जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे; जिल्हा नियोजनातून शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. २२ (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्हा नियोजनातून करावयाची शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.

जिल्ह्यातील टंचाई, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका प्रशासन विभागांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत श्री.गावित बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार) तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याच्या विहिरी व बोअरवेलसाठी भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून जागा निश्चित कराव्यात. तसेच विहिर खोलीकरणासाठी दोन ते तीन बोअरवेलसाठीचे व्हेरीफिकेशनही करावे. त्यानंतर संबंधित विभागाने त्याचा आराखडा मान्यतेसाठी सादर करून आठ दिवसात कामे सुरू करावीत. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांवर उपाययोजना कराव्यात.

सर्व नगरपालिकांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूरी दिलेली कामे तत्काळ सुरू करावीत व त्याच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिधींनाही निमंत्रित करावे. जिल्हा नियोजनाची कामे करताना शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत. ही कामे दोन वर्षात करता येणार असली तरी मुदत संपलेल्या कामांचा निधी खर्च करता येणार नाही, असेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, दुर्गम भागातील वाडे, पाडे व गावातील वस्त्यांच्या रस्त्यांसाठी शासनाने वीर बिरसा मुंडा योजना सुरू केली असून या योजनेत १०० टक्के गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी सर्वेक्षण करावे.  हे करत असताना नद्यांवरील पूल, संरक्षक भिंती यांचा विचार करून प्रस्ताव तयार करावेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा रस्त्यांनी जोडण्यासाठीचे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावेत. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या बसवण्याचे व घाटातील ढासळणाऱ्या भूक्षेत्रावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

सिंचन विभागाने जिल्ह्यातील मोठ्या नंद्यांना पूर आल्यानंतर ज्या गावांमध्ये पाणी शिरते; अशा पूर प्रवण गावांमध्ये संरक्षक भिती बांधण्यासाठी, पूर आल्यानंतर प्रवाह बदलणाऱ्या नद्यांसाठी सर्वेक्षण करावे. ही सर्व कामे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत करावयाची असल्याने त्यांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. तसेच जिल्ह्यातील ज्या यंत्रणांनी आपल्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर केले आहेत, त्या यंत्रणांनी त्या प्रस्तावाची एक प्रत शासन पातळींवर पाठपुरावा करण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

0000000000