शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1480

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘ई-श्रम कार्ड’साठी शिबिरांचे आयोजन करावे- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी  ई-श्रम कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘ई-श्रम’ कार्ड

केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार,  फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.

०००००

जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊन खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 22 : जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासन आणि एफ सी बायर्न, महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टीव्ही 9 यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 14 वर्षाखालील फुटबॉल खेळाडू जर्मनीत गेले आहेत. या खेळाडूंनी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जर्मनीत निवड होवून प्रशिक्षणासाठी आलेल्या फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, क्रीडा उप सचिव सुनील हंजे तसेच एफसी बायर्न क्लबचे भारतातील प्रतिनिधी कौशिक मौलिक आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ राज्यात रुजावा. राज्यातील खेळाडूंना या खेळामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासनाचा क्रीडा विभाग व एफसी बायर्न म्युनिक फुटबॉल क्लब, जर्मनी यांच्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र करंडक नावाने 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास 1 लाख मुलांनी सहभाग घेतला.

म्युनिक – जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी, एफसी बायर्न फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट 20 फुटबॉलपटूंची निवड केली. जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे दि. 19 ते 26 मे 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

राज्यात फुटबॉल खेळास चालना मिळावी, तसेच राज्यातील खेळाडूंना या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य तंत्र आत्मसात करता यावे व प्रशिक्षण मिळावे आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे शिष्टमंडळ जर्मनी येथे गेले आहे. हे शिष्टमंडळ म्युनिक येथे गेले असता या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणारे इंटरनॅशनल यूथ एक्सचेंज फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मीरजम एसिले, वरिष्ठ सल्लागार पीटर लीबल, युवा प्रशिक्षक डॅनिअल व ॲलेक्स यांचा राज्य शासनाच्यावतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्‍मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

‘आपत्ती व्यवस्थापनाकरिता वित्तपुरवठा’ या संकल्पनेवर जी-२० राष्ट्र समूहाच्या दुसऱ्या डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यगटाची २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत बैठक

मुंबई दि. 22 : आपत्तीचे संभाव्य धोके ओळखून ते टाळण्यासाठी, आपत्तीचा प्रभाव कमीतकमी राखण्यासाठी काम करणाऱ्या, डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप (DRRWG) या कार्यगटाची दुसरी बैठक  23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होणार आहे.

आपत्तीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाचे विविध नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याकरिता तसेच शाश्वत विकासाकरिता वित्तपुरवठा करण्यासाठी, एका समान बांधिलकीने एकत्र मिळून काम करणारे सरकारी अधिकारी, उद्योग तज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि 20 हून अधिक देशांतील संबंधित भागधारक, यांचा या बैठकीच्या निमित्ताने एक मेळावाच भरणार आहे. आपत्तीचे संभाव्य धोके ओळखून आणि त्यांच्या निवारणाच्या दृष्टीने नफा-तोट्याचा विचार न करता केल्या जाऊ शकणाऱ्या वैध वित्तपुरवठ्याच्या (क्रिएटिव्ह फायनान्सिंग) कुठल्या यंत्रणांचा वापर करता येईल याची चाचपणी करून, आपत्तीचा धोका कायम भेडसावणाऱ्या समुदायांवर होणारा आपत्तींचा प्रभाव कमीत कमी राखण्यासाठी नियोजन करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.

मुंबईत पुढील 3 दिवस चालणाऱ्या डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप (DRRWG) च्या या बैठकीमध्ये चार तांत्रिक सत्रे आणि त्या अनुषंगाने इतर जोड कार्यक्रम (साइड इव्हण्ट्स) होतील. गुजरातमध्ये गांधीनगर इथे 31 मार्च ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत, या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती. या बैठकीत, “डिझास्टर रिस्क रिडक्शन (DRR) म्हणजेच आपत्ती निवारण व्यवस्थापनासाठी वित्तपुरवठा” या मूळ संकल्पनेशी निगडित अतिरिक्त मुद्द्यांवर काम करणारी जोडसंकल्पना (क्रॉस कटिंग थीम) पुढे आली होती. या जोड संकल्पनेवर मुंबईतील या दुसऱ्या बैठकीत उच्च-स्तरीय चर्चा सुरू राहतील.

दि. 18 ते 19 मे 2023 या कालावधीत, अमेरिकेत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आमसभेच्या अध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत, आपत्तीचे संभाव्य धोके टाळणे किंवा कमी करण्यासाठी 2015 ते 2030 या कालावधीकरता आखलेल्या सेंदाई आराखड्याचा मध्यावधी आढावा घेण्यात आला होता. या मध्यावधी आढाव्याचे लागलीच पालन करण्याच्या दृष्टीने, मुंबईतील या बैठकीचे धोरणात्मक नियोजन करण्यात आले आहे. सेंदाई आराखड्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी सर्वांगीण उपाययोजना करण्याची जबाबदारी, जी-20 राष्ट्र समूहाने समर्थपणे पेलली असून, या उपाययोजनांवर ऊहापोह करण्यासाठी जी-20 समूह उत्तम व्यासपीठ आहे.

आपत्ती आणि हवामान बदलाशी संबंधित धोके सातत्याने भेडसावत असल्यामुळे, जी-20 समुहातील सदस्य राष्ट्रांना अंदाजे 218 अब्ज डॉलर्सचे सरासरी वार्षिक नुकसान किंवा पायाभूत सुविधांसाठी केलेल्या सरासरी वार्षिक गुंतवणुकीच्या 9 टक्के इतके नुकसान (एकूण पायाभूत सुविधांपैकी 9 टक्के सुविधांना हानी पोहोचणे) सोसावे लागते. या पार्श्वभूमीवर, डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप ची ही मुंबईतील दुसरी बैठक खूप महत्त्वपूर्ण  ठरते.  विकासासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत उच्च-स्तरीय चर्चा आणि परस्पर संवाद घडवून आणणे, या चर्चा- संवादाद्वारे, आपत्ती निवारण व्यवस्थापनासाठी वित्तपुरवठा (DRR) या जोडसंकल्पनेवर प्रत्यक्ष कृती करण्याची संधी, या बैठकीमुळे मिळू शकणार आहे. सार्वजनिक आणि खासगी वित्तपुरवठा, सामाजिक संरक्षण, ज्ञान-माहितीची देवाण-घेवाण आणि आपत्ती निवारण, आपत्तीतून सावरणे आणि पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा यंत्रणांची व्यवस्था, असे विषय या बैठकीत होणाऱ्या चर्चांमधून हाताळले जातील.

या व्यतिरिक्त, या कार्यगटाच्या बैठकीच्या अनुषंगाने या बैठकीदरम्यानच इतर जोड कार्यक्रमही (साइड इव्हट्स) मुंबईत होणार आहेत. पायाभूत सुविधांना असणाऱ्या धोक्यांचे मूल्यमापन करणारी म्हणजेच तीव्रता पडताळणारी साधने आणि संपूर्ण माहिती पुरवणारे सर्वंकष तंत्रज्ञान अर्थात डेटा प्लॅटफॉर्मचे महत्त्व मांडणारे, तसेच एकंदर परिसंस्थेवर आधारित धोरणे आणि स्थानिक आपद्ग्रस्तांना एकत्रित सामावून घेत पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचा म्हणजेच ‘बिल्ड बॅक बेटर’ हा दृष्टीकोन बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे उपक्रम, या जोड कार्यक्रमांमधून आयोजित करण्यात येतील. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय कृती आराखडे तयार करणे, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि भविष्यात आपत्तीमधून तावून-सुलाखून बाहेर पडण्याच्या दृष्टीने, आपत्तींचा सामना करण्याकरता सज्ज राहण्यासाठी पाठबळ पुरवणे, असे विविध विषयही या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहेत.

मुंबईत होणाऱ्या या बैठकीला, जी-20 समूहाचे सदस्य देश, निमंत्रित राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परराष्ट्र मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अशा महत्त्वाच्या प्रमुख भारतीय भागधारकांची उपस्थिती असेल.

००००

एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अलिबाग, दि.22 (जिमाका) :- “मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली.

‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सगुणा बाग येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे  उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, प्रगती, समृद्धी आणि विकासाची गंगा घरा-घरामध्ये पोहोचविण्याची आवश्यकता आहे,त्यासाठीची प्रेरणा अशा मेळाव्यातून मिळते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीतील बदलांना स्वीकारणे, त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.

सर्व समस्यातून बळीराजाला पुढे न्यायचे आहे. यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे,असे सांगून ते म्हणाले की, शासनामार्फत हिंगोली येथे स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरू करीत आहोत. आंबा प्रक्रिया उद्योग, काजू विकास महामंडळ, कांदा प्रक्रिया, असे विविध शेतीपूरक उपक्रम राबविले जात आहेत. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे पुन्हा सुरू केली आहे. त्याचा लाभ संपूर्ण राज्यभर निश्चितच मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे.

“एसआरटी चे गुणगान…माती बलवान….पीक पैलवान अन् शेतकरी धनवान”… या ब्रीद वाक्याची प्रशंसा करीत पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. यंदाचे वर्ष तृणधान्य वर्ष आहे, यासाठी दोनशे कोटी रुपये देण्याचे शासनाने ठरविले आहे. यामुळे तृणधान्य पिकविण्याला प्रोत्साहन मिळेल. ही लोकचळवळ व्हावी, अशा शुभेच्छा देत शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व मी मुख्यमंत्री या नात्याने जरूर करीन,असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते भूमातेच्या चित्राचे अनावरण करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सगुणा बागचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदक दीपाली केळकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने एसआरटी तंत्रज्ञानाविषयीचा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी शेती संशोधन या विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही संशोधक व शेतकऱ्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तमरित्या राबविणारे कृषी शास्त्रज्ञ विजय कोळेकर, कृषी तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग करणारे श्री.निवळकर यांचा समावेश होता.

0000

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून कमी पैशात घ्या विमा संरक्षण

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी एक अपघात विमा योजना आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत सहभागींना केवळ 20 रुपयांमध्ये 1 लाख ते 2 लाखापर्यंतची भरपाई मिळणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये व अटी पुढीलप्रमाणे

  •        एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे.

  • दरवर्षी नूतनीकरण आवश्यक.

  • १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.

  • ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध.

  • योजनेचाकालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे असा राहील.

  • विमा हप्ता रु. 20/- प्रती वर्षराहील.

  • विमा धारकाने वय वर्ष 70 पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर / बँक बंद केले तर विमा संरक्षण संपुष्ठात येईल.

  • एकाचव्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल.

  • विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूतमानला जाईल.

  • तांत्रिक अडचणीमुळे संपुष्ठात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

 

 मृत्यू रु. 2 लाख
दोन्ही डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी/ दोन्ही हात किवा दोन्ही  पाय निकामी होणे/एक डोळा आणि एक हात किवा पाय निकामी होणे. रु. 2 लाख
एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किवा एक पाय निकामी होणे रु. 1 लाख

या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी बँका व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ देण्यासाठी 30 जूनपर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील या विशेष शिबिराला भेट देऊन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

 

संकलन – नंदकुमार वाघमारे,

प्र. जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे; जिल्हा नियोजनातून शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. २२ (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्हा नियोजनातून करावयाची शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.

जिल्ह्यातील टंचाई, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका प्रशासन विभागांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत श्री.गावित बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार) तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याच्या विहिरी व बोअरवेलसाठी भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून जागा निश्चित कराव्यात. तसेच विहिर खोलीकरणासाठी दोन ते तीन बोअरवेलसाठीचे व्हेरीफिकेशनही करावे. त्यानंतर संबंधित विभागाने त्याचा आराखडा मान्यतेसाठी सादर करून आठ दिवसात कामे सुरू करावीत. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांवर उपाययोजना कराव्यात.

सर्व नगरपालिकांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूरी दिलेली कामे तत्काळ सुरू करावीत व त्याच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिधींनाही निमंत्रित करावे. जिल्हा नियोजनाची कामे करताना शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत. ही कामे दोन वर्षात करता येणार असली तरी मुदत संपलेल्या कामांचा निधी खर्च करता येणार नाही, असेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, दुर्गम भागातील वाडे, पाडे व गावातील वस्त्यांच्या रस्त्यांसाठी शासनाने वीर बिरसा मुंडा योजना सुरू केली असून या योजनेत १०० टक्के गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी सर्वेक्षण करावे.  हे करत असताना नद्यांवरील पूल, संरक्षक भिंती यांचा विचार करून प्रस्ताव तयार करावेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा रस्त्यांनी जोडण्यासाठीचे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावेत. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या बसवण्याचे व घाटातील ढासळणाऱ्या भूक्षेत्रावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

सिंचन विभागाने जिल्ह्यातील मोठ्या नंद्यांना पूर आल्यानंतर ज्या गावांमध्ये पाणी शिरते; अशा पूर प्रवण गावांमध्ये संरक्षक भिती बांधण्यासाठी, पूर आल्यानंतर प्रवाह बदलणाऱ्या नद्यांसाठी सर्वेक्षण करावे. ही सर्व कामे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत करावयाची असल्याने त्यांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. तसेच जिल्ह्यातील ज्या यंत्रणांनी आपल्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर केले आहेत, त्या यंत्रणांनी त्या प्रस्तावाची एक प्रत शासन पातळींवर पाठपुरावा करण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

0000000000

दिलखुलास कार्यक्रमात विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांची मुलाखत

मुंबई, दि. 22 : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.

राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 23, बुधवार दि. 24 आणि गुरूवार दि. 25 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

0000

पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील ६८ अस्थायी पदांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. २२ : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना दि. १ मार्च  ते दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार आस्थापनांवरील मानसेवी बालरोगतज्ज्ञ यांची ४८ पदे आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील २० पदे अशा एकूण ६८ अस्थायी पदांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आली होती.

या अस्थायी पदांना अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने मुदतवाढ दिली असून या अटींनुसार ही मुदतवाढ सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांना लागू राहणार नाही. ही ६८ पदे ज्या अटी व शर्तींच्या अधीन मंजूर करण्यात आली आहेत, त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे. पोलीस महासंचालकांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावा. यानंतर आकृतीबंध निश्चित करण्याकरिता या पदांची मुदत वाढवून मिळणार नाही, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

00000

पवन राठोड/ससं/

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती नवी दिल्ली येथे साजरी

नवी दिल्ली, 22 : महाराणा प्रतापसिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा  यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी श्री. अभिषेक जाधव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

00000

अमरज्योत अरोरा/

‘पुस्तकांचे गाव भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव – राज्यपाल रमेश बैस

सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,  भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे,  सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.

०००००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...