शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 14

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” – शिबाशिष सरकार

सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे – एकता कपूर

मुंबई, २ :-आज मुंबईत आयोजित “जागतिक चित्रपट आणि प्रदर्शन अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका” या विषयावरील मुख्य सत्रात मीडिया आणि कंटेंटचे भविष्य घडवणारे प्रमुख एकत्र आले होते. यात इरॉस नाऊ (एक्सफिनाइट ग्लोबल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम तन्ना; प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार; बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता आर. कपूर; तसेच गुगलच्या अँड्रॉइड टीव्हीच्या उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शालिनी गोविल पै यांचा समावेश होता.

भारताच्या कथात्मक मांडणीच्या खोलवर रुजलेल्या परंपरेवर प्रकाश टाकताना, शिबाशिष सरकार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या एक शतक जुन्या प्रवाहापासून आजच्या गतिमान स्ट्रीमिंग व्यासपीठापर्यंतच्या उत्क्रांतीबद्दल माहिती दिली. स्ट्रीमिंग व्यासपीठामुळे भारतीय कथांना जागतिक प्रेक्षक मिळू शकले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, आशयाचा सीमेपलीकडे खऱ्या अर्थाने प्रवास घडण्यासाठी, भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. संस्थात्मक भांडवल सहयोगासाठी केंद्रित, संपूर्ण भारत या दृष्टिकोनाचे आवाहन त्यांनी केले.

आकर्षक कथात्मक मांडणीहे जागतिक यशाच्या केंद्रस्थानी आहे हे अधोरेखित करताना एकता आर. कपूर यांनी कथा जितकी अधिक हृदयाशी जवळ आणि भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तितकीच ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडली जाण्याची शक्यता जास्त असते यावर भर दिला. वेदना, उत्कटता आणि आशा यासारख्या भावना सार्वत्रिक असतात, असेही त्यांनी सांगितले. सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परिसंस्थेत दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

जागतिकीकरण हा आजच्या आशयनिर्मितीतील सर्वात परिवर्तनकारी प्रवाह आहे, असे शालिनी गोविल पै यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वितरणातील अडथळे दूर झाले असून कथात्मक मांडणीचा जागतिक स्तरावरील प्रसार सुलभ झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे निर्मितीची प्रक्रिया वेगवान, प्रभावशाली व माहिती आधारित झाली असून आशयनिर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडवत आहे. भारतीय आशय निर्मात्यांनी पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जागतिक स्तरावर सर्वांना भावतील अशा आशयघन कथांचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक काळात कंटेंट डिस्कव्हरी महत्त्वपूर्ण होत आहे आणि यशाची पुढील लाट स्मार्ट नेव्हिगेशन, डिस्कव्हरेबिलिटी आणि तंत्रज्ञानाधारित कथाकथनावर अवलंबून असेल, असे त्या म्हणाल्या.

भारताचा डिजिटल संस्कृतीला सरावलेल्या प्रेक्षकवर्गासाठी आता कथाकथनाच्या रचनेत बदल करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण विक्रम टन्ना यांनी नोंदवले. प्रेक्षकांचा लक्ष केंद्रित राहण्याचा कालावधी कमी होत असून मोबाईलचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे नवीन आशयातील आवाज, मतप्रवाह व लक्ष वेधून घेण्याची क्षमता महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. यशासाठी तीन महत्वाच्या प्रवाहांचा त्यांनी उल्लेख केला: तंत्रज्ञानाची नवीन परिभाषा, अनुभवाधारित कथाकथन व निष्ठावंत चाहत्यांना आकर्षित करणारे आयपी तयार करणे. जेन ए आय ही आशयनिर्माते व व्यासपीठांसाठी क्रांतिकारक संधी असून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे, उत्पन्न मिळवणे व आवडीनुसार सर्वांना काहीतरी आशय मिळवून देणे यासाठी नवनवीन मार्ग प्रदान करते.

भारत जागतिक स्तरावर कंटेंट पॉवरहाऊस अर्थात आशयनिर्मितीची गंगोत्री बनण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. पायाभूत सुविधांमध्ये योजनाबद्ध गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व मौलिक तसेच गुणवत्तापूर्ण कथा सादरीकरणाप्रती वचनबद्धता असल्यास जागतिक माध्यमांच्या नवोन्मेषात भारत सहज नेतृत्व करू शकतो , असा निष्कर्ष या सत्राच्या शेवटी समोर आला.

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

  • भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे –  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी
  • वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन

मुंबई, दि. ०२ : इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म वर सामग्रीचे लोकशाहीकरण अधोरेखित करताना “आज, स्मार्टफोन असलेला कोणीही सर्जक आणि निर्माता असू शकतो”, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांवर विश्वासार्ह उपस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा यांनी भारताच्या कथाकथनाच्या खोलवर रुजलेल्या वारशावर भर दिला. “आपण कथा ऐकत मोठे झालो – आपण आज जे आहोत याचा एक भाग आहेत कथा,” असे त्यांनी उद्धृत केले.

भारतीय सर्जकांसाठी सध्याचा काळ सुवर्णकाळ आहे असे नमूद करताना डिजिटल तंत्रज्ञान, परवडणारा डेटा आणि उत्साही युवा लोकसंख्येच्या एकत्रीकरणाकडे त्यांनी लक्ष वेधले आणि “भारतासाठी जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याचा हा एक उत्तम  काळ आहे,” असे मत व्यक्त केले. समाज माध्यमावरील यशोगाथा सांगताना, श्रद्धा यांनी आशय मांडणीतील विश्वासार्हतेच्या शक्तीवर आणखी भर दिला. “जेव्हा आशयनिर्मिती अंतःकरणातून होते तेव्हा ती साहजिकच लोकांना भावते. मी नेहमीच धोरणात्मक होण्याऐवजी विश्वासार्ह आशय पोस्ट करण्याचा प्रयत्न करते,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रद्धा यांनी भारताच्या मीम संस्कृतीच्या वाढत्या प्रभावावर आणि इंस्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म, त्यांच्या ट्रेंडिंग ऑडिओ आणि हॅशटॅगसह, जनरेशन झेड प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावतात यावरही प्रकाश टाकला. प्रत्येक पिढी आपला अनोखा आवाज शोधते असे  सांगून   ट्रेंड किती लवकर तयार होतो आणि विकसित होतो हे पाहणे लक्षणीय आहे असे त्या म्हणाल्या.

इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी भारतातील डिजिटल आशय निर्मितीत अत्यंत वेगाने होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आपले विचार सामायिक करताना मेटाचा जागतिक दृष्टीकोन विशद केला. डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये क्रांती झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, डेटाची कमी होत असलेली किंमत आणि हाय-स्पीड इंटरनेटची व्यापक उपलब्धता यामुळे सामग्री निर्मात्यांसाठी नवीन दरवाजे खुले झाल्याचे नमूद  केले. भारतीय डिजिटल जगाशी जोडले जाण्यात तंत्रज्ञानाने कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे” याचा उल्लेख करत भारतात आशय निर्मितीमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे,” असे मोसेरी म्हणाले,.

इंस्टाग्रामवर अभिव्यक्तीचा प्रमुख प्रकार बनलेल्या व्हिज्युअल आशयाचा, विशेषत: रील्सच्या वर्चस्वाचा त्यांनी ऊहापोह केला. “व्हिज्युअल आशय मूलतःच अधिक आकर्षक आणि प्रभावी असतो. रील्सनी प्रत्येक व्यक्तीला तिच्या गोष्टी थोडक्या स्वरुपात आणि अधिक प्रभावी पद्धतीने सांगण्यास सक्षम बनविले आहे, जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी एक सृजनशील व्यासपीठ प्रदान केले आहे,” मोसेरी यांनी स्पष्ट केले.

“सृजनशील अभिव्यक्ती सक्षम करणे : जेन झी आशयाचा वापर कसा करते ” या विषयावरील परिसंवादात  केवळ संभाषणच नव्हते; तर भारताच्या अमर्याद सृजनशील क्षमतेचा गौरव होता त्याचबरोबर डिजिटल कथनकारांच्या पुढच्या पिढीला सशक्त बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका कशी बदलत आहे याचाही समावेश होता. डिजिटल प्लॅटफॉर्मने आशय निर्मितीच्या लोकशाहीकरणाचे काम सुरू ठेवल्यामुळे, संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम जेन झी साठी आशय वापराच्या भविष्याला कसा आकार देत आहे, हे देखील या सत्रातून स्पष्ट केले गेले.

0000

भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

• वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान
• 60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र
• “तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण :” राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबई, २ :-जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झाला, ज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या ३२ विविध आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, त्यात अॅनिमेशन, गेमिंग, चित्रपट निर्मिती, कृत्रिम प्रज्ञा, संगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. “प्रथमच, केवळ सर्जनशीलतेसाठी पुरस्कार दिला जात आहे. हा प्रवास आता सुरू झाला आहे. या उपक्रमाद्वारे तुम्ही नवीन संधींच्या विश्वात पाऊल ठेवत आहात. आम्ही भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) सुरू करत आहोत, ती आयआयटी सारखी आहे, पण त्यात सर्जनशीलतेसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे नाविन्य आणि अभिव्यक्तीसाठी मजबूत पाया तयार होईल.”

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सहभागींचे अभिनंदन करताना तरुणांच्या गतिमान ऊर्जा आणि तंत्रज्ञान कौशल्यावर प्रकाश टाकला. “सर्वांना शुभेच्छा. हे व्यासपीठ तरुण मनं सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे नारी शक्तीची ताकद आणि भारतीय आशय-सामग्री निर्मितीच्या भविष्याचेही प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सीआयसी च्या उत्क्रांतीवर आपले विचार मांडले. “आम्ही ऑगस्टमध्ये सुरुवात केली तेव्हा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 25 आव्हाने होती. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ मध्ये सीआयसी बद्दल बोलल्यानंतर सहभाग प्रचंड वाढला. आव्हानांची संख्या 32 पर्यंत वाढली. आम्हाला जवळपास एक लाख नोंदण्या मिळाल्या. आज इथे 750 अंतिम स्पर्धक आहेत आणि त्यापैकी प्रत्येकजण विजेता आहे,” असे जाजू म्हणाले.

उदयोन्मुख प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रतिभाशाली तरुणांना सर्जनशीलतेचे प्रदर्शन करता यावे यासाठी क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) सुरू करण्यात आले. या अंतर्गत देण्यात आलेली आव्हाने विविध श्रेणींमध्ये विस्तारलेले होते, ज्यामुळे निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये सर्जनशीलतेचा शोध घेण्याची आणि सीमा अधिक व्यापक करण्याची संधी मिळाली.

अ‍ॅनिमे चॅलेंजपासून ते एआय फिल्म मेकिंग स्पर्धा, एक्सआर क्रिएटर हॅकेथॉनपर्यंत, प्रत्येक श्रेणीने नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रोत्साहन दिले आणि जगभरातील निर्माते, तंत्रज्ञ आणि कथाकारांना एकत्र आणले.

सीआयसीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्याप्रमाणात लक्षवेधी ठरले आहे. 60 हून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत, ज्यामध्ये 1,100हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश आहे, त्यामुळे सीआयसीने जागतिक स्तरावर यश मिळविल्याचे दिसून येते. या प्रतिसादातून सर्जनशील तंत्रज्ञानाशी संलग्न होण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण आणि प्रभावशाली अशा नवीन माध्यमांच्या निर्मितीसाठी संधींची वाढती मागणी अधोरेखित झाली आहे.

आमिर खान, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, अक्किनेनी नागार्जुन, विक्रांत मॅसी, प्रसून जोशी आणि अरुण पुरी यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यांसह उद्योगातील दिग्गजांनी हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले.

32 आव्‍हाने आघाडीच्या उद्योग संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे सीआयसीला विविध सर्जनशील विषय, तंत्रज्ञान-चालित प्रकल्प आणि भविष्यासाठी तयार सामग्री एकत्र आणून त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचता आले. जागतिक मनोरंजन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेत भारताचे स्थान पुन्हा परिभाषित करणाऱ्या पुढील पिढीच्या निर्मात्यांसाठी हा उपक्रम एक लाँचपॅड म्हणून काम करत आहे. विविध माध्यम स्वरूपांमध्ये स्थानिक प्रतिभेला चालना देणे आणि नाविन्यपूर्ण सामग्री निर्मितीचा उत्सव साजरा करणे किती महत्त्वाचे आहे याचा हा एक पुरावा आहे.
0000
सागरकुमार कांबळे/ससं/

वेव्हज्‌ २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेश सुलभतेबद्दल संवाद

  • भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर; अनेक मार्गांनी समावेशक रचनेबाबत चर्चेचे करीत आहोत नेतृत्व : ब्रिज कोठारी
  • प्रवेशसुलभतेकडे केवळ अनुपालनासाठी घटक म्हणून पाहण्‍याऐवजी सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता घ्‍यावी जाणून
  • प्रवेशसुलभता लागू करण्यासाठी पद्धतशीर बदलांचा पाया आपण रचत आहोत : गुगलमधील ‘अ‍ॅक्सेसिबिलिटी- डिसेबिलिटी इन्क्लुजन’ चे प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. ०२ : वेव्हज 2025 मध्ये “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेशसुलभतेबाबतची मानके या विषयावर विचारप्रवर्तक समूह चर्चेचा कार्यक्रम आज  केंद्रस्थानी होता.  या चर्चासत्रामुळे शैक्षणिक, तांत्रिक, धोरण, विधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील अग्रणी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्‍ये  आशय निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील प्रवेशसुलभता कशाप्रकारे उदयाला येत आहे आणि भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासात याला प्राधान्य देणे का महत्त्वाचे आहे याविषयावर विचारमंथन झाले.

या सत्राची सुरुवात करताना, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी यांनी प्रवेशसुलभतेची पुनर्व्याख्या करण्यातील भारताच्या नेतृत्वावर भर दिला.  भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर ; अनेक प्रकारे, आपण समावेशक रचनेवरच्या चर्चेचे नेतृत्व करत आहोत. व्याप्ती, वैविध्य आणि प्रवेशसुलभता हे आता केवळ दृष्टिहीन किंवा श्रवणदोष असलेल्यांसाठीचे उपाय राहिलेले नाहीत – हे एक सार्वत्रिक डिझाइन तत्वज्ञान आहे जे 1.4 अब्जाहून अधिक नागरिकांना लाभदायक आहे, असे ते म्हणाले.

गुगलमधील ईएमईएचे अ‍ॅक्सेसिबिलिटी अँड डिसॅबिलिटी इन्क्लुजन विभागाचे  प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांनी यासंदर्भात जागतिक दृष्टिकोन मांडताना सांगितले की, अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये कायदे सक्षम असले तरी अनेकदा त्यांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. प्रवेशसुलभतेसंदर्भात युरोपियन अ‍ॅक्सेसिबिलिटी कायदा आश्वासक असून आगामी दशक परिवर्तनाचे असेल, प्रवेशसुलभतेच्या अंमलबजावणीकरता पद्धतशीर बदल करण्यासाठी आम्ही पाया रचत आहोत, असे ते म्हणाले.

माध्यम क्षेत्रातील सर्जनशील प्रवेशसुलभतेच्या विविध पैलूंवर ‘किंटेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशय विनय सहस्रबुद्धे यांनी आपले विचार मांडले. “आशय त्याच्या निर्मात्याच्या अद्वितीय दृष्टिकोनातून आकाराला येतो, विशेषतः चित्रपटात हे प्रामुख्याने जाणवते. आशय खरोखरच सुलभ करण्यासाठी, आपण तो सर्जनशील दृष्टिकोन जपला पाहिजे –  सरधोपट मार्गाने किंवा स्वयंचलित उपायांनी त्याचे महत्त्व कमी करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व वर्गांतील प्रेक्षकांसाठी, विशेषतः दिव्यांग प्रेक्षकांसाठी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाच्या अर्थपूर्ण भाषांतरावर त्यांनी अधिक भर दिला.  तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना कशा पद्धतीने वेग देत आहे यावर पत्रकार प्रीती सालियन यांनी प्रकाश टाकला. “आम्ही सांकेतिक भाषा संबंधित दुभाषी अवताराचा समावेश असलेली तसेच श्राव्य वर्णनात प्रगत असलेली कृत्रिम प्रज्ञा  तंत्रज्ञानावर आधारलेली वाहिनी सुरु केली असून जे काम करायला एकेकाळी अनेक आठवडे लागायचे ते आता फक्त 30 तासांमध्ये होते,” असे त्यांनी सांगितले. भारतात मनोरंजन क्षेत्र अधिकाधिक लोकांना उपलब्ध होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसून सरकारचे अधिकाधिक पाठबळ, सरकारी-खासगी भागीदारी आणि निविदा यंत्रणा यांची देखील आवश्यकता आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

वकील आणि रंगमंच, ओटीटी तसेच दूरचित्रवाणी यांसारख्या मंचांवरील सर्वसमावेशक कार्यक्रमांचे सल्लागार राहुल बजाज यांनी बोलताना, अधिक सशक्त कायदेशीर चौकटी तसेच औद्योगिक सहयोग यांच्या गरजेवर अधिक भर दिला. रेडिओ उडानचे संस्थापक दानिश महाजन यांनी यावेळी बोलताना विद्यमान धोरणांच्या अधिक कठोर अंमलबजावणीसह धोरणनिर्मिती प्रक्रिया आणि नियामकीय संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वाढीव प्रतिनिधित्व मिळावे , असे  आवाहन केले. “प्रतिनिधित्व हे सुनिश्चित करते की, उपलब्धता ही पश्चातबुध्दी नसून प्रणालीत समाविष्ट झालेला घटक आहे,” ते म्हणाले.

एकूण , या गटाने कृतीसाठीच्या सामुहिक आवाहनावर अधिक भर दिला: उपलब्धतेकडे एक अनुपालन तपासणी म्हणून नव्हे तर एक सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता म्हणून पाहिले गेले पाहिजे. भारत सध्या आशय क्रांतीच्या निर्णायक वळणावर उभा असताना प्रत्येक नागरिकाकरिता त्यातील संपूर्ण क्षमता खुली करण्यासाठी उपलब्धता हीच गुरुकिल्ली ठरेल.

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमधील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील राऊंडटेबल बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, अभिनेते आणि निर्माते अमीर खान, एफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णी, पी.जयकुमार रेड्डी यांच्या यांच्यासह या क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याकरिता प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, यामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे स्टुडिओ सुविधा उपलब्ध होणार आहेत.
‘आयआयटी’ मुंबईच्या तांत्रिक सहकार्याने ‘आयआयसीटी’ उभारले जाणार आहे. यामध्ये सर्जनशील उद्योग अभ्यासक्रमात समाविष्ट करून नव्या पिढीला करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ई-स्पोर्ट्ससाठी धोरणात्मक पाठबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट, वेबसिरीज जाहिरात आणि इतर व्हिज्युअल कंटेंटसाठी चित्रीकरण परवानगी मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असून नोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, परवाना प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सात दिवसात परवानगी मिळते, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, स्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
०००
गजानन पाटील/ससं/

वेव्हज्‌ आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेत आज कम्युनिटी रेडीओवरील संमेलनासह चर्चासत्रांचे आयोजन

मुंबई, दि. ०२ : वेव्हज्‌ 2025 या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेत 3 मे 2025 रोजी कम्युनिटी रेडीओवरील राष्ट्रीय संमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 11.30 वाजता जास्मीन सभागृह क्रमांक 2 येथे कम्युनिटी रेडीओवर राष्ट्रीय संमेलन होणार आहे.  परिषदेत प्लेनरी सत्रामध्ये जस्मिन सभागृह क्रमांक 1 येथे स. 10 ते दुपारी 3.15 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, फायर साईड चॅटचे आयोजन करण्यात आले आहे. तर जास्मिन सभागृह क्रमांक 2 येथे सकाळी 10 ते सकाळी 10.50 पर्यंत नेक्स्ट वेव्ह द फ्युचर ऑफ इंडियन एन्टरप्रेनरशीप या विषयावर पॅनलचे चर्चासत्र होणार आहे. तसेच जास्मिन सभागृह क्रमांक 3 येथे स. 10 ते दुपारी 3.15 पर्यंत मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी क्रांती, डिजीटल न्युज, पायरसी, भारतीय संगीत या विषयांवर विविध पॅनलच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत ब्रेकऑउट सत्रात दालन क्रमांक 202, 206, 203, 205, 206 मध्ये स 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मनोरंजन क्षेत्रातील ब्रँण्ड्स बिल्डींग, शासनाचे सृजकांना असलेले सहकार्य, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जगात ब्रँण्डींग, मजकूर पुरवठ्यातील क्रांती, एक्स फॉर गर्व्हमेंट, चित्रपट निर्मितीला कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. परिषदेत मास्टर क्लास सत्रात स 10 ते सायं 5.45 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते दु.4.40 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक, स्टार्टअप्‌स यावर चर्चासत्रे होतील.

दालन क्रमांक 105 ए अण्ड बी, दालन क्रमांक 104 ए आणि 103, क्युब ॲण्ड स्टुडिओ येथे वेव्हज बाजार असणार आहे. वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असून, ते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूइंग रूम हे वेव्हज बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असून, ते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले असणार आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा स्टुडिओ निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०२ : ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन हजार कोटी रुपयांचा करार झाला. गुणवत्तापूर्ण संस्थांच्या निवडक यादीत गोदरेज कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे हा स्टुडिओ जागतिक पातळीवर सर्वोत्तम होईल, यादृष्टीने कार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन यांनी आणि ‘गोदरेज’च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १९०० रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा २०३०  पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर २५०० रोजगार निर्मिती होईल.

०००

संतोष तोडकर/विसंअ/

‘प्राईम फोकस’ सोबतच्या ३ हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत नविन्यपूर्ण संकल्पना, क्रिएटिव्हिटीचा गुणवत्तापूर्ण वापर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्राईम फोकस’ सोबत ३००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी तर प्राईम फोकस च्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या कराराद्वारे ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबतील खार येथे कार्यालय असणाऱ्या, तसेच जगभरात आपल्या शाखा असणाऱ्या प्राईम फोकस कंपनीचे जगभरात काम चालते. या कंपनीसह तिच्या सहयोगी कंपन्यांना आवश्यक त्या परवानग्या / नोंदणी प्रक्रिया / मान्यता / क्लिअरन्स / आर्थिक प्रोत्साहने इत्यादी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यात येणार आहे. त्यांना विद्यमान धोरणे, नियम व नियमावलींनुसार आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

संतोष तोडकर/विसंअ/

‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०२ : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. यामुळे सिडकोमार्फत नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज झालेल्या करारांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि इंग्लंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बळगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी स्वाक्षरी केली.

‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

विस्तारत असलेल्या गेमिंग क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नव्या संधी उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०२:   महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक रूपांतर करून त्यांचे आयपी (बौद्धिक संपदा) तयार करणे, आणि त्या आयपीचं संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करणे ही कल्पना उत्कृष्ट आहे.

मराठीचा कंटेंट जागतिक स्तरावर नेणार

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मराठी कंटेंट जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मराठी कंटेंट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहभाग द्यावा,  असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अपस्किलिंग, आयपी हक्क आणि शैक्षणिक गुंतवणूक

अपस्किलिंगसाठी विविध इंडस्ट्रीने पाठबळ देणे अपेक्षित आहे. राज्य शासन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करत आहे. आयपी (बौद्धिक संपदा) विषयावर जनजागृती करणे देखील  गरजेचे आहे. माध्यम व मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.शूटिंगसाठी ‘एक खिडकी प्रणाली’ महाराष्ट्रात सुरु केली आहे यामुळे सर्व परवानग्या एका पोर्टलवरून मिळतात. शासकीय ठिकाणी शूटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह विविध क्रिएटर कंपनीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील मराठी कंटेंट, परवाना आणि कलाकाराबाबत समस्या मांडल्या.

०००

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...