रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 127

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध

मुंबई, १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन करून डाउनलोड करता येतील.

परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना व मार्गदर्शक तत्त्वे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात. सूचनांचे उल्लंघन केल्यास आयोग उमेदवारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यात अडचण असल्यास उमेदवारांनी contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा अथवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर आवश्यक ती मदत मिळवता येईल असे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

मुंबई 10: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक 18 मे 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

निर्धारित वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आयोगाने संकेतस्थळावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्यांचे उल्लंघन केल्यास उमेदवारावर कारवाई होऊ शकते. प्रवेश प्रमाणपत्र मिळविताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत ईमेल किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

संपर्क: contact-secretary@mpsc.gov.in

दूरध्वनी क्र. ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२

वेबसाइट: https://mpsc.gov.in | https://mpsconline.gov.in

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

 

 

बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट 

मुंबई, दि. १० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी)  संस्थेत  मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय  मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट म्हणाले, वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालये, बार्टी मुख्यालय, उपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ या मागणीवर  समाधानकारक तोडगा निघाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याची भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त करुन सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांचे आभार मानले आहेत.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

पुणे, दि. 10 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कुबेर, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला.

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 10 : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाली अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.

जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.

भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वारीमध्ये स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन सुरू करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसुल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे / मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्स अॅपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नये, याकरिता लिंक ओपन करून फॉर्म भरण्याबाबतही कळविले जात नाही.

तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्रव्यवहार केला जातो. सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी फोन पे / गूगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे / मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी/ कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील मच्छिमार  व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीबरोबरच कृषीसंलग्न पशुपालन, मत्स्यपालन, फळे, भाजीपाला या क्षेत्रांवर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील मत्स्य व्यवसायिकांचे हे योगदान लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक तसेच यामध्ये प्रतवारी, आवेष्टन, साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे तसेच स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगारनिर्मितीत मोठा हातभार लागणार आहे. त्याकरिताच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या विविध सुविधा आणि सवलती या आता मत्स्य व्यवसाय क्षेत्रालाही या शासन निर्णयामुळे मिळणार आहेत.

या निर्णयामुळे मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी दराने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड याचा लाभ दिला जाणार आहे. बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभही मत्स्य क्षेत्रात देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संदर्भात  देण्यात येणारे लाभ यापुढे मत्स्य व्यवसायिकांना देण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

या शासन निर्णयात मच्छिमार, मत्स्यसंवर्धक,  मत्स्य व्यवसायिक , मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज,  मत्स्य बोटुकली संवर्धक, मत्स्य व्यवस्थापन अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित संज्ञांच्या प्रथमच सुस्पष्ट व्याख्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादक त्याचबरोबर मत्स्य व्यावसायिक आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कामगार क्षेत्राला या शासन निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल  

पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी व थेट बाजारा बाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत. खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड, बाजार ओटे, गोडावुन, रस्ते या सह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांचे खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्या संदर्भात सूचना देण्यात याव्या. परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खाजगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. व्यवहार पारदर्शक नसलेल्याचे परवाने रद्द करण्याची  करण्यात यावी. तसेच सर्व खाजगी व थेट बाजाराचे लेखा परीक्षण करण्यात यावे असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. ते पणन संचालनायाच्या बैठकीत बोलत होते.

पणन संचालनायाची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पणन संचालक विकास रसाळ, उपसंचालक मोहन निंबाळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे या सह अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री श्री रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती सह खाजगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेला मालाचे पैसे शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने  देण्यात यावे. प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले का? यासंदर्भात आढावा घेण्यात यावा. शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवानाधारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. नवीन परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना जलद गतीने प्रक्रिया करण्यात यावी. तसेच परवाना देताना बँक गॅरंटी घेण्यात यावी. राज्यातील ग्राहक सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्था,फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करावे.

राज्यात मोठ्या क्षेत्रावर फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात 466 फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था नोंदणीकृत असून त्यापैकी 453 संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून उत्पादित फळे आणि भाजीपाला पिकांची साठवणूक करणे ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पणन संचालयाने नियोजन करावे. महामँगो, महाग्रेप्स, महाबनाना, महाऑरेंज, महाआनार, अशा संस्थांना त्यांच्या संबंधित कृषी मालाला निर्यात करण्याचे संदर्भात चालना देण्यात यावी. असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा

शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री  हक्काची त्यांना माहिती व्हावी,यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केली.

00000

 

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढत आहे. शिवाय उत्पादन खर्च कमी होण्यास देखील मदत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची प्रक्रिया देखील सोपी आणि कार्यक्षम होत असल्याने आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री रावराणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे आदी उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तयार केलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांचे QR Code फलकाचे विमोचन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात झाले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती नाईकनवरे यांनी खरीप हंगाम सन 2025-26 मध्ये नियोजित योजना व कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

पालकमंत्री म्हणाले की, कमी खर्चात उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. भात शेती किंवा इतर पिक घेताना नवीन प्रयोग करण्यावर भर द्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन द्या. प्रत्येक ग्राम व तालुका स्तरावरील प्रयोगशील तसेच प्रगतशील शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश दिले. तसेच विभागाने विविध कृषी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रचार व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये शाश्वत वाढ  करण्याचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना नवीन नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात नवीन काय करता येईल यासाठी सर्व कृषि विभागाने आराखडा तयार करावा. आगामी  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते  उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले.

 खरीप हंगाम 2025 चे नियोजन :-

खरीप हंगामातील भातपिकासाठी 56255 हेक्टर क्षेत्रावर नियोजन

तांदूळ उत्पादकता –  3100 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष

खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी 1217 हेक्टर क्षेत्रावर नियोजन

नाचणी पिकासाठी 2500 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष

 भात बियाणे मागणी – 9351.84  क्विंटल   आज अखेर पुरवठा  – 3187  क्विंटल

खते मागणी – 19557  मे.टन   – आज अखेर उपलब्धता -2601  मे.टन

 निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरीता  जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत.  जिल्हा स्तरावर तालुका स्तरांवर कृषि निविष्ठा तक्रार कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी आणि दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करतानाच उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकीकृत विकास आराखड्याच्या प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी शिवनई शिवारातील उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथळकर, देविदास वायदंडे, नितीन घोरपडे, संदीप पालवे, सिनेट सदस्य विजय सोनवणे, प्राचार्य श्री. भांबर, संपत काळे, सचिन गोरडे, बाकेराव बस्ते आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसराचा सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा. उपकेंद्राच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घ्यावा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. वैद्य यांनी उपकेंद्राची माहिती देतानाच परिसरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...