शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 15

‘वेव्हज् २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ – सांस्कृतिक कार्य  मंत्री ॲड. आशिष शेलार

  • वेव्हज-२०२५  समिटमध्ये स्पॉटीफाय यांच्यावतीने साऊंडस ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. २ :-  ‘ वेव्हेज २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे. ‘वेव्हेज २०२५’  ही केवळ एक परिषद नाही तर भारतीय सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य  मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५  समिटमध्ये दुसऱ्या दिवशी  स्पॉटीफाय यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या साऊंडस ऑफ इंडिया या सांस्कृतिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्य  मंत्री श्री. शेलार म्हणाले हा सांस्कृतिक कार्यक्रम भारताची पारंपरिक संगीतशैली आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा आहे.  मनोरंजन क्षेत्रातील नवप्रतिभांना प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मुंबई केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार म्हणाले, या शहरात निर्माण होणाऱ्या कलाकृतींनी जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक शंतनु मोईत्रा आणि त्यांच्या चमूने भारतातील विविध भागामधील शेतातील पेरणी आणि कापणी संदर्भातील लोकगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या संस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, आधुनिक साउंड आणि सांस्कृतिक विविधतेच्या अद्वितीय मिलाफामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी सोनटक्के यांनी केले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी मेगा ब्लॉक नाही

मुंबई, दि. 2 : राष्ट्रीय परिक्षा एजेंसी, नवी दिल्ली यांचेमार्फत रविवारी दि. 4 मे 2025 रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रावर विना अडथळा पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार दि. 4 मे 2025 रोजी कोणताही Mega Block ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने दि. 4 मे 2025 रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही Mega Block नसल्याचे कळविलेले आहे. तरी यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती; विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित; मनोहर जोशी व पंकज उधास मरणोपरांत सन्मानित

मुंबई, दि. 2 : समर्पित नेतृत्व लाभल्याशिवाय कोणतेही राज्य प्रगती करु शकत नही. सुदैवाने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे व प्रगल्भ नेते लाभले. प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी तसेच देशाला ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ ) राजभवन मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आपण संसद सदस्य असताना मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. त्यावेळची लोकसभा तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अतिशय कुशलतेने चालवली तसेच सभागृहातील चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतील हे सुनिश्चित केले असे राज्यपालांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख करताना राज्यपालांनी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष होते असे सांगितले. आपल्या धर्माचा अभिमान असावा परंतु इतर धर्मांचा तिरस्कार नको असे राज्यपालांनी नमूद केले.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत पार्श्वगायक पंकज उधास यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष जोशी यांनी सन्मान स्वीकारला.

सुलेखनकार अच्युत पालव व अभिनेते अशोक सराफ यांना देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती – अमरावतीची करिना थापा हिला देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते  चैत्राम पवार, बासरी वादक रोणू मजुमदार व प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सत्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक,  विश्वस्त मुश्ताक अंतुले, आनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.

*****

‘महाबळेश्वर महापर्यटन’ उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. 2 :- महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, ब्रॅन्ड अँब्यासिटर मृणाली देव-कृलकणी, नवेली देशमुख, जपानचे कॉन्सुलेट जनरल यमाशिता सान आदी उपस्थित होते.

महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, असे सांगून उपमुख्यंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विवविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फुड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे  पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे. बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे ब्रॅन्डीग व्हावे यासाठी कायम स्वरुपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. बामणोली खोऱ्यात केबल पुल बांधण्यात येत आहे. त्यावर विव्हिंग गॅलरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पुल, तापोळा तेटली येथे होणारा पुल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे.

यावेळी त्यांनी महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय  पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, त्यांना सुरक्षीत वातवरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करुन या उपक्रमाबद्दल श्री. देसाई यांचे कौतुक केले. पर्यावरणाचा ऱ्हास व तपापमान वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी किफायतशिर ठरणाऱ्या बांबु लागवडीला चालना दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक राज्ये पर्यटन उद्योगावर चालतात  आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे यासाठी काम करा, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पर्यटन तथा पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याचे ब्रॅन्डींग जगभरात करण्यासाठी या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोसत्वाच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. नटलेले, सुशोभित झालेले महाबळेश्वर पहायला मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे. सर्वांनी मिळून हा महोत्सव यशस्वी करुया, पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी पर्यटन सुरक्षा दल निर्माण केले असून प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर येथे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन येत्या काळात पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी महापर्यटन उत्सवाला शुभेच्छा देत असताना या उपक्रमाबद्दल आणि पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या कलपकतेबद्दल कौतुक केले. महाबळेश्वर, कोयनेचा परिसर अत्यंत सुंदर आहे. कोकणाला जोडणारा पुल तयार होत असल्याने याचा फायदा पर्यटन वाढीला निश्चतपणे होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी फुड फेस्टीवल फ्ली बाजार, कीड्स झोन, वेण्णा लेख येथील तरंगता बाजार, प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या. गोल्फ क्लब येथे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचे उद्घाटन केले. सुरक्षा दलाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला.

0000

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भर – सचिव निपूण विनायक

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे कार्य अधिक गतिमान करण्यात यावे जेणेकरून रुग्णांना वेळेवर औषधे व वैद्यकीय सामग्री उपलब्ध होऊ शकतील, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्राधिकरणामार्फत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रुग्णसेवेत गुणवत्ता व औषध पुरवठ्यात गती साधण्यासाठी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर चर्चासत्रात भर देण्यात आला.

यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड, महाव्यवस्थापक स्नेहल किस्वे , मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह यादव, महाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार जाधव यांच्यासह औषध व वैद्यकीय सामग्री उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सचिव निपूण विनायक यांनी यावेळी सांगितले की, तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर औषधांसाठी एक वर्ष व वैद्यकीय उपकरणांसाठी दोन वर्षांच्या कालावधीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. यामुळे पुरवठा प्रक्रियेत स्थिरता येईल व रुग्णसेवा अधिक गतिमान होईल. त्यांनी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत समन्वय व पारदर्शकता असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत उपस्थित प्रतिनिधींकडून मते जाणून घेतली

प्रत्येक जिल्ह्यात औषध साठवणूक करण्यासाठी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असून, प्राधिकरणाचे mmgpa.maharashtra.gov.in या संकेतस्थळामुळे उत्पादक कंपन्यांसाठी व्यवहार सुलभ होतील.

औषध पुरवठ्यामध्ये एका कंपनीची मक्तेदारी होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असून, विविध जिल्ह्यांमध्ये औषधाचे दर व गुणवत्तेचे प्रमाण राखण्यासाठी स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

औषध पुरवठादारांची मते जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल औषध उत्पादक कंपनी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. महेश आव्हाड यांनी आभार मानले

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

‘महाॲग्रीटेक’ प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश करावा – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 2 : पीक घेताना कोणत्या पिकाची पेरणी केली तर फायदा होऊ शकतो. आपल्या क्षेत्रात कोणत्या पेरणी केलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासंदर्भातील तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे असून महाॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

महाॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मायक्रो नेट सोल्युशनचे धीरज मेहेरा, कृषी विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, पीक उत्पादन व उत्पन्न अंदाज, उपग्रह आधारित पीक क्षेत्र, उत्पन्नाचे अंदाज व नियोजन  करणे, उपग्रह प्रतिमा वापरून पीक व साठ्याचे मॅपिंग करणे, पीक नुकसानहानीचे मूल्यांकन, पिकाच्या वाढीचा कालावधी टिपणे, पेरलेली पिके, पर्यायी पीकयोग्यता विश्लेषण या बाबींसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी विविध संस्थाकडून त्यांच्या यंत्रणांची काम करण्याची क्षमता पाहून धोरणात्मक निर्णय घेवून अद्यावत प्रणाली विकसित करण्यात येईल असेही कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

ठिबक व तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 2 : ठिबक व तुषार सिंचन संचाचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण या संचाचे वितरण करणाऱ्या साहित्य विक्रेत्यांनी द्यावे, असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक (ठिबक व तुषार) अंमलबजावणी संदर्भात झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ईरीगेशन असोसिएशनचे अध्यक्ष  झुंबरलाल भंडारी यांच्यासह संघटनेचे सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे वितरण कंपन्यांद्वारे केले जाते. या योजनांमध्ये, शेतकऱ्यांना अनुदान आणि सवलती मिळतात. पाणी वाचवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे, तर तुषार सिंचन मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य आहे. ठिबक व तुषार सिंचन संच शेतात बसविल्यानंतर त्याचा योग्यप्रकारे वापर होणे गरजेचे आहे. तसेच जास्त कालावधीपर्यंत ही यंत्रणा शेतकऱ्यांना वापरता यावी यासाठी हे संच वापरण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देणार असतील त्या कंपन्यानाच शासन अनुदान देण्यासंदर्भात प्राधान्यक्रम निश्च‍ित करेल असेही कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४’ ची प्रवेशपत्र उपलब्ध

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध झाली आहेत. संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरून आपल्या खात्यात लॉगइन करून डाउनलोड करावीत.

ही परीक्षा १०, ११, १३, १४ आणि १५ मे २०२५ या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मूळ स्वरूपात छापील प्रवेशपत्र अनिवार्य असून त्याविना परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना आयोगाने केली आहे.

परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या वाहतूक कोंडी, आंदोलने, हवामानातील बदल इत्यादी कारणांमुळे उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एका तास आधी स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नियोजित वेळेनंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

अधिक माहिती, सामान्य सूचना आणि मार्गदर्शक नियम आयोगाच्या संकेतस्थळावर ‘Guidelines for Examination’ या विभागात उपलब्ध आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास उमेदवारांवर कारवाई होऊ शकते.

प्रवेशपत्र मिळवताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर किंवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

 

0000

राजू धोत्रे/विसंअ/

भारताची सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त ग्राहक खर्चावर प्रभाव निर्माण करण्याची शक्यता

वेव्हज‌् २०२५ मध्ये होणार बीसीजी अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. २ :- सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वाढीमुळे भारताच्या डिजिटल परिदृश्यात लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. “फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स: मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी” असे शीर्षक असलेल्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या नवीन अहवालाचे उद्या  (३ मे २०२५) मुंबईतील वेव्हज २०२५ मध्ये प्रकाशन होणार असून या अहवालानुसार, भारतातील  सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेचा ३५० अब्ज डॉलर्सहून अधिक ग्राहक खर्चावर प्रभाव असून २०३० पर्यंत ही आकडेवारी १ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होण्याची  अपेक्षा आहे.

भारतात १००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती अशी  व्याख्या करण्यात आलेले २ ते २.५ दशलक्ष डिजिटल  सृजनशील  निर्माते असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. इतकी मोठी संख्या असूनही त्यांच्यापैकी केवळ  ८–१०% निर्माते त्यांच्या आशयातून सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहेत, ज्यामधून अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या या क्षेत्राचा पुरेशा प्रमाणात वापर होत नसल्याचे अधोरेखित होत आहे. या सृजनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेतील प्रत्यक्ष महसूल सध्या २०-२५ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज असून या दशकाच्या अखेरपर्यंत तो १००-१२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

अहवालातील प्रमुख निष्कर्षांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :

सध्या सृजनशील निर्मात्यांचा ३०% पेक्षा जास्त ग्राहकांच्या निर्णयांवर असलेल्या प्रभावामुळे आज ३५०-४०० अब्ज डॉलर्सचा खर्च केला जातो.

या परिसंस्थेचा जेन झेड आणि महानगर केंद्रांच्या पलीकडे विस्तार होत असून विविध वयोगट आणि विविध श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचत आहे.

शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ (लघु कालावधीची दृश्ये) हे सर्वाधिक पाहिले जाणारे आशयांचे (कंटेंट) स्वरूप आहे, ज्यात विनोदी, चित्रपट, दैनंदिन मालिका आणि फॅशन यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.

ब्रँड स्ट्रॅटेजींचा उदय होत असून वेगाने आशय निर्मितीवर, सर्जनशील निर्मिती स्वातंत्र्यावर, विविध प्रकारच्या ग्राहकांना विचारात घेण्यावर आणि फलनिष्पत्ती आधारित चाचणीवर जास्तीत जास्त भर दिला जात आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आभासी भेटवस्तू, लाईव्ह कॉमर्स आणि सदस्यत्वाचे फायदे अशी आर्थिक आकर्षणे असलेली उत्पन्नाची विविध साधने तयार केली जात आहेत.

येत्या काही वर्षात हे ब्रँड सर्जनशील निर्मात्यांच्या बाजारपेठेत आपली गुंतवणूक १.५ ते ३ पट करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे विपणन आणि वाणिज्य क्षेत्रावर डिजिटल सर्जनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेच्या प्रभावाचे संकेत मिळत आहेत.

हा बीसीजी अहवाल उद्या मुंबईत वेव्हज २०२५ मध्ये औपचारिकपणे प्रकाशित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या वेव्हज २०२५ या भव्य कार्यक्रमात  एआय (AI), सोशल मीडिया, एव्हीजीसी (AVGC) क्षेत्र आणि चित्रपट यातील उदयोन्मुख पैलूंवरील चर्चा डिजिटल माध्यम क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दाखवत आहे.

00000

सागरकुमार कांबळे/ससं/

लिगल करंट्स : अ रेग्युलॅरिटी हॅण्डबुक ऑन इंडिया’स मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंन्ट सेक्टर २०२५ उद्या प्रकाशित होणार

मुंबई, २ :- वेव्हज् २०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद) –  हे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचे वळण असून, या परिषदेदरम्यान Legal Currents: A Regulatory Handbook on India’s Media & Entertainment Sector २०२५ अर्थात “कायदेविषयक घडामोडी : भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीची नियामक पुस्तिका २०२५” या महत्त्वाच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन उद्या होणार आहे. वेव्हज-२०२५ या शिखर परिषदेअंतर्गत ज्ञान आणि माहितीविषयक भागीदारांपैकी एक असलेल्या खेतान अँड कंपनीने ही अहवाल पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेतून भारताच्या बहुआयामी  माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या वाढत्या क्षमतेला आकार देणाऱ्या तसेच या क्षेत्राला चालना देणाऱ्या नियामक संरचनांची रूपरेषा मांडली आहे.

भारताचे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व बदलातून जात आहे. नेमक्या या महत्वाच्या काळातच ही कायदेविषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली जात आहे. या पुस्तिकेत मांडलेल्या नियामक आराखड्यामुळे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्राशी संबंधितांना प्रसारण तसेच माहिती आधारित मनोरंजन, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता,  डिजिटल माध्यमे आणि चित्रपट यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करता आला आहे. अलिकडच्या काळात भारतात इंटरनेटच्या सुलभ उपलब्धतेत झपाट्याने वाढ झाली आहे, तसेच भारतातील आशय सामग्रीच्या वापराचे स्वरुपही बदलले असून, सध्या भारत एका सक्रिय आणि स्वीकारार्ह प्रशासनाच्यावतीने सुरू केलेल्या गेलेल्या एका डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. याअंतर्गत सरकारने आजही देशात मोठा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवलेल्या मुद्रित तसेच दूरचित्रवाणी आणि नभोवाणी सारख्या माध्यमांकरता नियामक प्रक्रिया सुलभ आणि अनुकूल केल्या आहेत.

मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये या क्षेत्राशीसंबंधित परदेशातील व्यक्ति आणि व्यावसायिकांसाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणे, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या स्थापित करणे आणि आपल्या प्रकल्पांचे कार्यान्वयन करणे या प्रक्रिया सुलभ करण्यासह त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या प्रमुख उपक्रमांचा तसेच कायदेविषयक महत्वाच्या तरतुदींविषयींचा तपशील दिलेला आहे.  केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने निर्मिती तसेच सह-निर्मितीसाठी  प्रोत्साहनपर लाभ मिळवून देणाऱ्या योजनाही राबवल्या जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत आशय सामग्री निर्मितीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

जाहिरात, ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल मीडिया यासारख्या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित उद्योग व्यावसायिक संस्था आणि सरकारमध्ये परस्पर सहकार्यपूर्ण भागिदाऱ्याही प्रस्थापित झाल्या आहेत. यामुळे या उद्योग क्षेत्राशी संबंधित भागधारकांना आपल्या प्रकल्पांच्या कार्यान्वयासाठी  लवचिकता प्राप्त झाली असून, त्यांच्याद्वारे नियमांच्या अनुपालनाचीही सुनिश्चिती होऊ शकली आहे.

आज भारत आशय निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिकाधिक भक्कम करू लागला आहे, अशावेळी आजच्या बहुआयामी, तंत्रज्ञानाधारित माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भागधारकांसाठी एक महत्त्वाचे संसाधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन केले जात आहे.

0000

सागरकुमार कांबळे/ससं/

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...