्या निमित्ताने  पाटण तालुक्यातील खेडोपाडी व दुर्गम भागात प्रशासन पोहचले. शैक्षणिक कारणासाठी नेहमी लागणारा  जातीचा दाखला ,उत्पन्नाचा दाखला ,डोगरी व दुर्गम भागातील दाखला ,रहिवास दाखला , नोकरीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा भूकंपग्रस्त दाखला इत्यादी विविध सुमारे १०००० पेक्षा अधिक दाखल्याचे महसूल विभागामार्फत वितरण करण्यात येत आहे.  नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थ्यांची  दाखला मिळविण्याची धावपळ या निमित्ताने निश्चितपणे कमी होणार आहे. जे विद्यार्थी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी  हजर राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचे मार्फत घरपोच करण्यात येत आहे.

            या अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशी दौलतनगर ता.पाटण येथे  अद्यावत आरोग्य सुविधेसह आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील सुमारे १००० पेक्षा अधिक व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.

            याच अभियानाचा एक  भाग म्हणून व  पाटण तालुक्यातील  सुशिक्षित  युवकांना रोजगाराची संधी उपलब्द्ध व्हावी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेत बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृह येथ  पंडीत दिनदयाळ उपाध्याय महा रोजगार  मेळाव्याचे आयोजन केले  होते . या प्रसंगी विविध कंपन्याचे सुमारे २६ प्रतिनिधी तसेच महामंडळ व व्यवसाय योजनेचे ९ प्रतिनिधी   उपस्थित होते . यावेळी  परिसरातील  सुमारे ५०० उमेदवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यापैकी १५ उमेदवारांना जागेवरच रोजगार प्राप्त झाला असून सुमारे २५१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे .

पाटण तालुक्यातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत.  शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये सुधारित शासन निर्णय निर्गमित करून भूकंपग्रस्तांच्या  पणतू ,खापर पणतू यांना देखील लाभ अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्ताच्या चौथ्या पिढीला  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्या मुळे  सुमारे १५ वर्षानंतर न्याय मिळाला असून  त्यांना ह्या दाखल्याच्या आधारे  शासकीय नोकरीत प्रवेश मिळण्याचा मार्ग  सुकर झाला आहे .   या शासन निर्णयानुसार आत्तापर्यंत २०० पेक्षा अधिक  पणतूना दाखले दिले आहेत. त्यामुळे शासकीय नेाकरी मिळविण्याच्या  भूकंपग्रस्तांच्या  चौथ्या पिढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नितीन जगन्नाथ भिसे रा मल्हारपेठ यांचे  अनेक वेळा प्रयत्न करूनही निवड होत नव्हती. नितीन भिसे ह्याची  तर आठ वेळा प्रयत्न करूनही  निवड होत नव्हती. भूकंपग्रस्त दाखल्यामुळे त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे . त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.

            कामगार कल्याण विभागाकडून या निमित्ताने पाटण मधील  सुमारे ७२० अकुशल कामगारांना अत्यावशक व सुरक्षा संच (हेल्मेट ,बूट ,बॅटरी इत्यादी ) पुरविण्यात आले आहे .त्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता तर वाढणार आहेच शिवाय त्यांना सुरक्षितरित्या काम करण्यास मदत होणार आहे.

            याशिवाय कृषी विभागामार्फत, ट्रॅक्टर, पावर टिलर,  इत्यादी विविध औजाराचे  वितरण केल्याने शेतकऱ्यांना  शेतीकामात निश्चितपणे  मदत होणार आहे. समाजकल्याण विभागामार्फत सुमारे ३५ दिव्यांग  व्यक्तींना  व्हील चेअरचे वाटप करून  दिव्यांगांप्रति महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे . याशिवाय सुमारे १०० अंध व्यक्तीना आरोग्य विभागामार्फत चष्म्याचे वाटप करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न शासनाने या अभियानाच्या माध्यमातून केला आहे.

            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी रमाई  आवास योजना शासनाची महत्वाकांशी योजना आहे .पाटण तालुक्यात होणारी अतिवृष्टी व दुर्गमता लक्षात घेता स्वत:च्या हक्काचे पक्के  घर असणे खूप महत्त्वाचे आहे.  त्या दृष्टीने तालुक्याकरिता मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून या योजनेअंतर्गत सुमारे १५० घरकुलांना (१.८० कोटी रु ची)  मान्यता  दिली . त्यामुळे पाटण तालुक्यातील १५० कुटुंबाना स्वत:च्या हक्काचे घर लवकरच उपलब्ध होणार आहे.

 

 

 

बोगस बियाणे विक्रीला पायबंद घालावा – पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता कृषि विभागाने घ्यावी. असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार जयकुमार रावल (ऑनलाईन) आमदार मंजुळाताई गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती संजीवनी सिसोदे (ऑनलाईन) अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, उपनिबंधक सहकार मनोज चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम सुकर होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. शेतकरी बांधवांना आवश्यक असणारे खरीप पीककर्ज वेळेत वितरीत करण्यात यावे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बॅकांनी घ्यावी. ज्या बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करतील त्यांचेवर गुन्हे दाखल करावे. जिल्ह्यातील पीक लागवड लक्षात घेऊन आवश्यक ते बी-बियाणे, खते व कृषि निविष्ठा मुबलक उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. बी-बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाही. यासाठी कृषि विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे. शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना शासन राबवित आहेत. या योजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावा. जिल्ह्यात फळबाग लागवड वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यास अनुसरुन जिल्ह्यात तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचीही सूचना केली.

जिल्ह्यात खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्र 3 लाख 84 हजार 159 हेक्टर इतके आहेत. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्यानंतर मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारीचे क्षेत्र आहे.कापूस लागवडीसाठी 10 लाख 30 हजार 640 बीटी कापूस बियाणे पाकीटांची आवश्यकता आहे.  तर यावर्षीसाठी 94 हजार 380 मे. टन खतांचे आवंटन मंजूर असून 47 हजार 472 मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हास्तरावर एक तर तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणनियंत्रण भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बी-बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तडवी यांनी बैठकीत दिली. या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध मौलिक सूचना केल्या. त्यावर आवश्यक कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणेला दिल्या.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १५: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार  विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन  ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे.  यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे.  औरंगाबाद विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

००००

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.

बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्यात ९८२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली.  सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

 

००००

 

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.१५- आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरित भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे.  नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करा

पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल.  प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण  नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार  आहे, असेही ते म्हणाले.

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली

गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून श्री.फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला.  साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे.  हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

कामे गतीने पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या उद्योगधंद्यासोबत लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्याच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने शहरात  कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयावर प्रशासन काम करीत असून ते पूर्ण करण्यासाठी  प्रशासनाच्या गतीमानतेसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, पुढील ३० वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील.  मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.  ते म्हणाले, महापालिकेसाठी ३१२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत  उभी राहणार आहे.  ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला देशातील  स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे,  असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ग.दि.माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील कुटुंब सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, पीएमआरडीए आयुक्त राजीव महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सुमीत्र माडगूळकर आणि माडगूळकर कुटुंबिय आदी उपस्थित होते.

 

अकरा विविध विकासकामांचे उद्घाटन

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात निघोजे एमआडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस व इतर प्रकल्प,  बोऱ्हाडेवाडी व नेहरूनगर येथील शाळा इमारत, मोशी येथील उप अग्निशमन केंद्र (सब फायर स्टेशन), रावेत येथील सेक्टर ३२ए मधील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतूकीकरण पुरवठा विभाग, चिंचवड येथील क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, चिखली येथील भाजी मंडई,  निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल व वीर सावरकर उद्यानातील लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उपक्रमांचा शुभारंभ

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलचे काम, डेअरी फार्म येथील पूलाचे काम, मोशी, डुडूळगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत, चोविसावाडी येथील नवीन अग्निशमन केंद्र  उभारणे, गवळीमाथा व कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रीया केंद्र, पॅकेज ३ अंतर्गत भोसरी विभागातील धावडे वस्ती येथील पाण्याची टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजनही  यावेळी करण्यात आले.  मनपा हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण, मालमत्तांची सुधारीत कर आकारणी, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे आणि दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि २०३१ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन चिखली  येथे ३०० द.ल. लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजित असून  त्यातील पहिल्या टप्प्यात १०० द.ल. लिटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

000

 

 

पिंपरी-चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, दि.१५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांगण प्रकल्पाची पाहणी केली. तारांगणात खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची चांगल्याप्रकारे माहिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘दिवसा तारे पहाणे’ ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली. तासभर तारांगणात बसून सृष्टीची रचना समजून घ्यावी असे वाटले. आपली मुले आणि युवकांच्या ज्ञानात सकारात्मक भर घालण्याचे आणि विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे काम तारांगणाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संचालक तुपे यांनी तारांगण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

असा आहे तारांगण प्रकल्प

ऑप्टोमेकॅनिकल व डिजीटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. तारांगण प्रकल्प २ हजार ४१० चौ.मी. क्षेत्रफळात विकसित करण्यात आलेला आहे. तारांगण प्रकल्पात ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचा सहभाग असलेल्या समितीचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. १५.७ मीटर व्यासाच्या या तारांगणामध्ये १२२ आसन क्षमता असून ‘खगोलविज्ञानातील १७ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम फित जपान येथील ‘गोटो’ कंपनीच्या सहाय्याने तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्त १०० आसन व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह सुविधा उपलब्ध आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. नवीन प्रशासकीय इमारत १८ मजली होणार असून तीन बेसमेंट असणार आहेत. इमारतीचे भूखंड क्षेत्र ८.६५ इतके आहे. ९१.५ हजार वर्ग मिटरचे बांधकाम होणार आहे. याठिकाणी ६०० चारचाकी आणि ३ हजार दुचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती कार्यालय, बहुउद्देशीय व महानगरपालिका सर्वसाधरण सभागृह यांच्यासह महानगरपालिकेच्या ६० विभागांची कार्यालये या ठिकाणी असणार आहेत. इत्यादी सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत असणार आहे.

00000

शासन आपल्या दारी : लोकाभिमुख प्रशासनाची ग्वाही

कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत  यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून लोकाभिमुखतेची ग्वाही दिली आहे. नुकतेच सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.  त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यातील लाखो गरजू व्यक्तींना या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

जनकल्याण कक्षाद्वारे संनियंत्रण

राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत.  त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात याबाबत प्रत्यक्ष बैठक होऊन कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजारांचे उद्दिष्ट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाला चालना देण्यात आली आहे.

पारदर्शक आणि वेगवान कार्यवाही

शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा या अभियानाचा उद्देश आहे. शासनाच्या जवळजवळ दोनशेहून अधिक योजनांचा लाभ या माध्यमातून गरजूंना मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळण्याची प्रक्रिया राबवली जाईल. या अनुषंगाने जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे. गरजूंना विविध योजनांचा लाभ सुलभरित्या व गतीने मिळवून देणारा हा उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे.

 

-हर्षवर्धन पवार,

जिल्हा माहिती अधिकारी,अमरावती

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

औरंगाबाद  दि 14 (जिमाका)- सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे,  राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रति असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.  कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतिक- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना महाराणा प्रतापसिंह यांच्यात होती. त्यांनी आपले जीवन जंगलात व्यतित केले.  असे हे लढवय्ये महाराणा प्रताप सिंह स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणखी हजारो वर्षांनंतरही ते  महत्वाचे असतीलच. महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळाला मुघल काळ न म्हणता महाराणा प्रताप काळ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. 

राजपूत समाजाला योजनेपासून वंचित ठेवणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात  मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल पण देशसेवा महत्वाची मानणारा हा समाज आहे. अशा या  समाजाला आता कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या  15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी

अकोला, दि.14(जिमाका)-  समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी केली. या घटनेत मयत व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेच्या पाहणी दरम्यान श्री. महाजन बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.

             श्री. महाजन यांनी जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किल्ला चौक, हरिहर पेठ, हमजा व सोनटक्के प्लॉट या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बाधित परिवारास आर्थिक मदतीसह सर्व सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी जुने शहर पोलिस स्टेशन येथे दंगल परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी, असेही निर्देशही श्री. महाजन यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

पुणे दि.१४-  राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलता व शासनाच्या विविध विभागांच्या कार्यतत्परतेमुळे परभणी तालुक्यात भाऊचा तांडा येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अवघ्या काही तासांतच ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासनाने मंजूर केले आहे. 

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायती अंतर्गत भाऊचा तांडा  येथील शेतामधील सेप्टिक टॅंकची सफाई करताना दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना  ११ मे २०२३ रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांनी मुख्यमंत्री यांना अवगत केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार काही तासातच शासकीय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

मृत पावलेल्या एकूण ५ सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य अदा करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक व्यक्ती १० लाख याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचा निधी १२ मे २०२३ च्या  शासन  निर्णयानुसार मंजूर केला आहे. 

सद्यस्थितीत सदर मंजूर केलेल्या निधीचा पहिला हप्ता प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे रुपये २५ लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी लवकरच सदर मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना मिळणार आहे. 

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरून काम करताना मृत्यू झालेल्या मॅन्युअल स्कॅवेंजर यांच्या वारसांना रुपये १० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. 

जिल्हाधिकारी परभणी यांनी १२ मे रोजी समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने  मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी समाज कल्याण विभागास तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कल्याण विभागाचे सचिव  सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी यावर तात्काळ पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...